Feb 28, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

कादंबरी भाग १०

Read Later
कादंबरी भाग १०
कादंबरी भाग १०

मागील भागाचा सारांश: राघव हा कादंबरीच्या मावस आत्त्याचा मुलगा होता. दोघांची भेट डेझर्ट सफारी दरम्यान अचानक झाली. राघवने तिला दुबई फिरवण्याची तयारी दाखवली. कादंबरीने भूमीला राघव बद्दल सांगितले.

आता बघूया पुढे….

दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता राघव कादंबरीला घ्यायला हॉटेलवर आला. कादंबरीने राघवची ओळख भूमी सोबत करुन दिली.

"माझ्या मैत्रिणीला कुठे फिरायला घेऊन जाणार आहात?" भूमीने राघवला विचारले.

"आज मिरॅकल गार्डनला घेऊन जाण्याचा विचार आहे. सगळी ठिकाणं ठरवून ठेवली आहेत. दुबई फ्रेम, दुबई मॉल, बर दुबई, हिंदू मंदीर, पॉईंट ए, काईट बीच, ग्लोबल व्हिलेज, दुबई सफारी पार्क, इबनबटुटा मॉल, मोशनगेट, बुर्ज खलिफा ही सगळी ठिकाणं डोक्यात आहेत. दररोज थोडेफार फिरुयात." राघवने सविस्तरपणे सांगितले.

"अच्छा. तुम्ही प्रवास कशाने करणार आहात?" भूमीला प्रश्न पडला होता.

"बस, मेट्रो आणि कॅब. मी माझ्या मित्राचं एक कार्ड मागून घेतलं आहे. दोन्ही कार्डवर रिचार्ज मारलं की, बस आणि मेट्रोचा प्रवास आरामशीर होईल. काही ठिकाणी कॅब करावी लागेल." राघवने उत्तर दिले.

"मस्त प्लॅनिंग केलंय. तुम्ही कादंबरीच्या सोबत असाल, तर मला अजिबात टेन्शन राहणार नाही. माझ्या कामामुळे मी तिच्या सोबत फिरु शकणार नाही." भूमी म्हणाली.

"तुम्ही तिची काही काळजी करु नका. दररोज तिला हॉटेल वरुन घेऊन जात जाईल आणि सुरक्षितपणे संध्याकाळी सोडून देत जाईल. तसं बघायला गेलं तर दुबई एकट्याने फिरणही सोपं आहे." राघवने सांगितले.


"तुझा प्रश्नोत्तराचा तास संपला असेल, तर आम्ही जाऊ का?" कादंबरी म्हणाली.

चेहऱ्यावर हसू आणून मान हलवून भूमीने होकार दर्शवला.

हॉटेलच्या बाहेर पडल्यावर बसस्टॉपवर दोघेजण गेले, तेथून मेट्रो स्टेशनपर्यंत जाणाऱ्या बसमध्ये ते बसले. मेट्रो स्टेशनवरुन मेट्रोत बसून जेथून मिरॅकल गार्डनला जाणारी बस मिळणार होती, तिथपर्यंत मेट्रोने गेले. बसमध्ये बसून मिरॅकल गार्डनला ते पोहोचले. जवळपास दोन ते अडीच तासांचा प्रवास त्यांना करावा लागला होता.

राघव कादंबरीला रस्त्याने दिसणाऱ्या इमारतींची, एरियाची माहिती देत होता. मिरॅकल गार्डन बघून कादंबरीला भारी वाटले होते. तीन ते साडेतीन तास ते दोघेजण गार्डनमध्ये फिरत होते. जगात सगळ्यात जास्त फुलांचे आणि झाडांचे प्रकार तिथे बघायला मिळाले. पानाफुलांचा वापर करुन विमान, पेंग्विन, झोका असे बनवण्यात आलेले होते.

"कादंबरी, ह्या गार्डनची प्रतिकृती नाशिकला बनवलेली आहे, ती तू बघितली नाही का?" राघवने मिरॅकल गार्डनमध्ये फिरता फिरता विचारले.

"नाशिकमध्ये असं एक गार्डन आहे, पण मी तिथे कधीच गेले नाहीये." कादंबरीने उत्तर दिले.

राघवने कादंबरीला जवळपास संपूर्ण दुबईचे दर्शन घडवले होते. दररोज फिरुन कंटाळा आल्याने कादंबरीने एक दिवस हॉटेलवर थांबून आराम करण्याचे ठरवले होते. भूमीलाही त्या दिवशी कमी काम होते, म्हणून तीही हॉटेलवर लवकर परतली होती.

"कादंबरी, आपल्याला भारतात परतायला अजून फक्त दोन दिवस उरले आहेत. तू दररोज राघव सोबत एका नवीन ठिकाणी फिरत आहेस, तर तू तुझ्या नजरेतून दुबई बद्दल काय सांगशील? 'एका सामान्य भारतीय मुलीच्या नजरेतून दुबई.' असा मला एक ब्लॉग लिहायचा आहे. तुझे अनुभव मला त्यात लिहायला आवडतील." भूमी म्हणाली.

यावर कादंबरी म्हणाली,
"मी माझा अनुभव माझ्या शब्दांत तुला सांगते, त्यातून तुला जे लिहायचं असेल ते लिही. दुबईतील उंच बिल्डिंग बघून डोळे दिपतात. जगाकडे, आयुष्याकडे वेगळ्या नजरेने बघण्याची दिशा मिळते.

मला दुबईतील बस आणि मेट्रोची सिस्टीम आवडली. एका स्टॉपवरुन दुसऱ्या स्टॉपवर उतरा किंवा शेवटच्या स्टॉपवर उतरा, तिकीट सारखंच लागतं. मेट्रो स्टेशन वरील ऑफिसर आपल्या सर्व शंकांचे निरसन अतिशय शांतपणे करतात.

आपण रस्ता ओलांडत असताना रस्त्यावरील गाड्या थांबून आपल्याला रस्ता ओलांडू देतात. सार्वजनिक ठिकाणी असणारे बाथरुम किती स्वच्छ आहेत. दुबईत सगळ्यांना हिंदी कळत असल्याने इंग्रजी बोलण्याचे

दुबई मॉलच्या येथील फाऊंटन शोने डोळे दिपून जातात. बुर्ज खलिफाची उंची बघून आपण आकाशाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत, ही ग्वाही मिळते. दुबई मॉलमधील ऍपल स्टोअर, फिश ऍक्वेरिअम, जगातील मोठमोठ्या ब्रॅंडचे दुकाने एकाच छताखाली बघायला मिळतात. मॉलमध्ये सगळंच इतकं महाग होतं की, तिथे काही घेण्याची हिंमत तरी मी केली नाही.

मॉलचा विषय निघाला आहेच, तर इबनबटुटा मॉलचे डिझाईन वेगळेच आहे. मॉलच्या आत फिरताना त्याचे वेगळेपण बघायला मिळते.

पॉईंट ए च्या इथून समोर अटलांटिस हॉटेलचे मुख्य प्रवेशद्वार दिसते. शाहरुख खानचा चित्रपट हॅपी न्यू इअरचे शूटिंग त्या हॉटेलला झाले होते. तिथेही फाऊंटन शो होतो. गाण्यासोबत वेगवेगळ्या रंगाचे कारंजे नाचत असतात. रात्रीच्या अंधारात रंगीबेरंगी कारंजा बघायला मस्त वाटतं.

ग्लोबल व्हिलेजमध्ये मला ज्या देशांची नावंही माहीत नव्हती, त्या देशांची संस्कृती बघायला मिळाली. देशांचे पारंपारिक नृत्य प्रकार, त्यांचे कपडे, त्यांच्याकडे मिळणाऱ्या खास वस्तू आणि खाद्यपदार्थ. आम्ही भारतात जेव्हा प्रवेश केला, तेव्हा सगळ आपलंस वाटू लागलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेथील मंचावर महाराष्ट्रीयन नृत्य प्रकार साजरा होताना बघून आपण महाराष्ट्रीयन आहोत, याचा अभिमान वाटला.

दुबई सफारी पार्कमध्ये वेगवेगळे प्राणी बघायला मिळाले. उन्हात फिरुन घाम आल्यावर थंड वाटावं म्हणून ठिकठिकाणी शेड बांधून त्यात स्प्रिंकलर शॉवर बसवण्यात आलेले आहेत. मला ती व्यवस्था खूप आवडली.

हिंदू मंदिरात भारतातील जवळपास सगळेच देव होते. तेथील वातावरण खूप प्रसन्न होतं. मंदिरात जाऊन मनाला शांत वाटत होते. मंदिराशेजारी गुरुद्वारा आहे, तिथे संध्याकाळच्या नाश्त्याला आम्ही गेलो होतो. तिखट ओली भेळ आणि फक्कड चहा पिऊन मन भरुन गेलं होतं.

बर दुबईत गेल्यावर काही परिसर पुण्यातील लक्ष्मी रोड सारखा भासला, तेथील दुकानांची ठेवण बघितल्यावर आपण भारतातच आहोत, याचा भास होतो. बर दुबईत छोले भटूरे, डोसा, वडापाव, कचोरी, पाणीपुरी हे सगळं खायला मिळालं. परफ्युम्स, चॉकलेट, केशर, खजूर, ड्रायफ्रूटसचे मोठमोठे दुकानही बघायला मिळाले.

गोल्ड सूक या परिसरात सोन्याची बाजारपेठ बघायला मिळाली. आपल्याकडे कपड्याच्या दुकानाबाहेर असणाऱ्या पुतळ्याला कपडे घातलेले असतात, तसे त्या पेठेत सोनाराच्या दुकानाबाहेर पुतळ्याला सोन्याचे भरजरीत दागिने घातलेले असतात. सोन्याचे इतके मोठे दागिने असतात, हे बघून मला आश्चर्यचं वाटलं होतं.

मोशनगेटला मोठमोठया राईड्स मध्ये मी बसले. राघव सोबत होता म्हणून ठीक होतं. मी एकटी घाबरले असते. मी पहिल्यांदा इतक्या मोठया राईड्स मध्ये बसले होते. रोलर कोस्टर राईड बद्दल इतक्या दिवस फक्त मी ऐकत आले होते. पहिल्यांदा त्या राईडमध्ये बसण्याचा अनुभव मी घेतला.

राघवने मला दोन-तीन बीच दाखवले. दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यात माणूस जेव्हा खूप कंटाळलेला असतो आणि त्याला शांततेची आवश्यकता असते, अश्या ठिकाणी जाऊन बसल्यावर तो ती शांतता अनुभवू शकतो. मला तरी ती शांतताच खूप आवडली होती. शारजामध्ये एक बस्ताकिया म्हणून ठिकाण आहे, तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी पार्क आहे. खाण्यासाठी फूड कोर्ट आहे. वॉक करण्यासाठी मोठा परिसर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांतता अनुभवण्यासाठी मस्त ठिकाण आहे.

आतातरी मला एवढंच आठवत आहे. बाकी तुला काय लिहायचं? ते लिही. आता आपल्या सगळ्याच भावना शब्दात मांडता येत नाही."

"हेच भरपूर झालं आहे. हे मात्र खरं आहे, काही अनुभव शब्दात मांडता येत नाही. एकंदरीत तुझ्या बोलण्यावरुन तुला दुबई आवडलेली दिसतेय." भूमी म्हणाली.

कादंबरीने चेहऱ्यावर हसू आणून होकारार्थी मान हलवली.

"तू दुबईला कायमस्वरुपी राहू शकतेस का?" भूमीने विचारले.

"नाही ग. हा आपला देश नाहीये. इथे आपली माणसं नाहीयेत. हं आता म्हणायला गेलं तर माझ्या आयुष्यात माझी वाटणारी माणसं फारशी नाहीयेत, तरीही इथे मला करमणार नाही. दुबई फिरण्यासाठी म्हणून ठीक आहे. फिरायला राघव सोबत होता आणि रुमवर आल्यावर तू असायची, म्हणून मला एकटेपणा जाणवला नाही. नाहीतर मी एकटी दुसऱ्या कोणत्याच देशात राहू शकणार नाही." कादंबरीने उत्तर दिले.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//