का एक झाले ऊन आणि सावली ?(भाग ५ वा)

ऊन आणि सावली एक होतील का ? अवनी आणि राजवीरची अनोखी कथा.

# का एक झाले ऊन आणि सावली ?( भाग ५ वा)

©® आर्या पाटील

कोसळलेल्या शरदरावांना घेऊन राजवीर तालुक्याच्या हॉस्पीटल मध्ये पोहचला. सौम्य हृदयविकाराचा धक्का असल्याचे डॉक्टरांनी सांगताच सविताताई तिथेच ओक्साबोक्सी रडू लागल्या. राजवीरने त्यांना धीर दिला. त्यांच्याकडून अवनीचा नंबर घेऊन तिला कॉल केला. शरदरावांशी बोलून तडकाफडकी निघून गेलेली अवनी मोबाईल तिथेच घरी विसरली होती. त्यामुळे त्याने केलेल्या कॉलला तिचा काहीच रिप्लाय आला नाही. 

योग्य वेळी शरदरावांना हॉस्पीटलमध्ये आणल्याने जीवाचा धोका टळला होता पण मानसिकरित्या खचलेल्या त्यांच्या जगण्याला मात्र धोका निर्माण झाला होता. खबरदारीचा इशारा म्हणून डॉक्टरांनी त्यांना दोन दिवस तिथेच ॲडमीट करण्याचे सांगितले.

राजवीरने फक्त हॉस्पीटलमधील गोष्टीच मॅनेज केल्या नाहीत तर त्या दोघांना मानसिक आधारही दिला.

" काका, तुम्ही कसलाच विचार करू नका. काय घडलय मला माहित नाही पण एवढं विश्वासाने नक्की सांगेन की चांगल्या माणसांच्या बाबतीत कधीच वाईट घडणार नाही. हे ही दिवस जातील." शरदरावांच्या बेडशेजारी बसत त्याने धीर दिला.

"आयुष्यात कधीच कोणाचं वाईट केलं नाही मग माझ्या अवनीच्या बाबतीत का असं घडावं ?" म्हणत ते पुन्हा ओक्साबोक्सी रडू लागले.

" काका सावरा स्वतःला. काय झालय सांगाल का ? बापाच्या हक्काने हृदयातील दुःख हलकं करा. " त्यांना शांत करीत राजवीर म्हणाला.

त्याक्षणी शरदरावांना राजवीरचा खूप मोठा आधार वाटला. विश्वासाने त्यांनी अवनीच्या मोडलेल्या लग्नाचं सत्य राजवीरला सांगितलं. तेवढ्यात सविताताईही आत आल्या. अवनीबद्दल कळताच त्याही तिथेच कोसळल्या.

राजवीरने त्यांना आधार दिला आणि बेडवर आणून बसवलं.

" सविता, तु अगदी बरोबर ओळखलं होतस. तिचा पडलेला चेहरा तुझ्या नजरेतून सुटला नाही पण मला नाही ओळखता आलं माझ्याच लेकीला. खूप मोठं दुःख सुखाचा शेला पांघरुण लपविलं माझ्या अवनीने. ती असच लग्न मोडणार नाही खूप काही घडलय हे नक्की. मला भेटायचं आहे तिला." म्हणत शरदराव बेडवरून उठू लागले.

" काका, तुम्हांला कुठेच जाता येणार नाही. डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहात तुम्ही. काळजी करू नका मी येतो अवनी मॅडमना घेऊन. तुम्ही फक्त स्वतःला आणि काकींना सावरा." सविताताईंकडे पाहत त्याने विनंती केली.

ओला कटाक्ष सविताताईंवर टाकत त्यांनी होकार दिला.

पुढच्याच क्षणी राजवीर हॉस्पीटलबाहेर पडला. गाडी स्टार्ट करीत त्याने देऊळगावचा रस्ता धरला.

सारखे डोळे भरून येत होते. गाडी चालविता चालविताच त्याने आईला फोन लावला. काही सेंकदाचा अवधी की त्यांनीही फोन उचलला.

" वीर बेटा बरा आहेस ना ? मित्राची आई कशी आहे ? खूप चांगलं केलस की तु तिथे गेलास. माझ्या बाळाचा मला अभिमान आहे." त्याची आई कौतुकाने म्हणाली.

आईच्या शब्दांनी मात्र त्याला आणखी भरून आलं.

" आई, तुला अभिमान वाटावा एवढा तुझा मुलगा चांगला नाही गं. एक खूप मोठा निर्णय घेतोय तुम्हां सगळ्यांना न सांगता पण हा निर्णय योग्यच असेल याची शाश्वती देतो. मला फक्त तुमचा पाठिंबा हवा आहे." तो गंभीर होत म्हणाला.

" वीर तु जो काही निर्णय घेशील त्यात आम्ही सगळेच सोबत असू. आम्हांला खात्री आहे तु कधीच अयोग्य नसशील. आईच्या काळजीने एवढच म्हणेन मनात काहीही असेल तर निःसंकोचपणे बोल. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत." समोरून त्याच्या आईनेही आश्वासक साथ दिली अगदी काहीही कारण न विचारता.

" सगळ्यांना सांग मी ठिक आहे. येतो लवकरच." म्हणत त्याने फोन ठेवला.

डोळ्यांतील अश्रूंना डोळ्यांतच टिपत गाडीचा वेग वाढवला. 

विचारांत मश्गूल तो तासाभरातच समुद्र किनारी पोहचला.ती अजूनही तिथेच होती आपल्या प्रारब्धाची तुलना सागराशी करीत. आपलं दुःखही तिला त्या जलराशीसारखं अमाप वाटत होतं. घडलेल्या घटनेविषयी अनभिज्ञ ती शरदरावांना कसं सांगायचं याचाच विचार करण्यात मश्गूल होती.राजवीर रागातच तिच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. त्याला असं समोर पाहून तिने मान दुसऱ्या बाजूने वळविली.

" मॅडम, काय सुरु आहे तुमचं ? तुम्हांला त्या दिवशीही म्हणालो होतो की तुमचे आईबाबा काळजीत आहेत. काही समस्या असल्यास त्यांना सांगा. पण तुम्ही नाही ऐकलं आणि आज त्याचीच परिणिती तुमच्या बाबांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यात झाली." बोलता बोलता तो गहिवरला.

" काय ? बाबा.." उठून उभी राहत ती त्याच्याकडे वळणार तोच तिचा तोल गेला. प्रसंगावधान राखून राजवीरने तिला आधार दिला. समोरच्या बाकड्यावर बसवित तो ही बाजूला बसला. घडलेली सारीच हकिगत तिला सांगताच तिचं उरलं सुरलं अवसानही गळून पडलं.

" का माझ्या सुखाला नजर लावली त्याने ? लग्न मोडण्याचा निर्णय त्याचा होता. मी तो स्विकारला. फक्त आईबाबांना मी सांगेन एवढीच तर इच्छा होती. ती ही त्याला पूर्ण करता आली नाही. बाबा कसे आहेत ? मला आताच्या आता बाबांजवळ जायचे आहे." ती त्याचा हात पकडून विनंती करू लागली.

" तुमचं लग्न कोणाबरोबर ठरलं होतं ? ते का तुटलं ? त्याला जबाबदार कोण ? मला काहीच माहित नाही. पण एवढं मात्र निश्चित की काकांच्या या अवस्थेला तुम्हीच जबाबदार आहात. विश्वासात घेऊन त्यांना हे आधीच सांगायला हवं होतं. अजूनही त्यांना तुमचीच चिंता आहे. या अवस्थेतही ते तुम्हांला सावरायला इथे येण्यासाठी हट्ट करीत होते. तुम्ही मात्र त्यांना काहीही न सांगता अंधारात ठेवलं. मी तुम्हांला आधीच म्हणालो होतो मनाला मोकळं करा. व्यक्त व्हा पण तुम्ही ऐकलं नाही. निदान आता तरी सावरा सगळं." आता मात्र त्याने तिचा हात हातात घेतला आणि विनंती करीत म्हणाला.

अवनीने होकारार्थी मान हलवली. तिला घेऊन राजवीर तसाच माघारी हॉस्पीटलकडे निघाला. पूर्ण प्रवास स्मशान शांततेत गेला. 

हॉस्पिटलमध्ये पोहचताच ती वायुवेगे शरदरावांच्या खोलीकडे धावली.

दरवाजा उघडताच बेडवर झोपलेल्या शरदरावांना पाहून हुंदका अनावर झाला. दवाखाना माहित नसलेल्या आपल्या बाबांना पहिल्यांदाच ती या अश्या अवस्थेत पाहत होती. ती त्यांच्याकडे सरसावणार तोच डॉक्टरांनी त्या दोघांना बाहेर बोलावून घेतले.

" हे पहा. हृदयविकाराचा धक्का जरी सौम्य असला तरी धोका तेवढाच आहे. त्यांना त्रास होईल असं काहीही बोलू नका आणि वागू नका." डॉक्टरांनी सक्त ताकिद दिली.

तिने होकारार्थी मान हलविली आणि शरदरावांपाशी पोहचली.

" बाबा, मला माफ करा. तुमच्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे." म्हणत त्यांच्या हातावर डोकं टेकवून रडू लागली.

" अवनी, बेटा तु शांत हो आधी. मी बरा आहे. दुःखाचं ओझं एकटीने वाहून दमली नाहीस का गं पोरी ? एवढं परकं केलस बापाला. एकदा मन मोकळं करून तर बघायचं." आपला थरथरता हात तिच्या डोक्यावरून फिरवीत ते म्हणाले.

तशी ती आणखी गहिवरली.

" बाबा, तुम्ही पाहिलेलं माझ्या लग्नाचं स्वप्न तुमच्या त्याच आशावादी डोळ्यांत तुटतांना नव्हते पाहू शकत. हिंमत नव्हती होत तुम्हांला दुःख देण्याची." ती अजूनही रडतच होती.

बाजूला बसलेल्या सविताताई डोळ्यांना पदर लावीत लेकीपाशी आल्या. तिच्या पाठीवरून मायेने हात फिरविताच त्यांनाही हुंदका अनावर झाला.

" आम्हांला त्रास नको म्हणून तु मात्र एकटीने एवढ्या मोठ्या आघाताचं शिवधनुष्य पेललस. कुठून आणलीस एवढी हिंमत पोरी ? श्रीधरराव या निर्णयापर्यंत का आले माहित नाही पण एवढं मी निश्चितपणे सांगेन की त्यांनी तुला नाकारून खूप मोठी चूक केली आहे. माझ्या मुलीने त्यांच्या संसाराचं सोनं केलं असतं. पण त्यांनी लग्न तोडून तुझं जीवन मात्र मातीमोल केलं. मला ऐकायचं आहे ते कारण ज्याची कुबडी वापरून त्यांनी तुला नाकारलं." शरदराव गंभीर होत म्हणाले.

त्यांच्या हातावरून डोकं वर घेत अवनीने डोळे टिपले.

" बाबा, श्रीधर तुमच्यासारखा मुळीच नाही. मी बऱ्यापैकी जाणती होते जेव्हा आईचं दुसरं बाळ गेलं. तो प्रसंग अजूनही आठवतो. तुम्ही किती काळजी घेतली होती तिची. त्या दुःखातून सावरायला तुमची आश्वासक सोबत महत्त्वपूर्ण ठरली. आजीने वंशाला दिवा हवा म्हणून तुमच्या दुसऱ्या लग्नाचा आखलेला बेत तुम्ही खंबीरपणे उधळून लावला. आजीच्या विरुद्ध गेलात पण आईची साथ सोडली नाही." आठवणींना उजाळा देत ती म्हणाली.

जुन्या आठवणींनी सविताताईंना गहिवरून आले. बेडचा आधार घेत त्या खाली बसल्या. डोळ्यांना पदर लावीत अश्रू गाळू लागल्या.

" श्रीधर तुमच्यासारखा नव्हताच मुळी आणि कधी झालाही नसता. एवढच कारण पुरेसं आहे त्याला नकार द्यायला." म्हणत तिने आशेने शरदरावांकडे पाहिले.

आपली लेक हेच आपलं विश्व असणारा तो बाप लेकीच्या बोलण्याने गहिवरला. तिला कुशीत घेत रडू लागला.

" तुझ्या भविष्याचं काय बेटा ? लोकं दोष तुलाच देणार आणि माझ्याने ते नाही सहन होणार." ते रडत म्हणाले.

" अवनी, हवं तर आम्ही श्रीधररावांची माफी मागू पण असं लग्न तोडण्याची भाषा नको बोलूस." सविताताई म्हणाल्या.

" नाही अजिबात नाही. लग्न मी तोडलं नाही मग आपण का माफी मागायची. माझा स्वाभिमान गहान ठेवून मला संसाराचं सुख नकोय. त्यापेक्षा मी आजन्म अविवाहित राहिन." आता मात्र ती गंभीर झाली.

" सविता, आपल्या लेकीला त्रास होईल असं काहीच वागायचं नाही आपण." तिच्या डोक्यावरून हात फिरवीत शरदराव म्हणाले.

" मग तिच्या भविष्याचं काय ? आपल्या इज्जतीचं काय ? लोकं तोडांत शेण घालतील. अवनीचं लग्न जमणं कठिण होईल." आईची व्यथा मांडित सविताताई म्हणाल्या.

" मी करेन अवनी सोबत लग्न. मी स्विकारेन तिला. फक्त तुमची परवानगी हवी आहे." मघापासून दारात सगळं ऐकत असलेला राजवीर आत येत म्हणाला.

त्याच्या अश्या आकस्मित वाक्याने ते तिघेही आश्चर्यचकित झाले. चार ते पाच दिवसांचा सहवास तो सात जन्मांत बदलायचं म्हणत होता.

" काका, मला माहित नाही मी अवनीच्या योग्यतेचा आहे की नाही पण त्या माझ्या आयुष्यात आल्या तर जगण्याचं सोनं होईल हे निश्चित. त्यांच लग्न कोणाशी ठरलं होतं ? कोणत्या कारणाने तुटलं ? मला कोणत्याच प्रश्नांची उत्तरे नकोत. चांगली माणसं ओळखायला चार दिवसही पुरेसे आहेत. एका मल्टिनॅशनल कंपनीत सिनियर इंजिनियरच्या पोस्टवर काम करणारा मी 'राजवीर मोहिते'. आजी-आजोबा, आई-बाबा, काका-काकू, अश्या गोतावळ्यात राहणाऱ्या माझी त्यांचा मुलगा अशी ओळख. त्यांचे संस्कार हीच माझी संपत्ती. मी शब्द देतो अवनी माझ्या घरी मुलीसारखी राहिल." राजवीरने सगळच मोकळेपणाने सांगितलं.

त्याच्या अश्या बोलण्याने ते तिघे अजूनही धक्क्यातच होते.

" राजवीर, तुम्ही आम्हांला ओळखत नसतांना एवढा मोठा निर्णय कसा काय घेवू शकता ?" शरदराव विस्मयाने म्हणाले.

" काका, माणसांत राहून माणसं ओळखायला शिकलो आहे. मला आणि खात्रीने सांगतो माझ्या घरच्यांना या लग्नाविषयी कोणतीच आपत्ती नसेल. तुमचा निर्णय महत्वाचा." तो हात जोडत म्हणाला.

" देवाला पाहिलं नाही पण तुमच्या रुपात आज देवपण अनुभवलं. मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे निर्णय घ्यायला मला वेळ हवा आहे. माझी बाजू पडती आहे पण तरीही तुमच्या घरच्यांना भेटून खात्री करावी लागेल. पुन्हा एकदा विरहाचं दुःख नाही माथी मारायचं तिच्या." राजवीरचे हात हातात घेत ते म्हणाले.

मघापासून शांत असलेली अवनी आता मात्र पुढे आली.

" बाबा, निर्णय घ्यायच्या आधी मला यांच्याशी बोलायचं आहे." राजवीरकडे न पाहता ती गंभीर होत म्हणाली.

काय बोलायचे असेल अवनीला ?

ती राजवीरला सत्य सांगेल का ? ते ऐकून राजवीर तिला स्विकारेल का ?

कळेल पुढच्या भागात.

क्रमश:

©® आर्या पाटील

    

🎭 Series Post

View all