का एक झाले ऊन आणि सावली ?(भाग ८ वा)

सप्तपदी चालत ऊन सावली एकमेकांत विसावले..

का एक झाले ऊन आणि सावली ?( भाग ८ वा)

©® आर्या पाटील

दुःखाला सुखाची चाहूल लागली आणि सावली कोवळ्या उन्हात न्हाहून गेली. सगळी बोलणी करून शरदरावांनी राजवीरच्या कुटुंबियाचा निरोप घेतला.

" अवनी, आता लवकरच सून म्हणून तुझ्या हक्काच्या घरी ये." म्हणत बयोआजींनी जाता जाता नातसुनेची द्रिष्ट काढली.

पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार करून अवनी घराबाहेर पडली. राजवीर गाडीपाशी तिचीच वाट पाहत होता.

" बाबा म्हणाले तुम्ही मुंबईत थांबणार आहात ? कसलीही गरज लागल्यास सांगा. काळजी घ्या स्वतःची." गाडीचा दरवाजा उघडीत तो म्हणाला. तिने होकारार्थी मान हलवीत स्मितहास्य केले.

शेवटी सगळ्यांचा निरोप घेत गाडी बंगल्याबाहेर पडली. नजरेआड होईस्तोवर राजवीर गाडीकडे पाहत होता.

" चला, वीरसाहेब गेली ती. आता तिला कायमची इकडे आणायची तयारी करू." म्हणत काकांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा राजवीर चांगलाच लाजला.

मोहित्यांच्या बंगलात लग्नाची लगबग सुरु झाली. सगळच एवढं जलगतीने घडलं की एकही दिवस वाया घालवणे शक्य नव्हते. महिनाभरावर लग्नाची तारीख येऊन पडली. राजवीरच्या म्हणण्याप्रमाणे मोजक्या नातेवाईकांनाच आमंत्रण द्यायचे ठरले. लग्नाचा अवास्तव खर्च टाळून ती रक्कम विभावरी एका खेडेगावात उभारत असलेल्या हॉस्पिटलला देण्याचे निश्चित केले. नातसुनेसाठी तात्या आणि बयोआजींनी पिढीजात दागिने आधीच बनवून घेतले होते त्यामुळे कपड्यांची खरेदी वगळता फारशी महत्त्वाची कामे नव्हती. आमंत्रणही फोनवरच द्यायचे ठरले.

" मी काय म्हणते, छोटासा रिसेप्शन प्रोग्रॅम करूया की गावात. नाव मोठं आणि लक्षण खोटं म्हणत लोकं उगाचच नाव ठेवतील." राजवीरच्या आईने आपल्या स्त्रीमनाची सल बोलून दाखवली.

" अजिबात नाही जो काही कार्यक्रम करायचा तो कोकणातच. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा घालू तेव्हा देऊ गावजेवण." त्याच्या बाबांनी मात्र त्याच्या आईच्या इच्छेला पूर्णपणे बगल दिली.

नाही हो करता करता सगळं जुळवून आणलं.विभावरीला फोन करून सगळ्याची माहिती देण्यात आली.

इकडे शरदरावही जोमाने लेकीच्या लग्नतयारीला लागले. तिच्या आधी जमलेल्या लग्नासाठी सगळीच तयारी झाली होती त्यामुळे आयत्या वेळी धावपळ करायची गरज लागली नाही. समुद्राला लागूनच लेकीच्या डेस्टीनेशन वेडिंगचा घाट घातला होता त्यांनी. मनावरील मळभ झटकून सविताताईही कामाला लागल्या. नातेवाईकांची वर्दळ सुरु झाली. लग्नाच्या तयारीचा जोम वाढू लागला.अवनी नेहमी सारखी ऑफिसला जाऊ लागली खरी पण ती घटना मात्र तिच्या स्मृतीपटलावरून नाहीशी होण्याचं नाव घेत नव्हती. ऑफिसच्या एका पार्टीदरम्यान मैत्रिणींनी बळजबरीने सॉफ्टड्रिंकच्या नावाखाली तिला मद्य पाजले. पहिल्यांदाच अल्कोहोलचं सेवन करणाऱ्या तिला ते झेपलं नाही. डोळ्यांपुढे अंधारी येऊ लागली. काही कळेनासं होऊ लागलं तसच स्वतःला सावरत ती एका रुमपाशी पोहचली. रुमचा दरवाजा उघडा पाहून ती आत शिरली आणि दरवाजा बंद केला. त्याही अवस्थेत तिने रुममध्ये कोणी असल्याचा वेध घेतला. पण मद्याची धुंदी जास्तच चढली होती तिला. स्वतःला सावरणे अशक्य झाले. डोळ्यांपुढील अंधार अधिक गर्द झाला आणि काही कळण्याच्या आतच ती कोसळली. त्यानंतर मात्र काय घडले काहीच आठवत नव्हतं.सकाळी उठताच स्वतःचा अस्तावस्त अवतार,वनपीसवर लागलेले रक्ताचे डाग,ओटीपोटात उठणाऱ्या वेदना आपल्या बाबतीत काही चुकीचं घडलय याची जाणीव देत्या झाल्या. ती तशीच स्वतःला सावरीत हॉस्पीटलमध्ये पोहचली. चेकअप दरम्यान आपल्यावर घडलेल्या अत्याचाराची खात्री पटली. पोलिस केस करावी असे मनापासून वाटत होते पण कोणत्या गोष्टींचा पुरावा देणार ? आईवडिलांच्या सन्मानासमोर तिला सारच मिथ्या वाटलं. होणाऱ्या नवऱ्याला मात्र तिने सगळं सांगीतलं. त्याने दिलेल्या नकारानंतर परिस्थितीच्या वणव्यात ती पुरती होरपळून निघाली. राजवीर सुखाचा स्त्रोत बनून आला आणि तिच्या मनातल्या दुःखाग्नीची दाहकता कमी करून गेला.

आजही त्या आठवणींनी वेदनेची कळ उठत होती तिच्या मस्तकात. रुमवर एकटीच राहत असल्याने तो एकाकीपणा तिला जास्त छळीत होता.खोलीत अंधार करून सत्यापासून लपण्याचा प्रयत्न सुरू होता. तोच अचानक फोन वाजला आणि ती भानावर आली. राजवीरचं नाव वाचून त्या अंधारातही आशेचा प्रकाश गवसला. तात्काळ तिने फोन उचलला.

" अवनी, ठिक आहात का ?" त्याने तिचं नाव उच्चारताच ती गहिवरली. तिच्या हुंदक्याचा आवाज फोनमधूनही स्पष्ट ऐकला त्याने.

" तुम्ही रडत आहात ? मी आता येतो तिथे." म्हणत तो खरच तिच्याकडे जाण्याची लगबग करू लागला.

" राजवीर, मी ठिक आहे. नाही रडणार पण तुम्ही इथे येऊ नका. प्लिज." ती विनंती करीत म्हणाली.

" ठिक आहे पण आधी रुममधील लाईट चालू करा." तो स्पष्टपणे म्हणाला.

तशी ती बावरली. लाईट सुरु करीत त्याला रुममध्ये शोधू लागली.

" कुठे आहात तुम्ही ?" विचारतांनाही तिची नजर त्याला रुममध्ये शोधीत होती.

" आहो, मी घरीच आहे. पण मला खात्री होती तुम्ही अश्याच अंधारात आठवणींना आळवित बसला असाल. जेवलात का ?" तो पुन्हा काळजीने म्हणाला.

" नाही. जेवते थोड्या वेळात." ती अगदीच हळू म्हणाली.

" नाही जेवलात तर मी नक्की येईन तिथे. तुम्हांला माहित आहे मी काहीही करू शकतो." तो दम भरत म्हणाला.

" हम्म. त्याची गरज नाही मी जेवते. तुम्हीही जेवा. घरी सगळे ठिक आहेत ?" थोडीशी मोकळी होत ती म्हणाली.

" अवनी, खूप बरं वाटलं आज. उद्या ऑफिस सुटल्यावर भेटायचं का ?" तो पटकन बोलून गेला.

ती मात्र शांत झाली. तिचं उत्तर न आल्याने त्याचा चेहरा पडला.

" ठिक आहे. नाही येणार." तो पडक्या स्वरात म्हणाला.

" उद्या साडेपाच वाजता फ्रेशर्स कॅफेमध्ये भेटू. ऑफिसला लागूनच आहे." तिने असे म्हणताच त्याची कळी खुलली. चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहू लागला. तिचा निरोप घेत फोन ठेवला पण मनाला मात्र तिच्या आठवणींना निरोप देता आला नाही. प्रेमाचं गुंजारव प्रीतीची तान छेडतं झालं. कधी एकदा तिला भेटतो ही जाणीव त्याला स्वप्नांच्या अधीन करीत होती. शेवटी दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला भेटला डोळ्यांची अन् मनाचीही भूक शांत झाली. तिला सावरणं फक्त एवढाच एक उद्देश ठेवून पुढे रोजच त्यांच्या भेटीगाठी सुरु राहिल्या. सहवासाच्या रोपट्याला मैत्रीचा बहर येत होता. त्याच्या सहवासात आपल्या वेदना विसरून ती सुखाचे रंग लुटत होती.हिरमुसलेल्या चेहऱ्याला पुन्हा एकदा आनंदाची भरती येत होती. तिच्या या भरतीत तो मात्र चिंब भिजत होता. मैत्रीचा बहर त्याचं नातं आणखी परिपक्व करता झाला. परिस्थितीच्या रखरखत्या उन्हातही तिच्या आयुष्याच्या गुलमोहराला प्रीतीचा लाल रंग चढू लागला. ती रमू लागली त्याच्यात.

एके दिवशी कॅफेमध्ये असतांना अचानक 'गौरव' राजवीरचा मित्र समोर आला.

"वीर, कसा आहेस ?" म्हणत तो त्याच्याजवळ आला.

" तु, तु इथे काय करत आहेस ? अवनी मी आलोच." म्हणत गौरवला सोबत घेऊन तो कॅफेबाहेर तिच्या नजरेआड गेला.

जवळ जवळ अर्ध्या तासाने कसलीशी चिठ्ठी हातात घेऊन तो आत आला. अवनीची नजर प्रवेशद्वारावरच होती. तिला पाहून लागलीच त्याने ती चिठ्ठी खिशात टाकली. त्याचा उतरलेला चेहरा मात्र तिच्या नजरेतून सुटला नाही.

" माझ्या आयुष्यात सुखाचे रंग भरणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो म्हणजे नक्कीच काही तरी आहे. गावीही तुम्हांला क्रित्येक वेळा अगतिक झालेलं पाहिलय मी. आपल्यामध्ये वेदनांचं साम्य आहे असं म्हणाला होता. या वेदनांत भागीदार व्हायची अजूनही माझी पात्रता नाही का ?" ती त्याच्यावर कटाक्ष टाकीत म्हणाली.

" तुम्ही माझं आयुष्य वाटून घेतलय तुमच्याबरोबर. प्लिज पुन्हा असं म्हणू नका. मैत्रीच्या नात्यात दगा अनुभवलेला अभागी मित्र आहे मी. जीवापाड जपलं होतं मैत्रीचं नातं पण त्याने क्षणात सगळ्याची राखरांगोळी केली. मला कोणताच संबंध नाही ठेवायचा त्याच्यासोबत. ऑफिस सोडून निघून गेला तो. शेवटची माफी मागायला आला होता." अजूनही राजवीर कोड्यातच बोलत होता.

" मित्र चुकला म्हणून मैत्री तोडतं का कोणी ? कोणी मनापासून माफी मागत असेल तर माफ करावं. त्याच्या मनावरचं ओझं हलकं होतं. तो ही माणूसच. चुका माणसांकडूनच होतात." ती त्याला समजावत म्हणाली.

तिच्या या समजावण्याचा कोणताच परिणाम झाला नाही राजवीरवर. तो अजूनही तेवढाच शुष्क होता. गौरव कायमचा निघून गेला होता त्याच्या आयुष्यातून पण त्याने दिलेली जखम भरून निघत नव्हती. अवनी याच जखमेवर सहवासाचं मलम बनू पाहत होती.

पाहता पाहता सहवासाचा तो पंधरवडा आठवणींचे रंग देऊन भुर्रकन उडून गेला. लग्नाला आठ दिवस शिल्लक राहीले आणि अवनीने गावी जाण्याचे ठरविले.

" आपण एकत्रच जाऊयात ना. मला करमणार नाही तुमच्याशिवाय." तिला स्टेशनवर सोडायला आलेला राजवीर भावनिक होत म्हणाला.

तशी ती गालातच हसली.

" आठ दिवसांचाच प्रश्न आहे." ती हसत म्हणाली.

" पण हेच आठ दिवस नकोसे झाले आहेत." तो तिचा हात हातात घेत म्हणाला.

" वीर, लोकं आहेत आजूबाजूला." ती इकडेतिकडे पाहत म्हणाली.

तो मात्र 'वीर' या उच्चाराने पुरता घायाळ झाला.

" अवनी, पुन्हा म्हण ना. तुझ्या तोंडून वीर ऐकायला खूप गोड वाटतं." तो तिच्या नजरेत डुंबत म्हणाला.

" मग तर मला जाऊ द्याल ना ?" आता तिनेही नजरेला नजर दिली.

तशी त्याने होकारार्थी मान हलवली. ट्रेनचा भोंगाही वाजला.

" वीर..." ती म्हणाली आणि त्याने नजर तिच्या पुढ्यात झुकवली. दुसऱ्याच क्षणी तिचा हात सोडला.

" जा.. मी येतो लवकरच तुला आपल्या घरी घेऊन यायला तोपर्यंत स्वतःला जप." नजर तिच्या दिशेने रोखत त्याने आश्वासकपणे तिला निरोप दिला.

ती ट्रेनमध्ये चढली. ट्रेनही सुरु झाली. त्याला मागे सुटतांना पाहून तिच्या काळजात मात्र खोल घालमेळ झाली.

'लवकर ये मी वाट पाहेन..' जणू नजरेनेच ती सांगती झाली.

ट्रेन नजरेआड होईस्तोवर राजवीर जागचा हलला नाही.

आता वेध लागले होते सप्तपदीचे. कधी एकदा सात जन्म सोबतीचं वचन देऊन तिला आपल्या विश्वात घेऊन येतो असे झाले होते त्याला.

एव्हाना विभावरी ताईही आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून माहेरी मदतीसाठी आली होती.

" राजवीर, आता अवनीची भेट थेट मांडवातच होईल असे वाटते. प्रयत्न करूनही वेळ नाही काढता आला. कोई बात नही तिला नणंदेचा हिसका आता प्रत्यक्षातच दाखवते. तसं बोलणं झालय आमचं फोनवर. माझ्या मर्जीत राहील सध्यातरी असच वाटतं. पुढे बघू कसा नणंदवास घडवायचा तो.." विभा पुन्हा थट्टेच्या मुडमध्ये येत म्हणाली.

" मी बरी माझ्या नातसुनेला नणंदवास करून देईन. डॉक्टर असशील दवाखान्यातली इथे फक्त आमची लाडकी नात आणि माझी नात कुणाला किती त्रास देईल चांगलच माहिती आहे मला. तिच्या पाठवणीच्या वेळी तु रडली नाहीस म्हणजे मिळवलं." विभाच्या डोक्यावरून हात फिरवीत बयोआजी म्हणाल्या.

" हे अगदी खरं बघ. दुसऱ्याच्या त्रासाने व्याकूळ होणारी माझी तायडी कोणालाच त्रास देऊ शकत नाही." म्हणत राजवीरने तिच्या मांडीवर डोकं टेकवलं.

" वीर, तु खुश आहेस यातच सगळं आलं. तुझी चॉईस सोनच असेल यात शंका नाही." म्हणत तिने त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरविला.

ताईच्या वात्सल्यात राजवीर न्हाहून निघाला.

विभाच्या येण्याने घराला आणखी शोभा आली. प्रत्येक काम ती लक्षपूर्वक पाहू लागल्याने आपसूकच कामांना गती मिळाली. साखरपुडा, हळदी आणि लग्न असे तीन दिवस विभागले होते त्यामुळे साखरपुड्याच्या आदल्यादिवशीच तिथे पोहचण्याचे ठरले. सगळं साहित्य चारदा तपासून गाडीत भरण्यात आलं. कपडे, मिठाई, सजावटीचं साहित्य जेवढं जमेल तेवढं सगळच त्यांनी गाडीत भरलं. विभाचा नवराही जातीने सगळं पाहत होता. सगळी जमवाजमव झाल्यानंतर मोजक्या नातेवाईकांना घेऊन गाडीने कोकणची वाट धरली.

राजवीर विभा आणि तिच्या पतीसोबत त्यांच्या स्वतःच्या गाडीने निघाला. मोजकी मित्रमंडळी लग्नाच्या दिवशीच हजेरी लावणार होती.

" गौरव कुठे आहे वीर ? त्याला तर तुझ्यासोबत हवं होतं. कॉल करते तर फोनही स्विच ऑफ. सगळं ठिक आहे ना." प्रवासातच विभावरी काळजीने विचारती झाली.

" हो सगळं ठिक आहे. त्याने जॉब सोडला. नव्या ठिकाणी नोकरी मिळाली त्यामुळे तिथे रूळायला वेळ जातोय पण येईल लग्नाच्या दिवशी तो." नजर गाडीबाहेर रोखत राजवीर म्हणाला.

गौरव नावाचं वादळ तात्पुरता क्षमलं होतं. पण उद्या लग्नाच्या दिवशीही या समस्येला तोंड देण्याची पक्की तयारी राजवीरने केली होती.

सरसर वर जाणारे आणि गिरक्या घेत खाली येणारे वळणावळणाचे रस्ते कापीत गाडी देऊळगावच्या दिशेने निघाली होती. कोकणातील गर्द हिरवळ डोळ्यांना सुखावह वाटत होती. समुद्राचं उधाणलेलं निळं रुप पाहून प्रवासाचा सारा शीण नाहीसा होत होता.

खूप मोठा प्रवास करून शेवटी मुंबईचं वऱ्हाड कोकणच्या दारात पोहचलं.

शरदरावांनी त्यांच्या स्वागताचा सुंदर घाट घातला होता. प्रत्येकाची आरती करून मानाने त्यांची सोय आपल्या विसावा कॉटेजमध्ये केली होती. त्यांचा मानपान पाहून नवऱ्याकडची मंडळी चांगलीच खुश झाली. बाकी आजूबाजूला असलेल्या निसर्गसौंदर्याने राहिलेली कमी पूर्ण केली. समुद्राला लागूनच डेस्टीनेशन वेडिंगचं प्लॅनिंग

सुरु होतं. सविताताई आणि नात्यातील स्रियांनी महिलामंडळीचा पाहुणचार केला. तात्या, राजवीरचे वडिल, काका आणि विभावरीचा नवरा यांनी जातीने शरदरावांसोबत लग्नाची व्यवस्था पाहिली.महिलावर्ग सविताताईंसोबत त्यांच्या घरात शिरला. राजवीरची नजर मात्र राहून राहून अवनीला शोधत होती. इथेच तर त्यांच्या अनोख्या नात्याचा श्रीगणेशा झाला होता. मनोपटलावर आठवणींचं पाखरू साद घालू लागलं. समुद्राचं सौंदर्य अवनीच्या साथीने पुन्हा एकदा अनुभवण्याची इच्छा आतुर होऊ लागली.गाभाऱ्यात जाऊन गणरायाचं जोडीने दर्शन घेऊन नवस फेडण्याची आतुरताही मनाला स्वस्थ बसू देत नव्हती.पुरुषमंडळींसोबत बाहेर असला तरी मनाने अवनीच्या भोवती पिंगा घालू लागला होता.

इकडे अवनीलाही त्याला भेटायचे होते पण त्यापूर्वी आलेल्या महिलावर्गाचं आदरतिथ्य करणं गरजेचं होतं. विभावरीला भेटण्याची ओढही होतीच. थोड्याच वेळात तयार होऊन ती बाहेर आली. सगळ्या स्त्रियांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. सिनेमातल्या नटीसारखं तिचं देखणं रुप पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य झळकले. विभावरीला फोन आल्याने ती बाहेर गेली होती. अवनीने साऱ्या वडिलधाऱ्या स्त्रियांना नमस्कार केला. तोच विभावरीही आत आली. पाठमोऱ्या अवनीला पाहून तिला समोरून पाहण्याची इच्छा अनावर झाली.

" जरा आमच्याकडेही लक्ष द्या वहिनीसा.." ती म्हणाली तशी अवनी मागे वळली. दोघींची नजरा नजर झाली. विभावरीचा उत्साहाने सळसळता चेहरा मात्र तिला पाहताच पडला. अवनीही तिला पाहून घामाघूम झाली. एक शब्दही न बोलता विभावरी तशीच बाहेर पडली आणि तडक राजवीरकडे गेली. 

" वीर, मला बोलायचं आहे तुझ्याशी आताच्या आता.." हळू आवाजात म्हणत तिने त्याचा हात पकडला आणि त्याला घेऊन तिथून दूर झाली.

" ताई, काय झालं ? असं काय महत्त्वाचं बोलायचं आहे ?" तिच्यासोबत चालता चालता तो बोलत होता.

ती मात्रा जोरात धापा टाकत त्याला घेऊन लांब निघून आली. समोर समुद्राला तर मनात रागाला भरती आली होती.

" वीर, आपण आताच्या आता इथून निघतोय.तु हे लग्न अजिबात करणार नाहीस. त्या दिवशी दवाखान्यात आलेली मुलगी.. शी मला बोलायलाही अवघड जातय.." बोलता बोलता विभाचा राग आणखी उफाळून आला.

" स्वतःचं स्वत्व जपता येत नाही आजच्या पिढीला. लग्नाआधीच स्वतःचं शील परपुरुषाच्या स्वाधीन करायची हिंमत तरी कशी होते ? मग आपल्यासोबत काय घडलय हे चेक करायला हॉस्पिटलमध्ये येतात. तुझी अवनीही याला अपवाद नाही." त्याचे दोन्ही हात पकडत विभा म्हणाली.

" बस ताई, खूप अपमान केलास अवनीचा पण आता नको. तुला सत्य माहित नाही गं.." बोलता बोलता त्याला रडू कोसळलं.

जवळजवळ अर्धा पाऊणतास दोघांमध्ये चाललेलं संभाषण साऱ्या प्रकरणाची उकल करतं झालं. सत्य ऐकून विभावरीचा तोल गेला ती तिथेच खडकाचा आसरा घेऊन खाली बसली.

" वीर,वीर हे काय झालं रे ?" ती डोक्याला हात लावीत म्हणाली.

" ताई, हे कोणालाच कळता कामा नये अगदी अवनीलाही. खूप मोठ वादळ येईल नाहीतर आणि या वादळात सगळच उद्धवस्त होतील." हिंमत करीत तो म्हणाला आणि पुन्हा एकदा डोकं तिच्या मांडीवर ठेवलं. तिने मात्र तात्काळ त्याला बाजूला सारलं आणि तडक अवनीचं घर गाठलं.

अवनी तिच्या रुममध्ये मैत्रिणींसोबत होती. विभावरीने आत जात सगळ्यांना बाहेर जाण्याची विनंती केली.

दरवाजा आतून लावताच अवनी पुन्हा एकदा अगतिक झाली.

" ताई.." ती काही बोलणार तोच विभावरीने तिला घट्ट मिठी मारली. भावना अश्रू बनून डोळ्यांतून बरसल्या. पुढच्याच क्षणी मिठीतून दूर करीत तिच्यासमोर हात जोडले.

" अवनी राजवीरने सगळं सांगितलं.मला माफ कर गं. त्या दिवशी नकोनकोते म्हणाले तुला. तुझ्यासोबत काय घडलय याची पुसटशी कल्पनाही आली नाही. एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीची अशी प्रतारणा केली. खरच माफ कर मला.." ती रडत म्हणू लागली.

" ताई, ताई तुम्ही शांत व्हा आधी. तुमचं तरी काय चुकलं जगाची रीत आहे ती. काहीही झालं तरी दोष स्त्रीलाच दिला जातो." म्हणतांना ती खंबीर बनली.

" पण आता नाही. मी तुझ्या सोबत आहे. स्वतःला एकटं समजू नकोस आणि जमल्यास मला माफ कर." म्हणत तिने पुन्हा एकदा हात जोडले.

तात्काळ अवनीने तिला आलिंगन देत शांत केले. विभावरीच्या रुपात तिचं दुःख जाणून घेणारं स्त्रीमन मिळालं होतं. मनावरचा भार थोड्या प्रमाणात कमी झाला होता. इकडे कितीतरी वेळ एकटाच राजवीर तिथेच खडकावर बसून राहिला. विचारांची भरती संपून सुखाच्या ओहोटीला सुरवात झाली होती.

तोच मागून अवनीच्या येण्याची चाहूल लागली. ती जवळ येताच तो तसाच तिच्या दिशेने झेपावला. तिला गच्च मिठी मारीत हुंदके देऊन रडू लागला.

" अवनी आय ॲम सॉरी.." तो पुढचं काही म्हणणार तोच विभावरीही तेथे आली.

" हा असा आहे बघ तुझा राजवीर. नावातच वीरता नाहीतर नुसता रडूबाई. माझ्याकडून शिक काहीतरी ब्रो." म्हणत तिने त्याच्या पाठीवरून हात फिरविला. तिच्या आवाजाने तो भानावर आला.

" राजवीर, मी तिला काहीच सांगितलं नाही." ती हळू आवाजात म्हणत अवनीच्या जवळ आली.

" आता तुच सांभाळ बाई माझ्या भावाला." म्हणत तात्काळ ती निघूनही गेली.

" वीर, तु वीरच आहेस. माझा राजवीर. तुझा हळवा स्वभाव हाच तुझा खरेपणा आणि याच खरेपणावर मी भाळले." म्हणत टाचा उंच करीत तिने त्याच्या कपाळावर स्पर्शखुण उमटवली.

समुद्रकिनारी प्रेमाच्या क्षितिजावर प्रीतीचा रंग लेवून ऊन सावली एक झाले जणू.

दुसऱ्या दिवसापासून लग्नाची लगबग सुरु झाली. साखरपुडा, मेंहदी, हळदी समारंभ साऱ्याच सुंदर क्षणांची मांदियाळी समुद्रकिनाऱ्यावर सजली. दोघेही एकाच रंगात रंगले. सुखाने परिसीमा गाठली. आनंदाच्या कोलाहलात सप्तपदीचे सुर निनादले. उगवतीच्या सूर्याला साक्षीला ठेवून ऊन सावली साता जन्मासाठी एक झाले. सगळच विधीवत पार पडलं. लेकीचं सुख पाहून मनाला सुखाची तर ती आपल्याला सोडून जाणार या विचाराने डोळ्यांना अश्रूंची भरती येत होती. भावनांच्या हिंदोळ्यावर झुलत शरदराव आणि सविताताईंनी लेकीची पाठवणी केली.

" सून नाही लेक घेऊन जात आहोत निष्चिंत रहा." म्हणत राजवीरच्या बाबांनी तिच्याभोवती मायेचं सुरक्षा कवच धरलं. शरदरावांनी हात जोडून राजवीरकडे आशेने पाहिले.

" बाबा, काळजी करू नका. अवनी माझी जबाबदारी आहे." म्हणत त्यांच्या आशेचा सन्मान केला.

अवनीला सविताताईंच्या गळ्यात पडून रडतांना पाहून बयोआजी, राजवीरची आई आणि काकीने डोळयांना पदर लावला. विभावरीने डोळे पुसत अवनीला जवळ घेतले. रीतीनुसार नवविवाहीत जोडपं गणरायाच्या मंदिरात दर्शनासाठी आलं.

अवनीला राजवीरचा नवस आठवला.

" माझं गाऱ्हाणं ऐकलं देवानं.." म्हणत तो जोडीने गाभाऱ्यात आला.

" देवा, अवनीला नेहमी आनंदात ठेव.." स्वगत होत त्याने हात जोडले.त्याचा तोच निरागसपणा भावला तिला. मंदिरातून बाहेर पडतांना पुन्हा एकदा तिच आजी दिसली. दोघांनी आजीला नमस्कार केला.

" सुखाने संसार करा." म्हणत आजीने आशीर्वाद देताच दोघे एकमेकांकडे पाहून हसले. शरदराव, सविताताई आणि नातेवाईकांना पुन्हा एकदा भेटून अवनी गाडीत बसली. आश्वासक नजरेने राजवीरने पुन्हा एकदा शरदरावांना तिच्या जबाबदारीचं वचन दिलं आणि तो ही गाडीत बसला.सगळ्यांचा निरोप घेत गाडी सुरु झाली आणि सगळ्यांचा आशीर्वादाने अवनी आणि राजवीरच्या संसाराला सुरवात झाली.

क्रमशः

©® आर्या पाटील

🎭 Series Post

View all