जस्ट टेक्अ लिटिल ब्रेक....

After marriage.... how to handle any situation...

" काय समजतो स्वतःला हा... काय माहित... हू.. याला काय वाटते... मी ऐकून घेते म्हणजे नेहमीच सहन करत राहीन का.. ? आता येणारच नाही पुन्हा घरी..  रहा एकटा... जसे काय मलाच फक्त याची गरज आहे ना... याला कुठे माझी गरज आहे... " श्रेया रागारागात बडबड करत रडतच वार्डरोब मधून कपडे काढून बॅगेत भरत होती. सोबतच श्रेयस ला म्हणजेच तिच्या नवर्‍याला मनातच राग काढत एकटी बडबडत होती.

बॅगे घेऊन बेडरूम मधून बाहेर येत मोबाइल घेऊन दरवाजा पर्यंत आली तोच तिची पावले जागी थांबले.

दरवाजावर दोघांच्या नावाची नेमप्लेट बघून त्यावरून हात फिरवताच तिला हुंदका फुटला. एकवार मागे वळून पूर्ण घरावर नजर फिरवली. खूप सार्‍या आठवणी होत्या दोघांच्या... प्रेमाच्या... रागाच्या... भांडणाच्या... बर्‍याच अश्या... मागे सोडून जात होती. मन आतून सांगत होते... जाऊ नये. पण बुद्धी मात्र रागाने अहंकाराने मनावरच हावी होत होती. शेवटी मनाने हार मानून बुद्धी पुढे शरणागती पत्करली. आणि बुद्धीचे ऐकून तिने बाजूलाच असलेल्या टेबलवर वर एका कागदावर नोट लिहून ठेवत दरवाजा बंद करून घेत शेवटी घरातून बाहेर पडली.

*******

  " श्रेयस... अरे काय झालय..? का सगळ्यांवर राग काढतोयस. " ऑफिस मधे आल्यापासून प्रत्येकाच्या छोट्या छोट्या चुकांवर श्रेयस बरसत होता ते पाहून त्याचा मित्र सौमित्र त्याला विचारतो.

  " एक धड  कोणी काम करत नाहिये.  स्वतःच्या मर्जीने वागायचे आहे सगळ्यांना... " श्रेयस चिडचिड करत लॅपटॉप वर आपले काम करत बोलतो.

" तुझा राग नक्की कशावर आहे... ऑफिस मधल्या चुकांवर....की.... श्रेय...." सौमित्र त्याचा चेहरा निरखून बघत आपला अंदाज घेत त्याला विचारतो.

  त्याच्या बोलण्याने लॅपटॉप वर चालणारी श्रेयसचे हात क्षणात थांबतात. श्रेया चे नाव ऐकताच त्याला काल रात्री झालेली त्या दोघांचे भांडण आठवते. मागचा एक महिना त्यांच्यात सतत होणारा वाद डोक्यात घुमत होता.

  त्याला विचारत हरवलेले पाहून सौमित्र ला आपला अंदाज खरा ठरल्याचे पक्के होते.

" श्रेयस... अरे कुठे हरवलास... " सौमित्र त्याला आवाज देतो.

" ह... नाही.... काही नाही... " सौमित्र च्या बोलण्याने भानावर येत नजर चोरत बोलतो.

" चल चहा घेऊ... डोक शांत होईल थोडे... "

" मला काम आहे.. तू जा एकटा... " श्रेयस पुन्हा लॅपटॉप वर बघत बोलतो.

" हो... तर तुलाच एकट्याला काम आहेत ना... आम्ही रिकामटेकडे नाही का... ? " सौमित्र त्याला टोमणा मारतो. त्याच्या बोलण्यावर श्रेयस त्याच्यावर नजर रोखत एक रागीट लूक देतो.

" असा बघू नको.... मला भिती वाटते. " सौमित्र वातावरण थोडे हलके करण्यासाठी घाबरण्याचे नाटक करत बोलतो.

" तू सुधारू नकोस कधी... नौटंकी " लॅपटॉप बंद करत चेअर वरुन उठत बाहेर जायला लागतो.

******

" श्रेया... अग काय झालय... आल्यापासून नुसती रडत आहेस. आता सांगशील की नाही. " माधवी तिचा उदास चेहरा पाहून विचारते.

  घरी आल्यापासून नुसते रडायचे काम चालू होते. नीट काही सांगत सुद्धा नव्हती. त्यामुळे माधवी ला काळजी वाटत होती.

" श्रेया... बस्स आता. नंतर रडून घे. आधी काय झाले ते सांग... ? " माधवी वैतागून बोलते.

" आई... श्रेयस चे माझ्यावर आता प्रेम नाही राहिले. सतत भांडत असतो. " श्रेया नाक वर ओढत रडत बोलते.

" श्रेया...अग लग्न झाले आहे तुमचे... हे काय बोलतेस कळत का तुला..." माधवी तिचे बोलणे ऐकून चिडून बोलते.

" हो... मला कळते..मी काय बोलते ते... आणि तू माझी आई आहेस ना... मग तुला माझे म्हणणे कळत नाहिये का...जो तो माझ्याच चुका सांगत असतो. " श्रेया रडत ओरडून बोलते. आई सुद्धा समजून घेत नाही असेच वाटत होते.

" शांत हो... " माधवी स्वतः ला शांत करत तिला आपल्या मिठीत घेत डोक्यावर हात फिरवत शांत करत होत्या. श्रेया ला सुद्धा आधाराची गरज होती. आईच्या कुशीत स्वतः ला रडून मोकळी करत होती.

  " झाले रडून... आता शांत हो.. ह.. मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. ह्म्म... " माधवी तिचे डोळे पुसत तिला प्रेमाने समजावून किचन मधे जाते.

******

" पुन्हा भांडलात का... ? " सौमित्र स्वतः बोलण्याची सुरवात करतो.

" ह्म्म... " श्रेयस हुंकार भरतो.

" ती अजून लहान आहे. इतकी समजूतदार नाही की तू सगळ्या अपेक्षा कराव्या तिच्याकडून. " सौमित्र

" हो माहीत आहे. आमच्यात ऐज डिफ्रनस खूप आहे. पण माझी पण सहन करण्याची शक्ती एका लिमिट पर्यन्त आहे. दरवेळी मीच माघार घेतो. पण त्याचे तिला काहीच वाटत नाही. " श्रेयस चिडत सगळे मनातले सांगतो.

" माघार घेतोस म्हणजे... अरे प्रेम करून लग्न केलेस ना...मग... तू तर तिच्या बालिशपणा वर प्रेम केलेस ना मग ... " सौमित्र ला त्याचे बोलणे थोडे खटकते.

" हो...प्रेम केले आणि आता सुद्धा प्रेम आहे...समजले ना... आणि सध्या कामाचे प्रेशर इतके आहे की तिचा हट्ट नाही पूर्ण करता येत. त्यामुळे थोडे वाद होतात. " श्रेयस

" श्रेयस तुला वाटत का की श्रेया खरच तुला पार्टनर म्हणून योग्य आहे. " सौमित्र

" काय म्हणायचे आहे तुला सौमित्र " त्याच्या बोलण्याचा अर्थ न समजून त्याला विचारतो.

" बघ. ..  तू इतका समजूतदार आहेस. शांत आहेस. त्या उलट श्रेया किती बालिश आहे. तुझ्या स्वभावात ती कुठेच मॅच होत नाही. मग का तू या नात्यात स्वतः ला गुरफटून घेत आहेस. " सौमित्र

" प्रेमात असा विचार नाही कोण करत सौमित्र... आणि ती मला मॅच होते की नाही हे मला मॅटर करत नाही. माझे तिच्यावर प्रेम आहे हेच खूप आहे माझ्यासाठी. " श्रेयस सौमित्र च्या बोलण्याने चिडून बोलतो.

" प्रेम आहे म्हणतोस तर गृहीत का धरतोस तिला. " सौमित्र बरोबर त्याला आपल्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो.

******

  " ह्म्म... मग कशावरुन श्रेयस चे प्रेम तुझ्यावर आता नाही हे ठरवले तू... ? " माधवी शांतपणे श्रेयाशी बोलतात.

" आई... हल्ली तो थोडा विचित्र वागतो. " श्रेया

" विचित्र म्हणजे...? " माधवी न समजून विचारते.

" हल्ली त्याच्याकडे वेळच नाही माझ्यासाठी. कुठे जायचे म्हटले की जाऊ जाऊ असेच करतो. सतत माझ्या छोट्या छोट्या चुकांवर मला ओरडत असतो. " श्रेया ला रात्रीचे भांडण आठवून डोळे भरून येतात.

" तू चुकते तेव्हाच ओरडतो ना... म्हणजे तू चुका करतेस...बरोबर.. " माधवी

" आधी पण तर माझ्याकडून चुका व्हायच्या तेव्हा नाही तो ओरडायचा...आताच का असा वागतो. " श्रेया आधीचे दिवस आठवते.

" श्रेया... लग्न म्हणजे दोघांनी समान साथ द्यायची असते. तू तुझा बालिशपणा सोड आता. प्रत्येकवेळी तोच का माघार घेईल. तू नाही घेऊन शकत.  " माधवी तिला समजावते.

" पण आई... तो.. " श्रेया बोलतच होती की माधवी तिला मधेच थांबवतात.

" दोन महिन्या आधीच तुम्ही नवीन फ्लॅट घेतला आहे ना. तुला आवडला होता तो. " माधवी विचार करत बोलते.

" हो... मला तो खूप आवडला होता फ्लॅट.  श्रेयस ला सांगितले त्याने बर्थडे गिफ्ट केला मला. मला तर विश्वास बसत नव्हता. पण त्याने खरच माझे ड्रीम पूर्ण केले." श्रेया ते दिवस आठवत हसत बोलते.

" श्रेया... अग राणी इतके समझते तर तो असा का वागतो हे नाही का समजून घेत आहेस. " माधवी

" म्हणजे... " श्रेया

" श्रेया... आता तुझे लग्न झाले आहे.  थोडा बालिशपणा कमी कर बाळा.. अग तो तुला वेळ देत नाही कारण त्याला बाकी गोष्टी सुद्धा बघायच्या आहेत. नुसते प्रेमाने पोट भरत नाही. तुझ्या हौसमौज तुझे हट्ट पूर्ण करण्यासाठी तो इतके कष्ट घेतो. आणि तू तो वेळ देत नाही म्हणून घर सोडून येतेस. हे बरोबर आहे का... ? " माधवी तिला खडे बोल सुनावतात.

श्रेया ला आईचे म्हणणे पटते. आणि त्याच बरोबर श्रेयस ची कामाच्या बाबतीत होणारी दमछाक सुद्धा आठवते. तिला आता स्वतः चा राग येतो.

" आई... मी.. मी.. चुकले. मला नाही समजले " श्रेया माधवी च्या गळ्यात पडून रडू लागते.

" बाळा.. संसार दोघांचा मग... वेळ प्रसंगी पुढाकार आणि माघार सुद्धा दोघांनी घ्यायची. "

" आणि कधी वाद वाढला तर..एका ने शांत रहायचे. नात्यात कायमचा ब्रेक घेण्या पेक्षा कधी कधी छोटा ब्रेक घ्या...आपण कुठे चुकतो आहोत...आपल्याला काय करायला पाहिजे याचा विचार करा. न की डायरेक्ट नात तोडायचा विचार करायचा. " माधवी तिला प्रेमाने समजावत होती.

*******

  " श्रेयस.. अरे या बायका आपल्याशी  नाही भांडणार मग कोणाशी भांडणार... आणि आपण आपल्या कामात इतके व्यस्त होते. की आपली वाट पाहणारी बायको आपल्याला आठवत नाही. पण तिच्या विश्वासावर आपण आहोत ना...हे विसरून कसे चालेल. " सौमित्र त्याला समजावतो.

  " ह्म्म... माझे चुकले... हल्ली कामामुळे श्रेया कडे फार लक्षच दिले नाही. " श्रेयस ला आता स्वतः च्या वागण्याची जाणीव होते.

" नाते जर कुठे बिघडत असेल तर वेळीच थोडा विचार करून दुरुस्त करायचे. म्हणजे ते पुन्हा पूर्व पदावर येते. " सौमित्र त्याच्या खांद्यावर थोपटत बोलतो.

*****

  रात्री श्रेयस लवकरच घरी येतो. दरवाजा उघडून आत येत त्याची नजर श्रेया ला शोधत होती. शूज काढून बॅग सोफ्यावर ठेवत किचन मधे येतो.

कोणी आल्याची जाणीव होताच श्रेया मागे वळून बघते. दोघांची नजरानजर होते. श्रेया नजर दुसरीकडे वळवून घेते.

" फ्रेश होऊन ये...कॉफी बनवते. " श्रेया त्याच्याकडे न बघताच बोलते.

तिचे असे तुटक बोलणे त्याला सहन होत नाही. तो तसाच तिला स्वतःकडे वळवत तिला आपल्या मिठीत घेतो. श्रेया ला सुद्धा त्याच्या मिठीची गरज होती.

दोघेही न काही बोलता सुद्धा एकमेकांच्या मनातले भाव ओळखत होते.

" सॉरी sssss " दोघेही एकसाथ बोलतात.

" मी पुन्हा नाही अशी वागणार..." श्रेया रडत बोलते.

" मी सुद्धा पुन्हा नाही असा वागणार..." श्रेयस तिचे अश्रू पुसत तिच्या माथ्यावर ओठ टेकवून बोलतो.

" श्रेयस.... " श्रेया त्याच्या डोळ्यात बघते.

" ह्म्म..."

" आई सांगत होती...की आपण पुन्हा भांडलो...तर...आपण थोडा ब्रेक घेऊया...म्हणजे ते...मी.... मला... " श्रेया त्याला कस सांगावे तेच तिला समजत नव्हते.

" जस्ट टेक्अ लिटील ब्रेक.... नात्यात कायमचा ब्रेक घेऊन नाते तोडण्या पेक्षा.... कधी कधी छोटा ब्रेक घ्यावा....म्हणजे आपल्याला आपल्या चुका लक्षात येतील...आणि नाते पूर्वपदावर आणण्यासाठी काय करायला पाहिजे याचा मार्ग सुद्धा शोधता येईल. " श्रेयस तिच्या मनातले भाव ओळखत बोलते.

" ह्म्म.... आय लव यू.... " श्रेया त्याच्या डोळ्यात बघत बोलते.

" आय लव यू...मोअर...." श्रेयस तिला आपल्या मिठीत घेत बोलतो.

 

समाप्त

©️®️ दिप्ती निमणकर