कादंबरी भाग २

Story Of A Girl
कादंबरी भाग २

मागील भागाचा सारांश: कादंबरी कधीही आई होऊ शकणार नाही, हे तिचे रिपोर्ट्स बघून डॉक्टरांनी सांगितले. सरोगेट मदर हा उपचार करण्याचा पर्याय डॉक्टरांनी शेखर व तिच्यापुढे ठेवला होता. घरी आल्यावर शेखरच्या आईला जेव्हा कादंबरीच्या रिपोर्ट्स बद्दल कळले, तेव्हा तिने कादंबरीला घटस्फोट देऊन टाक, असे स्पष्टपणे सांगितले, तसेच कादंबरीचा पाणउताराही केला.

आता बघूया पुढे….

हॉस्पिटल मधून येऊन जवळपास दोन तास झाले होते. कादंबरीच्या डोळ्यातील अश्रूही सुकले होते. रिपोर्ट्स चांगले यावे, म्हणून सासूबाईंनी कादंबरीला सकाळपासून उपवास ठेवायला सांगितला होता. कादंबरीने सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं.

डोळ्यातून सतत वाहणारं पाणी, डोक्यातील विचार आणि उपाशी पोट यामुळे तिचं डोकं दुखायला लागलं होतं. रुमच्या बाहेर पडून किचनमध्ये जाऊन किमान थंड दूध प्यावं असं तिला वाटत होतं, पण सासूबाई त्यावर काय प्रतिक्रिया देतील? हा विचार करुन ती रुममध्येचं बसून होती.

पुढील पंधरा मिनिटाने शेखर रुममध्ये आला, त्याच्या हातात जेवणाचं ताट होतं.

"कादंबरी, तू सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये. तू जेवण करुन घे, नाहीतर तुझी तब्येत बिघडेल." कादंबरी समोर जेवणाचं ताट ठेवत शेखर म्हणाला.

शेखरच्या डोळयात आपल्याबद्दल दिसणारी काळजी बघून कादंबरीला थोडासा का होईना दिलासा मिळाला होता. कादंबरी पाणावलेल्या डोळ्याने शेखरकडे एकटक बघत होती.

शेखरने ताटातील पोळीचा तुकडा मोडला, भाजीत बुडवून कादंबरीला भरवला. कादंबरीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरु झाल्या होत्या. इतक्या वेळ शेखर आपल्या बाजूने नाही, असं तिला वाटत होतं. शेखरचं आपल्यावर असणार प्रेम बघून तिला छान वाटत होतं.

शेखरने कादंबरीला बळजबरी एक पोळी आपल्या हाताने खायला लावली. पोटात अन्न गेल्याने कादंबरीची डोकेदुखी कमी झाली होती. कादंबरीचे जेवण झाल्यावर शेखर जेवणाचं ताट किचनमध्ये ठेऊन आला व तिच्यासाठी पाणी घेऊन आला. पाणी पिऊन झाल्यावर कादंबरी म्हणाली,

"शेखर, तुम्ही आईंसोबत सरोगेट मदर बद्दल बोललात का?"

"आई थोडी शांत झाल्यावर मी आई व पप्पांना सरोगेट मदर बद्दल सांगितलं, पण आईला फारसं पटलेलं दिसत नाहीये." शेखरने उत्तर दिले.

"आईंना पटलं नाही, तर तुम्ही खरंच मला घटस्फोट द्याल का?" कादंबरीने विचारले.

"कादंबरी, मी या प्रश्नाचं उत्तर तुला देऊ शकत नाही." शेखरने सांगितले.

"म्हणजे? तुमच्या बोलण्याचा अर्थ मी काय समजायचा?" कादंबरी आश्चर्याने म्हणाली.

"कादंबरी, मी या सगळ्याबद्दल आईसोबत लगेच बोलू शकत नाहीये. तू एकदा आईची मनस्थिती समजून घे ना. आईच्या सगळ्या मैत्रिणी आजी झाल्या आहेत, म्हणून तिची जास्त चिडचिड होत आहे. आईचा स्वभाव फटकळ आहे, हे तुलाही चांगलंच ठाऊक आहे. तू आता त्या छोट्याशा गोष्टीचा इतका मोठा बाऊ का करते आहेस?" शेखर म्हणाला.

"शेखर, तुम्हाला ही एक छोटीशी गोष्ट वाटते. आई इतरवेळी मला बरंच काही बोलायच्या, तेव्हाही कधीच तुम्ही माझ्या बाजूने त्यांच्या सोबत बोलला नाहीत. मला तेव्हा काहीच वाटत नव्हतं. तुम्हाला माझी बाजू घेऊन आईंना दुखवायचं नव्हतं, हे मी मान्य केलं होतं. शेखर, आज आई जे काही बोलल्या त्याने मी किती दुखावले गेले असेल, याचा विचार तुम्ही केला का? आपण कधीच आई होऊ शकणार नाही, हे जेव्हा एखाद्या स्त्रीला समजतं, तेव्हा तिची मनस्थिती काय असेल? हे तुम्ही समजून घेतलं का?

आईंच्या फटकळ स्वभावामुळे त्यांची प्रतिक्रिया तशी असेल, हे मी समजू शकते, पण तुम्हाला एकदा त्यांना बोलण्यापासून थांबवता आलं असतं. आता ते तुम्हाला जमलं नाही, तर निदान त्यानंतर तरी तुम्ही माझी बाजू त्यांच्यासमोर मांडायला हवी होती.

शेखर, लग्नात सप्तपदीच्या वेळी हातात हात घालून अग्नीच्या साक्षीने आपण सात वचनं घेतली होती. संकट काळात आपण दोघांनी एकमेकांच्या सोबत राहणे अपेक्षित आहे. शेखर, ही वेळ खूप नाजूक आहे. तुम्हाला कळत कसं नाहीये. मी एकच प्रश्न विचारला होता की, तुम्ही मला घटस्फोट द्याल का? तर याचं उत्तर एका शब्दात 'नाही' हे मला अपेक्षित होतं." कादंबरीने मनात साचलेलं सर्व काही बाहेर काढलं.

"कादंबरी, तुझी ही जी काही वायफळ बडबड सुरु आहे, त्याला मला प्रतिउत्तर द्यावं वाटत नाही. उद्या तुझे बाबा आणि भाऊ येणार आहे, तेव्हा जो सोक्षमोक्ष होईल तो होईल. आता कितीही बडबड केली, तरी काही फायदा नाही. तुही शांत झोप आणि मलाही झोपूदे. मी टेरेसवर झोपायला चाललो आहे. मोकळ्या हवेत झोपल्यावर जरा बरं वाटेल." शेखरने आपली प्रतिक्रिया दिली.

एक उशी आणि चादर घेऊन शेखर टेरेसवर झोपायला निघून गेला. शेखरचं कोणतं रुप खरं आहे? हेच कादंबरीला समजत नव्हतं. शेखर व तिच्यातील बंध तुटल्यासारखा तिला जाणवला होता.

"सात जन्म हाच नवरा मिळावा
म्हणून तिने वड पुजला,
तो तर याच जन्मात तिला
कंटाळला."

जेवण भरवणारा शेखर बघून तिला आशेचा किरण दिसू लागला होता. शेखरचं नंतरचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यासमोर काळाकुट्ट अंधार झाला होता. आता या अंधारातून उजेडाकडे जाणारी वाट कशी सापडेल? याचा विचार कादंबरी करत होती.

छताकडे बघत कादंबरी विचार करत होती. उद्याचा दिवस आपल्या आयुष्यात काय घेऊन येणार आहे? हा विचार तिच्या डोक्यात सुरु होता. जेव्हा डोळे थकले, तेव्हा तिला झोप लागली.

"कादंबरी, उठ." शेखरच्या आवाजाने तिला जाग आली.

कादंबरीने हळूच डोळे उघडले. रुमच्या बाहेरुन येणारा गोंधळ ऐकून कादंबरीने शेखरकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले.

"तुझे बाबा आणि भाऊ आले आहेत. तू उठ, फ्रेश हो आणि तुझं सामान भरायला घे." शेखरने सांगितले.

कादंबरी खाडकन आपल्या जागेवरुन उभी राहिली.
"मी माझं सामान का भरु?" कादंबरीने विचारले.

"कादंबरी, काल घडलेलं तू सगळंच विसरली आहेस का? आई काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. तू आत्ता तुझ्या बाबांसोबत माहेरी जा. तू इथे असशील, तर आईची बडबड सतत सुरु राहिल.

आईचा राग निवळल्यावर मी आईला निवांत सगळं समजावून सांगतो, तोपर्यंत तू माहेरी जा. मी स्वतः तुला घ्यायला येईल आणि लवकरच." शेखरने तिला आश्वासन दिले.

कादंबरीने अंघोळ केली. आपले कपडे बॅगमध्ये भरले. आपल्या रुममधून बाहेर पडताना कादंबरीला भरुन आलं होतं. पुन्हा या रुममध्ये यायलाच मिळालं नाही, तर पुढे काय? हा विचार तिच्या मनात डोकावत होता. ह्याच रुममध्ये बसून शेखर व तिने भविष्याची स्वप्नं रंगवली होती.

"तुमच्या या खोट्या नाण्याला घेऊन जा आणि परत आमच्या दारात पाठवू नका." कादंबरी घराबाहेर पडत असताना तिच्या सासूबाई म्हणाल्या.

कादंबरी खाली मान घालून तिच्या भावाच्या गाडीत बसली.

लग्न झाल्यावर वाजत गाजत मानाने कादंबरीने शेखरचा हात धरुन ज्या घरात आली होती, त्या घरातून अपमान सहन करुन तिला परतावे लागत होते. कादंबरीच्या मनाला असह्य वेदना होत होत्या.

इतरवेळी भावाच्या गाडीत बसून माहेरी जाताना कादंबरीच्या आनंदाला पारावार उरत नव्हती, आज मात्र माहेरच्या रस्त्याला गाडी लागल्यावर तिला अश्रू अनावर होत होते.

"बाबा, हा शेखर आईच्या हाताखालचा बैल आहे का? अहो एक शब्दही तो बोलला नाही. शेखरची आई नको ते बोलली." कादंबरीचा भाऊ अजय रागाने बडबड करत होता.

"अजय, आपलंच नशीब फुटकं असं म्हणायचं. आपलं नाणं खोटं असल्यावर लोकं बोलणारच ना." बाबांनी प्रतिक्रिया दिली.

बाबांच्या त्या बोलण्याने कादंबरी अजूनच दुखावली गेली. गाडीत बसल्यापासून एकदाही तिच्या भावाने किंवा बाबांनी तिची विचारपूस केली नव्हती.

"बाबा, आता पुढे काय करायचं?" अजयने विचारले.

"मला तर काही सुचत नाहीये. शेखरच्या घरच्यांचं वर्तन बघून ते कादंबरीला स्विकारतील असं वाटत नाही. घटस्फोटाच्या नोटीसची वाट बघू. नातेवाईकांना, शेजारी-पाजारी हे सगळं कळल्यावर त्यांचं बोलणंही ऐकून घ्यावं लागेल." बाबांनी सांगितले.

अजय पुढे म्हणाला,
"बाबा, ते सगळं ठीक आहे, पण कादंबरीला आयुष्यभर आपणच सांभाळायचं का? रोहिणी आणि तिचं पटलंही पाहिजे. शिवाय घरात एक माणूस वाढला की सगळाच खर्च वाढेल."

"आपण त्या सगळ्यावर नंतर विचार करु. आता सध्या आपली अजून बदनामी न होता या दोघांचा घटस्फोट करुन घेऊयात." बाबांनी उत्तर दिले.

आपल्या भावाचं व बाबांचं बोलणं ऐकून कादंबरी आश्चर्यचकित होत होती. बोलताना कोणीच कादंबरीच्या मनाचा विचार करत नव्हते.

कादंबरीच्या वडिलांच्या घराजवळ गाडी येऊन थांबली. तिचे बाबा व भाऊ दोघेही गाडीतून उतरुन घरात गेले. कादंबरीला गाडीतून उतरुन घरात जाण्याची इच्छाच होत नव्हती.

ज्या माहेरी येण्यासाठी ती आतुर व्हायची, आज त्याच घरात जायला तिला नकोसं झालं होतं. इतरवेळी कादंबरी घरी आली की, तिच्या स्वागताला आई, वहिनी, भाचा-भाची दारात येऊन उभे राहिलेले असायचे. आज मात्र कोणीच दिसत नव्हते. कादंबरीने आपली सामानाची बॅग गाडीतून खाली घेतली व ती घरात गेली.

हॉलमध्ये कोणीच नव्हतं. कादंबरीची नजर आईला शोधत होती. कादंबरी स्वयंपाकघरात डोकावली, तर तिची वहिनी तिथे होती.

"वहिनी, आई कुठे आहे?" कादंबरीने विचारले.

"आई मंदिरात गेल्या असतील." तिच्या वहिनीने तिच्याकडे न बघता उत्तर दिले.

कादंबरीच्या वहिनीने तिला पाणी सुद्धा विचारले नाही. कादंबरी तिची बॅग घेऊन तिच्या रुमच्या दिशेने निघाली होती.

"ताई, तुम्ही खालच्या रुममध्ये रहा. तुमच्या रुममध्ये मुलांची खेळणी आहेत. दिवसभर ते तिथेच खेळतात." वहिनीने सांगितले.

कादंबरी खालच्या रुममध्ये गेली. एक पलंग आणि एक कपाट मावेल एवढी ती रुम होती. आपली बॅग रुममध्ये ठेवून पलंगावर कादंबरी बसली.

कादंबरीची आई तरी तिच्याशी नीट बोलेल का? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all