का एक झाले ऊन आणि सावली ?(भाग ७ वा)

अवनी आणि राजवीरचा अनोळखी प्रवास ओळखीचा होतांना..

# का एक झाले ऊन आणि सावली ?( भाग ७ वा)

©® आर्या पाटील

विभाच्या बोलण्याने राजवीर शांत झाला. उठून उभा राहत तो आईजवळ आला.

" वीर, म्हणजे त्या दिवशी तु याच गोष्टीबद्दल बोलत होतास का ?" त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत त्या म्हणाल्या.

राजवीरने होकारार्थी मान हलविली.

" खरच वीर तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती." त्याच्या काकांनीही विभाच्या बोलण्याला दुजोरा दिला.

त्याने पुन्हा एकदा आईवर कटाक्ष टाकला. लेकाची अगतिक नजर आईला हळवं करून गेली.

" पुरे झाले तायडे, किती त्रास देशील त्याला ? भावोजी तुम्ही पण लेकाची गंमत करता.वीर पुसटशी कल्पना आली होती आम्हांलाही.गौरवच्या बोलण्यातून आमची शंका आणखी दृढ झाली." राजवीरची आई म्हणाली.

" काय सांगितले गौरवने ? कशाबद्दल बोलला तो ?" बोलता बोलता राजवीर गंभीर झाला.

" चिल ब्रो, तो स्पष्ट काहीच म्हणाला नाही पण अस्पष्टपणे बरच काही कळालं." विभावरी त्याच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाली.

" म्हणजे ? म्हणजे काय कळालं तुम्हांला ?" तो घाबरतच म्हणाला.

" काही नाही रे. तु कोणा मुलीला भेटायला गेला आहेस एवढच बोलला तो आणि आम्ही सुतावरून स्वर्ग गाठला. या स्वर्गातच साताजन्माच्या गाठी बांधलेल्या असतात. तुझ्या प्रेमविवाहाला आम्ही कधीच विरोध केला नाही आणि करणार नाही. मग कधी भेटवतोस अवनीला ?" काका आश्वासकपणे म्हणाले.

त्याने एकवार सगळ्यांकडे पाहिले. त्याला त्यांच्याकडून होकाराची अपेक्षा होतीच. त्याचं कुटुंब नेहमीच सावलीसारखं त्याच्या सोबत होतं. घराचा लाडका लेक असल्याने त्याच्या सुखाला नेहमीच प्राधान्य दिलं गेलं.

" तात्या, अवनीचे आईवडिल खूप साधी माणसं आहेत. लेकीचं लग्न करण्याआधी त्यांना तुम्हांला भेटायचे आहे. आपल्या लेकीच्या भविष्याबाबत साशंक न राहता निर्णय घ्यायचा आहे." पुन्हा एकदा तात्यांजवळ जात राजवीर म्हणाला.

" मग बोलावून घे त्यांना इकडेच. लग्नाची बोलणीही होईल आणि मुलीचं होणारं सासरही पाहतील." तात्यांनी राजवीरच्या शंकेचं निरसन गेलं.

कुठे भेटले ? कसे भेटले ? कोणी प्रपोज केले ? या अश्या एक ना अनेक प्रश्नांना त्याने काल्पनिक प्रसंग सांगून बगल दिली. आपल्या कुटुंबियांशी खोटे बोलतांना वाईट वाटत होते पण त्याहीपेक्षा अवनीचं सत्य लपवणे त्याला जास्त रास्त वाटले. तिचा आत्मसन्मान महत्त्वाचा होता त्याच्यासाठी आणि तेच जपण्याचा मनापासून प्रयत्न सुरु होता.

" काय हॅण्डसम मग खुश ना ? तुम्ही सगळं ठरवून घ्या. मी आणि आकाश मेडिकल टूरसाठी महाराष्ट्राबाहेर आहोत आठदिवस. आल्यावर भेटेनच माझ्या वहिनीला." म्हणत विभाने राजवीरला चिमटा काढला.

" इट्स नॉट फेयर ताई. तुच नाहीस मग घरी कोण सांभाळणार ?" राजवीर नाराजीच्या सुरात म्हणाला.

" आता बायको येणार आहे तुझी मग काय आम्ही पाहुणे फक्त. ती सांभाळेल की सगळं." डोळा मारत विभाने पुन्हा त्याला चिडवले.

" तायडे तुमचा दौरा पुढे नाही टाकता येणार का? तुम्ही दोघेही हवे होता." राजवीरचे बाबा म्हणाले.

" महत्त्वाचं नसतं तर खरच गेले नसते. अफ्टरऑल मेरे प्यारे भाई की शादी है !" म्हणत तिने दौऱ्याचं महत्त्व सांगितलं. पर्याय नसल्याने सगळ्यांनी होकार भरला पण घरची लाडकी लेक नसेल याची खंत सगळ्यांनाच लागून राहिली.

त्याच दिवशी फोनवरून राजवीरने अवनीच्या बाबांना तात्यांचा निरोप दिला.डॉक्टरांनी सक्तीचा आराम करायला सांगूनही शरदरावांनी या निरोपाचा आदर केला. चार पाच दिवसांनी अवनीला घेऊन त्यांनी राजवीरचं घर गाठलं.गाडी दाराशी येताच राजवीर स्वागतासाठी पुढे आला जोडीला काका काकूही होते. शरदराव आणि सविताताई हात जोडत बाहेर आल्या. राजवीरची नजर अवनीला शोधत होती. देऊळगाववरून येऊन जवळजवळ आठ दिवस झाले होते. अवनीची छबी डोळ्यांत साठविण्यासाठी मन व्याकूळ झालं होतं. दोन तीन वेळा फोनवर बोलणं झालं पण जुजबी. 

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अवनीची गोरी कांती उठून दिसत होती. मधाळ डोळे, चाफेकळी नाक, कमनीय बांधा, मध्यम उंची तिच्या सौंदर्याला आणखी खुलवित होती. चेहऱ्यावरील वेदनेची लाली अजूनही तेवढीच प्रखर होती. तिला पाहताच राजवीरची कळी खुलली. तिनेही स्मितहास्य करीत त्याच्या भावनेचा सन्मान केला. काकींनी हळूच चिमटा काढत बोटांचा मोर नाचविला आणि अवनीच्या सौंदर्याची पोचपावती दिली.

सविताताई आणि अवनीला घेऊन त्या आत आल्या. बयो आजी, राजवीरची आईने पुढे येऊन त्यांचे स्वागत केले. तात्या,राजवीरचे वडिल शरदरावांच्या स्वागतासाठी पुढे आले. अगदी काही वेळातच शरदरावांचा बुजरेपणा साऱ्यांच्या संगतीत कमी झाला.सविताताईही त्या वातावरणात मिसळून गेल्या. अवनी मात्र अजूनही कसल्याश्या विचारातच गढलेली होती. काकींनी अवनीला घरच्या सगळ्या मंडळींची ओळख करून दिली. तिनेही स्मितहास्य करीत सगळ्यांना अभिवादन केले.

" शरदराव, मनात कोणतीही शंका ठेवू नका अवनी या घरात लेक बनून येईल.आमची नात विभावरी आणि अवनीमध्ये कोणतेच अंतर नसेल." तात्यांनी शरदरावांना शाब्दिक आधार दिला.

राजवीरच्या वडिलांनीही तात्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला.

" मला काही बोलायचे आहे ?" अवनी शांतपणे म्हणाली.

तसे सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. राजवीर उठून उभा राहत तिच्याकडे अगतिकतेने पाहू लागला.

" राजवीरने माझ्या मोडलेल्या लग्नाची कल्पना तुम्हांला दिली की नाही माहित नाही पण यासाऱ्यांत ते देवदूत ठरले. बाबांच्या खालावलेल्या परिस्थितीत त्यांनी माझ्या घराला भक्कम आधार दिला. या ऋणाची परतफेड शक्य नाही. तुमच्या घराचा एक अविभाज्य भाग होऊन या ऋणात राहायला मिळाल्यास मी स्वतःला भाग्यवान समजेन." ती नजर खाली घेत म्हणाली.

आता मात्र सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. घरच्यांच्या नजरा राजवीरवर रोखल्या गेल्या.

" मी तुम्हांला सांगणारच होतो पण.." म्हणत तो पुन्हा तात्यांजवळ आला.

" तात्या, तुम्हीच शिकवलत ना आपल्या एका निर्णयामुळे कोणाचं दुःख दुर होत असेल तर तो निर्णय खंबीरपणे घ्यावा. मी ही तेच करतोय." राजवीर म्हणाला आणि अवनीच्या मोडलेल्या लग्नाची कल्पना देता झाला.

थोडावेळ पुन्हा तसाच शांततेत गेला. शरदरावांचा साधेपणा, सविताताईंचं सुसंस्कृत वागणं आणि अवनीचा

 खरेपणा तात्यांचं मन जिंकून गेला.

" माझा या लग्नाला होकार आहे. बाकी वीरच्या आईवडिलांनी स्पष्ट सांगावे. शरदराव तुमचा निर्णयही महत्त्वाचा आहे." तात्या आश्वासकपणे म्हणाले.

" आजपर्यंत तुमच्या निर्णयाला कोणीच विरोध केला नाही आणि करणारही नाही. आम्हांलाही हे लग्न मान्य आहे." राजवीरच्या बाबांनीही होकार दिला.

शरदराव हात जोडत उभे राहिले.

" खरच मी धन्य झालो. मागच्या जन्मीचं पुण्य कामी आलं आणि लेकीच्या आयुष्याचं सोनं झालं. जगात अजूनही माणूसकी शिल्लक आहे." म्हणत त्यांनी तात्यांचे पाय धरले.

" आहो हे काय करता शरदराव ? तुमच्या काळजाचा तुकडा आम्हांला देऊन आमच्या घराचं नंदनवन करीत आहात तुम्ही. खरं तर आम्हीच तुमच्या उपकाराखाली आहोत." म्हणत तात्यांनी हात जोडले.

पाठोपाठ राजवीरचे वडिल आणि काकाही हात जोडून उभे राहिले.

" प्रत्येक लेकीला अशी माणसे मिळाली तर माहेर आणि सासरमधलं अंतर संपून जाईल." म्हणतांना शरदरावांना हुंदका अनावर झाला. तात्काळ राजवीरच्या बाबांनी त्यांना सावरले. आलिंगन देत सुखाची शाश्वती दिली. सविताताईंनीही हात जोडले. राजवीरच्या आईने पुढे येऊन त्यांना सावरले. अवनी भावनिक नजरेत तो रम्य सोहळा साठवित होती. नकळत नजर राजवीरच्या दिशेने वळली.समाधानाची लकेर त्याच्या चेहऱ्याला खुलवित होती. त्याला एवढं आनंदी तिने पहिल्यांदा पाहिले होते. दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होणाऱ्या आनंदयात्रीला तिने डोळ्यांत साठवले. भावनेने मनाचा ठाव घेतला की प्रेमाची जाणिव निर्माण होते. एका नजरेत प्रेम होतं की नाही माहित नाही पण इथे मात्र एका जाणिवेत प्रेमाचा रंग चढत होता.दुसऱ्याच क्षणी राजवीरही तिच्याकडे पाहता झाला. तिचा चेहरा स्मितहास्याने उजळला. नजरेनेच तिने त्याचे आभार मानले. त्यानेही नजरेनेच आपण सोबत असल्याची ग्वाही दिली.

राजवीरच्या आई आणि काकीने अवनी आणि राजवीरला एकत्र बसवून तिची ओटी भरली. बयो आजींनी आपल्या खानदानी बांगड्या होणाऱ्या नातसुनेच्या हातात घातल्या.

तिने प्रश्नार्थक नजरेने राजवीरकडे पाहिले. त्यानेही नजरेनेच होकार दिला. दोघांनी जोडीने सगळ्यांना नमस्कार केला.

" एक विनंती होती तुम्हां सर्वांना. आधी लग्न ज्या तारखेला ठरलं होतं त्याच तारखेला आमचं लग्न व्हावं. वायफळ खर्च करण्यापेक्षा अगदीच मोजक्या लोकांच्या आशीर्वादात हे शुभकार्य पार पडावं अशी माझी इच्छा आहे." विनंती करीत राजवीर म्हणाला.

अवनीच्या मनातलं सारच राजवीरच्या ओठांवर येत होतं. ती आदरयुक्त नजरेने त्याला पाहत होती. तो ही मनकवडा होऊन तिच्या सगळ्याच समस्यांवर रामबाण उपाय शोधीत होता. राजवीरच्या घरच्यांनी त्याच्या सुखाला प्राधान्य देत होकार दिला. शरदरावांनी पुन्हा हात जोडले.

" अजून किती उपकार करणार राजवीर ? मी कृतकृत्य झालो आज." अगतिक होत ते म्हणाले.

" बाबा, मी आजपासून बाबाच म्हणणार तुम्हांला. उपकाराचं लेबल लावून हा आपलेपणा कमी करू नका." त्यांचे हात पकडीत त्यानेही उत्तर दिले.

" एक इच्छा होती. लग्नाचे सारे विधी आपल्या घरी कोकणात पार पाडावेत. एकुलती एक लेक तिची पाठवणी घरच्या अंगणातून व्हावी. बाकी तुमचा निर्णय शिरसावंद.." पुन्हा एकदा त्यांनी हात जोडले.

" तुम्ही सारखे हात जोडू नका. नाहीतर आम्ही पाया पडू." म्हणत काकांनी वातावरण हलके केले.

तात्यांशी सल्ला मसलत करून राजवीरच्या वडिलांनी शरदरावांची मागणी मान्य केली पण लग्नाचा अर्धा खर्च आम्ही करणार ही गळ घालूनच.

सुखाचा सोहळा अवनीच्या वेदनेला क्षमवीत होता. घर दाखविण्यासाठी म्हणून राजवीरने तिला आपल्या रुममध्ये नेले.

" राजवीर, तुमच्या मुळे आज बाबा नव्याने उभे राहतांना पाहायला मिळाले.आईबाबांचा हरविलेला सन्मान आज पुन्हा भेटला. तुमच्या या ऋणातून मी कधीच मुक्त होणार नाही." खिडकीतून बाहेर पाहत अवनी म्हणाली.

" अवनी, एक विनंती होती आधी आपण एकमेकांचे मित्र बनुया. कदाचित हा अनोखा प्रवास ओळखीचा होईल. मला प्लिज आहो जावो म्हणू नका." तो विनंती करीत म्हणाला.

तात्काळ तिने नजर त्याच्याकडे वळवली.

" थोडं कठिण आहे पण प्रयत्न करेन. तुम्हीही अरे तुरे केलेलं चालेल." अजूनही ती गंभीरच होती.

" तुम्ही ठिक आहात ना ?" त्याने काळजीने विचारले.

या प्रश्नाला तिच्याकडे कोणतेच उत्तर नव्हते. नजरेत पुन्हा पाणी दाटले.

" मी आहे सोबत तुमच्या. स्वतःला एकटं समजू नका." म्हणत त्याने तिचा हात हातात घेतला. त्याचा थरथरणारा हात अनुभवून अवनीला पुन्हा तो भावला.

" मुलीचा हात पहिल्यांदा हातात घेत आहात का ? बी रिलॅक्स." ती म्हणतच होती की पुढच्याच क्षणी त्याने तिला जवळ घेतले. आपसुकच डोळ्यांतून पाणी आले. तिला पुन्हा एकदा हे अनपेक्षित होतं. पण या वेळेस विरोध करायची तिचीही इच्छा झाली नाही. जगातल्या सगळ्यात सुरक्षित ठिकाणी असल्याचा भास झाला. जे दुःख आईवडिलांना सांगता येत नव्हते त्या दुःखात हक्काचा साथीदार मिळाला होता जणू.

" आय ॲम सॉरी." पुढच्याच क्षणी तिला मिठीतून सोडवत त्याने नजर वळवली आणि तिच्या नकळत अश्रू टिपले.

" ॲक्चुअली थँक यु." ती हळू आवाजात म्हणाली. अगदीच मोजक्या शब्दांत भावनांची देवाणघेवाण सुरु होती. तिच्या शब्दांनी मनातली भावना कळली जणू त्याला. तिच्याकडे नजर फिरवीत त्याने कपाळावर स्पर्शखूण उमटवली. त्याच्या स्पर्शाने तिच्या अश्रूंचा बांध फुटला. तिने त्याला गच्च मिठी मारली. तोंडातील हुंदके आणि डोळ्यांतील पाणी सारे काही सांगत होते.

मिठीत सामावलेल्या तिच्या डोक्यावरून हात फिरवीत त्याने तिला शांत केले.

" मी आहे सोबत तु काळजी नको करूस." त्याचा एकेरी उच्चार आपलेपणा वाढवून गेला.

क्रमश:

©® आर्या पाटील

🎭 Series Post

View all