कादंबरी भाग १४

Story Of A Girl
कादंबरी भाग १४

मागील भागाचा सारांश: राघवने कादंबरीला प्रपोज केलं. कादंबरीने थोडा विचार करुन त्याला होकार दिला. राघवच्या घरुन दोघांच्या लग्नाला विरोध होता. राघवने घरच्यांच्या विरोधात जाऊन कादंबरी सोबत लग्न केले. कादंबरी आजारी पडल्यावर डॉक्टरांनी तिची प्रेग्नन्सी टेस्ट करायला सांगितली.

आता बघूया पुढे…..

सलाईन घेतल्याने कादंबरीला जरा तरतरी आली होती. कादंबरीच्या आवश्यक त्या तपासण्या डॉक्टरांनी केल्या होत्या. सगळ्या तपासण्यांचे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येणार होते. राघव कादंबरीला घेऊन घरी गेला.

"राघव, मी हॉस्पिटलमध्ये असल्यापासून बघतेय. तुझा चेहरा गंभीर वाटतो आहे. मला काही दुर्मिळ आजार झाला आहे का?" कादंबरीने असं विचारल्यावर राघव तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणाला,

"कादंबरी, काही काय बोलतेस? डॉक्टरांनी तुझी प्रेग्नन्सी टेस्ट केली आहे, म्हणून माझ्या चेहऱ्यावर असे प्रश्नचिन्ह आहे. डॉक्टरांच्या अनुभवावरुन तू प्रेग्नंट असशील, असं त्यांना वाटत आहे." राघवने सांगितले.

"काय? अरे पण असं कसं घडू शकेल?" कादंबरी जोरात म्हणाली.

"मलाही तेच कळत नाहीये. उद्या रिपोर्ट आल्यावरचं खरं काय आहे? ते कळेल." राघव म्हणाला.

"डॉक्टर काही म्हणत असतील, असं काही होऊ शकणार नाही. उद्या रिपोर्ट आल्यावर तेच खोटे पडतील." कादंबरीने आपली प्रतिक्रिया दिली.

"तू या सगळ्याचा जास्त विचार करत बसू नकोस. आराम कर. उद्या कंपनीत जाऊ नकोस. मी हाफ डे घेऊन येतो, मग आपण डॉक्टरांकडे जाऊयात." राघव म्हणाला.

कादंबरीला रिपोर्ट काय येतील? हे ठाऊक होते. तरीही तिच्या मनात अनेक प्रश्न उभे राहत होते. दुसरा दिवस कधी उजाडेल आणि ती डॉक्टरांकडे जाऊन रिपोर्ट बघेल, असं तिला झालं होतं.

दुसऱ्या दिवशी राघव हाफ डे घेऊन घरी आला. कादंबरीला घेऊन तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी त्या दोघांना आपल्या समोरील खुर्चीत बसायला सांगितले.

"डॉक्टर, रिपोर्ट काय आलेत? कादंबरी ठीक आहे ना?" राघवने काळजीने विचारले.

"सांगतो. त्याआधी मला एक सांगा. ज्या रिपोर्ट वरुन तुम्ही आई होणार नाहीत, हे निष्पन्न झालं होतं, ते रिपोर्ट तुमच्याकडे आहेत का?" डॉक्टरांनी कादंबरीकडे बघून विचारले.

"नाही, पण त्या रिपोर्टचा इथे काय संबंध?" कादंबरीने आपली शंका विचारली.

"मिसेस कादंबरी, तुम्ही प्रेग्नंट आहात. मला तुमचे ते रिपोर्ट बघायला मिळाले असते, तर नेमकं त्यावेळी काय होतं? हे कळालं असतं." डॉक्टरांनी उत्तर दिले.

कादंबरी आ वासून डॉक्टरकडे बघत होती. तिला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता.

"डॉक्टर, पण हे कसं शक्य आहे?" राघवने विचारले.

"हे बघा मि. राघव, माझ्यापुढे तेव्हाचे रिपोर्ट नाहीयेत, त्यामुळे मी काहीच सांगू शकणार नाही. आता बाकी विचार करत बसण्यापेक्षा हा देवाचा आशिर्वाद समजून घेऊयात. अभिनंदन, तुम्ही दोघे आई-वडील होणार आहात." डॉक्टर स्मित हास्य करुन म्हणाले.

यावर राघव चेहऱ्यावर हसू आणून म्हणाला,
"धन्यवाद डॉक्टर. आता यापुढे कादंबरीची काळजी कशी घ्यायची? मला काहीच अनुभव नाहीये आणि आमच्या सोबत कोणी वडीलधारी व्यक्तीही राहत नाही."

"मि. राघव थोडं शांत व्हा. कादंबरी मॅडमला घेऊन तुम्ही स्त्रीरोगतज्ञाकडे जा. बाकीचं सगळं काही तुम्हाला त्या मॅडम समजावून सांगतील." डॉक्टरांनी बोलता बोलता रिपोर्टची फाईल आणि दुसऱ्या डॉक्टरांचा पत्ता दिला.

कादंबरीला अजूनही ते सगळं खरं वाटत नसल्याने तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसून येत होते. राघवने कादंबरीचा हात धरुन तिला डॉक्टरांच्या केबिन बाहेर घेऊन गेला. बाहेर असलेल्या एका बाकावर तिला बसवलं. आपल्याकडील पाण्याच्या बाटलीचे झाकण उघडून तिला पाणी पिण्यासाठी दिले.

कादंबरीच्या डोळयात अश्रूंनी गर्दी केली होती. राघवने तिच्या डोक्यावरुन हात फिरवल्यावर ती त्याच्या मिठीत घुसून खूप रडली. राघवने तिला शांत होऊ दिले.

"कादंबरी, आपण लगेच ह्या मॅडमकडे जाऊन येऊयात, म्हणजे आपल्याला पुढे काय काळजी घ्यावी लागते? ते कळेल." राघव बोलल्यावर कादंबरीने मान हलवून होकार दर्शवला.

गाडीत बसल्यावर कादंबरी राघवकडे बघून म्हणाली,
"राघव, हा खरंच दैवी चमत्कार असेल का? की अजून वेगळं काही."

"कादंबरी, आपल्याकडे तुझे सुरुवातीचे रिपोर्ट्स नाहीयेत, त्यामुळे काहीच सांगता येणार नाही. आजवर आपण जे घडत गेलं, ते स्विकारत गेलो. आपण आई-बाबा होणार ही तर आनंदाची गोष्ट आहे. बाकीचे काही विचार मनात न आणता ही गोष्ट स्विकारुयात." राघव गाडी चालवता चालवता तिला समजावून सांगत होता.

गाडीतून खाली उतरुन राघव कादंबरीचा हात धरुन हॉस्पिटलच्या दिशेने जात होता. हॉस्पिटलमध्ये प्रवेश केल्यावर कादंबरीला समोर भिंतीवर आई व बाळाचे चित्र दिसले, त्याखाली लिहिलेला मजकूर तिने वाचला.

"दुडूदुडू पावलांनी आलं,
बाईला मातृत्व दिलं,
तिचं जग बदलून टाकलं."

कादंबरी वेटींग एरियात एका खुर्चीत बसली. राघव रिसेप्शनिस्ट कडे जाऊन नंबर लावून आला. कादंबरीच्या शेजारी एक स्त्री बसलेली होती, तिच्या डोळ्यातील पाणी बघून कादंबरीने विचारले,

"ताई, तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही एकट्याच आला आहात का?"

डोळ्यातील पाणी पुसत ती स्त्री म्हणाली,
"हो, मी एकटीच आहे. माझ्या मिस्टरांची किती वेळेपासून वाट बघत आहे, पण ते येतंच नाहीयेत. शिवाय फोनही उचलत नाहीयेत."

यावर कादंबरी म्हणाली,
"ते मिटिंगमध्ये अडकले असतील किंवा गाडीवर असतील, म्हणून फोन उचलत नसतील. तुमच्या डोळयात पाणी का?"

"काय सांगू ताई, लग्न होऊन वर्षही झालं नाही. सासूबाई नातवासाठी हट्ट करत आहेत. ह्या डॉक्टर मॅडम माझ्या ओळखीच्या होत्या, म्हणून त्यांच्याकडे ह्यांना घेऊन आले. माझ्या सगळ्या तपासण्या होईपर्यंत ते सोबत येत होते. आता त्यांच्या तपासण्या करायची वेळ आली, तर ते येतच नाहीयेत. काहीना काही कारण सांगून टाळत आहेत. आजची ही तिसरी अपॉइंटमेंट आहे.

गेल्या दोन तासापासून मी त्यांची वाट बघत आहे. मला तर काही कळत नाही. सासूबाई माझ्या नावाने खडे फोडत बसतात." ती बोलत असतानाच कादंबरीचा नंबर आल्याने ती डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली.

डॉक्टरांनी तिला पथ्यपाणी, घ्यावयाची काळजी, तसेच सोनोग्राफी करण्यास सांगितले. जवळपास वीस मिनिटाने ते दोघे बाहेर आले. राघव मेडीकल मध्ये गोळ्या-औषधे आणण्यास गेला. तोपर्यंत कादंबरी त्या स्त्रीजवळ जाऊन बसली. कादंबरी तिच्याशी काही बोलणार तेवढ्यात त्या स्त्रीचा फोन वाजला. मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारा फोटो बघून कादंबरी आश्चर्यचकित झाली होती.

फोनवर बोलून झाल्यावर ती स्त्री म्हणाली,
"हे बघा, आत्ता ह्यांचा फोन आला होता. कंपनीत उशीर झाला म्हणे. रिक्षाने घरी यायला सांगितलं आहे. बायकोची काही काळजीच नाहीये."

"आत्ता स्क्रीनवर जो फोटो आला होता, तो तुमच्या नवऱ्याचा फोटो होता का?" कादंबरीने विचारले.

"हो." त्या स्त्रीने उत्तर दिले.

"तो फोटो मला परत दाखवा." कादंबरीच्या बोलण्यावर तिने तिच्या नवऱ्याचा फोटो दाखवला.

फोटो बघितल्यावर कादंबरी म्हणाली,
"आत्ता सगळा घोळ उघडकीस आला आहे. तुम्हाला तुमच्या नवऱ्याचं खरं रुप जाणून घ्यायचे असेल, तर माझी मदत कराल का?"

"करेल, पण तुम्ही कोणत्या घोळाबद्दल बोलत आहात? तुम्ही ह्यांना ओळखता का? माझ्या सासूबाईचं तोंड बंद होत असेल, तर मी काहीही करायला तयार आहे." ती स्त्री म्हणाली.

"मी ते सगळं तुम्हाला उद्या सांगेल. तुमच्या सासू-सासऱ्यांना बोलावून घ्या. सगळ्यांसमोर सगळं काही उघडकीस आणावं लागेल. मला तुमचा फोन नंबर आणि पत्ता द्या. तुम्हाला हॉस्पिटलच्या अश्या फेऱ्या माराव्या लागणार नाही." कादंबरी म्हणाली.

"मला तुमचं सगळ मान्य आहे. आपल्याला एकमेकींचे नावही माहीत नाही. माझं नाव जानकी आहे. तुमचं नाव कळेल का?" जानकीने विचारले.

"माझं नाव कादंबरी आहे. माझी ओळख म्हणजे मी तुमच्या नवऱ्याची पहिली बायको आहे. मी आई होऊ शकणार नाही, हे कळल्यावर शेखरने मला घटस्फोट दिला. आपण कधीही आई होऊ शकणार नाही, हे मी मान्य करुन बसले होते.

मला तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की, मी आज प्रेग्नंट आहे. याचा अर्थ दोष माझ्यात किंवा तुमच्यात नाही, तर दोष शेखरमध्ये आहे. हे हॉस्पिटल तुमच्या ओळखीचं असल्याने त्यांना काही झोल करता येणार नाही, याची कल्पना आल्याने ते टेस्ट करायला येत नाहीयेत. आपण दोघी मिळून त्यांचं पितळ सगळ्यांसमोर उघडं पाडूयात.

उद्या तुमच्या आई-वडिलांना आणि सासू-सासऱ्यांना बोलावून घ्या. माझ्याबद्दल कोणालाच काहीच सांगू नका." कादंबरीने सगळं सविस्तरपणे सांगितले.

यावर जानकीने मान हलवून होकार दर्शवला.

कादंबरी शेखरचं पितळ कसं उघडं पाडेल? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all