Login

का एक झाले ऊन आणि सावली ?(भाग ९ वा )

अवनी आणि राजवीरच्या संसाराचा अनोखा प्रवास..

# का एक झाले ऊन आणि सावली ?( भाग ९ वा)

©® आर्या पाटील.

गाडीने मुंबईचा रस्ता धरला तसा अवनीचा कंठ आणखी दाटून आला. पाठवणीचा तो क्षण म्हणजे क्षितिज जणू सुखदुःखाचं.मागे पडणाऱ्या माहेरात घुटमळणारं मन आणि नव्याने साद घालणाऱ्या सासरची लागलेली ओढ. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू. अवनीही या जाणीवेत न्हाहून निघत होती. तिच्या गालांवर ओघळणारे पाणी पाहून राजवीर मात्र गहिवरला. पुढच्याच क्षणी त्याने तिचे डोळे टिपले. तिचा हात हातात धरत नजरेनेच सोबतीची शाश्वती दिली. तिनेही येणाऱ्या नव्या पर्वाला स्विकारलं. स्मितहास्य देत त्या सोबतीचा स्विकार केला. रात्र प्रवासातच गेली. त्याच्या हातात हात देऊन कधी ती त्याच्या खांद्यावर विसावली तिलाही कळलं नाही. तो मात्र पुन्हा एकदा तिच्या स्पर्शाने हळवा झाला. डोळ्यांत अश्रूंनी गर्दी केली. विभावरीने मागे पाहताच त्याने आपली ओलेती नजर खाली घेतली. जाग आली तेव्हा स्वतःला असं राजवीरच्या खांद्यावर पाहून थोड्यावेळासाठी अवनीलाही अवघडल्यासारखे झाले.

" काय मग वहिनीबाई झाली का झोप ?" विभावरीने चौकशी करताच तिने होकारार्थी मान हलवली.

संध्याकाळी निघालेलं लग्नाचं वऱ्हाड दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास घरी पोहचलं. प्रवासाने सगळेच थकले होते त्यामुळे नव्या नवरीच्या गृहप्रवेशाचा विधी थोडक्यात आटोपता घेत सगळे विश्रांतीसाठी निघून गेले.

विभावरीने अवनीला राजवीरच्या रुममध्ये आणले. आन्हिके उरकून अवनीने कपडे बदलले. प्रवासाचा थकवा आला असल्याने विभावरीने आराम करण्याचे सुचविले. सत्यनारायणाची पुजा संध्याकाळी असल्याने मधे भरपूर वेळ होता.

विभाही फ्रेश होत तिथेच अवनीसोबत थांबली. तसेही लांबचा पल्ला असल्याने माहेरातून अवनीसोबत कोणीही आले नव्हते. ही कमी विभाने मात्र मोठी बहिण बनून भरून काढली.

राजवीर आकाशसोबत विभावरीच्या रुममध्ये थांबला.

अवनीला पाहण्याची इच्छा अनावर होत होती पण घरात पाहुणे असल्याने त्याने आपला मोह आवरता घेतला.

शेवटी दुपारी जेवणाच्या वेळेस रूमबाहेर पडलेल्या अवनीला पाहून राजवीरचा जीव भांड्यात पडला.

" अवनी, ठिक आहात ना ? आईबाबांना फोन केलात का ?" तिला गाठत तो चौकशी करता झाला.

" नाही. आल्यापासून वेळ मिळाला नाही." ती आजूबाजूला पाहत म्हणाली.राजवीरने शरदरावांना फोन लावला आणि अवनीच्या हातात दिला. त्याक्षणी अवनीला तो अगदी जीवाभावाचा वाटला. जवळ जवळ पाच दहा मिनिटे फोनवर शरदरावांशी बोलणाऱ्या अवनीला पाहून त्याला हायसे वाटले.

" थँक यू वीर." म्हणत तिने मोबाईल रिटर्न केला.

" या वीर साठी तर मी काहीही करायला तयार आहे." तिचं रुप डोळ्यांत साठवत तो शब्दांत हरवला.

" सध्यातरी पुजेची तयारी झाली की नाही तेवढच बघ. तुझ्या बायकोला आजच्या दिवस आमच्याकडे सुपूर्त कर बरं. उद्यापासून मग दिवस आणि रात्र दोन्हीही तुमचेच." चिडवीत काकू म्हणाल्या आणि पुजेच्या तयारीसाठी अवनीला घेऊन आत निघून गेल्या. इकडे राजवीरने फिल्मी स्टाईलने केसावरून हात फिरविला.

" ओ साले साहेब तुम्ही पण आवरून घ्या. पुजेला बसायचं आहे जोडीने." म्हणत आकाशने राजवीरला तयारीचं सुचवलं.

हिरव्या पैठणीत अवनी कमालीची सुंदर दिसत होती. पिढीजात दागिन्यांनी सजलेली तिची गोरी कांती पौर्णिमेच्या चांदप्रकाशागत उजळली होती. जमलेले सारेच तिच्या सौंदर्याचं कौतुक करत होते. तिला पाहताच

राजवीरच्या डोळ्यांना पुन्हा एकदा भूरळ पडली. स्वतःला सावरीत त्याने पाहुण्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला. सत्यनारायणाच्या पुजेदरम्यान तिचं रुप जवळून न्याहाळता झाला. नजरेनेच तिला सुंदर दिसत असल्याचा इशारा केला. तिलाही त्याच्या नजरेची भाषा समजू लागला होती.चेहऱ्यावर लाजेची लाली चढली आणि तिचं सौंदर्य वाढवती झाली. गावातील लोकांनी दोघांना भरभरून आशीर्वाद दिला. जेवणाचा कार्यक्रम संपेपर्यंत रात्रीचे बारा वाजले. आता बहुतेक सगळीच पाहुणेमंडळी निघून गेली होती.घरात फक्त घराचीच माणसे होती. त्यारात्रीही विभा अवनीजवळच थांबली. विभावरी राजवीरशी बोलणं स्पष्टपणे टाळीत होती. तिच्या या वागण्याने राजवीरला मात्र मेल्याहून मेल्यासारखे वाटत होते. अवनीला तिने हक्काने आधार दिला. त्या अनोळख्या ठिकाणी अवनीला रुळायला मदत केली.

" अवनी, राजवीर थोडा भावनिक आहे. भावनांच्या आहारी जातो पण मनाचा वाईट नाही. त्याच्याकडून काही चूक झाल्यास त्याला सांभाळून घे." रुममध्ये विभाने अवनीला आपल्या भावाची हळवी बाजू सांगितली.

" ताई, त्यांच्या याच भावनिकतेवर जीव जडू लागलाय. ते एवढे चांगले आहेत की त्यांच्याकडून कोणतीही चुक होणे अशक्यच आहे." ती विश्वासाने म्हणाली. तशी विभावरी उठून खिडकीपाशी आली.

" तो ही माणूसच आहे. चुकू शकतो.मग सावरशील ना त्याला ? त्याला एकटं पडू देणार नाहीस ना ?" ती शुन्यात नजर रोखीत म्हणाली.

" ते माझ्यासाठी देव आहेत.प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात मी त्यांच्या सोबत असेन. आजपासून माझ्या अस्तित्वाचा ते एक अविभाज्य भाग असतील. त्यांच्या हक्काचं प्रेम त्यांना मिळेल तुम्ही नका काळजी करू." म्हणत ती विभाच्या जवळ गेली.

तिची चाहूल लागताच विभाने डोळ्यांतील पाणी टिपले.

अवनीला मिठी मारत तिच्या निर्णयाचा सन्मान केला.

दुसऱ्या दिवशी लग्नानंतरच्या काही उरलेल्या विधी आटोपण्यात आल्या. तो दिवसही तसाच धावपळीतच गेला. दोघांची भेट झाली ती रात्री रुममध्येच.

खरं तर राजवीरने विभावरीला अवनीसोबत थांबण्याची विनंती केली पण

" मी रोजच तिला सोबत नाही देऊ शकत." म्हणत तिने ती विनंती टाळली. शेवटी तो रुममध्ये आला. दर्पणासमोर बसून अवनीचं स्वतःचं नवं रूप न्याहाळणं सुरू होतं. मनाचा मनाशी चाललेला संवाद एवढा गहिरा होता की तो आल्याची चाहूलही लागली नाही. तो आत आला ते अवघडतच. तिला विचारमग्न पाहून पुन्हा काळीज हळहळलं. थोडा वेळ तो ही तिला तसाच नजरेत भरत राहिला. तिचं लक्ष त्याच्यावर जाताच ती उठून उभी राहिली.

" राजवीर, तुम्ही ? तुम्ही केव्हा आलात ? विभा ताई नाही आल्या का ?" ती काहीशी गडबडत म्हणाली.

" तुम्ही नका काळजी करू मी झोपतो खाली तुम्ही वर झोपा." म्हणत तो बिछाना घेण्यासाठी बेडकडे वळला.

" मला तसे म्हणायचे नव्हते." ती दबक्या आवाजात म्हणाली.

" अवनी, मी एवढं नक्की समजू शकतो. शरिरावरच्या जखमा भरून निघतात पण मनाच्या जखमा भरायला वेळ द्यावा लागतो. तुमच्यासाठी वेळेचं कोणतच बंधन नसेल. तुम्ही फक्त स्वतःला सावरा." म्हणत तो मागे वळला. तात्काळ उठत ती त्याच्याजवळ पोहचली.

" अजून किती समजून घ्याल मला ? कोणी एवढ चांगल कसं काय असू शकतं ?" ती त्याच्यावर नजर रोखीत म्हणाली.

" जिथे आपलेपणा असतो तिथे आपसुकच समजून घेतलं जातं. आणि माझे तर.." बोलता बोलता तो थांबला.

" मनातलं ओठांवर येत असतांना शब्दांना बळजबरीने अडवू नये. मनाला त्रास होतो." ती त्याच्या मनाचा वेध घेत म्हणाली.

" माझे प्रेम आहे तुमच्यावर. तुमच्या सोबत असण्याची सवय व्यसन म्हणून मनाला लावून घ्यायला आवडेल. सतत डोळ्यांसमोर तुम्ही हव्या असता. तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहून मन आनंदी होतं तर तुमच्या डोळ्यांतील पाण्याने मन व्याकूळ.तुम्ही आहात तर जगातील सगळी सुखं ओंजळीत आल्यासारखी वाटतात. खूप खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर.." तो तिच्या डोळ्यांत हरवत बोलता झाला.

त्याच्या भावनांचा बाण तिच्या काळजाला लागला मात्र वेदनेऐवजी समाधानच आनंदाश्रू बनून गालावर ओघळले. तो पुन्हा अनावर झाला. तिला मिठीत घेत त्याने मनाला शांत केले. त्याच्या कुशीत विसावता तिलाही प्रेमाची अनुभूती आली. आपसुकच तिचे दोन्ही हात त्याच्याभोवती एकवटले गेले. बराच वेळ ते तसेच एकमेकांना मनाने अनुभवत मिठीत सामावले होते. अचानक कसल्याश्या जाणिवेने राजवीर भानावर आला. तिच्याभोवती गुंफलेले हात सोडवत त्याने स्वतःला तिच्या बाहुपाशातून मोकळे केले. तिनेही पटकन स्वतः ला सावरले.

" अवनी, तुम्ही झोपा. थकल्या असाल ?" म्हणत तो मागे वळला. क्षणाचा अवधी की अवनीने त्याचा हात पकडला.

" माझ्यावर प्रेम करणं तुमची प्रीत असेल आणि त्याच प्रीतीला मनापासून जपणे हे माझं कर्तव्य असेल.माझ्या कर्तव्यात मी भूतकाळाला आडवं येऊ देणार नाही. मला पत्नी म्हणून मनाच्या गाभाऱ्यात बसवलं त्याच हक्काने मला तुमच्यात सामावून घ्या.मला पुसायच्या आहेत साऱ्या वेदना तुमच्या प्रेमाने. त्याच प्रेमाची शपथ आहे तुम्हांला." म्हणत तिने त्याला आपल्या बाजूने वळवले. त्याच्या डोळ्यांत पाणी तरळल होतं. त्या ओल्या नजरेत तिला भरत त्याने तिला जवळ ओढले.

" नाही अवनी मला पुन्हा तुला त्याच त्रासात नाही पाहायचं." तो रडतच म्हणाला.

त्याच्यापासून दूर होत तिने नजर खाली घेतली.

" माझ्या अपवित्रपणावर तुमच्या प्रेमाचा महल तुम्ही नाही उभारू शकत हे मी का विसरले ? मनापासून सॉरी." त्याच्या बोलण्याने तिला पुन्हा भूतकाळाची आठवण झाली.

तिच्या शब्दांनी मात्र त्याच्या काळजावर आघात केला. तात्काळ तिच्या ओठांवर बोट ठेवत त्याने तिला शांत केले.

" असं नाही गं अवनी. अपवित्र तु तेव्हाही नव्हतीस आणि आताही नाहीस. पुन्हा स्वतःला दोष देऊन माझ्या प्रेमाचा अपमान करू नकोस." म्हणत त्याने तिचा चेहरा ओंजळीत धरला.

" मग माझ्याही भावनांचा सन्मान करा. अजून किती वेळ मी उपकाराचं ओझं घेऊन जगू. अत्याचाराने पिडीत लग्न मोडलेल्या माझ्याशी लग्न करून माझ्यावर आणि माझ्या आईवडिलांवर उपकारच तर केलेत तुम्ही. आता एका पतीचा हक्क नाकारून पुन्हा एकदा दया दाखवत आहात. हे सारच यातनेपेक्षा कमी नाही. किती वेळ या यातना सहन करायच्या मी ? जगणं नकोसं होईल माझं.." बोलता बोलता अश्रू अनावर झाले ती रडू लागली.

" अवनी, मला माफ कर. प्लिज रडू नकोस." म्हणत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. भावनांनी परिसीमा गाठली आणि त्याने मिठी आणखी घट्ट केली. मिलनाचा दरवळ प्राजक्ताच्या फुलांगत सुंगंध उधळता झाला.आयुष्याच्या क्षितीजावर मनाने अन् शरिराने एक होण्याचा सोहळा सजला. ढळत्या वेळेसोबत रात्रीलाही रंग चढला. या रंगात रंगून जात ऊन अन् सावली एक झाले. मिलनाच्या त्या क्षणीही त्याच्या डोळ्यांतून बरसणाऱ्या अश्रुधारा तिला अगतिक करून गेल्या. त्याच्या मनातलं शल्य तिला काही केल्या कळेना. त्यांच्या अश्रूंना तिने आपल्या ओंजळीचा आधार दिला. आपली सोबत हेच तर खरे दुःख आहे याची जाणिव होताच त्याला का असा दुःखी झालास हे विचारायचं धाडसही तिला झाले नाही.

" तुमच्या दुःखाचं कारण नाही माहित पण दुःखाच्या उन्हात ही सावली तुमच्या सोबत असेल." तिने त्याचा हात हातात घेत विश्वास दिला. तिच्या आश्वासक सोबतीने तो आणखी गहिवरला. तिला उराशी कवटाळित प्रेमाची जाणीव श्वासांत भरून घेतली. एकमेकांत विसावत ऊन सावली निद्रेच्या अधिन झाले. पहाटेचे दोन तीन वाजले असतील तोच अचानक राजवीर झोपेतून दचकून उठला. सर्वांग घामाने डबडबले होते. अवनीलाही जाग आली. राजवीरला अश्या घाबरलेल्या अवस्थेत पाहून तिने लाईट चालू केली. तसा राजवीर पटकन भानावर आला.

" वीर, काय झालं ? बरं नाही वाटत का ?" त्याला पाणी देत ती म्हणाली.

पाण्याचा ग्लास तोंडाला लावित त्याने घटाघटा पाणी पिले.

" मी विभा ताईंना बोलवू का ?" त्याच्या जवळ बसत डोक्यावरून हात फिरवीत ती म्हणाली.

" मी ठिक आहे." म्हणत त्याने चेहऱ्यावरील घाम टिपला.

" वाईट स्वप्न पाहिलं का ?" तिने असे म्हणताच त्याने होकारार्थी मान हलवली आणि पुढच्याच क्षणी डोकं तिच्या मांडीवर टेकवलं.

" राजवीर, तुम्ही झोपा शांत. सगळी स्वप्ने सत्यात उतरत नाहीत." म्हणत त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरविला.

तिचा हात घट्ट पकडत राजवीरने डोळे मिटले. तिच्या मायेच्या स्पर्शाने त्याला शांतता मिळाली. तिच्या मांडीवर तसाच तो झोपी गेला. तिला मात्र झोप येत नव्हती. त्याचं दुःख डोळ्यांत जागवित खूप वेळाने ती ही झोपी गेली.

सुखाच्या नव्या पर्वाला सुरवात झाली खरी पण दुःखाची किनार लेवूनच.सगळच सुरळित सुरु होतं. सासरच्या अंगणात अवनी रुळायला लागली होती. राजवीरच्या सहवासाने, घरच्यांच्या आपुलकीने, विभावरीच्या बहिणीच्या मायेने तिला संसाराचं सर्वात मोठं सुख मिळालं होतं पण मनातली सल काही कमी होत नव्हती. घरच्यांपासून आपला भूतकाळ लपविल्याची बोचरी जाणिव तिला तिन्हीसांजेला हळवं करून जायची. देव्हाऱ्यात गणरायाला साकडं घालीत ती सामर्थ्य गोळा करायची. लग्नानंतर आठ दहा दिवसांचा कालावधी असा पटकन निघून गेला. त्या दिवशी किचनमध्ये काम करीत असतांना अचानक अवनीला गरगरल्यासारखे झाले आणि ती कोसळली. घरातील सगळ्याच महिलांनी तिची आईच्या मायेने काळजी घेतली. थकवा आला असेल असा अंदाज बांधत घरीच प्राथमिक उपचार केले. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच तिला तसाच थकवा जाणवू लागला. पुन्हा गरगल्यासारखे होऊ लागले. तिने विभावरीला फोन करून आपल्या लांबलेल्या पिरेड्सची माहिती दिली. मनाला नकोती रुखरुख छळू लागली होती. विभावरीने तात्काळ तिला तिच्या हॉस्पीटलमध्ये येण्याचे सांगितले. राजवीर घरीच होता त्यामुळे त्याला कल्पना देत तिने हॉस्पीटले गाठले. मनातली शंका खरी ठरली आणि अवनी प्रेग्नेंट असल्याचं कन्फर्म झालं. अवनीच्या पायाखालची जमिनच सरकली. टेबलाचा आधार घेत ती खुर्चीवर बसली. आपला चेहरा हाताच्या ओंजळीत लपवित अनावर झालेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तिला असे रडतांना पाहून विभावरीही भावनिक झाली.

" ताई, आता या सत्याचा कसा सामना करू मी ? अजून किती वेळ राजवीरच्या भावनांशी खेळू ? घरच्यांच्या प्रेमाची अजून किती प्रतारणा करू ? जेव्हा त्यांना कळेल की मी..." बोलता बोलता तिला पुन्हा अश्रू अनावर झाले.

" अवनी, तु आधी शांत हो. तु कोणाच्याही भावनांशी खेळत नाहीस. राजवीरला सगळं माहित होतं. आणि घरच्यांच्या प्रेमाची प्रतारणा तेव्हा होईल जेव्हा त्यांना तुझ्या भूतकाळाचं सत्य कळेल. तु मनावर अपराधीपणाचं ओझं नको लादून घेऊस. निघेल यातूनही मार्ग." म्हणत विभावरीने तिच्या डोक्यावरून हात फिरविला.

" ताई, मी राजवीरना काय सांगू ? आता कुठे प्रेमाचा रंग आयुष्यात सजू लागला होता. अजून किती वेळा मी त्यांचं आयुष्य बेरंग करू.." ती रडत रडतच म्हणत होती.

" मी राजवीरला आत पाठवते. तु बोलून घे त्याच्याशी." म्हणत विभावरी बाहेर जायला निघाली तोच अवनीने तिचा हात घट्ट पकडला आणि मानेनेच नकार दर्शवला.

" मी बोलते त्याच्याशी. तु नको काळजी करूस." म्हणत विभावरी बाहेर पडली. शून्यात नजर रोखून बसलेल्या राजवीरला पाहून विभावरीने चेहरा गंभीर केला.

" राजवीर, माझ्या केबीनमध्ये ये ताबडतोब." ती म्हणाली आणि तिच्या केबीनमध्ये निघून गेली. इकडे अवनीला पाहण्याची इच्छा अनावर झाली होती पण विभावरीच्या बोलण्याचा रोख लक्षात घेत त्याने तिच्याकडे जायला प्राधान्य दिले. तसाच उठत लागलिच तो आत गेला. तिने तात्काळ केबीनचा दरवाजा बंद केला.

" राजवीर, अवनी प्रेग्नेंट आहे.." त्याच्याकडे नजर रोखीत ती म्हणाली.

तिच्या या वाक्याने राजवीर हादरला. काय बोलावे काहीच कळत नव्हते. आपला चेहरा ओंजळीत लपवित त्यानेही दिर्घ सुस्कारा घेतला. पुन्हा एकदा वेदनेची एक सल मस्तिष्कात प्रवेश करती झाली आणि तो गहिवरला.

" अवनी ठिक आहे ना ?" तो गहिवरलेल्या सुरात म्हणाला.

" नाही. ती तुटली आहे आतून पूर्णपणे. अपराधीपणाची भावना तिचं जगणं नकोसं करीत आहे. तुला आणि घरच्या मंडळींना आठवून सारखी रडत आहे." विभावरी हळवी होत म्हणाली.

" मी सांगून टाकतो तिला सगळं निदान मनावरील अपराधीपणाचे मळभ तरी दुर होईल. काय करेल ती फार फार मला सोडून जाईल पण जिवंतपणी नरकयातना तरी नाही सहन कराव्या लागणार तिला." डोळे पुसत तो गंभीर होत म्हणाला.

" वीर, चुकतोस तु. तिला सत्य सांगण्याची वेळ कधीच निघून गेली. ती खूप स्वाभिमानी आहे. जेव्हा खरं कळेल तेव्हा सगळच संपलेलं असेल. ती जिवंत तर असेल पण जगणं सुटलेलं असेल. आणि तिच्या उदरात वाढत असलेल्या तुझ्या बाळाचं काय ? मला माहित आहे त्या बाळाला संपविण्याचं पाप ती कधीच करणार नाही. सगळ्या समस्यांचा सामना करीत एकल पालकत्वाची जबाबदारीही पेलेल पण तुझ्या जबाबदारीचं काय? तुझ्या अंशाला असं स्वतःपासून दूर झालेलं पाहवेल तुला. तिच्या अपराधीपणाच्या भावनेला तुझं प्रेम हे एकमेव उत्तर असेल. तिला फक्त तुझं प्रेमच यातून सावरू शकेल.." म्हणत ती उठून राजवीर जवळ आली आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरविती झाली.

" ताई मी चुकलो पण त्याची शिक्षा अवनीला आणि तिच्या पोटात वाढत असलेल्या माझ्या बाळाला का ? त्या मोहाच्या क्षणी मी का नाही स्वतःला सावरू शकलो. गौरवने माझ्या मैत्रीचा चुकीचा अर्थ काढून माझ्याकडून नकोत्या गोष्टीची अपेक्षा केली. त्याचं मुलांप्रती असलेलं आकर्षण मला माहित होतं पण त्याचा शिकार मीच होईन याची पुसटशी कल्पनाही आली नाही मला. माझ्या ड्रिंकमध्ये औषध टाकून त्याने त्या संधीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या नकोत्या स्पर्शाने मला त्याची कपटी वासनाधिन मैत्री कळली. तात्काळ त्याला रुममधून बाहेर काढत मी आलेल्या प्रसंगातून स्वतःला वाचवले पण शरीरात भिनलेल्या औषधाच्या नशेने बुद्धीचा ताबा घेतला.तेवढ्यातच अवनी रुममध्ये आली. तिला स्वतःला सावरणे कठिण झाले होते. माझ्यासारखच तिच्यावरही कोणता प्रसंग ओढावला असेल असेच वाटत होते. काही कळायच्या आत तिचा तोल गेला. बेशुद्ध होऊन खाली कोसळत असतांना मी तिला सावरले. मनाच्या पुरुषत्वाच्या जाणिवा सशक्त झाल्या आणि शरीराचा तोल ढळला. मी नाही सावरू शकलो स्वतःला. तिच्या स्पर्शात वाहत गेलो. अत्याचार केला तिच्यावर. या जाणिवेतून बाहेर येईस्तोवर खूप उशीर झाला होता. तिचा शिकार झालेला देह पाहून मात्र मी पुरता भानावर आलो. कपाळावर हात मारीत कितीतरी वेळ तसाच रडत राहिलो. आपल्या हातून चुक नव्हे तर पाप झालं होतं या जाणिवेने मला घायाळ केलं. तडक पोलिस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःचा गुन्हा कबूल करावा असं राहून राहून वाटत होतं पण पुढच्याच क्षणी आईबाबांचा, तात्या आणि बयो आजीचा चेहरा समोर यायचा. माझ्या मागे लोकं त्यांचं जगणं नकोसं करतील ही एकच स्वार्थी भावना माझ्यावर वर्चस्व प्रस्थापित करून गेली आणि अंधाराचा फायदा घेत मी माझ्या अवनीला दुःखाच्या नरकात टाकून भित्रेपणाने पळून गेलो. पण त्यानंतर मात्र हा अपराध माझा जीव घेऊ लागला. पुढचे चारही दिवस डोळ्याला डोळा लागला नाही. डोळे मिटताच समोर तिचा निपचित पडलेला देह यायचा. आरश्यात पाहतांना स्वतःची घाण वाटायची. आईच्या कुशीत शिरून रडावसं वाटायचं. मी जिवंत होतो पण जगणं सुटलं होतं.

'आपण चुकलो तर ती चुकी सुधारण्याचा एक प्रयत्न नक्की करावा.' तात्यांचे हेच शब्द मला या मानसिक युद्धात बळ देऊन गेले आणि मग सुरु झाला अवनीला सावरण्याचा प्रवास.." बोलतांना सगळा प्रसंग जसाच्या तसा आठवला त्याला.

" तु तिला सावरलं नाहीस तर तुझ्या अपराधाला सावरलस. वीर तुझ्या या चुकीला मी तरी कधीच माफ करू शकणार नाही. काहीही असो तु स्वतःला सावरायला हवे होते. एका मुलीच्या स्वत्वाची किंमत तुला कधीच कळणार नाही. तु तिला सावरत आहेस म्हणून आणि फक्त म्हणून मी तुझ्यासोबत आहे." बोलता बोलता ती पुन्हा गंभीर झाली.

" ताई, खरच खूप अभागी आहे मी. बाप बनणार असल्याचा आनंदही हक्काने जगू शकत नाही. माझ्या अंशाचा स्वागत सोहळाही माझ्याच दुष्कृत्याने वेदनादायी बनला आहे." म्हणत त्याने विभावरीला मिठी मारली.

" वीर, शांत हो बाळा. हे असं का घडलं माहित नाही पण आता जे घडणार आहे त्याला सावरावच लागेल. त्यात त्या बाळाची काय चुकी. त्याला त्याचं हक्काचं प्रेम मिळायलाच हवं. आईचंही आणि बाबाचंही. तु फक्त अवनीला जप. तिच्या मनावरील अपराधीपणाचं ओझं तुझ्या प्रेमाने दूर कर.तिला विश्वास दे तु सोबत असल्याचा.अश्रूंना ओंजळीत घेऊन सुखाचे चांदणे शिंपीत तिचा मातृत्वाचा प्रवास सुखकर कर. तिच्यासोबत तुझ्या बाळाचा सहवास जग. एवढच तुझ्या हातात आहे. तु ते कसं करणार आहेस माहित नाही पण तुला करावच लागेल. घरच्यांना मी सांभाळेन. जा तिला गरज आहे तुझी." त्याला सावरीत विभावरी म्हणाली.

त्यानेही मनाशी पक्का निर्धार करून स्वतःला सावरले. डोळे पुसत तो केबीनबाहेर पडला आणि अवनीच्या रुममध्ये आला.

" अवनी.." तिला आवाज देत तो तिच्याजवळ पोहचला. दुःखात बुडालेली ती त्याच्या आवाजाने भानावर आली. जखमेवर कोणीतरी मायेने फुंकर घालित असल्यासारखे वाटले. तशीच खुर्चीवरून उठत ती त्याच्या दिशेने झेपावली. त्यानेही तेवढ्याच तत्परतेने तिला जवळ घेतले.

" राजवीर, सगळं संपलं ? मी म्हणाले होते माझ्याशी लग्न नका करू पण तुम्ही नाही ऐकलं. मी तुमच्या नशिबात फक्त वेदनाच घेऊन आले आहे. देवही माझीच परीक्षा का पाहतोय ? अजून किती काळ माझ्या वेदनेला कर्तव्य म्हणून स्वतःच्या डोक्यावर घेणार ? मी नाही उद्धवस्त करू शकत तुमचं आयुष्य ? कोणा परक्याच्या अंशाला का म्हणून स्वतःचं नाव देणार तुम्ही?" ती रडत बोलत असतांनाच राजवीरने तिला शांत केले. तिचे डोळे टिपीत चेहरा ओंजळीत धरला.

" तुझ्या अंशाला मी माझं नाव देऊच शकतो ना ? आजपासून या नात्यात तुझं माझं नसेल. हे बाळ आपलं असेल. तुझ्या या प्रवासात मी नवरा म्हणून तुझ्या सोबत असेन. मनातून नकारात्मक विचार काढून टाक. या बाळाच्या आयुष्याची नांदी सकारात्मकतेने होऊ दे. त्याला जगण्याचा नव्हे नव्हे आनंदी जगण्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार त्याला मिळू देणे हे पालक म्हणून आपलं कर्तव्य.." म्हणत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले.

" वीर, तुम्ही नका एवढे चांगले वागू भीती वाटते." ओला कटाक्ष त्याच्यावर टाकीत ती म्हणाली.

" अवनी, मला एक वचन देशील ? जुनं आठवून दुःखी न होण्याचं." तिचा चेहरा ओंजळीत पकडीत तो म्हणाला.

तिने गच्च मिठी मारत त्याला आश्वासन दिले जणू. ओंजळीतून काय सुटलय यापेक्षा काय उरलय हे जास्त महत्वाचं होतं. स्वतःला सावरीत अवनी नियतीने दिलेला हा धक्काही सहन करायला तयार झाली. विभावरीने आपल्या पद्धतीने घरच्यांना समजावित येणाऱ्या बाळाची गोड बातमी दिली. घर आनंदाने न्हाहून निघालं. राजवीरनंतर आज जवळ जवळ अठ्ठावीस वर्षांनी घराला 

बाळाचे वेध लागले होते. काका काकुंना मुल नसल्याने राजवीर आणि विभाच त्याचं जग होते. या जगात अवनी आली आणि त्यांच्या मनातली इच्छा राजवीरच्या बाळाच्या रुपाने पूर्ण झाली. विभावरीच्या लग्नाला दोन वर्षे होऊन गेली होती पण अजूनतरी पालकत्वाचा निर्णय घेतला नव्हता. राजवीरच्या बाळाच्या चाहुलीने सगळ्यांच्याच जगण्याला नवा हुरुप आला. शरदराव आणि सविताताईंनाही विश्वासात घेऊन विभावरीने लेकीच्या गर्भारपणाची बातमी दिली. सुरवातीला त्यांनाही धक्का बसला पण बाळाची चाहुल आजी आजोबांना सुखावून गेली. लेकीला कधी एकदा डोळ्यांत पाहते असे काहीसे झाले सविताताईंना. शरदरावांनी जुना अल्बम काढून अवनीचं बालपण पुन्हा एकदा डोळ्यांत साठवलं.

राजवीरने आश्वासक सोबती बनून तिचा गर्भारपणाचा काळ सुखावह केला. सुरवातीचे दोन महिने ऑफिसला जाणाऱ्या अवनीची दगदग पाहून विभावरीने तिला पूर्णवेळ विश्रांतीची ताकिद दिली. बयो आजी, राजवीरची आई आणि काकीने अवनीची लेकीप्रमाणे काळजी घेतली. तिच्या खाण्यापिण्याच्या वेळा, औषधपाणी, गर्भसंस्कार, व्यायाम सगळ्या सगळ्या गोष्टींचं एक वेळापत्रक बनवलं. घरी तर घरी पण कामाला गेल्यावरही राजवीरचे चौकशीचे दहा फोन ठरलेले असायचे.तिच्यासोबत जणू तो ही बापपण जगत

होता. तिला अस्वस्थ पाहताच तिचे दुःख वेचून घ्यायचा आणि हास्याचे रंग तिच्या गालावर सजवायचा. तिला होणारा त्रास पाहून मात्र एकांतात अश्रू ढाळित बसायचा. अजूनही रात्री दचकून उठायची सवय मोडली नव्हती त्याची. सविताताईंच्या आग्रहाखातर अवनीचा माहेरी पाठवलं पण फक्त आठ दिवसांसाठीच त्यातही चार दिवसांची सुट्टी घेऊन तो तिथे जाऊन राहिला. या सगळ्याची परिणिती बाळाच्या अनुकूल वाढीत झाली त्यामुळे विभावरीचं राजवीर सोबतचं वागणं पूर्वपदावर येऊ लागलं. सात महिन्यांचा काळ लोटताच डोहाळ जेवणाचा उत्सवही आनंदाने पार पडला. यासाऱ्यांच्या मायेने अवनी मात्र सुखावून गेली. राजवीरच्या प्रेमाने ती त्याच्याशी घट्ट बांधली गेली पण असा एकही दिवस गेला नसेल की आपण घरच्यांच्या भावनांशी खेळतोय या जाणिवेने ती अगतिक झाली नसेल.

बाळाचं गर्भातलं अस्तित्व मात्र तिला जगण्याला बळ द्यायचं. त्याच्या हालचालीने आईपणाची जाणिव गडद व्हायची. राजवीरही तिच्या पोटावर हात ठेवून या अस्तित्वाला जगायचा. त्याचं असं बाळाशी एकरूप होणं तिला पुन्हा भावनिक करून जायचं. तिच्यासोबत राजवीरही ते गर्भारपण जगला होता जणू. तिची सर्वतोपरी काळजी घेत आपली जबाबदारी लिलया पेलली होती. आता वेध लागले होते ते बाळाच्या आगमनाचे. बापपण प्रत्यक्षात जगायला मन आतुर झालं होतं. कोवळ्या उन्हाला सुखापरी ओंजळीत घ्यायची ओढ लागली होती. भूतकाळ तिथेच संपला होता जणू आणि वर्तमानाने भविष्याचं सोनेरी स्वप्न दाखवलं होतं.

क्रमश:

©® आर्या पाटील.