कादंबरी भाग ११

Story Of A Girl
कादंबरी भाग ११

मागील भागाचा सारांश: राघवने कादंबरीला जवळपास पूर्ण दुबई फिरवली होती. कादंबरीला दुबई बद्दल काय वाटते? हे भूमीने जाणून घेतले.

आता बघूया पुढे….

कादंबरी भाग १२

"भूमी, आपण उद्या जाणार आहोत, म्हणून राघव आपल्याला इथल्या एका भारतीय हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाणार आहे." कादंबरीने मोबाईलमध्ये बघत सांगितले.

"अरे वा! छानच आहे, पण मी कबाबमध्ये हड्डी कशाला बनू? तुम्ही दोघे जा." भूमी गालातल्या गालात हसत म्हणाली.

"भूमी, तुला काय म्हणायचं आहे?" कादंबरीने डोळे मोठे करुन भूमीकडे बघत विचारले.

"तुम्ही दोघे सोबत छान दिसतात. शिवाय तुमची केमिस्ट्री सुद्धा चांगली जुळलेली दिसतेय." भूमी हळूच हसत म्हणाली.

"भूमी, आज बोललीस, पण नंतर या विषयावर बोलू नकोस. राघव सोबत माझी खूप चांगली मैत्री झाली आहे, पण त्यापलीकडे काहीच नको. एकतर तो माझ्या मावस आत्त्याचा मुलगा आहे. दुसरं म्हणजे मी घटस्फोटीत आहे, तिसरं मी कधीच आई होऊ शकणार नाही. जी मुलगी आई होऊ शकणार नाही, अश्या मुलीशी कोणीच लग्न करणार नाही.

मला तो विचारचं करायचा नाहीये. राघवच्या आईला आमच्या मैत्रीबद्दल कळल्यावर ती मैत्री सुद्धा तोडायला लावू शकते, तेव्हा तू बाकीचा विचारच करु नकोस. तो आपल्याला जेवायला घेऊन जाणार आहे, आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवण करण्याचं काम करु." कादंबरीने बोलून विषय बंद केला.

राघव संध्याकाळी भूमी व कादंबरीला घेऊन जायला हॉटेलवर आला. कॅब करुन ते तिघे एका हॉटेलच्या इथे पोहोचले. हॉटेलमध्ये जाऊन तिघांनी मिळून ऑर्डर दिली.

"इथलं जेवण केल्यावर तुम्हाला आपण भारतातच आहोत, असं वाटेल." राघव म्हणाला.

"तसंही दुबईत आल्यापासून जेवणात एवढं वेगळेपण वाटलं नाही. मात्र मी कादंबरीच्या हातच्या जेवणाला खूप मिस केलं." भूमीने आपली प्रतिक्रिया दिली.

"कादंबरीच्या हातचं जेवण माझ्या नशिबात कधी असेल, काय माहीत?" राघव म्हणाला.

"तुम्ही भारतात आल्यावर आमच्या फ्लॅटवर या. कादंबरी सगळे भारी पदार्थ करुन खायला घालेल." भूमीने राघवला सुचवले.

"हम्मम. आता भारतात आल्यावर काय काय होतं? त्यावर पुढचं सगळ ठरेल. दोन दिवसांनी भारतात परतल्यावर पहिले घरी जावं लागेल. मग एका आठवड्याने कंपनी जॉईन करेल. आता ते जिथे पोस्टिंग देतील, तिथे हजर व्हावं लागेल. आमच्या कंपनीची एक नवीन ब्रँच नाशिकला सुरु झाली आहे. कदाचित तिथे पोस्टिंग होण्याची शक्यता जास्त आहे." राघव म्हणाला.

"हे तर एकदम भारीच होईल. तुम्ही आमच्याच एरियात रहायला या. आपण तिघे मिळून मस्त मज्जा करत जाऊयात." भूमी हसून म्हणाली.

वेटरने जेवण आणून दिल्यावर कादंबरी म्हणाली,
"तुमचे पुढचे प्लॅन करुन झाले असतील, तर आपण जेवणाचा आनंद घेऊयात का?"

"खडूस." भूमीने आपली प्रतिक्रिया दिली.

तीन-चार घास खाल्ल्यावर कादंबरी म्हणाली,
"जेवण खरंच खूप चविष्ट आहे. ह्या जेवणाने पोट भरणारचं आहे, पण मन सुद्धा भरेल."

कादंबरीच्या बोलण्यावर राघव व भूमी दोघेही हसले. जेवण झाल्यावर कादंबरी म्हणाली,
"राघव, ही आपली इथली शेवटची भेट आहे. उद्या आम्ही भारतात परतणार आहोत. तिकडे गेल्यावर आपली भेट होईल की नाही, माहीत नाही. तू जर ह्या ट्रीपमध्ये माझ्यासोबत नसता, तर एवढी मज्जा आली नसती. तुझ्यामुळे ही दुबई ट्रीप बेस्ट झाली आहे. तुझे आभार कसे मानू? हेच कळत नाहीये.

भूमी सारखी मैत्रीण मिळाल्यामुळे दुबई बघायला मिळाली आणि ह्याच दुबईत तुझ्यात मला एक मित्र सापडला. माझ्या उभ्या आयुष्यात मी तुमच्या दोघांची मैत्री विसरणार नाही."

बोलताना कादंबरीचे डोळे भरुन आले होते.
"मित्र म्हणतेस आणि आभार मानतेस. कादंबरी, हे आठ दिवस कसे निघून गेले? हे मलाही कळलं नाही. तुझ्या आयुष्यात एवढं सगळं घडून गेलं असतानाही तू तुझ्या पायावर उभी राहिलीस, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. तुझ्यासारखी मुलगी माझी मैत्रीण आहे, याचा मला अभिमान आहे.

आपण भारतातही नेहमी भेटत जावू. आपली ही मैत्री कायम अशीच राहिलं. आता इमोशनल होण्यापेक्षा मस्तपैकी आईस्क्रीम खाऊयात." राघव चेहऱ्यावर हसू आणत म्हणाला.

आईस्क्रीम खाऊन झाल्यावर कादंबरी व भूमी कॅबमध्ये बसून आपल्या हॉटेलवर गेल्या आणि राघव त्याच्या फ्लॅटच्या दिशेने गेला.

दुसऱ्या दिवशी रात्रीची फ्लाईट असल्याने दिवसभर कादंबरी व भूमीने सगळं सामान बॅगमध्ये भरलं. त्यांचं विमान चार तास उशीरा असल्याचा मेल भूमीला आला होता. विमानतळावर जाऊन सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यावर कादंबरी व भूमी बेंचवर जाऊन बसल्या.

"तुला आकाशातील ढग बघायचे होते ना? आता तुझी तीही इच्छा पूर्ण होईल." भूमी कादंबरीकडे बघून म्हणाली.

"हो, बघ ह्या प्रवासात माझी तीही इच्छा पूर्ण होईल, पण प्रवास करण्यात पूर्ण रात्र निघून जाईल. तू विमानात मस्तपैकी झोपशील, पण माझं काय? माझं डोकं जाम होईल." कादंबरी उदास चेहऱ्याने म्हणाली.

"कुछ पाने के लिये, कुछ खोना पडता हैं जानेमन. आता आकाशातील ढगही बघ आणि जेटलॅगचा अनुभव सुद्धा घे." भूमीने आपली प्रतिक्रिया दिली.

"जेटलॅग म्हणजे काय असतं?" कादंबरीने विचारले.

"तुला उद्या कळेलच." भूमीने उत्तर दिले.

पुढील काही वेळेनंतर इमिग्रेशन सुरु झालं. कादंबरी व भूमी आपल्या विमानात जाऊन स्थानापन्न झाल्या. विमानाने आकाशात उड्डाण घेतल्याबरोबर भूमी झोपेच्या अधीन झाली होती. कादंबरीला काही झोप येत नव्हती. विमानाने अर्धा रस्ता पार केल्यावर कादंबरीला उगवणारा सूर्य नजरेस पडला. सूर्य हळूहळू कसा उजाडतो? ते कादंबरी फोटो काढून टिपत होती.

सूर्य जसा कलाकलाने उगवतो, तसाच आपल्याही आयुष्याचा प्रवास अंधाराकडून उजेडाकडे होत आहे, याचा आभास तिला होत होता. सूर्य उगवताना कादंबरीला कधी विमानातून बघता येईल? याची कल्पना तिने कधीच केलेली नव्हती.

विमान मुंबई विमानतळावर उतरले. आपल्या सामानाच्या बॅग घेऊन कादंबरी व भूमी विमानतळाच्या बाहेर पडल्या. भूमीने आधीच कॅब बुक करुन ठेवलेली होती. गाडी विमानतळावरुन पुढे हायवेला लागल्यावर इकडे तिकडे बघितल्यावर कादंबरी भूमीकडे बघून म्हणाली,

"भूमी, जाताना हा हायवे, आजूबाजूचा परिसर मला भारी वाटत होता. आता स्वच्छ दुबई बघून आल्यावर मला हे सगळं अजिबात आवडत नाहीये. वेगळंच काहीतरी वाटत आहे."

यावर भूमी हसून म्हणाली,
"हो, कुठूनही बाहेरुन जाऊन आल्यावर असंच वाटतं. आपण फक्त दहा दिवस तिकडे होतो. राघव गेल्या वर्षापासून तिकडे राहतो, त्याला किती वेगळं वाटेल."

भूमीच्या बोलण्याला दुजोरा देत कादंबरी म्हणाली,
"हो ना, तो इकडे आल्यावर त्याला किती वेगळं वाटेल. माझं डोकं दुखत आहे. मी जरावेळ झोपण्याचा प्रयत्न करते."

कादंबरी एवढं बोलून डोळे मिटून पडली. तिला झोप लागत नव्हती, पण डोळे जड पडल्याने ती तशीच पडून राहिली.

नाशिक आल्यावर भूमीने तिला उठवले. भूमीने ड्रायव्हरला गाडी हॉटेल शिवसागर समोर थांबवायला सांगितली. गाडी थांबल्याने कादंबरीने डोळे न उघडता झोपेच्या गुंगीतच भूमीला विचारले,
"भूमी, आपण इकडे का थांबलो आहोत?"

"काही पोटापाण्याचं बघावं लागेल ना? मी आपल्यासाठी काहीतरी पार्सल घेऊन येते. घरी गेल्यावर पोटात दोन घास ढकलून आराम केला, तर बरं वाटेल." भूमी गाडीच्या खाली उतरली.

पुढील पंधरा मिनिटांनी भूमी हातात पार्सल घेऊन येऊन गाडीत बसली. तोपर्यंत कादंबरीने डोळे उघडून जागे होण्याचा प्रयत्न केला होता. गाडी भूमीच्या घराजवळ जाऊन थांबली.

"भूमी, दुबई ट्रीप कशी झाली?" सावंत काकूंनी गाडीजवळ येत विचारले.

भूमी कॅब ड्रायव्हरला पैसे देत होती. ड्रायव्हर सामानाच्या बॅग खाली उतरवून निघून गेला.
"सावंत काकू, ट्रीप एकदम मस्त झाली. मला पिण्याचे पाणी मिळेल का? आता डायरेक्ट संध्याकाळी पिण्याचे पाणी येईल."

"तुम्ही वर जा. मी पाणी घेऊन येते." सावंत काकू बोलून निघून गेल्या.

कादंबरीने तोपर्यंत सामानाच्या बॅग उचलल्या होत्या. भूमीकडे हलक्या बॅग दिल्या होत्या. सगळं सामान वर घेऊन गेल्यावर सावंत काकू पिण्याचे पाणी घेऊन गेल्या.

काकूंच्या हातातून पाणी घेत भूमी म्हणाली,
"काकू, तुमच्यासाठी दुबई वरुन स्पेशल खजूर आणली आहे. संध्याकाळी घरी आणून देते."

सावंत काकू खुश होऊन निघून गेल्या.

"लोकांना खुश कसं करावं? हे तुला चांगलंच कळतं." बॅग बाजूला ठेवत कादंबरी म्हणाली.

"त्या बॅग राहूदेत. आधी काहीतरी खाऊन घे आणि आराम कर. एकदा आरशात चेहरा बघ." भूमीने सांगितले.

तोंडावर पाणी मारुन कादंबरी फ्रेश झाली, कपडे बदलले, तरी तिच्या डोळ्यावरची झोप उडाली नव्हती. काही खाण्याची इच्छा नव्हती, पण पोटात कावळे ओरडत असल्याने कादंबरीने दोन घास पोटात ढकलले आणि पाणी पिऊन ती झोपेच्या अधीन झाली.

जाग आल्यावर कादंबरीने डोळे उघडून शेजारी बघितले, तर भूमी लॅपटॉप मध्ये काम करत बसलेली होती. बाजूला ठेवलेल्या मोबाईलमध्ये वेळ बघून कादंबरी म्हणाली,
"भूमी, अग मला झोपून चार तास झालेत. तू मला उठवायचं होतं ना."

"तुझ्या डोळ्यावर अजूनही झोप आहे. तशीही झोपेतून उठून काय करणार आहेस? पूर्ण झोप झाल्याशिवाय तुला बरं वाटणार नाही." भूमी लॅपटॉप मध्ये बघून म्हणाली.

"एवढं झोपूनही मला झोपल्यासारखं वाटत नाहीये. असं का होतं असेल बरं?" कादंबरीला प्रश्न पडला होता.

"यालाच जेटलॅग म्हणतात." भूमीने उत्तर दिले.

कादंबरी तशीच पुढील कितीतरी वेळ झोपून होती. भूमीने चहा बनवल्यावर कादंबरीला उठवले. चार ते पाच तास शांत झोप झाल्यावर कादंबरीला फ्रेश वाटत होते.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all