Mar 03, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

कादंबरी भाग १

Read Later
कादंबरी भाग १
कादंबरी भाग १

'श्रद्धा असेल तर शक्य आहे.'

'अनुभवा स्पर्श मातृत्वाचा.'

'मातृत्वाच्या आनंदाहून आनंद नाही दुजा.'

'नवीन सदस्याचे स्वागत करा, कौटुंबिक सुखाचा आनंद घ्या.'

'या इवल्याशा पावलाचं तुमच्या आयुष्यात स्वागत करा.'

वेटींग एरियात बसून कादंबरी हॉस्पिटलच्या भिंतीवरील एकेक पोस्टर वाचत होती. पोस्टर वाचून चेहऱ्यावर आनंदही होता आणि रिपोर्ट्स काय येतील? याची मनात भीतीही होती.

"अभिनंदन, तुमच्या घरात एका गोंडस, नाजूक परीचे आगमन झाले आहे." ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभ्या असलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना नर्सने हसतमुखाने सांगितले.

मुलगी झाल्याचं कळताच बाळाचे आजोबा बर्फीचा बॉक्स घेऊन वेटींग एरियात बसलेल्या सगळ्यांना बर्फी वाटत होते. कादंबरी जवळ येऊन त्यांनी बर्फी दिली, तेव्हा कादंबरीने त्यांना विचारले,

"काका, तुम्हाला नात होईल याची इतकी खात्री होती की, तुम्ही आधीच बर्फी घेऊन आलात?"

बाळाचे आजोबा हसून म्हणाले,
"बर्फी आणि पेढे दोन्ही आणलेले होते. माझ्या मुलीला लग्नानंतर दहा वर्षांनी मुलगी झाली आहे. आजोबा होण्याचा आनंद काहीतरी निराळाच असतो."

"शेखर, आपल्याही आयुष्यात हा दिवस येईल ना?" कादंबरीने शेखरकडे त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारले.

शेखर कादंबरीचा हात हातात घेऊन म्हणाला,
"देवाच्या मनात असेल तर नक्कीच हा दिवस आपल्या आयुष्यात येईल. कादंबरी, आपण आपल्या परीने सगळे प्रयत्न करुन बघितले आहेत. आता रिपोर्ट बघून डॉक्टर काय सांगतील? त्यावर पुढचं भविष्य ठरेल."

शेखर बोलत असताना त्याला कोणाचातरी फोन आला, म्हणून तो फोनवर बोलण्यासाठी बाजूला निघून गेला.

नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाच्या कुटुंबाकडे बघून कादंबरीच्या चेहऱ्यावरही हसू उमलले. कादंबरीच्या मनात पुन्हा तोच विचार सुरु झाला,
"रिपोर्ट व्यवस्थित असतील ना? माझ्या आयुष्यातही हा अनमोल क्षण येईल ना? मला मातृत्वाचा स्पर्श अनुभवायला मिळेल ना?"

कादंबरी आपल्या विचारांच्या तंद्रीत मग्न असताना शेखर तिच्या जवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला,
"कादंबरी, डॉक्टरांनी आपल्याला बोलावलं आहे."

डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाण्याआधी कादंबरीने डोळे मिटून खोल श्वास घेऊन देवाचे नाव घेतले. शेखरच्या हाताला धरुन तिने डॉक्टरांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. डॉक्टरांनी आपल्या समोरील खुर्चीत शेखर व कादंबरीला बसायला सांगितले. डॉक्टरांसमोर कादंबरी व शेखरचे रिपोर्ट्स होते.

'डोळयात आई होण्याची आस,
मनात धडधड,
सुकलेला घसा,
पोटात भीतीचा गोळा.'

कादंबरीने शेखरचा हात घट्ट धरुन ठेवला होता. डॉक्टरांनी फाईल मधील डोकं वर काढून कादंबरी व शेखरकडे बघितले. टेबलवरील पाण्याचा ग्लास हातात घेऊन ते कादंबरी समोर धरुन म्हणाले,

"मिसेस कादंबरी, आत्ता यावेळी तुमच्या मनात जी चलबिचल सुरु आहे, त्याचा अंदाज तुमच्या चेहऱ्यावरुन येतो आहे. हे पाणी प्या आणि थोडं शांत व्हा."

कादंबरीने पाण्याचा ग्लास हातात घेऊन घटघट पाणी ती प्यायली.

"डॉक्टर, रिपोर्ट काय आलेत? काही मोठा प्रॉब्लेम आहे का?" शेखरने विचारले.

"म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही." डॉक्टरांनी उत्तर दिले.

"डॉक्टर, प्लिज शब्दांचे खेळ खेळू नका. रिपोर्ट जे सांगत आहेत, ते सरळसरळ सांगून टाका. माझं हृदय अतिवेगाने धडधडत आहे." कादंबरी म्हणाली.

यावर डॉक्टर म्हणाले,
"मी तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी हे सगळ बोलत होतो. मी आता डायरेक्ट मुद्द्यावर येतो. तुमच्या लग्नाला दोन वर्षे होऊन गेलीत, तरी तुम्हाला मुल-बाळ होत नाहीये, म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात. आपण तुमच्या दोघांच्या सगळ्या तपासण्या केल्यात. रिपोर्ट्स माझ्या हातात आहे.

आता मी जे सांगतो, ते लक्षपूर्वक ऐका. तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे की, त्याचा अवलंब करुन आपण अशक्य ते शक्य करुन दाखवू शकतो. इथे येणाऱ्या प्रत्येक पेशंटमध्ये काहीना काही प्रॉब्लेम असतो. मी व माझी टीम मिळून त्या प्रॉब्लेमवर उपचार करतो. आजपर्यंत ९९% पेशंटवर उपचार करण्यात मला यश आले आहे.

या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचा विश्वास हवा. विचारांत सकारात्मकता असेल तर असाध्य ते साध्य होऊ शकते.

तुमच्या दोघांचे रिपोर्ट बघता मिसेस कादंबरी तुम्ही कधीही आई होऊ शकणार नाही. मिस्टर शेखर तुमच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला धक्का बसणे स्वाभाविक आहे, पण यावरही आपल्याकडे उपचार उपलब्ध आहे."

कादंबरीच्या डोळयात तरळलेले अश्रू बघून डॉक्टरांनी त्यांचं बोलणं मध्येच थांबवलं. शेखरने कादंबरीकडे बघून 'रडू नकोस, मी आहे' हे नजरेने सांगितले.

"डॉक्टर, यावर उपचार काय?" शेखरने विचारले.

"सरोगेट मदर ही संकल्पना तुम्ही ऐकली असेलचं. बाळ तुमचेच असेल, फक्त ते दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात वाढेल." डॉक्टरांनी सांगितले.

"डॉक्टर, आम्ही घरी जाऊन यावर चर्चा करतो आणि तुम्हाला येऊन लवकरच भेटतो, मग आपण यावर अधिक चर्चा करु." शेखरने एका हातात फाईल घेतली, दुसऱ्या हाताने कादंबरीचा हात धरला आणि तिला तो केबिनच्या बाहेर घेऊन आला.

वेटींग एरियातील एका खुर्चीत त्याने कादंबरीला बसवले. शेजारी असणाऱ्या मेडीकल मधून त्याने पाण्याची बाटली आणली. पाण्याच्या बाटलीचे झाकण उघडून बाटली कादंबरी समोर धरुन तो म्हणाला,

"कादंबरी, पाणी पी."

पाणावलेल्या डोळ्यांनी कादंबरीने शेखरकडे बघितले. शेखरला तिच्या डोळ्यातील प्रश्न कळला होता.

"कादंबरी, डॉक्टर म्हणालेत की, यावरही उपचार आहेत. अशी हतबल होऊ नकोस. आपण घरी जाऊन आई-पप्पांसोबत याबद्दल चर्चा करुयात. मला खात्री आहे की, आई- पप्पा या सगळ्याला तयार होतील. ते काही म्हणाले तर मी त्यांना समजावून सांगेल." शेखरने कादंबरीला धीर दिला.

कादंबरीने यावर आपली काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

"कादंबरी, आपल्याला आता निघायला हवं. आई-पप्पा आपली वाट बघत असतील." शेखर असं म्हणाल्यावर कादंबरी आपल्या जागेवरुन उठली. डोळ्यातील अश्रूंमुळे तिच्या पुढची वाट धूसर झाली होती. शेखरच्या पाठोपाठ ती चालत होती.

गाडीत बसल्यावरही ती काहीच बोलली नव्हती. डोळे मिटून शांत बसली होती. लग्नानंतरची दोन वर्षे तिच्या डोळ्यासमोरुन जात होती. तिला मुलं होत नाही, यावरुन तिने बरंच काही ऐकलं होतं.

कोणाच्याही लग्नाला गेलं की, 'लग्नाला एक वर्ष झालं, तरी अजून हिला काहीच झालं नाहीये. अमुकच्या सुनेला तीन महिन्यात दिवस राहिले.' अश्या प्रकारचे टोमणे नातेवाईकांच्या तोंडून तिला ऐकायला मिळत होते. एकवेळेस बाहेरचे लोकं काही बोलले तरी त्याचं तिला फार काही वाटत नव्हतं, पण तिच्या सासूबाई तिला येता-जाता टोमणे मारत असायच्या.

मुल व्हावं म्हणून तिच्या सासूबाईंनी सोळा सोमवारचं कडक व्रत करायला सांगितलं होतं. कादंबरीला मनापासून देवाचं करणं आवडत नव्हतं, पण सासूबाईंच्या इच्छेखातर तिला सकाळ- संध्याकाळ देवासमोर बसून जप करावा लागत होता.

कादंबरी मध्ये दोष आहे, हे जेव्हा सासूबाईंना कळेल तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असेल? हा विचार करुनच तिला एसी गाडीत बसून सुद्धा दरदरुन घाम फुटला होता.

विचारांच्या धुंदीत ते घराजवळ कधी पोहोचले? हे कादंबरीला कळलेही नाही.

"कादंबरी, घर आलंय." शेखर म्हणाला.

कादंबरीने इकडे तिकडे बघितलं, तर खरंच ते घराजवळ पोहोचले होते. शेखर एव्हाना घरात निघून गेला सुद्धा होता. कादंबरी हळूच गाडीतून उतरली. एखाद्या अपराध्याप्रमाणे ती घराच्या दिशेने एकेक पाऊल टाकत होती.

"कादंबरी, तुझ्या पायाला मेहंदी लावली आहे का? किती हळुवारपणे येते आहेस? डॉक्टरांनी काय सांगितलं? हे ऐकण्यासाठी आमचे कान आतुरले आहेत. तू आल्याशिवाय शेखर काही सांगायलाही तयार नव्हता. पटकन घरात ये आणि सोप्यावर बस." कादंबरीला दरवाजात बघून तिच्या सासूबाई तोऱ्यात म्हणाल्या.

कादंबरी खाली मान घालून सोप्यावर जाऊन बसली. कादंबरीने वर मान करुन सासू-सासऱ्यांकडे बघितलेही नाही. सासूबाईंनी शेखरला पाणी आणून दिले, पण कादंबरीला पाणी दिले नाही. कादंबरीच्या घशाला कोरड पडली होती, पण स्वयंपाक घरात जाऊन पाणी पिण्याचे त्राण तिच्यात नव्हते.

"शेखर, डॉक्टर काय म्हणाले?" शेखरच्या वडिलांनी विचारले.

"पप्पा, कादंबरी कधीच आई होऊ शकत नाही." शेखरने उत्तर दिले.

"मला वाटलंच होतं. तरी मी तुम्हाला सांगत होते की, माझ्या मावस भावाची मुलगी सून म्हणून घरात आणूयात, पण नाही तुम्हा दोघा बाप-लेकाला ही अवदसा आवडली होती. आता घ्या ही बया कधीच आई होऊ शकणार नाही. आपल्या घराला वंशज देऊ शकणार नाही. जी बाई आई होऊ शकत नाही, तिचा जन्माला येऊन फायदा तरी काय?

हिच्या आई-वडिलांनी त्यांचं खोटं नाणं आपल्या गळ्यात बांधून आपली फसवणूक केली आहे. अहो, हिच्या घरच्यांना फोन करुन बोलावून घ्या. शेखर वकिलासोबत चर्चा करुन घटस्फोटाचे कागदपत्रं तयार करुन घे.

तू आता लगेच लग्नासाठी उभा राहिलास तरी छपन्न पोरी तयार होतील. ए अवदसा इथे माझ्या डोळ्यासमोर काय बसलीस? तुझं सामान बांधायला घे. आजची रात्र ह्या घरातील तुझी शेवटची रात्र आहे, हे लक्षात ठेव." कादंबरीच्या सासूबाई एका दमात सगळं काही बोलून गेल्या.

कादंबरीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, तिने मोठ्या आशेने शेखरकडे बघितले, पण त्याने तिच्याकडे बघितलेही नव्हते आणि आपल्या आईला एवढं सगळं बोलण्यापासून थांबवलंही नव्हतं.

कादंबरी आपल्या रुममध्ये निघून गेली. कादंबरीने आपल्या रुमचा दरवाजा लावून घेतला आणि स्वतःला बेडवर झोकून दिले. डोळयातील पाणी आणि मनात उठणार विचारांचं काहूर काहीच थांबत नव्हतं.

ज्याचा हात धरुन या घरात आली होती, तोही तिच्या बाजूने काहीच बोलला नव्हता. इतरवेळीही तिच्या सासूबाई नाकातील केस जळतील इतक्या वाईट शब्दात तिचा पाणउतारा करायच्या. कादंबरी तो त्यांचा स्वभाव आहे, म्हणून सोडून द्यायची, त्यावेळीही शेखर कधीच त्याच्या आईला शांत करत नव्हता.

कादंबरीला पहिल्यांदा शेखरने आपल्या बाजूने थोडंफार बोलावं, या अश्या नाजूक वेळी त्याने आपल्या भावनांचा विचार करावा असं वाटत होतं. कादंबरी एकटीच रुममध्ये बसून आपल्या नशीबाला दोष देत रडत होती.

शेखर कादंबरीला घटस्फोट देईल की तिच्या बाजूने उभा राहिलं? हे बघूया पुढील भागात....

©®Dr Supriya Dighe

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//