काळ आला पण.............!

कोरोना काळात सुचलेली एक कथा.

काळ आला पण…….!

वत्सलाबाई वय वर्षे 78 सकाळपासुन बिछान्यात पडल्या पडल्या रानो कधी येते ह्याची वाट पहात होत्या.रोजच्या सवयीनुसार त्यांनी सकाळीच दार किलकिले करून उघडे करून ठेवलेले.रानो त्यांची केअर टेकर.गेले 20 वर्ष तीच घरची सगळी काम करत होती..एकुलता एक मुलगा रूधीर नौकरी निमित्त अमेरीकेत गेला तो तिकडचाच झाला.मधल्या काळात पती गेले आणि वत्सलाबाई एकट्याच पडल्या होत्या स्वत:च्या टु बीएचके फ्लॅटमधे.

रानो तर नाही पण "तो" मात्र कालपासुनच दाराजवळ दबा धरून बसलेला.आताशा सांधेदुखीमुळे वत्सलाबाईंना काठी शिवाय चालताच येत नसे.त्यात एकटेपणाने त्य अधिकच खचलेल्या,सदासर्वकाळ रानोवर अवलंबुन दिवस कंठणे चाललेले.

एक जीवघेणा हल्लेखोर दबा धरून बसलाय ह्याची सुतराम कल्पना नसलेल्या वत्सलाबाई तळमळीने दाराकडे डोळे लावुन बसलेल्या.तेवढ्यात दाराशी हालचाल जाणवली.रानो लॅचकी ने दार लोटुन घरात आली.अरेरेऽऽऽ हिनेही मला साधे बघितले नाही.आता कुणाचे शरीर धारण करायला मिळाल्याखेरीज मी वार तरी कसा करू??मनातल्या मनात त्याचे विचारमंथन सुरू.

 योग्य संधीची वाट पहाण्यावाचुन पर्यायही नव्हता.एक वादळ घरात दाखल झाल्याची साधी कुणकुणही न लागलेल्या दोघी घरात बेफिकीर वावरत होत्या.रानोने आल्या आल्या स्वच्छ हात धुतले,आेटा पुसला.आज्जींसाठी चहाचे आधण ठेवले. तिकडे चहा होईपर्यंत आज्जीचे तोंड धुणे प्रातर्विधी उरकले.दोघींनी मिळुन चहा घेतला.आज्जींना बिछान्यावर झोपवुन रानोने सगळी कामे झरझर उरकली.रोज सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास ती वत्सलाबाईंकडे असायची.त्यांचे खाणेपिणे सर्व आटोपुन मगच ती घरी जायची.वत्सलाबाईंना रानोचाच आधार होता ह्या वयात.ती ही आईप्रमाणे त्यांची सेवा करायची.अगदी  17/18 वर्षाची होती तेव्हापासुन तीच काम करत होती.आता तर कोणी नाही म्हणुन जरा जास्तच काळजीने बघायची ती आज्जींकडे.

इकडे "हा" रानोला आपली पहिली शिकार बनवण्यासाठी दाराआड सज्जच.डोळ्यात प्रचंड चमक निर्माण झालेली.आज पहिले सावज मिळणार..लार टपकत होती पण हे कायऽऽ??? ती तर माझ्याजवळही न फिरकता गेली की..हाय रे दैवा..अजुन किती काळ ही प्रतिक्षा..माझी बोहोणी होणार की नाही?

खरतर हे मोडक कुचक लाकुड सावज म्हणुन जास्त चांगलेय..नो रिस्क मोडवर पहिल्या दमात माझे खाते उघडेल पण ही खविस बाई जवळ येईल तर शप्पथ.."तो" विचार करत वाट पाहतोय योग्य संधीची..मनाची तडफड तगमग वाढत चाललेी.वेळ हातातुन निघुन चाललीय. ग्रेस पिरिएड संपण्यापुर्वी मला माझे खाते उघडायला लागणार.

किती सहज एंट्री मिळाली ह्या घरात.ना कोणाची चाहुल ना भीती..पण आता हि बया जवळ येईल तेव्हा खरे..तेवढ्यात…..!

तेवढ्यात बिछान्याची हालचाल झाली.ह्याचा चेहरा फुलला.आनंद गगनात माईना माईना अशी अवस्था..

आज्जीबाई हळुहळू एक एक पाऊल टाकत दाराच्या दिशेने येत आहेत.दार बंद करताना तरी ही माझ्या सवेंदनकक्षेत येईलच की मी लगेच तिच्या शरीराचा ताबा घेईन.मनात मांडे रचणे चालु.स्वर्ग दोन बोटे उरलेला.आज्जी दाराच्या अगदी जवळ.आता त्या दाराला हात लावतील आणि मी प्रवेशकर्ता होणार…..पण हाय रे दैवा,म्हातारीने दाराला काठीनेच लोटुन बंद केले आणि परत फिरली..

काय नीच बाई आहे.हाताने बंद करायला हात मोडलेत का हिचे..देवाऽऽ अजुन किती काळ प्रतिक्षा.असह्य होतेय आता..माझा अंत यायच्या आत मला हिच्या शरीराचा ताबा मिळु दे देवाऽऽ.त्याचा धावा चालू.

तेवढ्यात फोन वाजतो.वत्सलाबाई कोणाशी तरी बोलताएत.अचानक सुरकुतलेल्या चेहऱ्यावर लाली चढली.चेहरा हसतमुख.कसला एवढा आनंद झालाय.

"अच्छाऽऽ हो का!!" 

"अरेव्वा! कधी?ऊद्या येतोएस?नक्की ना,की मागल्यावेळ सारखे?" बोलताना नकळत डोळ्यातले पाणी टिपले.

नाही गं आई,नक्की येतोय..चल ऊद्या भेटू."

आज्जीला कोण आनंद झाला.आपला लेक कित्येक वर्षांनी घरी येणार.आनंद डोळ्यातुनही पाझरायला लागलेला.

"रानोऽऽऽ,जरा लवकर ये गं आज.रूधीर येतोय उद्या.तयारी करायचीय बरीच.असशील तशी ये."

"बरं आज्जी."

"तो" ही खुष.अजुन एक सावज गावणार.. रानोची वाट पहात पुन्हा तिथेच ऊभा.रानो आली वत्सलाबाईंनी सांगितल्या प्रमाणे एक एक काम उरकले आणि त्याच्या हाती न लागताच आली तशी गेलीही.हा पुन्हा हिरमुसला.आता उद्याची वाट पहाण्याशिवाय पर्याय नाही.चिडचिडत धुसफुसत उद्याची वाट पहाणे सुरू.

सकाळ झाली. नेहमीप्रमाणे रानो आली अन् गेली.आता त्याला तिच्यात तसाही इंटरेस्ट उरलेला नव्हता.नवा गडी नवे राज ह्या म्हणी प्रमाणे तो येणाऱ्या पाहुण्याची वाट पहात बसला.वत्सलाबाई जितक्या आतुर नसतील तितका "तो" आतूर झाला होता रूधीरला बघायला.

अखेर फोन वाजला."आई आलोय ग मीऽ.फक्त मी आलोय म्हणुन घाईने दार उघडायला येवु नकोस.मी लॅच उघडून येईन." 

"बरं बरं ये लवकर." वत्सलाबाईंचे शेवटचे दोन शब्द त्यालाही आपल्या पहिल्या वहिल्या सावजाची खूण पटवुन देत होते.त्याचा आनंद ओसंडुन वहात होता.फक्त काही क्षण आणि मी एका नव्या रूपात नव्या शरीरात प्रवेशणार…

आनंदाच्या हिंदोळ्यावर विहरत असतानाच दाराची हालचाल.कोणीतरी दार उघडलेय.आता घराच्या आत प्रवेश‍."अरेऽऽ हा दर्प कसला येतोयऽऽ!?"

मला असह्य होताेय हा दर्प.

आणि एक आर्त किंकाळी…….

आह्ऽऽऽ…! मेलो मेलो...वाचवाऽऽ!

तडफड होतीय वाचवा..वाचवा…! सगळे क्षणात शांत….

रूधीरने आत येताना सॅनिटायझरने दारवाजाच्या दोन्ही हँडल्सला क्लिन करून प्रवेश केला होता….

आज एक कोरोनारूपी यमदूत मुलाने परतवुन लावला होता.

_______________(समाप्त)____________________

®© राधिका कुलकर्णी.

कोरोना काळात मन चलबिचल असताना लोकांना काहीतरी सकारात्मक वाचायला द्यावे ह्या उद्देशातुन ह्या अतिलघुकथेचा जन्म झाला.

कथा कशी वाटली?हे कमेंटद्वारे जरूर कळवा.

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत ही कथा कुठेही शेअर करू शकता.धन्यवाद.

कथा आवडल्यास माझ्या पेजला जरूर फॉलो करा..

@राधिका.

🎭 Series Post

View all