का ऐकून घ्यायचे नेहमी!

गोष्ट सासू सुनेच्या नात्याची

सासुबाई एकट्याच बडबड करत होत्या, अन् मीरा ती ऐकून न ऐकल्या सारखे करीत होती.
इतक्यात सुहास ऑफीसमधून आला आणि हात- पाय धुवून डायनिंग टेबलवर खुर्ची ओढुन बसला. तशा सासुबाई त्याला म्हणाल्या, "या घरात आता मला  बोलायची देखील सोय राहिली नाही रे."
सुहासला कळलं 'आईच्या बोलण्याचा रोख मीराकडे आहे ते.' समोर ठेवलेल्या चहाचा कप हातात घेत तो म्हणाला, "आता काय नवीन घडले आणि आज?"

"अहो काही नाही, नेहमीचेच. आई ताईंना फोन वर सांगत होत्या, ' मी सुहासकडून थोडे पैसे मागून घेते. असावेत थोडे फार जवळ आपल्या. काहीतरी खर्च असतात ना आपले!'
मग हे ऐकून मी माझ्या जवळचे दोन हजार आईंना दिले. हे ठेवा म्हंटल जवळ. वर खर्चाला लागतात. तशा आई उसळून म्हणाल्या, 'सुनेने दिलेले पैसे वापरायची वेळ अजून आली नाही आमच्यावर. मुलगा कमावता आहे म्हंटल माझा अजून."

मीरा हे आपल्या तोंडावर असे काही बोलेल असे सासुबाईंना वाटलेच नव्हते. त्या रागाने थरथरत आळीपाळीने मीराकडे आणि सुहासकडे पाहत होत्या.

गेल्या सहा वर्षात मीरा आपल्या सासुबाईंना पहिल्यांदाच उत्तर देत होती. इतक्या वर्षात मीराला केवळ ऐकून घ्यायची सवय झाली होती. सासुबाईंनी सूचना केल्या, ती ऐकून घेत होती. काही ना काही कारणाने त्या मीराला बोल लावत होत्या. मीरा विरुद्ध सुहासचे कानही भरत होत्या. मग तो ही तिला बोलायचा. ते ही मीरा निमूटपणे ऐकून घ्यायची. एक -दोन वेळा नणंदही भांडून गेली होती मीरासोबत, 'माझ्या आईसोबत नीट वाग आणि घरातील कामे नीट करत जा' म्हणून. ते ही तिने ऐकून घेतले होते. कारण माहेरची शिकवण.. 'सासरी उलट उत्तर द्यायचे नाही!'

'आपले नेमके काय चुकते ' हे मीराला कळतच नव्हते. घरचं सगळ पाहून ती पार्ट टाईम जॉब करायची, त्यामुळे सासुबाईंना घरचे फारसे काही पहावे लागत नव्हते. भरपूर मोकळा वेळ होता त्यांच्याकडे. मग तो सारा वेळ आता मीराच्या चुका काढण्यात जाऊ लागला.

मीराही सासुबाईंना कधी उलट बोलत नसे, त्यामुळे त्या जास्तच बोलू लागल्या तिला.
मीराने हे सारे सुहासला सांगायचा प्रयत्न केला. पण "माझी आई तशी नाहीच मुळी" असा पवित्रा त्याने घेतला. मग तिला आपसूकच गप्प बसावं लागलं.

"का आई? सुनेने स्वयंपाक करावा, सारं घर सांभाळावं, आपल्या नवऱ्याची, सासूची मर्जी सांभाळावी, तर मग तिने कमावलेले पैसे आपल्याच सासूला दिले, तर ते का चालत नाहीत?"
आज पहिल्यांदाच सुहास बायकोसाठी आपल्या आईला बोलत होता. हे पाहून मीराला आश्चर्याचा धक्काच बसला.

"आई या घरात जसा तुझा 'सासू ' म्हणून मान आहे, तसाच तिचाही 'सून ' म्हणून मान आहेच ना? तिला सारखे घालून -पाडून बोलण्याने तू तुझा मान कमी करून घेतेस आणि वर आपल्याच
सुनेकडे बोट दाखवतेस!
इतके दिवस मी काही बोललो नाही. कारण मीराने कधीतरी स्वतः साठी स्टँड घ्यावा, असे मला वाटत होते आणि नवऱ्याला पुढे करून बायको तिच्या मनातले सगळे बोलून घेते, असे आईला वाटायला नको म्हणून मी गप्प होतो.
जिथे आपले चुकत नाही, तिथे सारखेच का ऐकून घ्यायचे आई?
आज ती तुझ्या माघारी न बोलता समोर बोलली. याचा अर्थ असा की ती खरं बोलत होती. त्याशिवाय तशी हिम्मत केलीच नसती तिने!
आई ,तुझी सून म्हणून नको, निदान माझी बायको म्हणून तरी तिला किंमत दे." इतके बोलून सुहास तिथून उठून गेला.

पुढचे दोन दिवस 'मुलगा बोलला,' म्हणून मीराच्या सासुबाई तोंड फुगवून बसल्या होत्या. एरवी चूक कोणाची का असेना, पण 'सॉरी ' म्हणणारी मीरा अजूनही सॉरी म्हणायला कशी आली नाही, म्हणून त्यांचा जीव वर -खाली होत होता.

तिसऱ्या दिवशी मात्र त्यांचा संयम सुटला आणि त्या मीराजवळ गेल्या आणि  म्हणाल्या, "तुम्ही पोरं कामासाठी दिवसभर बाहेर जाता. मला काही लागलं तर जवळ पैसे हवेतच. आपल्या माणसाचं बोलणं फार मनाला लावून घेऊ नये बघ. दे ते दोन हजार रुपये, कधीतरी लागतात खर्चाला."

हे ऐकून मीराने आपल्या सासुबाईंच्या हातात आनंदाने पैसे दिले आणि त्यांना सॉरी म्हणाली. तसं सासुबाईंनी तिला हलकेच आपल्या मिठीत घेतलं आणि डोळे पुसत त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. तशी मीरा भरल्या डोळ्यांनी आनंदाने आपल्या सासुबाईंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराच वेळ पाहत राहिली.