'क' कोरोनाचा......(भाग ६)

It's story of old women. She survived in lokdaun.

क कोरोनाचा .....( भाग ६)

आज्जी. गजरेवाली आज्जी.
रस्त्याच्या कडेला बसणारी.
छोटीशी टोपली, छोटीशी आज्जी. सत्तरीतली.
गजऱ्याने भरलेली टोपली आणि आज्जी स्वाभिमानाने...
आज्जीच खूप वय झालय पण तरीही हार, गजरे विकतेय, घरच्यांना हातभार म्हणून. आज्जीला दोन मुलं. दोघेही कमावते. तरीही आज्जी स्वकमाईने जगणारी..

आज लॉक डाऊन मध्ये कशी काय? 
मी - 
"अग आज्जी तू इकडे कशी काय?"

आज्जी - आग लोकडाऊन संपला म्हण, म्हणून आलिया.

"संपला नाही ग अजून ...आता तुझ्याकडील गजरे कोण घेणार?"

आज्जी - ज्यासनी घ्यायची त्ये घेतील.

"होंका? कोरोनाने तुला घेतलं मंजे?"

आज्जी - घेतलं त घेतलं. आज न उद्या मराचच आये की..

"अस काय? .....मर की ..मी कूट नाय मन्नतेय. पण एकटीच मर ना. सगळ्यांना कशापायी घेऊन जाते वर."

ती - येडी झालीस का तू? मी कशापायी नेणार सगळयासनी?

"तुले जर कोरोना झाला तर तो बोलणार आहे का मी तुले झालो म्हणून. तुले माहीत होईस्तोवर तुयापासून कितीजनाले पसरवशील तू. तूया नातवापोराले पण होईल बग. ( मी तिच्याकडून हार घेते नि पैसे देते)

ती - खर की काय?

" टीव्ही बघत न्हाय तू?"

ती - न्हाय ग. मले काय कळत टीव्ही फिवी तल.

"म्हणून सांगते घरला जा."

ती - मले बी वाटत माय घरी रहावं म्हणून.  पण सूना लय वंगाळ बोलत्यात बग. हातातला घास तोंडात जात न्हाय बग.

"अस्सं होय..."

ती - पोरबी त्यांचं च एकतया. नातवबी हिडीस फिदीस करतायत. मलेबी वाटतं जिंदगीभर म्या कस्ट केले आता जरा दम धरावा. पण माह्या नशिबात न्हाय बग. लगीन झाल्यापासुन गजरे एकटुया, धन्याचा मायावर लय जीव पण तो गेला न मी अनाथ झाले..

आज्जी डोळ्याच्या कडा पुसायला लागली तशी मी बी जवळ गेली. 

"गप हो आजी, आग आयुष्यभर तू हार गजरे विकलीस  पन जेव्हा तू मरशील तेव्हा फुल सोड फुलांची पाकळी सुद्धा मिळणार नाही. सूनाना सांग मले जर नीट घरात राहू देत नसाल तर बाहेर राहून  कोरोना घेऊन येईन न तुमा सगळ्याले सोबत घेऊन जाईल. मग चला सोबत स्वर्गात..."

आजी हसली "कायबी बोलतीस तू?"

"मग न्हायंतर काय? एकल तर ठीक न्हाईत लाव पोलिसांना फोन. सगळे सुतासारखे सरळ होतील."

 ती -  न्हाय ग, माझा पोरांमंदी अन नातवा मंदी लय जीव आहे. मी अस कदीबी नाय करणार.

"नको करू. मीच लावते फोन बीएमसीवाल्याना अन सांगते इथं एक म्हातारी खोकलून रहायली म्हणून. तुले उचलून नेतील मग बघू".

ती  - आग अशी काय करते. जाइल की मी.

"आग तुझं वय जास्ती. म्हातार्यांना लवकर कोरोना होतो म्हणे म्हणून काळजी वाटते ग. बाकी काही नाही."

ती - हो ग बाई जाते आताच.

 मी - हे घे पैसे?.

ती - कशाचे? तू दिलेकी मघाशी..

मी - ठेव की तब्येतीसाठी. तुझ्या नातीने दिले अस समज...

ती - नको तुझे पैसे ठेव तुझ्याकडे...हे घे फुल नि गजरा...

मी - कशासाठी?

ती - तू्झ्या आजीने दिले अस समज..........

            तर अशी ही स्वाभिमानी आज्जी. हिच्यासारख्या कितीतरी आज्या आपल्या आजूबाजूला आहेत. आजोबासुद्धा आहेत. ह्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे ते आपण कसोशीने पार पाडत असाल ही आशा...
पुन्हा एकदा 
"लॉकडाऊन मध्ये कोरोनाला मारायचाय, माणुसकीला नाही."
 

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

माझी पोस्ट माझे नावरहित सामायिक केल्यास.......... चुकीला माफी नाही. (कॉपीराईट भानगड वैगेरे वैगेरे.)
हसत जगा नि सर्वाना हसत जगू द्या.

आपल्याला जर माझ्या कथा आवडत असतील तर मला फॉलोव करा.

🎭 Series Post

View all