काळ आला होता पण वेळ नाही

Kaal


*कथेचे नाव:-*काळ आला होता पण वेळ नाही

*विषय* ::-काळ आला होता पण

*फेरी :- राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा*




घरात सगळे गणपतीच्या निमित्ताने जमले होते..

आज मोठी धम्माल होती,सगळीकडे मस्त आनंदोत्सव साजरा होत होता, सगळीकडे प्रसन्न वातावरण होते, घर पाहुण्यांनी भरले होते.नुसता किलबिलाट होता पुर्ण घरात

सगळीकडे हसण्याचे बोलण्याचे आवाज घरभर घुमत होते तर पाहुण्यांची वर्दळ वाढत होती.घरची मंडळी सगळ्या आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत होते.

घरातील करती स्त्री म्हणजे सासुबाई,आणि तिची जाऊबाई, आणि त्यांच्या हाताखाली बायका सगळ्या एका मोठ्या खोलीत बसल्या होत्या.. तर पुरुष बाहेर ओसरीत चटया टाकून मांडी घालून बसले होते.तरी एकीकडे छोटे छोटे पाहुणे मुलं खेळण्यात मस्तीत गप्पा गोष्टीत गुंग झाले होते

सासरी गेलेल्या मुली ,त्यांच्या सासवा, आज त्या ही आल्या होत्या.त्यात काही नवीन लग्न झालेल्या मुली त्यांच्या सासरच्यांसोबत माहेरी खास जेवणासाठी आणि पाहुणचारासाठी आल्या होत्या..

तसे ही ह्या घराची रीत होती ही ,पूर्वापार चालत आलेली रीत..कोण्या एका आईने ही रीत पाडली... काय तर म्हणे गणपतीच्या दिवशी नवीन लेकींसोबत घरातील दूर होत गेलेल्या लेकींना ही बोलवायलाचे मुली ,आज्या, काक्या आणि मावश्या ही आल्या होत्या,सगळ्यांच्या गप्पा छान रंगल्या होत्या, चेष्ठा मस्करी चालू होती, आज तर छान मैफिल जमली होती.

सगळ्या सासवा जमून गप्पा मारत होत्या,कोणी सुनांच्या कागळी करत होत्या तर काही गुणगान गात होत्या ( कारण त्यांच्या सुना समोरच बसल्या होत्या तर सहाजिक आहे की त्या सुनांचे गुणगान गाणारच ना !)

त्यात आता घरातील सासूबाईला रहावले गेले नाही जरा म्हणून सुरू झाली तर ती अगदी टोकापर्यंत पोहचली.तिला हे माहीत होते की मिठाई आणायला सुनबाई आणि आपला मुलगा गेले आहेत म्हणजे त्यांना आता तासभर तरी लागणार होता. पण त्यांना हे माहीत नव्हते की सुनबाई आणि लेकाऐवजी आपली मुलगी आणि जावई मिठाई आणायला गेले आहेत..


ह्या बदललेल्या प्लॅन मुळे मोठी समस्या निर्माण होणार होती, काळ येणार होता हे त्यांना माहीत नव्हते.तरी सासरे बुवा यांनी सासुबाईंना बजावले होते,"आज सगळ्या सासवा जमतील तर सूनबाईची तक्रार करू नकोस बरं! नाहीतर तुझे पितळ उघडे पडायचे सगळ्यांसमोर..आपली सुनबाई तशी गुणाने वागते पण ती मुळात गुणाची तोपर्यंत च आहे जोपर्यंत तू तिच्यासोबर गुणाने वागत आहेस.."

सासुबाई वैतगत म्हणाल्या होत्या, "हो समजलं,आता बास हो,मी बघून घेईल काय ते माझे.."


सासुबाई सुनेचे कौतुक करतांना सहज बोलून गेल्या ,आमच्या सुनेला जेवण बनवायची खूप हौस ,तिचा जर अख्या नातेवाईकात नंबर काढला तर खालून पहिला असेल आणि आळशी पणात वरतून पहिला असेल.ही होती ह्या घरातील सासू प्रतिभाबाई.

जी तिच्या सुनेचे म्हणजे प्राजक्ताचे सगळ्यांसमोर असे गुण गाणं गात होती.त्यांना वाटले प्राजक्ता मंदिरात गेली आहे तर तोंड सुख घेऊ जरा.

तर झालं असे की प्राजक्ता त्यांची सून त्यांच्या मांडीला मांडी लावून बसली आहे हे त्यांना माहितीच नव्हते.त्या समजत होत्या तिच्या मांडीला मांडी लावून बसलेली तिची लेक आहे...आणि घडले असे की जेव्हा ही त्या प्राजक्ता बद्दल बोलत तेव्हा त्या ,त्यांच्या बाजूला बसलेल्या प्राजक्ताच्याच मांडीवर जोरात टाळी देत.

मुळ गम्मत म्हणजे त्यांचे हे बोलणे प्राजक्ता निमूटपणे ऐकून घेत होती आणि सासुबाईंनी मध्ये मध्ये तिच्याकडे टाळी मागितली तर टाळी ती टाळी देत होती ,पण तेव्हा मात्र तिचे तोंड बघण्यासारखे होते...

इतक्यात सासूबाईला प्राजक्ता हळूच म्हणाली, "आई तुम्ही तर ती तुरच्या डाळीचे पुरण केले होते मी त्याची गोष्ट नाही सांगितली अजून, जरा ती ही गोष्ट सांगा ना ह्या सगळ्या बायकांना, ती तरी कशी विसरलात तुम्ही, सांगा तुमच्या सुनेचे प्रताप."

प्राजक्ताचा आवाज ऐकताच सासुबाई एकदम शॉक मध्ये जमा झाल्या होत्या जणू,त्यांनी पाहिलेच नव्हते की इतक्या वेळ जिला प्रीती समजून मी मांडीवर टाळ्या देत होते,ती प्रीती नसून प्राजक्ता होती...

तितक्यात जोर जोरात हसणाऱ्या सासूला जोऱ्यात ठसका लागला, त्यांना काहीच सुचत नव्हते,डोळे एकदम पांढरे पडले होते... सगळीकडे एकच गोंधळ उडाला होता,हसणारे सगळे शांत झाले होते..


आता तर प्राजक्ताला ही खूप टेन्शन आले होते, सासुबाई काहीच बोलत नव्हत्या,श्वास जणू जवळजवळ घेताच येत नव्हता... त्यांना पाणी ही घेतले तरी पुन्हा तसाच ठसका लागत होता...


प्राजक्ता पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर होती..तिला काही केल्या सुचेना.शेवटी तिला इलाज सुचला...


तिला सगळे विनवू लागले, "अग प्राजक्ता काही कर ग,नाहीतर तुझ्या सासूचे काही खरे नाही ग"

प्राजक्ता,थोड्यावेळ थांबून म्हणाली,"काकू आहे एक इलाज माझ्याकडे पण इलाज थोडा जालीम आहे, त्यात थोडा त्रास होईल आईंना... पण औषध काम करेल.."


काकू म्हणाल्या,"अगदी पटकन कर काय करायचे ते,पण कर बाई."

प्राजक्ता,"बघा काकू ,तो इलाज मी केला तर तुम्ही मलाच वेड्यात काढाल आणि मला लाजल्यासारखे होईल, म्हणून मी आधीच तुमची परवानगी घेत आहे"

काकू म्बणाल्या,"अग कर जो इलाज करायचा तो कर, आम्हाला तुझ्यावर भरोसा आहे ,पण तुझ्या सासूबाईला नीट कर इतकेच."


प्राजक्ता खोट्या काळजीने म्हणाली ,"हो माझ्या सासूबाईला नीटच करायचे आहे ,म्हणूनच हा जालीम इलाज मी करणार आहे.."

ह्यात प्राजक्ताला सासूबाईचा खरा चेहरा दिसला होता.ती मनात म्हणाली , "ह्या निमित्ताने, ज्या सासुबाई माझी चुक झाली की सावरून घेत होत्या ,मला धीर देत होत्या, होईल नीट सगळे असे समजावत होत्या आणि माझी कशीही बनवलेली भाजी,चपाती असो त्या खात होत्या त्याच इथे माझ्या मागे माझ्या स्वयंपाकाची खिल्ली उडवतांना माझी चेष्टा करत होत्या,जोरात हसत आहेत म्हणजे ते फक्त दाखवण्या पुरते होते आणि मनात माझी गम्मत बघत असत,आणिआता त्याचीच बातमी करून मीठ लावून सगळ्यांना सांगत आहेत." ह्याच गोष्टीचा तिला खूप राग आला होता..


आता प्राजक्ताला आपले वागणे माहीत झाले म्हणून त्यांनी ही ह्या खोट्या नाट्या खोकल्याचे नाटक केले होते.सासुबाईंचा हा ही त्यांचा डाव प्राजक्ताला कळला होता म्हणजे प्राजक्ताने सगळ्यांसमोर त्यांना खोटे पडायला नको होते, मग असे झाले असते तर त्यांचा अपमान झाला असता तो वेगळा...


नणंद म्हणाली ," वहिनी करा ना तो इलाज लवकर,आईला बरी करा, हा ठसा खूप त्रासदायक ठरेल."

प्राजक्ता म्हणाली ,"काळजी नको करू ,हे बघ कसा नीट करते आईंचा खोकला,पुन्हा कधीच हा खोकला लागणार नाही."


दिराने विचारलं , "वहिनी नेमके तू काय करणार आहेस असे?"

प्राजक्ता म्हणाली," मी पाठीत फक्त एक बुक्की मारणार आहे, हवे तर एक जोरात थापड मारून बरा करू शकते, म्हणजे जे काही अटकलेले असेल ते पटकन बाहेर येऊन सासूबाईंना आराम पडेल."


नणंद म्हणाली ,"अग हा कसला उपाय, हा तर जीव घेणा उपाय आहे वहिनी आणि काय बरं असे जीवघेणे अटकले असेल ?"

सून ही खोडसाळ होती,बोलायला तरबेज होती आपल्या सासूला इतरांबाबत टोमणे देतांना ,वाईट बोलतांना तिने ऐकले होते ,
पण जाऊदे त्यांचा स्वभाव आहे निदान माझ्याशी अश्या वागत नाहीत असे म्हणुन सोडुन द्यायची.
तसही तिने ठरवलं होतंजोपर्यंत माझ्यापासून दोन हात लांब आहेत तोपर्यंत मी ही गुणाने वागणार.
आज सूनबाईच्या हद्दीत सासुबाई शिरल्या होत्या..आणि त्यांनी तिला डिवचले होतेच ते ही सगळ्यांसमोर

"मग मीही काही तरी देणे लागत आहे व्याजा सहीत नाही पण थोडे तरी देणे बाकी आहे आणि ते दिलेच पाहिजे. कोणाचे उसने ठेवायचे नाही हे त्यांनीच मला शिकवले होते."प्राजक्तने मनात विचार केला.

प्राजक्ता म्हणाली ,"अग काही ही,म्हणजे एखादा टोमणा ही अडकला असेल, त्यामुळे ही हे होऊ शकते कधी कधी. "

प्राजक्ताचे हे बोलणे ऐकताच सासूबाईचा ठसका लगेच थांबला,आणि त्यांच्या ठसका थांबताच सगळीकडे एकच शांतता पसरली होती ,आणि थोड्या शांत झालेल्या सर्व बायका जोरजोऱ्यात हसू लागल्या...

विहिण बाई आल्या समोर आणि प्राजक्ताचा सासूबाईला म्हणाल्या, "प्राजक्ता अगदी बरोबर बोलली हो, खरंच तुमच्या घश्यात एखादा टोमणा अडकला असेल,आणि तसेच झाले आणि म्हणूनच तुमचा ठसका बरा झाला . "

सासुबाई खूपच खजील झाल्या होत्या, त्या समजून गेल्या आज काळ आला होता पण त्यांची वेळ आली नव्हती...

सासुबाई मनात म्हणाल्या ,
"आज नाहीतर काय झाले असते माझ्यासोबत देव जाणे, मीच मूर्ख की मी बोलत सुटले प्राजक्ता बद्दल, बघितले ही नाही की जिच्या बद्दल बोलते तीच माझ्या बाजूला बसली होती आणि तिलाच मी टाळी देत होते.."

प्राजक्ता हसत म्हणाली, "आई मग कसा होता इलाज, पुन्हा कधीच ठसका लागणार नाही असा होता ना माझा इलाज. "

*समाप्त*
*©अनुराधा आंधळे पालवे
*जिल्हा - मुंबई