का एक झाले ऊन आणि सावली ?(भाग १० वा) अंतिम

का एक झाले ऊन आणि सावली ? या प्रश्नाला सकारात्मक उत्तर देऊन राजवीर आणि अवनी एक झाले वीराच्या रुप

का एक झाले ऊन आणि सावली ?( भाग १० वा) अंतिम

©® आर्या पाटील

भविष्याच्या सोनेरी स्वप्नात रमत राजवीर अवनीला आश्वासक साथ देत होता. घरचे सगळेच तिची सर्वतोपरी काळजी घेत होते.विभावरीही अवनीच्या बाबतीत नेहमीच सतर्क असायची. शारीरिक आरोग्यासोबतच तिचं मानसिक स्वास्थही जपायची. आधीच हळवी असलेली अवनी भावनांच्या आहारी जाऊ नये म्हणून राजवीरला विशेष लक्ष देण्याचा हुकूम दिला होता तिने. राजवीरनेही तिच्या जीवनात सुखाची बरसात करीत हा हुकूम निष्ठेने पाळला होता. डोहाळ जेवणानंतर माहेरी पाठवण्याची पद्धत होती. कोकणात पाठवणे शक्य नव्हते अश्यावेळेस विभावरीनेच तिचे माहेरपण केले. ताईच्या हक्काने तिचे आईपण निभावले. लेकीला पाहण्याची ओढ अनावर होताच सविताताईही विभावरीकडे काही दिवस येऊन राहिल्या.बाळाचं होणारं आगमन तिच्या दुखऱ्या भूतकाळावर रामबाण उपाय ठरत होतं. कातरवेळी मन उदास होताच राजवीर तिला मायेने कुशीत घ्यायचा.

" अवनी, हे आपलं बाळ आहे. त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आता फक्त माझ्यात विरल्या आहेत. कोणताही नकारात्मक विचार न करता आपल्या बाळावर सकारात्मक जीवनाचे गर्भसंस्कार होऊ देत." तिच्या कपाळावर स्पर्शखुण रेखाटित तो म्हणायचा.

" तुम्ही सोबत आहात म्हणून अंधाऱ्या वाटेवरचा हा दिशाहीन प्रवास सुखकर झाला. दिपस्तंभ बनून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि विवंचनेच्या वादळात भरकटलेल्या माझ्या जीवन नावेला सुखाच्या किनाऱ्यावर घेऊन आलात." ती त्याच्यात विसावत म्हणायची.

तिच्या त्या शब्दांनी त्याला मात्र अपराधीपणाची जाणिव व्हायची. आपल्या हातून घडलेलं पातक आठवत तो हळवा व्हायचा. त्याच्या डोळ्यांतील वेदना तिच्यापासून लपायच्या नाहीत.

' तुमच्या मनातलं दुःख तरी काय आहे ?'या तिच्या प्रश्नाला तो 'तुझं माझं वेदनेचं साम्य आहे.'एवढच म्हणत टाळायचा. त्याच्या बोलण्याचा अर्थ तिला कधी कळलाच नाही. विभावरीशी हितगुज साधत त्याचं दुःख जाणून घ्यायचा पर्यंत केला पण तिनेही त्याच्या दुःखाचं कारण कळू दिलं नाही. ते न कळण्यातच दोघांची आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाची भलाई होती हे जाणून विभावरीने काळजावर दगड ठेवून सत्य लपवले. काहीही झालं तरी आपल्याच भावाला तुटतांना नव्हती पाहू शकत ती. बघता बघता नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला होता. कधीही बाळंतपणाची वेळ जवळ येऊ शकते हे जाणून राजवीरने ऑफिसमधून सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला. आता चोवीस तास तो अवनीसोबत राहू लागला. तिला हवं नको ते पाहू लागला. आईच्या मायेने जपू लागला.त्याच्या प्रेमाच्या छायेत ती सावली आनंदाने जगत होती. 

त्या दिवशी मात्र तिला राजवीरचे लहानपणीचे फोटो पाहण्याची इच्छा अनावर झाली. याआधी सासूबाईंनी तो अल्बम तिच्या स्वाधीन केला होता. राजवीरने फोटो पाहून झाल्यावर तो स्वतःच्या कपाटात ठेवला. नेमका त्या वेळेत राजवीर रुममध्ये नव्हता. तशी एरवी ती त्याच्या कपाटाला कधीच हात लावत नसायची पण आता मोह आवरला न गेल्याने ती उठली आणि त्याचा कपाट उघडती झाली.कपाटातील टापटीपपणा तिची नजर वेधून गेला. दोन तीन कप्पे पाहून झाल्यावर तिने ड्रॉवर उघडला. त्या ड्रॉवरच्या तळाशी तिला तो छोटा अल्बम सापडला. अल्बम पाहताच तिची कळी खुलली. तो उचलून घेत ड्रॉवर बंद करणार तोच नजर एका चिठ्ठीवर पडली. चिठ्ठी पाहताच तिला कॅफेमध्ये भेटलेला गौरव आठवला. गौरवचं नाव बऱ्याचदा तिने घरच्यांना तोंडून ऐकलं होतं पण लग्नानंतर त्याला कधीच पाहिलं नव्हतं.

राजवीरला विचारल्यावर तोही त्याच्याविषयी बोलणं टाळायचा. ती चिठ्ठी पाहताच तिची उत्सुकता शिगेला पोहचली.कदाचित गौरव हेच त्याच्या दुःखाचं कारण असेल असा अंदाज बांधून तिने ती उचलली. हातातला अल्बम कपाटात ठेवत तिने चिठ्ठी उघडली. नजरेने त्यातील मजकुराचा वेध घ्यायला सुरवात केली. मैत्रीने सुरवात झालेला मायना त्या रात्रीच्या प्रसंगावर येऊन थांबला ज्या रात्री तिच्यावर अत्याचार झाला होता.आपल्यावर अत्याचार करणारा राजवीर होता हे वाचतांना तिचं स्वतःवरील नियंत्रण सुटलं. डोळ्यांत आसवांनी आणि मनात त्या बोचऱ्या आठवणींनी गर्दी केली.जसाच्या तसा तो प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिला पण या वेळेस त्या प्रसंगातील ती व्यक्ती तिला स्पष्ट दिसली. 'राजवीर...' अशी आर्त आरोळी घालीत ती जाग्यावरच कोसळली. तिची ती वेदनेनी भरलेली हाक राजवीरच्या कानावर पडली. तो तसाच धावत रूममध्ये पोहचला. बेशुद्ध होऊन अवनी खाली कोसळली होती. तिच्या हातातली गौरवची चिठ्ठी पाहून त्याला काय घडलं असेल याची कल्पना आली. डोळ्यांतून अश्रूधारा ओघळू लागल्या. त्याने ती चिठ्ठी तशीच तिच्या हातातून घेत चुरगाळून फेकून दिली.

" आई, बयोआजी लवकर या.." म्हणत त्याने टाहो फोडला.

लागलीच राजवीरची आई रुममध्ये धावत आली. अवनीला बेशुद्धावस्थेत पाहून त्यांचेही प्राण कंठाशी आले. टेबलावरील ग्लासमधील पाणी त्यांनी तिच्या तोंडावर शिंपडले पण त्याचा काही एक फायदा झाला नाही. राजवीरचे वडिल आणि काकाही धावतच रुममध्ये पोहचले.

" वीर, आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहचावे लागेल. मी गाडी काढतो तु अवनीला घेऊन ये. दादा तु विभाला फोन करून सगळ्याची कल्पना दे." म्हणत राजवीरचे काका गाडी काढण्यासाठी निघून गेले.

त्याच्या बाबांनी फोन करून विभाला कळवलं.

" अवनीच्या आईबाबांना कळवू नका काळजी लागून राहिल त्यांना. सगळं व्यवस्थित होईल तुम्ही अवनीला घेऊन ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोहचा. वीरला सांभाळा ." म्हणत विभाने फोन ठेवला.

राजवीरने अवनीला उचलून घेत गाडीमध्ये बसवले. सोबत आई होती पण त्याने आईला पुढे बसवून स्वतःच्या मांडीवर अवनीचं डोकं घेतलं.

" अवनी, प्लिज उठ ना." रडत रडत तो पूर्ण प्रवासात तिला उठवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होता. त्याची आणि अवनीची ही अवस्था पाहून त्याच्या आईनेही डोळ्यांना पदर लावला.

" बाळा, रडू नकोस आपल्या अवनीला काहीच होणार नाही. ती येईल शुद्धीवर." म्हणत त्यांनी त्याला धीर दिला. दवाखान्याचं मोजकं अंतर त्याला कोसोंच वाटत होतं. काही वेळातच ते दवाखान्यात येऊन पोहचले. विभावरीने आधीच सगळी तयारी करून ठेवली होती. तात्काळ अवनीला आत नेण्यात आले. नऊ महिने पूर्ण होऊन चार पाच दिवसांचा कालावधी लोटला होता. तिची योग्य ती तपासणी करून विभावरीने सिजर करण्याचे स्पष्ट संकेत दिले. ऑपरेशनची सगळी तयारी करून तिला ओटी मध्ये नेण्यात आले.

" ताई, अवनीला काही झालं तर मी ही जिवंत राहणार नाही." विभावरीला सांगत राजवीर रडू लागला.

" वीर, अवनीला आणि बाळालाही काहीच होणार नाही. तु स्वतःला सावर." म्हणत ती आत निघून गेली.

अवनीला सत्य कळलय हे कोणत्या तोंडाने सांगणार होता तो ? आपल्या दुःखाला उरातच साठवत तो ऑपरेशन थिएटरबाहेर येरझाऱ्या घालू लागला. काही वेळाने राजवीरचे बाबाही बयोआजींना घेऊन तिथे पोहचले.

आजीच्या कुशीत शिरत राजवीर ओक्साबोक्सी रडू लागला.

" वीर, सावर स्वतःला. आपली अवनी राकट आहे. या संकटावरही ती नक्कीच मात करेल." म्हणत त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरविला. राजवीरच्या आईने गणरायाच्या मूर्तीसमोर आपले गाऱ्हाणे मांडले.

" देवा, माझ्या लेकीला आणि बाळाला सुखरूप ठेव." म्हणत दिपप्रज्वलित केले.

विभावरीच्या प्रयत्नांना यश आले. गणरायाने राजवीरच्या आईचं गाऱ्हाणं ऐकलं.

" मोहित्यांच्या घरात नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. राजवीर आणि अवनीला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. मी आत्या झाले आहे." हे सांगतांना विभावरीच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. घरातील सगळे जण आनंदाच्या डोहात ओतप्रोत बुडाले.

" ताई, माझी अवनी ठिक आहे ना ?" राजवीर हळवा होत म्हणाला.

" हो. अवनीच्या जीवाला कोणताच धोका नाही. सध्या बेशुद्ध आहे पण येईल लवकरच शुद्धीवर. नर्स माझ्या भाचीला घेऊन येईलच. मी आले." म्हणत विभावरी फ्रेश व्हायला निघून गेली.

आताही तिला अवनीला सत्य कळालं आहे हे सांगायचं राहून गेलं. राजवीर पुन्हा त्याच आठवणीत बुडाला तोच

" अभिनंदन राजवीर,आता तु बापाची भूमिका बजावणार आहेस." म्हणत राजवीरच्या वडिलांनी त्याला आलिंगन दिले. तसा राजवीर भानावर आला. दुःखाच्या जाणिवेवर सुखाने अलगद फुंकर घातली.

" पहिली बेटी म्हणजे धनाची पेटी. घरी लक्ष्मी अवतरली आहे. अभिनंदन वीर." म्हणत काकांनीही त्याला शुभेच्छा दिल्या. 'आपण बाप झालो' आहोत या जाणिवेसरशी तो हळवा झाला. तेवढ्यात नर्स त्याच्या लेकीला घेऊन बाहेर आली. राजवीरच्या आईने नातीला तिच्या हातातून घेत राजवीरच्या पुढ्यात धरलं. हळवी जाणिव त्या लहानग्या अंशाला पाहून आणखी गहिवरली. डोळ्यांतून अश्रुधारा ओघळू लागल्या. त्याने थरथरत्या हाताने तिला ओझरता स्पर्श केला.तिचं निरागस रुप ओलेत्या नजरेलाही स्पष्ट दिसत होतं.

" किती तेजस्वी आहे तुझी लेक वीर !आपल्या आईवर गेली आहे." म्हणत बयोआजींनी पणतीला हातात घेतले.

" राजवीर, घे.आपल्या लेकीला जवळ घे." म्हणत त्यांनी तिला त्याच्याजवळ देण्याचा प्रयत्न केला.

" नाही आजी. मला नाही जमणार. तिला काहीही व्हायला नको." म्हणत आपले थरथरते हात मागे घेतले.

" अरे बाप आहेस तु तिचा. तिला हातात घेतलं नाहीस तर बापपण कसं जगशील ? मी आहे तु प्रयत्न कर." म्हणत त्यांनी त्याला खाली बाकड्यावर बसवलं. त्याच्या थरथरत्या हातांना आधार देत लेकीला त्याच्या जवळ दिले. तिच्या त्या नाजूक स्पर्शाने राजवीरला जग जिंकल्याचा आनंद मिळाला. मघापासून वाहणारे डोळे लेकीशी मुक संवाद साधू लागले. तोच स्ट्रेचरवर अवनीला घेऊन नर्स बाहेर आली. ती अजूनही बेशुद्धच होती. तिला स्पेशल रुममध्ये हलवण्यात आले. लागलिच लेकीला आईकडे देत राजवीरने रुम गाठली. सलाईन लावून नर्स रूमबाहेर पडली.

" कोणीतरी एकानेच आत थांबा." नर्सने सक्त ताकिद दिल्याने दुसरं कोणी रूममध्ये गेलं नाही.

अवनीला अश्या अवस्थेत पाहून राजवीरला अश्रू अनावर झाले. तिचा हात हातात घेत तो रडू लागला.

" अवनी, मी चुकलो. तुझा अपराधी आहे मी. मला हवी ती शिक्षा कर पण हा अबोला संपव. तुला काही झालं तर मी ही जिवंत राहू शकणार नाही." बोलत असतांनाच विभावरी आत आली.

" वीर, नको काळजी करूस बाळा. ती येईल शुद्धीवर. तिच्या जीवाला कोणताच धोका नाही." म्हणत विभावरीने राजवीरला धीर दिला.

" ताई, तिला शुद्ध आल्यानंतर तिच्या जीवाला असलेल्या धोक्याचं काय ? जी गोष्टी आपण लपविली ती आज या कठिण प्रसंगी तिला कळली." म्हणत त्याने घडलेली सारी हकिगत तिला सांगितली. विभावरीने डोक्यावर हात मारून घेत दिर्घ सुस्कारा टाकला.

" वीर आता काय होणार ?" ती हळवी होत म्हणाली.

" आता जे काही होईल, तिचा जो काही निर्णय असेल तो मान्य असेल मला. मी अपराधी आहे आणि या दुष्कर्माची शिक्षा मला मिळालीच पाहिजे." तो गंभीर होत म्हणाला.

" तुला शिक्षा देऊन ती सुखी होईल का ? ती शिक्षा फक्त तुला नसेल तिला आणि तुमच्या लेकीलाही असेल. असं कसं सगळं अघटित होऊन बसलं रे.." म्हणतांना तिला गहिवरून आले.

सुखाचा क्षण दुःखद आठवणींनी काळवंडून गेला.

त्यांच संभाषण सुरु असतांनाच अवनी शुद्धीवर येऊ लागली.

" ताई, मी नाही सामना करु शकणार अवनीचा." म्हणत डोळे पुसत तो बाहेर निघून गेला. थोड्या वेळातच अवनी पूर्णपणे शुद्धीवर आली. विभावरीलाही तिचा सामना करणे कठिण जात होते. तिने आईला आवाज देत तिच्या लेकीला घेऊन येण्याचे सांगितले. विभावरीने अवनीच्या कुशीत बाळाला ठेवताच मातृत्वाच्या पर्वाला प्रत्यक्षात सुरवात झाली. लेकीचं रुप डोळ्यांत साठवतांना अवनी हळवी झाली.तिला उराशी कवटाळित आईपणाची भूक भागवून घेतली. त्या निरागस जीवालाही आईची खात्री पटली. मघापासून रडणारी ती अवनीच्या कुशीत जाताच शांत झाली

" तुझी लेक तिच्या बापावरच गेली आहे. तो ही कुशीत घेतल्यावरच शांत व्हायचा." राजवीरच्या आईने म्हणताच अवनीच्या डोळ्यासमोर राजवीरच्या आठवणी फेर धरू लागल्या. गौरवची चिठ्ठी तिचा भूतकाळ पुन्हा जागृत करिती झाली. आपली त्यावेळची मानसिक आणि शारीरिक परिस्थिती आठवून अवनीला राजवीरचा तीव्र संताप आला पण पुढच्याच क्षणी त्याने दिलेली साथ तिला हळवं करून गेली. गोड कटू आठवणींच्या हिंदोळ्यावर मन झुलू लागलं. एकएक करीत सगळेच तिला भेटून गेले पण राजवीरने मात्र तिच्या समोर येणे टाळले. बाहेर राहूनच तो तिचा कानोसा घेत होता. तिला डोळे भरून पाहण्याची, तिच्या पायावर पडून माफी मागण्याची, तिच्या कुशीत शिरून रडण्याची इच्छा अनावर होत होती पण या इच्छेला त्याने स्वतःच्या अपराधाचं लगाम लावलं आणि स्वतःला थोपवलं.

" ताई, तुम्हांला माहित होतं सगळं ?" विभावरी रुममध्ये एकटी असतांना अवनी हळवी होत म्हणाली.

" हो. तुमच्या लग्नाच्या दिवशीच मला सत्य कळलं. त्यावेळी राजवीरचा खूप राग आला होता पण आपल्याच भावाला शिक्षा देण्याची हिंमत झाली नाही. मी स्वार्थी बनले. तुझा, तुझ्या आईवडिलांचा विचार करून मी शांत राहण्याचे ठरवले. अवनी, गौरव का असं वागला माहित नाही पण त्याच्या दुष्कर्माची शिक्षा राजवीरला मिळाली. राजवीर अपराधीच आहे. त्याने स्वतः ला सावरायला हवं होतं हे जरी शंभर टक्के खरं असलं तरी तो माणूस म्हणून अयोग्य नव्हता आणि आताही नाही. त्या रात्रीपासून ते आजपर्यंत तो सुखाने झोपलाही नसेल याची अनुभूती तुझ्यापेक्षा जास्त कोणाला असेल ? तुटला होता तो आपल्या हातून नकळत घडलेल्या अपराधाने. त्याचं मन त्याला आतून खातं होतं पण आईबाबांच्या,तात्या आणि बयोआजींच्या संस्कारांना दोष लागायला नको म्हणून स्वतःला सावरलं आणि तडक तुझं घर गाठलं. त्यानंतर तु त्याला प्रत्यक्ष अनुभवलं आहेस, त्याच्या सहवासाने स्वतःला सावरलं आहेस त्याबद्दल मी काय बोलणार ? आताही मी त्याची पाठराखण करीत नाही. तो चुकलाय हे अगदी खरे पण या चुकीची जाणिव ठेवून त्याने ती सुधारण्याचाही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्याचं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. तुला बेशुद्धावस्थेत पाहून तुटला होता तो. तुला काही झालं तर स्वतःला संपवण्याची भाषा करीत होता. लेकीला पाहून आनंदात न्हाहून गेला होता. तिच्यात तो तुला शोधत होता. शेवटी निर्णय तुझा असेल पण एक ताई म्हणून मी राजवीरला माफ करावस अशी विनंती करू शकते." म्हणत विभावरीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि बाहेर जाण्यास वळली.

" ताई, राजवीरना आत पाठवा." म्हणत तिने लेकीवर दृष्टीक्षेप टाकला. होकारार्थी मान हलवित विभावरी बाहेर निघून आली. राजवीर तिथेच बाहेर घुटमळत होता.

" ताई, अवनी बरी आहे ना ? तिला काही त्रास.." म्हणतांना मात्र त्याचं काळीज गलबललं.

" तिने तुला आत बोलावलं आहे. भेट तिला ती वाट पाहतेय." म्हणत विभावरीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. राजवीरच्या डोळ्यांत पाणी तरळले. त्याने नकारार्थी मान हलवली.

" ती वाट पाहतेय." एवढच म्हणून विभावरी तेथून निघून गेली. मनात नाना विचारांनी थैमान घातले होते. शेवटी खंबीर होत त्याने रुममध्ये प्रवेश केला.

तिच्यावर दृष्टी पडताच तो पुन्हा रडू लागला. रडतच तिच्या जवळ जात त्याने तिचे पाय धरले.

" अवनी, मला माफ कर. मी अपराधी आहे तुझा. तु देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे." तिच्या पायांजवळ बसत तो रडू लागला. त्याला असं अनावर झालेलं पाहून ती त्याच्याजवळ जाण्याच्या मनसुब्याने उठणार तोच ओटीपोटात कळ आली.

तिच्या आर्त स्वरांनी राजवीर मात्र हळहळला. तिथून उठत तो तिच्या जवळ आला.

" अवनी, ठिक आहेस ना ? ताईला बोलवू का ?" तिच्या डोक्यावरून हात फिरवित विचारता झाला. त्याच्या स्पर्शाने तिला मात्र हळवं केलं. हुंदके अनावर झाले आणि डोळ्यांतून ओघळू लागले.

" अवनी, मला माफ कर. प्लिज तु रडू नकोस. माझ्या अपराधाची शिक्षा स्वतःला नको देऊस. प्लिज शांत हो." तिथेच बेडवर तिच्या डोक्यावर डोकं ठेवून तो बोलता झाला. हातांनी अलगद तिला मिठीत घेतले. ऊन सावली वेदनेच्या जाणिवेने एकमेकांत विसावले. श्वासांना श्वासांची सोबत मिळाली अन् दुःखाला दुःखाची. आज दुःखाने त्याची सर्वोच्च पातळी गाठली होती. स्वतःला सावरीत राजवीरने अवनीचे डोळे पुसले.

" तुझा निर्णय मला मान्य असेल." म्हणत तो बाहेर जाण्यासाठी उठणार तोच तिने त्याचा हात पकडला.

" वीर, आपल्या लेकीला नाही का घेणार ?" तिने असे म्हणताच तो तसाच मागे वळला आणि पुन्हा एकदा तिच्या कुशीत शिरला.

" अवनी.." तो काही बोलणार तोच तिने त्याला शांत केले.

" 'इज्जत' हा प्रत्येक स्त्रीचा अनमोल दागिना. जाणती झाल्यानंतर ही इज्जत जपण्याचा ती अटोकात प्रयत्न करते किंबहुना तशी शिकवण तिला अजाणत्या वयापासूनच दिली जाते. हिच शिकवण प्रत्येक मुलाला दिली तर ? स्त्रीची अब्रू राखणे या कर्तव्याची त्यांना जाणिव करून दिली तर माझ्यासारख्या कोणत्याच अवनीच्या आयुष्यात हा वाईट दिवस उगवणार नाही. वीर,आपल्याला मुलगा झाला तर मी आई म्हणून ही शिकवण देण्याचा नक्की प्रयत्न करेन. 

माझंही खूप प्रेम आहे तुमच्यावर. लग्नानंतर ज्या दिवशी हक्काने आईबाबांना फोन लावून दिलात त्याच दिवशी मनाच्या गाभाऱ्यात प्रेमदेवतेपरी तुम्हांला सजवलं. तुम्ही होतातच तसे मला प्रत्येक गोष्टीत साथ देणारे. कारण काहीही असो पण तुमचा सहवास मला जगण्याचं वरदान देऊन गेला. मी खरच त्या समुद्रात विसावले असते जर त्या दिवशी तुम्ही मला आधार दिला नसता. तुम्हीच मला संपवल आणि तुम्हीच नविन जन्मही दिला. तुम्ही केलेला अत्याचार एक स्त्री म्हणून मी केव्हाच विसरू शकणार नाही. प्रेयसी आणि पत्नी म्हणून मी माफ करेन तुम्हांला पण एक स्त्री म्हणून तुमच्या गुन्हाला माफी नाही.तुम्हांला त्याची शिक्षा भोगावीच लागेल." बोलता बोलता आता मात्र ती गंभीर झाली.

" मी तयार आहे शिक्षेसाठी.." म्हणत त्यानेही डोळे टिपले.

" कसली शिक्षा देतेस अवनी माझ्या नातवाला ?" तेवढ्यात बयो आजी आत आल्या.

तसे दोघेही सावध झाले.

" बरोबर आहे तुझं अवनी. बाप म्हणून जबाबदारी पार पाडावीच लागेल त्याला. तुझी ती पॅटर्निटी लिव्ह टाकून घे पाहू. नाहीतर मीच शिक्षा देऊन तुला." म्हणत बयो आजींनी वातावरण हलकं केलं.राजवीरच्या मनात मात्र धाकधूक लागून राहिली. विभावरीला त्याने घडलेल्या घटनेची माहिती दिली. अवनीशी स्पष्ट बोलणे आता तिलाही शक्य होत नव्हते. अवनी मात्र पुन्हा एकदा खंबीर बनून परिस्थिती निभावून नेत होती.राजवीर सोबत पूर्वीसारखी वागून त्याच्या मनावरील भार हलका करीत होती. दोन दिवसांनी सविताताई आणि शरदरावही दवाखान्यात येऊन पोहचले.

लाडक्या लेकीला आणि नातीला सुखरूप पाहून दोघांना आनंदाची भरती आली. 

" तुम्ही घरी जाऊन आराम करा. मी थांबतो अवनी आणि बाळाजवळ." लेकीजवळ थांबत असलेल्या सविताताईंना त्याने घरी जाण्याची विनंती केली. अवनीने इशारा देताच त्याही निघून गेल्या.जेवढे दिवस ती दवाखान्यात होती राजवीर तिच्या सोबत सावलीसारखा थांबला. लेकीला उचलून घेण्याची कलाही एका बापाला अवगद झाली. त्या तिघांना एकत्र पाहून विभावरीला समाधान वाटायचं. अवनीची तब्येत स्थिरस्थावर झाल्यावर तिला डिस्चार्ज देण्यात आला.

" नातीचं बारसं कोकणात करू धुमधडाक्यात." या शरदरावांच्या विनंतीला " सगळच कसं तुम्ही करणार ? लग्न तुमच्या दारात लागलं आता नातीचं बारसं आमच्या घरात होऊ दे ." म्हणत तात्यांनी बगल दिली.

शेवटी बारश्याचा कार्यक्रम मोहित्यांच्या बंगल्यातच ठरला. घरात लगबग सुरु झाली. सारा बंगला नानाविध फुलांनी सजला. लेकीसाठी राजवीरने ऑर्चिडच्या फुलांनी गच्च सजलेला पाळणा तयार करून घेतला.

" मग राजवीर लेकीचं नाव काय ठरलं ?" आलेल्या पाहुण्यांपैकी एकीने विचारलं.

" ते ठरवण्याचा अधिकार तिच्या आईचा." अवनीकडे पाहत उत्तर दिले. तशी अवनी हसली. कार्यक्रमाला सुरवात झाली. सविताताईंनी लेकीची ओटी भरली. पाच सुवासिनींनी मिळून अवनीला आणि तिच्या लेकीला ओवाळलं.'सीता घ्या कुणी लक्ष्मी घ्याचे' स्वर बंगल्यात निनादले. लेकीला पाळण्यात घालण्यात आले. अवनीने विभावरीच्या कानात नाव सांगितले तसा तिचा चेहरा पडला. जड अंतःकरणाने तिने चिमुकलीच्या कानांत नाव सांगितले. अवनीने राजवीरला खूण करताच दोघांनी मिळून झाकलेली लेकीच्या नावाची पाटी मोकळी केली.

'वीरा अवनी मोहिते.' पाटीवर लिहिलेलं बाळाचं संपूर्ण नाव वाचतांना जमलेले सारेच आश्चर्यचकित झाले. राजवीरच्या पायाखालची जमिनच सरकली. तोच नजर अवनीवर खिळली.

' हिच तुझी शिक्षा राजवीर. तुझ्याच लेकीच्या नावामागे वडिल म्हणून तुझं नाव कधीच न लावण्याची.' जणू तिचे डोळे सत्य सांगत होते.

राजवीरने भरल्या नजरेने या शिक्षेचा स्विकार केला. विभावरीनेही डोळ्यांतील पाणी टिपले.

" राजवीर, आता हे काय भलतच ? आजपर्यंत सगळं तुझ्या मनासारखं झालं म्हणून तुझं हे असलं वेड नाही सहन केलं जाणार." तात्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावलं.

" तात्या, मी ही तेच सांगतोय. आतापर्यंत फक्त माझ्या मनासारखं झालय अवनीच्या मताचा कधीच विचार झाला नाही. नऊ महिने बाळाला पोटात आईने वाढवायचे, जीवन मरणाच्या उंबरठ्यावर उभी राहून त्याला जन्माला घालायचे, दिवस रात्र एक करून त्याची काळजी घ्यायची आणि त्याची ओळख करून देतांना मात्र वडिलांना प्राधान्य द्यायचे ?तुम्हीच म्हणता ना माणसाने प्रवाही राहावे मग बदलाचा हा प्रवाह आपण स्विकारला तर वावगं काय ?" त्याने तात्यांना समजावलं. आताही तो आपल्या सावलीची साथ सोडत नव्हता. तिच्या आयुष्यात दुःख घेऊन आलेला ऊन आता मात्र त्या दुःखात स्वतःच पोळत होता तिला सावली देऊन.

त्याच्या घरच्यांना त्याचं म्हणणं मान्य करावच लागलं.

मनातलं बोचरं दुःख त्याने स्मितहास्याने लपवले. आपल्यावर अत्याचार करणाऱ्या पुरुषाला शिक्षा देऊन एक स्त्री समाधानाने हसत होती पण आपल्यावर मायेचं पांघरुण धरणाऱ्या उन्हाला दुःख देऊन सावली मात्र आतल्या आत रडत होती. पुढे जीवनाच्या वाटेवर एकमेकांची सोबत होत हे ऊन सावली एक झाले पण ज्या कारणामुळे त्यांचा प्रवास सुरु झाला त्यामुळे नेहमी प्रश्न निर्माण व्हायचा का असे एक झाले ऊन आणि सावली ?

समाप्त

©® आर्या पाटील

कथेचा शेवट कदाचित आपलं मन विचलीत करेल. पण प्रत्येक स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असावा एवढाच या कथेचा उद्देश. अत्याचारपिडीत स्त्रीच्या मनावरील घाव प्रेमाने भरून काढता येतात पण आठवणींचे व्रण मनावर तसेच कायम राहतात वेदना बनून. माफी मागून तिला खरच न्याय मिळेल का ? तिची गेलेली इज्जत परत येईल का ? सगळ्याचं उत्तर 'नाही' हेच आहे. कथेतील नायिकेने तो स्टॅण्ड घेतला. पत्नी म्हणून एका पतीला माफ केलं. पण अत्याचारपिडीत म्हणून एका वाईट प्रवृत्तीला शिक्षा दिली.

🎭 Series Post

View all