'क' कोरोनाचा ......(भाग 3) ड्युटी.

Thank-you it's small word for your sacrifice. Grand salute to all Superman and superwomen police. "दिलसे नमस्कार".

             'क' कोरोनाचा....( भाग 3) ड्युटी.
 
घरट. छोटंसं. त्यात चिमणा चिमणी.
आणि त्यांचं छोटस पिल्लू.  
चिमणाचिमणी भुर गेलेत. चारा आणायला.
पिल्लू घरात एकटच? नाही. 
आजी आहे सांभाळायला.

    मोठ्या मुंबईत पिल्लुच छोटस वन बीएचके घर.
      
        तर वन बीएच के घरात दिवसा 2 जीव, रात्री चार जीव, कधीकधी रात्री 2 जीव वास करायचे.
का? पिल्लुचे आईबाबा पोलीस  आहेत. 

नवरा बायकोला 'सुटेबल'  म्हणून एकावेळी ड्युटी लावलेली किंवा तशी सोय केलेली.

         लग्नाला चार वर्षे झालीत.
डॉक्टरांच्या वाऱ्या करून मागील वर्षी पिल्लुच आगमन झालेलं.
पिल्लुला सात महिने झालेत.
सगळं आनंदी आनंद.

 पण दृष्ट लागलीय. 
पिल्लू छोटस कोवळस. 
आणि ह्या कोरोनाने थैमान घातलाय.
वरून ऑर्डर. पील्लूच्या मम्माला.
 ड्युटीवर जॉईन व्हा. लगेच.
 नो एक्सक्युज.
 
तिच्या जीवाची घालमेल सुरू.
बाळ छोटस. करणार कस?
वारिष्ठांचे आदेश. रुजू व्हा नाहीतर.........
 वरिष्ठांचे पण चुकत नव्हते. कामाचा लोड आणि काय?


तो आणि ती विचार करत बसलेले.
रुजू व्हावं लागेल.

पहिला दिवस. 
खूप रडली ती.
पण गेली.
तिच्यासारख्या कामावर खुपजणी.
घरदार मागे टाकून ड्युटीसाठी पुढे आलेल्या.
कर्तव्य आहे शेवटी आणि पोटाची भूक  सर्वात मोठी.

मग तिनेही मन कठोर केलेलं.
पण शेवटी शरीर आहे, मशिन नाही.
बाळ अंगावर दूध पित होत त्यामुळे छाती दाटून यायची. 
पुन्हा रडारड.
ऐकणारे, समजवणारे खूप पण त्याच जळत त्यालाच कळत.
आईची माया मोठी.
नंतर नंतर सवय झालेली.

तो.
तोही काही वेगळा नाही.
मन मारून मशीनसारखं जगणं.
 भावनांना 'रिसायकल बिन' मध्ये टाकून जगायचं.
'हेही दिवस निघून जातील' अस स्वतःलाच समजवणारा.

खर आहे, कुणाचे दिवस किती दिवस टीकलेत बरं.......


आजचा दिवस खूप वाईट. 
सकाळीच,
तिला जाणवलं की छातीमध्ये, स्तनांमध्ये दुखतंय.
गाठीसारखं वाटतय.
हो, हो, तीच. गाठ आलीये. दुखतंय खूप. काय करावं?
घरातील काम? 
दुखणं? 
बाळ?
डॉक्टर?
ड्युटी?
काय करावं?

शेवटी ती गेली..ड्युटीवर....
भारतीय स्त्री.....सहनशील.....वैगेरे..वैगेरे.......

आठ तासांची ड्युटी दहा - बारा तास कशी होते ते कोणत्याच पोलिसांना शब्दात सांगता येणार नाही.
आजही तेच..
 
ती घरी आली. दहा तास ड्युटी करून. जाण्यायेण्याचा वेळ वेगळाच.
पुन्हा घरचे काम.

तोही आला. रात्री अकराला.
जेवायला बसला. जेवण करून झोपायला गेला.
झोपतेवेळी दिसणारी पिल्लू आज जागी होती.

आई दूध पाजत होती नि झोपवत होती.

तो - उद्या सकाळी 5 वाजता लवकर डबा बनवून दे.  सगळ्याना लवकर बोलावलंय.

ती -  ( थोडं त्रासून ...)  कशासाठी?

तो - कुठेतरी मर्डर झालाय, म्हणून बोलावलंय इन्वेस्टिंगेशनसाठी बाहेर जावं लागणार आहे.

ती  - मला कदाचित जमणार नाही. आईला सांगाना...
  सकाळपासून दुखतंय.....

तो - (खूप जास्त चिडून) एक दिवस सकाळी उठायला सांगितलं तर नाटक का करतेस?

( झालं. इथेच दोघांच्याही ज्वालामुखीचा उद्रेक झाला. दोघांनीही एकमेकांचा खूप उद्धार केला.)

ती - तू कधी समजून घेणार नाहीस मला. मला सकाळपासून छातीत दुखतंय म्हणून मी नाही म्हणतेय. काय दुखतंय? कस दुखतंय? कधीपासून दुखतंय एवढंसुद्धा तु न  विचारता नाटक करते म्हणतोस.......

( रडारड सुरू...)

तो - अग मी पण सलग बारा तास उभा राहून ड्युटी करून आलोय ना...... माझं पण शरीर ठणकत आहे..... पण एक शब्दाने बोललो नाही मी...
उद्या अजून 5 वाजता जायचय..... 

ती - अरे तू पण समजून घेणा .....
 सकाळी आयता डबा नेतोस, रात्री आल्यावर जेवणाच्या ताटावर बसतोस, सगळं वेळेवर तुला मिळत ते वरून टपकत नाही ना.......
 तू फक्त बारा तास काम करतोस पन मी झोप सोडून फक्त काम नि कामच करत असते. आणि बाईच दुखणं तुला कस कळणार ना... ते कळायला फक्त बाईच व्हावं लागतं.....

(तो थोडा विरघळलेला........)

तो - हो ग राणी.  मलाही लक्षात येतंय सगळं..... पण आपली ड्युटीच तशी आहे नि आत्ताची वेळी बेकार आहे.....मलाही वाटतं की तुम्हाला वेळ द्यावा.....
या कोरोनाचा ड्युटीमुळे जीव मेटाकुटीला आलाय. दररोज तेच ते मृत शरीर बघून मनच मृत झालाय ग.
अस वाटत .......आपणही मरुन जावं......
साली कसलीच झंझट नको ही.......

( ती पुन्हा रागावली ......)

ती - अस काही अभद्र बोलू नको. यांनंतर असकाही
बोलशील तर याद राख......आपल्या पिल्लुला तरी बघून अस काही बोलू नको......
आणि सकाळचं काय...
मी रात्रभर जागी राहील तुझ्यासाठी....... जे म्हणशील,  जस म्हणशील ते करून देईल......

(त्याच्या डोळ्यात पाणी.....)

ती - काय झालं? का रडतोस? सांगना?

तो - तुला सांगणार नव्हतो पण सांगतो.....
आज एका सोसायटीत गेलो होतो.. तिथे एक बाई कोरोना पेशंट होती...साधारण आपल्याच वयाची असेल.. ती हॉस्पिटलला जायला तयार होत नव्हती म्हणून आम्हाला बोलावलं.... ती सतत बोलत होती माझं पिल्लू छोटा आहे.... तीच बाळ दोन वर्षांचा आहे......कदाचित तिचा नवरा मेला असेल......'मी हॉस्पिटलमध्ये  गेल्यावर  त्याला कोण बघणार?..... आणि जर मी मेले तर माझ्या बाळाचं कस होणार?....' या काळजीने ती धाय मोकलून रडत होती...तीच बाळ पण रडत होत...आम्हालासुद्धा कळत नव्हतं की काय करावं?.....

 ती तिच्या बाळाला ना जवळ घेऊ शकत होती ना मुके घेऊ शकत होती. बाकीचे सर्व बघत होते. 
मग एका बाईने तिला हमी दिली की ती सांभाळेल बाळाला म्हणून.....ती बाई तेव्हा कुठे हॉस्पिटल मध्ये यायला तयार झाली....

दररोज मरणारे बघतो, दररोज मरण बघतो, पण त्या दोन वर्षांच्या बाळाच्या रडण्याने डोळ्यात पाणी आलं ग......
तेव्हा मला काय वाटलं सांगू.......आपण जर दोघेही कोरोनाबाधित झालो आणि आपल्या जीवाला बरेवाईट...........
तर आपलं पिल्लू...........

पुढचा अर्धा तास दोघांचाही  अश्रूसंवाद.........

रात्री दोघांचीही झोप ऑफ ड्युटीवर गेलेली.......

सकाळी लवकर उठून  ते दोघेही ऑन ड्युटीवर......


धन्यवाद आपल्या अतुलनीय प्रतिसादाबद्दल.

माझी पोस्ट माझे नावरहित सामायिक केल्यास.......... चुकीला माफी नाही. (कॉपीराईट भानगड वैगेरे वैगेरे.)
हसत जगा नि सर्वाना हसत जगू द्या.
आपल्याला जर माझ्या कथा आवडत असतील तर मला फॉलोव करा.

🎭 Series Post

View all