कादंबरी भाग १२

Story Of A Girl
कादंबरी भाग १२

मागील भागाचा सारांश: कादंबरी व भूमी भारतात परतणार असल्याने राघव त्यांना जेवायला एका भारतीय हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. विमान उशीरा आल्याने कादंबरीला आकाशातील ढग व उगवता सूर्य बघता आला. रात्रभर झोप न लागल्याने तिला जेटलॅगचा त्रास झाला.

आता बघूया पुढे….

पुढील एक पूर्ण दिवस कादंबरीने आराम केला. दुसऱ्या दिवशी ती नेहमीप्रमाणे कंपनीत गेली. कंपनीत गेल्यावर तिच्या सहकाऱ्यांनी दुबईबद्दल प्रश्न विचारुन तिला भंडावून सोडले होते.

संध्याकाळी कादंबरी कंपनीतून घराच्या दिशेने निघाली होती, तेव्हा तिचा मोबाईल वाजला. मोबाईलच्या स्क्रीनवर अनोळखी नंबर दिसत होता.

"हॅलो, कोण बोलतंय?" कादंबरीने विचारले.

"हॅलो, मी राघव बोलतोय. नाम तो सुना ही होगा." समोरुन राघवने उत्तर दिले.

राघवचं नाव ऐकताच कादंबरीच्या चेहऱ्यावर हसू आले होते.
"हा नंबर कोणाचा आहे? एक मिनिट हा तर लोकल नंबर आहे म्हणजे तू भारतात आलास का?" कादंबरीने उत्साहाच्या भरात लागोपाठ प्रश्न विचारले.

"हो. हा माझा इथला फोन नंबर आहे. तू भारतात येऊन दोन दिवस झाले नाही, तरी मला लगेच विसरलीस." राघव नाराजीच्या सुरात म्हणाला.

"असं काही नाहीये. मला जेटलॅगचा त्रास बराच जाणवला. अजूनही थकवा जाणवतो आहे. आज कंपनीत काम करायला मन लागत नव्हतं." कादंबरीने सांगितले.

"विचार कर, तुला इतक्या कमी दिवसात इतका मोठा बदल जाणवतो आहे. मला कसं वाटत असेल? सकाळीच घरी पोहोचलो. माझी चौकशी कोणी केली नाही, मात्र लग्नाची चर्चा सुरु झाली. दोन-तीन दिवस घरी राहतो आणि कंपनीच्या मुख्य ऑफिसला जाऊन पोस्टिंगची चौकशी करुन जॉईन होतो. घरी राहणं कठीण आहे." राघव म्हणाला.

"आपल्या भेटीबद्दल आत्त्याला सांगितलं का?" कादंबरीने विचारले.

"हो. उगाच पुन्हा आपण बोलतो आहे हे कळल्यावर गैरसमज व्हायला नको, म्हणून सांगितलं. आईने जे यावर सांगितलं, ते मला अपेक्षितचं होतं." राघवने सांगितले.

"माझ्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवू नकोस, असंच सांगितलं असेल." कादंबरी उदास सुरात म्हणाली.

"हो, पण मी आईचं थोडीचं ऐकणार आहे. मी इतकी चांगली मैत्रीण गमावणार नाहीये. असो मी घरी असेपर्यंत शक्यतो आपण बोलणं टाळूयाच. कंपनीत गेलो की कळवतो." राघव म्हणाला.

"हो चालेल. मी हेच म्हणणार होते." कादंबरीने बोलून फोन कट केला.

कादंबरी घराजवळ पोहोचत होती, तेवढ्यात भूमीचा तिला फोन आला,
"हॅलो, कुठे आहेस?" भूमीने विचारले.

"घरापासून पाच पावलांवर मागे आहे." कादंबरीने चालता चालता उत्तर दिले.

"जिथे आहेस तिथेच थांब आणि तुझी पावलं शिवसागरच्या दिशेने वळव." भूमीने सांगितले.

कादंबरी जागच्या जागी थांबून म्हणाली,
"भूमी, यार मी आज खूप थकले आहे. हवंतर तू माझ्यासाठी पार्सल घेऊन ये." कादंबरी म्हणाली.

"तू जर माझी खरी मैत्रीण असशील, तर शिवसागर मध्ये येशील." एवढं बोलून भूमीने फोन कट केला.

कादंबरीची इच्छा नसतानाही तिने आपली पावलं हॉटेल शिवसागरच्या दिशेने वळवली. हॉटेलचा दरवाजा ढकलून आत जाऊन तिची नजर भूमीला शोधू लागली, तोच भूमीने तिला हात वर करुन आवाज दिला. कादंबरी भूमीच्या दिशेने गेली, तर भूमीसोबत अजून एक व्यक्ती तिथे बसलेले होते.

कादंबरीचा लटकलेला चेहरा बघून भूमी म्हणाली,
"तुझ्या चेहऱ्यावरुन तू किती थकलेली आहेस, हे मला जाणवतंय. मी तुझा जास्त वेळ घेणार नाही. मला तुझी मनोज सोबत ओळख करुन द्यायची होती, म्हणून तुला इतक्या घाईने इथे बोलावले."

कादंबरीने मनोजकडे बघून एक छोटीशी स्माईल दिली. भूमीने मनोजची ओळख करुन देण्यासाठी आपल्याला इथे का बोलावलं आहे? हे कादंबरीला कळत नव्हते. तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह बघून भूमी म्हणाली,

"मनोज कोण आहे? मी त्याला भेटण्यासाठी तुला का बोलावले? हे प्रश्न तुला पडले असतील. मनोज माझ्याच कंपनीत नोकरी करतो. तो बंगलोरच्या शाखेत नोकरी करत असल्याने आमचं कामानिमित्ताने बोलणं फोनवर होत होतं. हळूहळू आमच्यात मैत्री होऊ लागली होती. माझा अपघात झाल्यावर तो एवढ्या लांबून मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आला होता.

आमच्यातील मैत्रीचे रुपांतर कधी प्रेमात झाले, हे कळलंच नाही. आता दुबईला आम्ही दोघे तीन दिवस एकत्र होतो, तेव्हा मनोजने मला प्रपोज केलं. मी क्षणाचाही विलंब न लावता त्याला होकार दिला. मनोज मला समजून घेतो. आमच्या दोघांचे विचार जुळतात." बोलताना भूमीच्या चेहऱ्यावर आनंद होता.

"अरे वा! अभिनंदन. भूमी तू ज्यासाठी मला बोलावलं होतं, ते सांगितलंस. आता मी निघते. मला आराम करण्याची गरज आहे." एवढं बोलून कादंबरी हॉटेल मधून बाहेर पडली.

"तू तर तुझ्या मैत्रिणीचं एवढं कौतुक करत होतीस. ती अशी तडकाफडकी का निघून गेली? माझ्याकडे बघून बोलली सुद्धा नाही." मनोजने आपली प्रतिक्रिया दिली.

"कादंबरी एरवी अशी कधीच वागत नाही. कदाचित तुझ्याबद्दल मी तिला आधीच सांगितले नाही, म्हणून राग आला असेल. घरी गेल्यावर मी तिच्याशी बोलते." भूमीने सांगितले.

काही वेळेनंतर भूमी घरी गेली. दरवाजावरील बेल न वाजवता आपल्याकडील चावीने दरवाजा उघडून ती आता गेली. कादंबरी स्वयंपाक घरात स्वयंपाक करत होती.

"कादंबरी, तुला बरं वाटत नसेल, तर आपण बाहेरुन काहीतरी मागवू." भूमी आपली बॅग खाली टेकवत म्हणाली.

"त्याची आवश्यकता नाहीये. मी खिचडीभात आणि गुळाचा शिरा बनवला आहे. तू फ्रेश होऊन ये." कादंबरीने भूमीकडे न बघता उत्तर दिले.

मग भूमी तिच्याजवळ जाऊन उभी राहिली. कादंबरीला फिरवून तिने तिचा चेहरा आपल्या समोर आणला व ती म्हणाली,
"कादंबरी, काय झालंय? हॉटेल मधून अशी तडकाफडकी का निघून आलीस?"

"सॉरी भूमी, त्यावेळी मी थोडीशी स्वार्थी झाले होते. मनोज सोबत लग्न झाल्यावर तू माझ्यासोबत राहणार नाहीस आणि मी पुन्हा एकटी पडेल, हा विचार मनात आला होता. घरी येताना मी विचार केला की, आपण दोघी कायम सोबत कश्या राहू शकतो?

तुलाही तुझं आयुष्य आहे. तुलाही पुढे जाण्याचा अधिकार आहे. मनोज चांगलाच असेल, म्हणून तू त्याला होकार दिलास. मी तुझ्यासाठी खूप खुश आहे." बोलता बोलता कादंबरीच्या डोळयात पाणी आले होते.

भूमीने तिला घट्ट मिठी मारली. मिठी सोडवत भूमी म्हणाली,
"ये वेडाबाई, आम्ही लगेच लग्न करणार नाही. मनोज पुढील सहा महिन्यांसाठी लंडनला जाणार आहे. तिकडून परतल्यावर आम्ही लग्न करणार आहोत. तोपर्यंत तुलाही तुझा राजकुमार मिळेल."

"ते सगळं जाऊदेत. तू फ्रेश होऊन ये. मी तुला गरमागरम शिरा भरवते." कादंबरीने विषय टाळला.

मनोज लंडनला जाण्याआधी कादंबरीने त्याची भेट घेऊन माफी मागितली.

चार ते पाच दिवसांनी राघवने कादंबरीला फोन करुन त्याची पोस्टिंग नाशिकला झाल्याचे कळवले. भूमीने आपल्याच एरियात राघवसाठी फ्लॅट शोधून ठेवला होता.

पुढील दोन आठवड्याने राघव नाशिकला आला. भूमीने त्याला कादंबरीच्या हातचं जेवण करण्यासाठी आमंत्रित केले होते. कादंबरीच्या हातचं जेवण करुन त्याचं मन तृप्त झालं होतं. एकाच एरियात राहत असल्याने राघव व कादंबरी दररोज रात्री वॉकच्या निमित्ताने भेटायचे. दिवसभर घडलेल्या गोष्टी ते एकमेकांना सांगत होते.

आठवड्यातून एकदा कादंबरी त्याला आपल्या घरी जेवायला बोलवायची. राघव व कादंबरीची मैत्री हळूहळू वाढत होती.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all