Feb 22, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

कादंबरी भाग १३

Read Later
कादंबरी भाग १३
कादंबरी भाग १३

मागील भागाचा सारांश: राघवची पोस्टिंग नाशिकमध्ये झाली होती, तो कादंबरीच्या एरियात राहत होता. भूमीने मनोजची ओळख कादंबरी सोबत करुन दिली.

आता बघूया पुढे….

एके दिवशी भूमी घरी नसताना कादंबरीने राघवला घरी जेवायला बोलावले होते. राघव तिच्या घरी आल्यापासून शांतच होता.

"राघव, आज एवढा शांत का आहेस? मी आल्यापासून बघतेय, तू वेगळ्याच विचारात आहेस." कादंबरीने विचारले.

"आज सकाळी आईचा फोन आला होता, तिने लग्नावरुन खूप बडबड केली." राघवने उत्तर दिले.

"राघव, आत्त्यांची काळजी करणं बरोबर आहे. तू किती दिवस असाचं एकटा राहणार आहेस. एका मुलीने फसवलं म्हटल्यावर सगळ्याच मुली तश्या असतात, असं नाही. एकदा शांत डोक्याने या सगळयाचा विचार करुन बघ." कादंबरीने त्याला समजावून सांगितले.

"कादंबरी, मला लग्न करायचंच नाही असं नाहीये. मला समजून घेणारी मुलगी माझ्या आयुष्यात आली आहे." राघव म्हणाला.

"अरे वा, मग तरी तू इतका उदास का आहेस?" कादंबरीने आश्चर्याने विचारले.

"अजून त्या मुलीला मी हे सांगितले नाहीये, त्यामुळे तिला मी आवडत असेल की नाही, काही कल्पना नाही." राघवने उत्तर दिले.

"राघव, तुझ्यासारख्या मुलाला कोण नाही म्हणेल? एकदा तिला तुझ्या मनातील भावना सांगून तर बघ. कदाचित ती तुझ्या बोलण्याची वाट बघत असेल." कादंबरी म्हणाली.

"कादंबरी, माझ्याशी लग्न करशील का? मला तू खूप खूप आवडते. आयुष्यभर मला तुझ्या हातच्या जेवणाची चव चाखायची आहे." राघव एका दमात सगळं काही बोलून गेला.

कादंबरी काही न बोलता त्याच्याकडे आश्चर्याने बघत होती. पुढील काहीवेळ शांतता होती. दोघेही काहीच बोलत नव्हते. राघव कादंबरीकडे बघून तिच्या उत्तराचा अंदाज घेत होता.

"राघव, जे शक्य नाही, त्याचा विचार मनात आणू नकोस. आपल्यात मैत्रीचं नातं आहे, तसंच राहूदेत." कादंबरी त्याच्याकडे न बघता म्हणाली.

"पण का? तुला मी आवडत नसेल, तर तसं सांग." राघवने आपली प्रतिक्रिया दिली.

"राघव, मी एक घटस्फोटीत स्त्री आहे. शिवाय मी कधीही आई होऊ शकणार नाही. माझ्याशी लग्न करुन तुला काय मिळणार आहे?" कादंबरीने विचारले.

"तुझं प्रेम माझ्यासाठी भरपूर आहे." राघवने सांगितले.

"राघव, प्रेम हे काही दिवस टिकतं. पुढे जाऊन तुला स्वतःचं मूल असावं असं वाटेल, मग हे प्रेम हळूहळू कमी होईल. तुझ्या आईचा आपल्या लग्नाला कडाडून विरोध असेल." कादंबरी म्हणाली.

"हे बघ कादंबरी, मूल आपण दत्तक घेऊ शकतो किंवा त्यासाठी अजून बरेच पर्याय आहेत. राहिला प्रश्न आईचा किंवा दुसऱ्या कोणाचा? तर मला त्याने काही फरक पडत नाही. आता एक विचार कर, आपली दोघांची अचानक भेट दुबईत कशी झाली? त्या भेटीचा काहीतरी अर्थ असेलच ना. तू वेळ घे, विचार कर आणि मला तुझं उत्तर कळव." एवढं बोलून राघव कादंबरीच्या घरातून निघून गेला.

कादंबरीला काय निर्णय घ्यावा? काही कळत नव्हते. राघवला फोन करणेही तिला बरोबर वाटत नव्हते. कादंबरी बराच वेळ राघवचा, त्याच्या बोलण्याचा विचार करत बसली होती. तिचं एक मन म्हणत होतं की, राघव हा एक चांगला मुलगा आहे, तो आपल्यावर खरंच किती प्रेम करतोय. तिचं दुसरं मन म्हणत होतं की, पुढे जाऊन राघवही शेखरसारखा वागायला लागला तर….

कादंबरी राघवच्या विचारात असताना भूमी घरी आली.
"हे काय कादंबरी, राघव इतक्या लवकर निघून गेला. मला वाटलं होतं की, मी येईपर्यंत तो थांबेल." भूमी घरात येत म्हणाली.

कादंबरीने भूमीला सगळं काही सांगितलं. भूमी यावर थोडा विचार करुन म्हणाली,
"कादंबरी, तुझ्या मनात शंका उत्पन्न होणे स्वाभाविक आहे. मी तुला माझ्या अनुभवावरुन सांगते, मलाही असंच वाटायचं की, आपण एकटे आनंदी राहू शकतो. आपल्याला कोणाची गरज नाही, पण मनोज आयुष्यात आल्यापासून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मी स्वतःवर प्रेम करायला लागले आहे.

एकंदरीत राघव मला चांगला मुलगा वाटतो आहे. राघवला तुझ्याबद्दल सगळं काही माहीत असताना सुद्धा त्याने तुला प्रपोज केलंय. याचा अर्थ त्याचं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. तो तुला आहे तशी स्विकारायला तयार आहे आणि हेच महत्त्वाचे असते."

"भूमी, राघव मलाही आवडतो, पण मनात नको नको त्या शंका येत होत्या. तुझ्याशी बोलून मला निर्णय घेणे सोपं जाणार आहे. मी राघवला भेटून होकार देणार आहे." कादंबरी म्हणाली.

भूमीने कादंबरीला घट्ट मिठी मारली. पुढील तीन ते चार दिवसांनी कादंबरीने राघवला भेटून तिचा होकार कळवला. कादंबरी व त्याच्या नात्याबद्दल कल्पना देण्यासाठी राघव त्याच्या घरी गेला होता.

राघव गावावरुन तडकाफडकी परत आल्यावर कादंबरीने त्याला विचारले,
"राघव, काय झालं? तू लगेच परत का आलास?"

"कादंबरी, मला आपल्या लग्नाला सगळेजण विरोध करतील, याची कल्पना होती. सगळेजण तुझ्याबद्दल इतकं वाईट बोलत होते की, माझा राग अनावर झाला. मी स्वतःला कसेबसे रोखले आणि निघून आलो. सुशिक्षित असून सुद्धा विचार जर या थराचे असतील, तर त्यांना काय आणि कसं समजावून सांगायचं?

आपलं एकमेकांवर प्रेम आहे, म्हणून आपण लग्न करणार आहोत. लग्न म्हणजे काही व्यवहार नाहीये ना? एक स्त्री मुलाला जन्म देऊ शकते, म्हणूनच तिच्यासोबत लग्न करायचे, हा विचारच मला पटत नाही." राघवच्या चेहऱ्यावर चीड दिसून येत होती.

"राघव, तू शांत हो. एवढी चिडचिड करुन त्रास तुलाच होणार आहे. बरं आता पुढे काय आणि कसं करायचं?" कादंबरीने विचारले.

"कोर्टात जाऊन रजिस्टर पद्धतीने लग्न करुयात. मी उद्याच कोर्टात अर्ज देऊन टाकतो. कोणी काही म्हटलं तरी मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, ही काळ्या दगडावरची रेख आहे." राघवने सांगितले.

एक महिन्याने राघव व कादंबरीने कोर्टात जाऊन लग्न केले. लग्नाला भूमी आणि राघवचा एक मित्र उपस्थित होते. कादंबरी राघवच्या घरी जाणार असल्याने भूमीला भरुन आले होते. एकाच एरियात राहत असल्याने एकमेकींसोबत भेटी होणारच होत्या.

लग्न झाल्यावर कादंबरी व राघव तीन ते चार दिवसांसाठी महाबळेश्वरला फिरायला गेले होते. तिकडून आल्यावर दोघांचं रुटीन सुरळीत झालं होतं.

कादंबरी सकाळी उठून दोघांसाठी नाश्ता व डबा बनवायची. राघव कादंबरीला स्वयंपाकात मदत करायचा. डबे घेऊन आपापल्या कंपनीत ते निघून जायचे. संध्याकाळी आल्यावर चहा पीत दोघेजण दिवसभरात काय काय केलं? यावर गप्पा मारायचे. रात्रीचे जेवण झाल्यावर दोघेही वॉक करायला घराबाहेर पडायचे.

घराची साफसफाई करण्याचे काम राघव करत होता. राघवचं म्हणणं होतं की, घर जर दोघांचे आहे, तर काम फक्त बायकोने का करायचे? कादंबरी नाही म्हणायची, तरीही तो घरातील काम केल्याशिवाय राहत नव्हता.

दोघांचा राजा-राणीचा संसार मजेत सुरु झाला होता. दर रविवारी राघव कादंबरीला चित्रपट बघायला घेऊन जायचा, नाहीतर जवळपास कुठेतरी फिरायला घेऊन जायचा.

आठवड्यातून तीन ते चार वेळेस कादंबरी भूमीची भेट घ्यायची. भूमीला एकटं वाटू नये ही काळजी कादंबरी घेत होती.

एका रविवारी सकाळी राघवला दरवाजावरील बेल ऐकू आली, म्हणून त्याला जाग आली. बाजूला कादंबरी गाढ झोपलेली होती. दूधवाला असेल या विचाराने राघवने उठून दूध घेतले. कादंबरी एरवी कधीच एवढ्या वेळ झोपून राहत नव्हती. कादंबरी थकली असेल, हा विचार करुन राघवने तिला उठवले नाही.

राघवने चहा बनवला. कादंबरीला चहा द्यावा, म्हणून तो तिला उठवण्यासाठी गेला. राघव तिच्या उशाशी जाऊन बसला आणि त्याने तिच्या कपाळाला हात लावला, तर तिचं अंग गरम लागलं.

"कादंबरी, बरं वाटत नाहीये का?" राघवच्या बोलण्यात काळजी होती.

कादंबरीने हळूच डोळे उघडून राघवकडे बघितले.
"राघव, मला अशक्तपणा जाणवतो. काही केल्या उठवलं जात नाहीये." कादंबरी हळूच म्हणाली.

राघवने तिला हात देऊन उठवून बसवले. राघवने तिला बळजबरी चहा-बिस्कीट खाऊ घातले. जवळच्या एका डॉक्टरकडे तो तिला घेऊन गेला. डॉक्टरांनी अशक्तपणा जाण्यासाठी सलाईन लावले.

"मि. राघव, तुमच्या बायकोची प्रेग्नन्सी टेस्ट करुन घ्यावी लागेल. त्यांना जो त्रास होत आहे, त्यावरुन त्या प्रेग्नंट असू शकतात." डॉक्टरांनी राघवला कल्पना दिली.

"डॉक्टर, पण कादंबरी कधीच आई होऊ शकणार नाहीये. मला वाटतंय की, या तपासणीची गरज नाहीये." राघवने सांगितले.

"मला माझ्या अनुभवावरुन जे वाटले ते मी सांगितले. तुमच्या बायकोला अशक्तपणा जाणवत आहे, मळमळ होत आहे. शिवाय या महिन्यात त्यांना पाळीही आली नाहीये. माझ्या शंकेचे निरसन करुन घेण्यासाठी मी त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट करुन घेतो." डॉक्टरांच्या या बोलण्यावर राघवने मान हलवून होकार दर्शवला.

क्रमशः

©®Dr Supriya Digheईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//