कालचक्र भाग-३

हळू हळू उलगडत जात होतं.

दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये शिवांश मित्रांसोबत पार्टीची अरेंजमेंट झाली की नाही हे पाहत होता तितक्यात मागून येऊन अन्याने विचारलं.

" काय रे भावा पार्टनर मिळाला का ?"

" नाही अजून पण लवकरच ती तुमच्या समोर असेल." मिश्कीलपणे हसत तो अन्याला बोलला.

अनिकेतही त्याला असं हसताना पाहून थोडा विचारात पडला.

" चल रे, सगळी अरेंजमेंट झाली आहे आता फक्त उत्सुकता आहे फ्रेशर्स पार्टीची आणि हो कोणालाही पार्टीत त्रास झाला नाही पाहिजे. याकडे जातीने लक्ष घाला. पार्टी यावेळी ही जंगी झाली पाहिजे." शिवांश सगळ्यांना सांगत असतो.

शिवन्या नुकतीच लायब्ररीत जाऊन बसली होती आणि तितक्याच शिवांश तिथे पोहचतो आणि सरळ तिच्या डेक्स जवळ जातो.

" हाय "

शिवन्या डोकं वर काढून बघते आणि परत पुस्तकात मग्न होऊन जाते.

" हाय, हॅलो.. मी शिवांश आणि तू..... शिवन्या करेक्ट ?" अंश थोडा हसूनच बोलतो.

शिवन्या त्रासिक चेहऱ्याने अंशला बघते आणि पुन्हा पुस्तकात गढून जाते.

" सॉरी ! मी डिस्टर्ब करतोय तुला पण एक विचारायचं होतं. म्हणजे बघ ना आपल्या कॉलेज मध्ये फ्रेशर्स पार्टी आहे तर तू..माझी.. पार्टन...र बनणार का?? अंश विचारतच असतो. तितक्यातच शिवन्या झटकन मान वर करून अंशला रागाने बघते.

तिचा तो रागीट लूक पाहून अंश थोडा वेळासाठी तिच्यात हरवून जातो पण भानावर येत सॉरी बोलून निघायच्या तयारीत असतो.

शिवन्या मनातच बोलते,' मी याच्यावर का रागावले ? मुळात रागवण्यासारखं काही कारणही नव्हतं आणि तो पार्टीसाठी पार्टनर विचारत होता. आयुष्यभरासाठी नाही पण मला नकळत राग आला. अंश रूम बाहेर पडणार इतक्यात शिवन्याने त्याला आवाज देऊन थांबायला सांगितले.

"हां.. काय बोलत होता तुम्ही, माफ करा मी जरा पुस्तकात महत्त्वाचे वाचत होती त्यामुळे जरा चिडले." शिवन्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आणत शिवांशला बोलली.

" ते तू पार्टीत माझी पार्टनर होणार का विचारलं होतं पण असं वाटलं तुम्हाला विचारल्यावर राग आला आहे म्हणून मी आपलं निघालो." शिवांश उसनं हसू आणत शिवन्याला बोलला.

" हो " शिवन्याने एका दमात बोलून टाकले आणि लायब्ररीमधून ती बाहेर पडली.

शिवांश तिचं उत्तर ऐकून चाटचं पडतो. थोड्या वेळाआधी चिडली होती आता लगेच हो पण बोलली. अशी कशी ही, काही तरी गुढ आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा... अन् तोही तिथून जातो.

(पार्टीच्या दिवशी..)

" अगं शिवा, चल ना लवकर यार तिकडे पार्टी संपायला येईल तरी तू अजून तयारी करत आहेस." शिखा दोन तासांपासून दरवाज्याच्या बाहेर उभी राहून ओरडत होती.

" हो गं आलेचं, थांब ना का उगाच घाई करत आहेस ? आठची वेळ दिली आहे अजून अर्धा तास बाकी आहे." शिवाने आतून उत्तर दिलं.

शिवाऽऽऽऽऽ शिखा ओरडतच होती इतक्यात दरवाजा उघडला गेला आणि ती शिवाला पाहतचं राहिली.

कमरेपर्यंत रुळणारे आणि आवड म्हणून हलके कर्ल्स केलेले मऊ मुलायम दाटसर केस, दिसायला तशी सर्वसाधारण मात्र डोळे इतके बोलके की समोरच्याची नजर हटताचं कामा नये आणि ओठांवरच हसू, बोलणं इतकं लाघवी की कोणी न बोलता पुढे जाणार नाही. दिसायला मध्यमपेक्षा थोडी जास्त जाड पण लाडक्या नावाप्रमाणे लाडू मात्र दिसायला अगदी नाजूक. पण दिसत तसं नसतं असंच काहीसं या लाडूचा काही भरवसा नाही , जर कोणी चुकीचं काही करताना दिसलं किंवा एखादी गोष्ट मनाला नाही पटली तर त्या समोरच्या व्यक्तीचं काही खरं नाही. अशी शिवन्या, पार्टीसाठी तयार होती. कर्ल्स केस, वाइन कलरची डिझायनर साडी, तसाच डिझायनर ब्लाऊस, एक वेगळ्याच नाजूक डिझाईनचे चोकर तसेच कानातले आणि हलकासा मेकअप.

शिखाचं तोंड तिला पाहताच उघडं राहिलं.

" चल तुला आता नाही उशीर होत आहे का ? नौटंकी कधीही चालू होते तुझी..." शिवा तिला हसतचं बोलली आणि घराबाहेर पडली पण.....आणि ती वस्तू देखील.

"काळाचे चक्र गतीने पुढे जाऊ पाहत होतं. तिच्यासोबत आज परत काहीतरी घडणार होतं आणि तसंही नियतीने जे ठरवलं आहे ते त्या काळात घडवून आणतेच."

शिवा आणि शिखा दोघीही गाडीने कॉलेजच्या पार्टीत पोहचतात. तिकडे शिखा आपल्या पार्टनर सोबत निघून जाते. शिवाही अंशला शोधत शोधत पार्टी हॉल मध्ये येते. शिवांश पाठमोरा होऊन मित्रांशी बोलत असतो तितक्यात त्याला अन्या हाक मारतो.

"अंश"

शिवांश वळतो आणि इतक्यातच त्याला शिवन्या दिसते आणि तो तिच्यात गुंतून जातो. इकडेही शिवाचे तेच झालेले असते.

जिम नाही पण योगा आणि व्यायामाची आवड असलेला, मित्रांना थोडा ऑड वाटणारा पण सगळ्यांना हवाहवासा, आपल्या बरोबर असणाऱ्यांना प्रचंड जीव लावणारा, युनिक चॉकलेटी रंगाचे डोळे, कोणाशी बोलताना नजर अशी की नजरेनेच ठाव घेईल, पण तितकाच नम्र. जोवर कोणी चुकत नाही. नाहीतर नावातच शिव ज्याच्या तसाच रागीट. सफेद शर्ट त्यावर ऑलिव्ह ग्रीन कलरचा सूट, जेलने सेट केलेले केस त्यासोबत सतत चेहऱ्यावर लाघवी हसू जे पुरेसं होतं घायाळ करण्यासाठी त्याचा एक वेगळाच ओरा होता. असा शिवांश सुद्धा पार्टीसाठी रेडी होऊन आला होता.

हसतचं तो शिवन्याला भेटायला गेला आणि तिला घेऊन तो स्वतः च्या ग्रुप जवळ घेऊन येत बोलला.

" यांना भेटा, या आज माझ्या फ्रेशर्स पार्टीच्या पार्टनर मिस. शिवन्या इनामदार." हलकंस स्मित करून बोलला.

शिवन्यानेही सगळ्यांना हसून ग्रीट केलं.

काहीवेळाने पार्टीला सुरूवात झाली. हळू हळू पार्टी रंगात आली होती. गेम्सला सुरूवातही झाली आणि फ्रेशर्सही उत्साहाने सहभागी होत होते. मिस्टर आणि मिसेस फ्रेशर्स, ट्रूथ आणि डेअर, ट्रेजर हंट, पेपर डान्स असे अनेक वेगवेगळे गेम्स पार्टी मध्ये होते. त्यात शिवन्या आणि शिवांश उत्साहाने भाग घेतं होते.

हळू हळू पार्टी संपत आली होती सगळे जेवून आणि नव्या उत्साहाने परत निघाले होते.

शिवन्या आणि शिखा ही निघतच होत्या इतक्यात शिवन्या वॉशरूमला जाते सांगून शिखाला गाडीजवळ जावून थांबायला बोलते.

इथे वॉशरूम मध्ये अचानक लाईट बंद चालू होवू लागते आणि विचित्र किंकाळ्या ऐकू येतात. शिवा घाबरून पळतच असते इतक्यात दरवाजा लॉक होऊन जातो. धावत जाऊन दरवाजा वाजते पण सगळे घरी निघून गेल्यामुळे त्या ठिकाणी कोणी नसतं. घामाघूम होऊन थकून ती तिथेच बसून जाते आणि अचानक तिच्या पर्स मधून ती वस्तू बाहेर पडते आणि तिचे डोळे विस्फारून जातात.

" हे ! हे घड्याळ, इथे कसं आलं ? मी..मी तर हे कपाटात ठेवून दिलं होतं ना मग.." घसा कोरडा पडल्यामुळे अडखळत बोलते.

अचानक ते घड्याळ हवेत उडू लागतं आणि त्याचा काटा गतीने पुढे सरकत जातो. हवामानात अचानक गारवा दाटून येतो आणि शिवन्याला अनेक विचित्र आकृत्या दिसू लागतात.

इथे शिखा वैतागून जाते शिवन्या वॉशरूमला सांगून गेली अर्धा तास झाला तरी अजून का आली नाही म्हणून ती परत कॉलेजमध्ये जाते. कॉरीडोर मधून चालतच असते तेवढ्यात पाठून अंश तिच्या खांद्यावर हात ठेवतो अन् ती दचकून जाते.

" अगं रिलॅक्स, एवढं दचकायला काय झालं ? आणि तू इथे काय करत आहेस ? कोणाला शोधते आहेस ?" अंश शिखाला हळूवारपणे विचारतो.

"अरे अंश, घाबरले ना यार असं कोण घाबरवतं का? आणि अंश यार शिवा बघ ना रे कुठे राहिली आहे ? मला येते बोलली आणि अर्धा तास झाला तरी अजून आली नाही. कधी पासून मी पार्किंग मध्ये उभी होती त्यात हे कॉलेज रात्रीचं 'हंटर कॉलेज' वाटतंय." शिखाने पटकन अंशला सांगितलं.

"चल आपण जाऊन पाहून येऊ." अंश आणि शिखा लगेच वॉशरूमच्या दिशेने गेले. जाऊन बघतात तर काय आतून थंड वाफा बाहेर येत होत्या. शिखाने दरवाजा ठोकला‌ पण आतून काही रिस्पॉन्स आला नाही म्हणून अंशने जोरात दरवाजा ढकलला आतून लॉक असल्यामुळे तो उघडत नव्हता तरी जोर लावून त्याने तो उघडला पण आत जाताच शिखा आणि अंश आश्चर्यचकित झाले.

शिखा जमीनीवर निपचित पडून होती आणि मगाशी तो त्यांनी पाहिलेला गारवा तोही नाहीसा झाला होता. शिखा धावतच शिवा जवळ जाऊन‌ तिला उठवू लागली पण तरी ती शुद्धीत नव्हती.

अंशने तिला जाऊन असेच उचलून घेतलं आणि त्याची नजर त्या वस्तूवर जाऊन पडली आणि तोही जरा घाबरला आणि सावध झाला. त्याने ते उचलून खिशात टाकलं आणि तो तिथून बाहेर पडला. शिखा आणि शिवाला घरी सोडून तोही घरच्या दिशेने निघाला खरा पण डोक्यात अनेक प्रश्नांची कोडी घेऊन...

नियतीने त्या दोघांना परत समोरासमोर आणलं होतं. काळाचे पडदे हळू हळू उलगडत जात होते. त्याला काळाचा महिमा कळून चुकला होता पण या सगळ्या पासून अनभिज्ञ होती फक्त "ती"


क्रमशः

© प्रणाली कांचन कृष्णा शिंदे

🎭 Series Post

View all