का एक झाले ऊन आणि सावली ?(भाग ४था )

Story of Avani who fighting against her own destiny.

# का एक झाले ऊन आणि सावली ?( भाग४ था)

©® आर्या पाटील

तिला न्याहाळीत असतांनाच त्याने डोळे उघडले.जरी कटाक्ष बाप्पाच्या मूर्तीवर असला तरी त्याची नजर तिचा वेध घेत होती.

" पुन्हा तेच. तुम्ही खरच अश्या पाहत जाऊ नका नाहीतर .." म्हणत त्याने देवाला हात जोडले.

" तुम्ही दिसता तेवढे भोळे नक्कीच नाहीत." म्हणत ती तेथून निघाली.

मंदिराबाहेर पडत पुन्हा एकदा तुळशी वृंदावनाचे दर्शन घेतले. लागलिच राजवीरही तिथे पोहचला. त्यानेही हात जोडत तुळशीला वंदन केले. 

डोळे उघडून समोर पाहताच तिला राजवीर दिसला.

" गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायचं असतं देवाचं." म्हणत ती चप्पल ठेवलेल्या ठिकाणी निघाली.

" देऊळगावचा गणपती नवसाला पावतो म्हणे. मी ही नवस बोललो आहे. जोपर्यंत मला यश मिळत नाही तोपर्यंत गाभाऱ्यात प्रवेश करणार नाही. ज्यादिवशी मी माझ्या कार्यात यशस्वी होईन तेव्हाच आत जाऊन गणरायाचं दर्शन घेईन." तो निश्चयाने म्हणाला.

" हो आहेच आमचं मंदिर जागृत देवस्थान.लवकरच बाप्पा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करेल." तिनेही त्याच्या निश्चयात विश्वास भरला.

तोच गावातील एक वयस्कर स्त्री देवदर्शनासाठी मंदिरात आली. दोघांना एकत्र पाहून तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकले.

" अवनी, भारी आहे तुझा होणारा नवरा. रामसीतेची जोडी आहे गं बाय.कोणाची द्रिष्ट नको लागायला माझ्या पोरीला." म्हणत तिने अवनीच्या चेहऱ्यावरून हात फिरवीत आपल्या चेहऱ्यावर बोटे मोडली.

अवनीने फक्त हसून प्रतिउत्तर दिले. लागलिच ती वृद्ध स्त्री मंदिरात प्रवेश करती झाली.

" ओ मॅडम, तुम्ही हसत आहात. त्या आजीबाई मला तुमचा होणारा नवरा समजून बसल्या आहेत." तो धीरगंभीर होत म्हणाला.

तसा तिने पुन्हा एकदा कडवा कटाक्ष त्याच्या दिशेने टाकला.

" आजी म्हणाली म्हणजे आपलं लग्न ठरलं असे नाही ना. होतो गैरसमज म्हाताऱ्या माणसांचा त्याचा बाऊ का करता ? मी निघते तुम्ही या सावकाश." चप्पल पायात चढवित ती म्हणाली.

" वा रे वा ! म्हणजे तुम्ही गेल्यावर आजी मला बरोबर पकडतील. मग त्यांना काय उत्तर देऊ ?थांबा मी ही येतो." म्हणत त्यानेही बूट घातले.

तोच त्याचा फोन वाजला.फोनवरील नाव पाहताच त्याचा चेहरा पूर्णपणे बदलला.

" तुम्ही इथेच थांबा थोडावेळ मी आलोच." म्हणत तो तेथून थोडा बाजूला गेला.

" गौरव, आता तु का कॉल केला आहेस ? मी म्हणालो ना मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही." तो रागातच म्हणाला.

फोन कट करणार तोच पलिकडून आर्त स्वरात गौरव बोलू लागला.

" राजवीर, मी चुकलो मला माफ कर. पण माझ्या सोबतची मैत्री तोडू नकोस." पलिकडून त्याचा मित्र गौरव गयावया करून बोलू लागला.

" मित्र असे नाहीत वागत." राजवीरने पुन्हा एकदा त्याला धारेवर धरले.

" मला माहित आहे मी खूप मोठी चुकी केली आहे पण मी ती मुद्दामहून नाही केली. प्लिज वीर माफ कर मला." तो पुन्हा माफी मागू लागला.

" का फोन केला होतास ? मुद्द्याचं बोल." त्याचा माफीनामा न स्विकारताच राजवीर म्हणाला.

" विभावरी ताईने फोन केला होता. सारखा तुझा पत्ता विचारीत होती. तु घरी सांगून आला नाहीस का ? घरचे काळजीत असतील. एकदा कॉल कर ताईला आणि खुशाली कळव." गौरव म्हणाला.

" खुशाली.. कसली खुशाली कळवू ? काय सांगू त्यांना ? सोड तुला नाही कळणार. तु तिला सांगितलं नाहीस ना मी कुठे आहे ते ?" राजवीर गंभीर होत म्हणाला.

" नाही सांगितलं. एकदा चुकलो आता परत तुला त्रास नाही द्यायचा." तो ही अगतिक होत म्हणाला.

" मी करतो कॉल तु काहीच सांगू नकोस." म्हणत तात्काळ त्याने फोन कट केला.

दुसऱ्याच क्षणी त्याने अवनीकडे पाहिले ती त्या आजींशी बोलण्यात मग्न होती. लागलिच त्याने आपल्या मोठ्या बहिणीला विभावरी ताईला फोन लावला. क्षणाचा अवधी की तिनेही लगेच फोन उचलला.

" वीर अरे कुठे आहेस तु ? असं न सांगता जातं का कोणी ? आई-बाबा,आजी-आबा, काका-काकू, घरातले सगळेच किती काळजीत आहेत." एका दमात विभावरी म्हणाली.

तिच्या बोलण्याने घरातले सगळेच डोळ्यासमोर फेर धरू लागले. असं कोणाला काहीच न सांगता पहिल्यांदाच तो बाहेर पडला होता.कोणाशी संपर्क नको म्हणून फोनही स्वीच ऑफ केला होता. ऑफिसच्या कामासाठी फोन स्विच ऑन केला आणि गौरवचा फोन आला. विभावरी ताई आणि घरचे सगळेच काळजीत असतील म्हणून तात्काळ त्याने तिला कॉल केला.

ताईने आईच्या मायेने केलेली विचारपूस त्याला हळवं करून गेली मात्र दाटून आलेला हुंदका उरातच दाबत त्याने फोन पुन्हा कानाला लावला.

" अगं मित्राची आई आजारी असल्याचे कळले आणि तातडीने त्याला घेवून त्याच्या घरी कोकणात आलो. त्या गडबडीत घरी कळवायला विसरलो. फोनही स्विच ऑफ झाला. आता करतो कॉल तु नको काळजी करूस. आठ दिवस इथेच थांबायचा विचार आहे. त्याला गरज आहे माझी." खोटं बोलतांना आवाज जड होत होता त्याचा पण पर्याय नव्हता.

" आता ठिक आहेत ना त्या ? काहीही लागलं तरी कळव.अश्यावेळेस तर मित्राची खरी गरज असते. त्याला जशी शक्य असेल तशी सगळी मदत कर. मी सांगते आईला फोन करून. स्वतःची काळजी घे. फोन करीत रहा." विभावरी ताई मायेने म्हणाली.

" ठिक आहे चल करतो कॉल नंतर." म्हणत त्याने लगेचच फोन कट केला. डोळ्यांतील पाणी वेस ओलांडून गालावर घरंगळले.

" ओ मिस्टर, येता की इथेच थांबता." मागून अवनीचा आवाज ऐकताच तो सावध झाला. गालावरील अश्रू टिपत त्याने स्वतःला सावरले.

" हो. निघूयात." नजर चोरत तो म्हणाला आणि पुढे चालू लागला.

" तुमचा नक्कीच काही तरी मोठा प्रॉब्लेम आहे. आताही तुम्ही रडत होता. आणि काय हो तुम्ही मित्रांबरोबर आलात ना इथे मग ते कुठे आहेत ?" आता मात्र अवनीने त्याची शाळा घ्यायला सुरवात केली.

" प्रॉब्लेम तर मोठाच आहे. तोच सोडवायचा प्रयत्न सुरु आहे. घरच्यांना न सांगता आलोय याचच वाईट वाटतय." तो अगदिच मोकळेपणाने बोलून गेला.

" घरचे काळजीत असतील त्याच्यांशी बोलून घ्या तुम्हांलाही बरं वाटेल." तिने सुचविले.

" अगदी खरं बोललात तुम्ही. मी बोलतो त्यांच्याशी. तुम्ही पण का नाही बोलत तुमच्या आईबाबांशी स्पष्ट ?" त्याने तिला तिच्याच उत्तरात पकडलं.

तिने पुन्हा त्याच्यावर कटाक्ष टाकला. पण यावेळेस तो रागीट नव्हता.

" काही गोष्टी स्पष्ट नाही बोलता येत.आईवडिलांना ज्या गोष्टीचा त्रास होणार असेल त्या न सांगितलेल्याच चांगल्या." विचारांत गढून जात ती म्हणाली.

" खरं आहे पण त्याच गोष्टी त्यांना इतरांकडून कळल्या तर आणखी त्रास नाही होणार का ? त्यापेक्षा विश्वासात घेऊन आपण सांगितलेलं जास्त चांगलं ठरेल." त्याने मार्ग सुचविला.

तिने मात्र यावेळेस काहीही न बोलता फक्त होकारार्थी मान हलविली.

" तुमच्या आई खूप काळजीत आहेत. आपल्या लेकराच्या चेहऱ्यावरचं दुःख कळतं एका आईला. काहीही असो पण त्यांना दुखावू नका. काही गरज लागल्यास नक्की सांगा." त्याने पुन्हा एकदा तिला समजावले.

तिने यावेळेसही स्मितहास्य करीत त्याला होकार दिला.

ऊन आणि सावलीचं एकमत झालं होतं जणू.

काही वेळातच ते घरी पोहचले.

" आईबाबांशी बोलून घ्या त्यांना बरं वाटेल आणि तुम्हांलाही." कॉटेजकडे निघालेल्या राजवीरला ती म्हणाली.

त्यानेही मान हलवित होकार दिला.

अवनीला पाहून सविता ताईंच्या जीवात जीव आला.

ती पुन्हा चिडेल म्हणून काहीही न बोलता त्यांनी शरदरावांना खुणावले. शरदरावांनीही इशाऱ्यानेच त्यांना होकार दिला.

" अवनी, बेटा नाश्त्यासाठी तुझी वाट पाहत थांबलो आहे मी.सविता आम्हांला नाश्ता देतेस ?" म्हणत शरदरावांनी त्यांना किचनमध्ये जायला सुचविले.

त्याही लागलिच आत निघून गेल्या.

अवनी शरदरावांच्या बाजूला येऊन बसली. काही कळायच्या आतच तिने डोके त्यांच्या खांद्यावर टेकवले.

" बेटा, आता बरं वाटतय ना ? आई सांगत होती तुला बरं नाही वाटत." तिच्या डोक्यावरून हात फिरवित ते म्हणाले.

" हो बाबा. मी ठिक आहे." म्हणतांना तिला गहिवरून आले.

" आई काळजीत आहे गं. तिला सारखं वाटतय तुझं काही तरी बिनसलय. पण मला खात्री आहे काहीही असलं तरी तु माझ्यापासून लपविणार नाहीस. ती उगाचच काळजी करते. श्रीधर बरे आहेत ना ? म्हणजे बरेच दिवस झाले त्यांचा फोन नाही आला मला म्हणून विचारलं." बोलता बोलता त्यांनी विषयाला हात घातला.

" बाबा, मी ठिक आहे. थोडा थकवा आहे. आत जाऊन आराम करते." म्हणत तिने विषय टाळला आणि आत निघून गेली.

आजही तिला खरं सांगायची हिंमत झाली नाही. आपल्या लग्नाचं स्वप्न पाहणाऱ्या मायबापाला ते लग्न तुटलं आहे हे सांगायची हिंमत होत नव्हती हीच तिची शोकांतिका. दुसऱ्याच्या कर्माची शिक्षा ती स्वतः भोगत होती.

इकडे शरदरावांनाही आता खात्री पटू लागली होती. अवनीची बदलेली मन:स्थिती तिच्या स्वभावातही दिसून येत होती. दोन तीन दिवस झाले तरी ती श्रीधरशी बोलतांना दिसली नाही. लग्नाच्या तयारीचा विषय निघताच तिचं तेथून निघून जाणे, श्रीधरच्या नावाने रागावणे, स्वतःच्या विचारात मश्गूल राहणे, रोजचे पाणावलेले डोळे, निरुत्साही चेहरा हे सारं काही सांगून जात होतं.

आता शरदरावांनाही काळजी वाटू लागली होती.

त्या दिवशी अवनी समुद्रावर निघाली असतांनी त्यांनी तिला अडविले.

" अवनी, श्रीधरच्या घरी जाऊन यायचा विचार आहे. बरेच दिवस झाले काहीच बोलणं नाही. तुमच्या लग्नाच्या पत्रिका आल्या आहेत. पहिली पत्रिका त्यांनाच नेऊन देतो." तिच्या समोर लग्नपत्रिका धरत ते म्हणाले.

लग्नपत्रिका पाहताच ती गोंधळली. दुसऱ्याच क्षणी काहीही न बोलता घराबाहेर पडली.इकडे शरदराव तिला आवाज देत तिच्यामागे धावले. पण तिने मात्र त्यांचा आवाज कानापर्यंत पोहचू दिला नाही. ती तशीच निघाली आणि समुद्रावर पोहचली.

" नक्कीच काही तरी घडलय. मी श्रीधरलाच फोन करून विचारतो." म्हणत त्यांनी मोबाईल काढला आणि फोन लावला.

श्रीधरने फोन उचलला.

पाच दहा मिनिटांच्या त्यांच्या संभाषणात शरदराव घामाने डबडबले.

" हे लग्न नाही होऊ शकत याचं कारण तुम्ही अवनीलाच विचारा. या पुढे प्लिज मला आणि माझ्या घरच्यांना फोन करू नका." म्हणत त्याने फोन ठेवला.

" असं कसं लग्न नाही होऊ शकत. लग्न म्हणजे बाहुला बाहुलीचा खेळ वाटला का ? मी आताच जाऊन त्यांना जाब विचारतो." मोठा धक्का बसलेल्या शरदरावांनी बोलता बोलता छातीला हात लावला आणि पुढच्याच क्षणी धपकन खाली कोसळले.

त्या आवाजाने सविताताई धावतच घराबाहेर आल्या. शरदरावांना कोसळलेलं पाहून त्यांचाही जीव कंठाशी आला.

" अवनी, अगं लवकर ये. बाबा बघ कसे करीत आहेत ?" म्हणत त्या जोरजोरात रडू लागल्या.

त्यांच म्हणणं ऐकायला अवनी तिथे नव्हती. पण राजवीरने मात्र त्यांची आरोळी ऐकली. शरदरावांना कोसळलेलं पाहून तात्काळ त्याने आपली गाडी काढली. वॉचमॅनच्या मदतीने शरदरावांना गाडीत बसवलं आणि दवाखान्याचा रस्ता धरला.

खरं कळल्यावर आता अवनी कसे सांभाळेल तिच्या आईवडिलांना ?

कळेल पुढच्या भागात.

क्रमश:

©® आर्या पाटील

🎭 Series Post

View all