कादंबरी भाग १५(अंतिम)

Story Of A Girl
कादंबरी भाग १५(अंतिम)

मागील भागाचा सारांश: कादंबरीच्या रिपोर्ट्स वरुन ती प्रेग्नंट असल्याचे समजले. तिला सुरुवातीला धक्का बसला होता, पण राघवने तिला सगळं काही सकारात्मकतेने स्विकारायला सांगितले. स्त्रीरोगतज्ञाकडे गेल्यावर कादंबरी व शेखरच्या दुसऱ्या बायकोची भेट झाली.

आता बघूया पुढे….

"ती स्त्री कोण होती? तू तिच्याशी एवढं काय बोलत होती?" गाडीत बसल्यावर राघवने विचारले.

"राघव, ती शेखरची दुसरी बायको आहे. तिचं नाव जानकी. लग्नाला वर्ष झालं तरी तिला दिवस जात नाही, म्हणून शेखरची आई तिच्यामागे लागली आहे. ह्या डॉक्टर मॅडम तिच्या ओळखीच्या असल्याने ती त्यांच्याकडे आली. तिच्या सगळ्या तपासण्या झाल्या, पण शेखर त्याच्या तपासण्या करायला येण्यासाठी टाळाटाळ करत आहे.

माझा अंदाज असा आहे की, शेखरने मागच्या वेळी माझे रिपोर्ट बदलले असतील, म्हणजेच स्वतःतील दोष उघडकीस न येऊ देण्यासाठी मला दोषी ठरवलं. मला हेच त्याचं खरं रुप सगळ्यांसमोर आणायचं आहे." कादंबरीने सविस्तरपणे सांगितले.

"बापरे! शेखरला हे सगळं करुन काय मिळालं असेल? एक ना एक दिवस त्याचं हे सत्य सगळ्यांसमोर येणारच होतं." राघव म्हणाला.

"आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी त्याच्याकडूनचं घेईल." कादंबरी काहीतरी विचार करत म्हणाली.

"तुझ्या आई-वडिलांना सुद्धा सगळं खरं कळायला हवं." राघव म्हणाला.

"हो. मी आईला फोन करुन उद्या दादा, बाबा आणि आईला बोलावलं. ते सहजासहजी येणार नाहीत, हेही माहीत होतं, म्हणून सांगितलं की, तू जर मला जन्म दिला असशील, माझ्यात तुमच्या दोघांचं रक्त असेल, तर उद्या काही करुन तिघेही जण नाशिकला या. अजून थोडं भावनिक बोलले. आता ते येतील, ह्याची मला गॅरंटी आहे. उद्या फक्त तुला सुट्टी घ्यावी लागेल." कादंबरीने सांगितले.

"अर्थात, मी तुझ्या लढाईत सोबत असणारच आहे. काही काळजी करु नकोस. हा तुझ्या आत्मसन्मानाचा लढा आहे. आपण दोघे मिळून हा लढा लढवूयात." राघव कादंबरीच्या हातात हात देऊन म्हणाला.

कादंबरीने भूमीला फोन करुन तिच्या प्रेग्नन्सी बद्दल सांगितले, तसेच शेखरच्या खरा चेहरा ती सर्वांसमोर आणणार असल्याचेही सांगितले. कादंबरी व राघव सोबत भूमीही शेखरच्या घरी जाणार होती.

कादंबरी व जानकी फोन, मॅसेज मधून एकमेकींच्या संपर्कात होत्या. दुसऱ्या दिवशी जानकीने शेखरला कंपनीत जाऊ दिले नव्हते. शेखरच्या आई-वडिलांना व स्वतःच्या आई-वडिलांना खोटं कारण सांगून अर्जंट घरी बोलावून घेतले.

"जानकी, तुझं हे काय सुरु आहे? तू मला कंपनीत जाऊ दिले नाहीस. तुझ्या आणि माझ्या दोघांच्या आई-बाबांना अर्जंट इकडे बोलावून घेतलं. आम्हाला सगळ्यांना एकत्र का जमवलं आहेस? हेही सांगत नाहीयेस." शेखर चिडून म्हणाला.

"तुम्हाला घाई कसली आहे. थोड्याच वेळात आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, मग तुम्हाला सगळं काही कळेल. थोडा धीर धरायला शिका." जानकी बोलत असतानाच दरवाजावरील बेल वाजली. जानकी दरवाजा उघडायला गेली.

दरवाजात कादंबरीचे आई-वडील व भाऊ उभे होते.
"तुम्ही आत या. कादंबरी ताई थोड्याच वेळात येतील." जानकीने त्यांना आता यायला सांगितले.

घरात आल्यावर शेखर व त्याच्या आई-वडिलांना बघून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कादंबरीचे आई-वडील आपल्या घरी काय करतात? हे शेखरला कळत नव्हते. जानकीने त्यांना बसायला खुर्च्या दिल्या आणि पाणी दिले. पुढील दहा-पंधरा मिनिटांनंतर कादंबरी, भूमी व राघव शेखरच्या घरी आले.

"जानकी, हे लोकं आपल्या घरी काय करत आहेत?" शेखरने रागात ओरडून विचारले.

जानकी काही बोलणार तेवढ्यात कादंबरीचा भाऊ म्हणाला,
"कादंबरी, आम्हाला इथे का बोलावलं आहे, तेही शेखरच्या घरी? आता त्यांचा आणि तुझा काय संबंध आहे?"

यावर कादंबरी म्हणाली,
"दादा, अश्या माणसासोबत माझा संबंध संपला, याचा मला आनंदच झाला आहे. तुमच्या मनात असणारे प्रश्न तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. मला त्याआधी शेखरच्या आईला काही प्रश्न विचारायचे आहेत. भूमी, मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे सगळं रेकॉर्ड झालं पाहिजे."

भूमीने मोबाईलचे व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरु केले.

"मी आई होऊ शकणार नाही, म्हणून तुम्ही शेखरला मला घटस्फोट द्यायला सांगितला. तुमच्या मते दोष माझ्यात होता, मग त्याची शिक्षा मला मिळायलाच हवी. मला ते सगळं मान्य आहे.

आता तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न दुसऱ्या मुलीशी लावलं. तिलाही दिवस जात नाही, म्हणून तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यायला सांगितले. आता या सगळ्यात तुम्हाला एकदाही असं वाटलं नाही की, दोष तुमच्या मुलात असू शकतो? प्रत्येकवेळी दोष हा बाईतचं कसा असेल?" कादंबरीने शेखरच्या आईसमोर उभे राहून तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारले.

"माझा मुलगा खरं सोनं आहे. आता त्याचं नशीब फुटकं की, त्याच्या नशिबात आधी तू आणि आता ही बया आली आहे." शेखरच्या आईने मोठया फुशारकीत सांगितले.

"बरं ठीक आहे. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आम्ही दोघेजण हॉस्पिटल मधून आल्यावर तुम्हाला शेखरने सरोगेट मदर याबद्दल काही सांगितले होते का?" तिरप्या डोळ्यांनी शेखरकडे बघत कादंबरीने विचारले.

"नाही. मला सरोगेट मदर काय असतं? हेही ठाऊक नाही. तुला घटस्फोट देताना शेखर पूर्णपणे तयार होता, त्याने एकदाही तुझी बाजू माझ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला नाही. शिवाय त्याच्या बाबांनी त्याला पुढे काही उपचार आहेत का? हेही विचारलं होतं, तर त्याने स्पष्टपणे नकार दिला होता.

मी त्यावेळी रागाच्या भरात तुला बरंच काही बोलले होते. तू घरातून गेल्यावर मी शांतपणे शेखरला त्याचं मत विचारलं होतं, तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगून टाकले होते की, त्याला तुझ्यापासून घटस्फोट घ्यायचा आहे म्हणून." शेखरची आई बोलल्यावर तो इकडे तिकडे बघत होता.

यावर कादंबरी टाळी वाजवून म्हणाली,
"मला म्हणे, आईला सरोगेट मदर मान्य नाही. ती तयार होत नाहीये. ज्याच्यात स्वतःमध्ये दोष आहे, तो काय दुसऱ्याची बाजू मांडेल?"

"कादंबरी, शेखरमध्ये दोष आहे, हे तू ठामपणे कसं म्हणू शकतेस?" कादंबरीच्या भावाने विचारले.

कादंबरी मिश्किल हसून म्हणाली,
"तुला आज मला दादा म्हणायला सुद्धा लाज वाटते आहे. ज्यावेळी माझ्यावर आई होणार नसल्याचे आरोप होत होते, तेव्हा तुला एकदाही असे वाटले नाही की, आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन कादंबरीची तपासणी करुन घेऊयात. हा घटस्फोट कसा टाळता येईल? हा प्रयत्न करुन बघूयात.

जिथं जन्मदात्या आई-बाबांनाही वाटलं नाही, तिथं तुझ्याकडून वेगळी काय अपेक्षा करु शकते? दादा, शेखरने त्यावेळी सगळे रिपोर्ट्स बदलले होते.

आता जानकी ताईंच्या ओळखीचे डॉक्टर असल्याने शेखरला रिपोर्ट बदलणे शक्य नसल्याने ते टेस्ट करण्यासाठी टाळाटाळ करत होते. प्रत्येक अपॉइंटमेंट ते कॅन्सल करत होते.

तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते, माझ्या लग्नाला मोजून तीन महिने झाले असतील आणि मी प्रेग्नंट आहे. मला जेव्हा हे कळलं, तेव्हा मीच मोठया धक्क्यात होते.

काल माझी व जानकीताईंची हॉस्पिटलमध्ये भेट झाली, तेव्हा त्यांचा नवरा शेखर आहे, हे कळल्यावर मला एकेक गोष्टीची लिंक लागत गेली."

कादंबरी प्रेग्नंट आहे, हे कळल्यावर तिच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता, पण ती तो व्यक्त करु शकत नव्हती. बाकीच्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक भाव दिसून येत होते.

जानकी शेखर जवळ जाऊन म्हणाली,
"शेखर, ही लपवाछपवी पूरे झाली. आता जे खरं आहे, ते सांगून टाका. उगीच कायद्याचा आधार घ्यायला लावू नका."

यावर शेखर हात जोडून म्हणाला,
"मी तुम्हा दोघींचा गुन्हेगार आहे. मला माफ करा. कादंबरीसोबत लग्न झाल्यावर सहा महिन्यांतचं माझ्यात दोष आहे, हे मला कळलं होतं.

मला कल्पना होती की, आम्हाला मुलं न होण्याचे खापर कादंबरीवरचं फुटेल. आजवर तेच होत आलं आहे. पुरुषात दोष असू शकतो, हे कोणालाच मान्य नसते. माझा पुरुषार्थ वाचावा, म्हणून मी कोणालाच खरं सांगितलं नव्हतं.

ज्यावेळी आम्ही दोघे डॉक्टरकडे गेलो होतो, तेव्हा एका वॉर्डबॉयला पैसे देऊन आमच्या दोघांचे रिपोर्ट बदलले होते. डॉक्टरांनी नेमका सरोगेट मदरचा पर्याय आमच्यापुढे ठेवला. आता दोष माझ्यातच असल्याने ते शक्यच होणार नव्हते.

मी आई-बाबांना त्याबद्दल काहीच सांगितले नव्हते. यावेळी डॉक्टर जानकीच्या ओळखीचे असल्याने मला काहीच घोळ करता येणार नव्हता, म्हणून मी टेस्ट करायला टाळाटाळ करत होतो. मला कल्पना होती की, आता लवकरच आपलं पितळ उघडं पडणार आहे. मी फक्त आजचं मरण उद्यावर ढकलत होतो.

शेवटी अनाथ मूल दत्तक घेण्याचा पर्याय मी तुझ्यापुढे ठेवणार होतो, म्हणजे माझं पितळ उघडं पडलं नसतं. देवाच्या मनात वेगळचं होतं. मी केलेल्या कर्माची शिक्षा मला मिळाली."

शेखरच्या आई-वडिलांनी मान खाली घातली. कादंबरी जानकीच्या आई-वडिलांकडे बघून म्हणाली,
"काका-काकू, जे काही झालंय त्यात तुमच्या मुलीचा दोष नाहीये. तिच्यासोबत उभे रहा. तिला तिच्या पायावर उभं रहायला मदत करा.

माझ्या माहेरच्यांनी माझी साथ दिली नाही. मला जर वेळेवर भूमी आणि राघव भेटले नसते, तर माझं काय झालं असतं? हेही सांगू शकत नाही.

राघव, आपलं काम झालंय. आपण निघूयात."

कादंबरी, राघव, भूमी जायला निघाल्यावर कादंबरीची आई म्हणाली,
"बाळा, आमचं चुकलं आम्हाला माफ कर. तुझं पहिलं बाळंतपण माहेरीचं व्हायला हवं. अजय तुला घ्यायला येईल. तुला आरामाची गरज असेल, तर मला हक्काने बोलावं."

यावर कादंबरी मागे वळून मिश्किल हसून म्हणाली,
"आई, ज्या दिवशी त्या घरातून बाहेर पाऊल टाकलं, तेव्हाच मरेल पण तिथे परत येणार नाही, असं ठरवलं होतं. ज्या काळात मला तुमच्या सगळ्यांच्या आधाराची गरज होती, तेव्हा तुम्ही कोणीच तिथे नव्हता. आता खरं तुमच्यासमोर आल्यावर तुम्ही मला पुन्हा स्विकारायला तयार झालात, हा स्वार्थचं झाला ना?

मला असे स्वार्थी नातेवाईक नकोय. तुम्ही किती मोठी चूक केली आहे? हे तुमच्या लक्षात येण्यासाठी तुम्हाला मी इथे बोलावले. माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसला नसता. मी जाते."

सगळ्यांच्या मना तिच्यासमोर झुकलेल्या होत्या. कादंबरी मात्र ताठ मानेने बाहेर पडली. आज कादंबरीला मनावरचं खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतं होतं. त्या प्रसंगाने एका नव्या कादंबरीचा जन्म झाला होता.

समाप्त.

तुम्हा सगळ्यांना कादंबरीचा हा प्रवास, ही कथा कशी वाटली? हे कमेंट करुन कळवा.

©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all