का नाही जमणार?...

Saglyanna Sagal jamat fakt atmvishwas hava
का नाही जमणार?...

"आई काय झालं? मोबाईलवर विडिओ सुरू आहे पण तुमचं लक्ष दुसरी कडेच आहे. काय झालं?"

"अग माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला होता, त्याच्याच विचार करत होते."

"काही सिरीयस आहे का?"

"नाही त्या भेटण्याचं ते तुमच्या भाषेत काय म्हणतात गेट टु टुगेदर करण्याचं ठरवतायेत."

"अरे वा हे तर मस्तच आहे."

"काय मस्त ग, त्या फोर्स करत आहेत पण मला जायचं नाही आहे."

"का असं का? का जायचं नाही तुम्हाला."

"नाही ग मी त्या सगळ्यांसारखी नाही."

"हे कुणी ठरवलं?" तिने मोठे डोळे करून विचारलं.

"मीच माझं ठरवलं, ये तू मला बोलू दे ग."

"ओके बोला."

"ह्या सगळ्या माझ्या बालमैत्रिणी, म्हणजे बारावीपर्यंत सोबत होतो पण त्यांनतर सगळ्या शिक्षणासाठी इकडेतिकडे गेल्या, संपर्क तुटला. त्यांनतर लग्न झाली, सगळ्या त्यांच्या संसारात रममाण झाल्या. मग माहेरी गेल्यानंतर कधीतरी कुणाची तरी भेट व्हायची. सगळ्या काहीनकाही करायच्या ग. कुणी जॉब वर होत्या कुणाचं पार्लर तर कुणाचा स्वतःचा बिझनेस. सगळ्या बिझी होत्या. मी मात्र माझ्या आयुष्यात काहीच करू शकले नाही. (त्यांच्या चेहरा थोडा उदास झाला होता) आता दोन वर्षांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने ग्रुप बनवला आणि मलाही त्यात घेतलं. मग गप्पागोष्टी सुरु झाल्या, फ्री असल्या की अध्येमध्ये बोलत असतात."

"आई तुम्ही काहीच करू शकला नाहीत असं का म्हणालात?"

"मग काय केलं ग काहीच केलं नाही."

"आई तुम्ही तुमच्या लग्नानंतरची इतकी वर्षे या घराला दिलीत. घराला घरपण आणलंत. सगळ्यांची सेवा केली, मुलांवर चांगले संस्कार केले. सगळ्यांना आपुलकीने, प्रेमाने जपलं इतकं सगळं करूनही काहीच केलं नाही असं म्हणताय. आजही तुमच्या शिवाय घरातलं पान हलत नाही, सगळ्यांना तुम्ही हवे असता, का? तर लडा लावलाय तुम्ही त्यांना. ही नाती ही माणसं जी तुम्ही प्रेमाने जोडून ठेवली आहेत ना हीच तुमची खरी कमाई आहे आणि ही त्या लाखो रुपयांपेक्षा खूप जास्त आहे.

आता भावुक व्हायचं नाही आणि डोळ्यातून अश्रू येऊच द्यायचे नाही. मी तुमच्या मैत्रिणींना कळवते की तुम्ही गेट टुगेदरला येत आहात."

"अग मला नाही जमणार."

"का नाही जमणार? एकदा गेलात ना तिकडे की सगळं जमेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि आनंदी रहा. मला हे जमणार नाही हा विचार डोक्यात येऊच द्यायचा नाही. एकदा आत्मविश्वास आला ना की सगळं जमेल. इतकी वर्षे घरातच होतात आता बाहेर पडा आणि मोकळा श्वास घ्या."


मीनलताई गेटटुगेदरला गेल्या आणि परतल्या तेव्हा त्यांच्यात वेगळाच उत्साह होता, आत्मविश्वास होता. मनातलं दडलेलं फुलपाखरू बाहेर पडून आकाशात मुक्तपणे पिंगा घालू पाहत होते. चेहऱ्यावर निखळ हास्य होतं.
स्वतःतल्या स्व ला भेटून आल्या होत्या.

आल्या आल्या लगेच तिला घट्ट मिठी मारली.

"थँक यू, तुझ्यामुळे मला हे जमलं."

समाप्त: