Oct 24, 2021
कथामालिका

फक्त तुझ्यासाठी!!- भाग ९

Read Later
फक्त तुझ्यासाठी!!- भाग ९

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

'सुर्या अब?? तुझे लगता हैं कानून उस बडे बाप के बेटे को सजा देगा??'- त्याच्या मित्राने विचारलं..

'अगर कानून सजा नही देगा तो हम देंगे.. वैसे मुझे भी कानून पे ज्यादा भरोसा नही हैं.. बट ये केस डीसीपी रागिणी राणे के पास गया हैं तो कुछ आशा कर सकते हैं..'- हरविंदरने मागून येत माहिती दिली होती..
                   ----------------------

'कौन हैं वो? पैसे के आगे कोई नही टिकता..'- जॉनने स्पष्ट नाराजी व्यक्त केली

'नही.. ये थोडी अलग हैं.. ये कानून की पक्की हैं.. हिच्या समोर कोणाचं काही चालत नाही.'- हरविंदरने सांगितलं..

इतक्यातच हॉस्पिटलमध्ये मुख्य डॉक्टर धावत अनघाच्या रूम बाहेर येऊन थांबले होते. साऱ्या नर्सेस आणि वॉर्डबॉय लोकांची धावपळ सुरू झाली होती.. हा बदल पाहून सुर्या आणि त्याचे मित्रही गोंधळले होते..

'रागिणी मॅडम आल्या..'- कोणीतरी अस्पष्ट बोललं तसे सारे सावरून उभे राहिले.. 
सुर्या आणि त्याच्या सोबत्यांनीही आपला अवतार नेटका केला आणि ते रागिणी मॅडमची वाट पाहू लागले..

साऱ्यांच्या नजरा वॉर्डच्या एंट्रीजवळ लागल्या होत्या.. पुढच्या काही मिनिटांत एका तेजतर्रार स्त्रीने आत प्रवेश केला होता... तिच्या सोबतीला इंस्पेक्टर सावंत आणि हवालदार माने होते..

'या डॉक्टर.. आत चला..'- मुख्य डॉक्टरांना बोलवत रागिणी मॅडम थेट अनघाच्या खोलीत शिरल्या होत्या..

'कशी आहेस अनघा?'- रागिणी मॅडमनी खाटेवर झोपलेल्या अनघाचा हात हातात घेऊन चौकशी केली..

' मी?? मी.. मी आधीच अधू होती अन आता तर उद्धवस्त झाली आहे.. माझं भविष्य माझ्यासारखच काळोखात डूबलं..'- अनघाच्या डोळयातून अश्रू वाहू लागले होते..

'अनघा, तुला माहितेय तुझ्यावर कोणी बलात्कार केलाय??'- रागिणी मॅडमनी शक्य तितके निर्विकारपणे आपले प्रश्न चालू ठेवले.

'हो.. कोणी प्रदिप तिवारी होता.. त्याचे वडील आमदार आहे असं काही बोलत होता.. त्यानेच माझ्या रफिक भाईला मारलं.. माझ्या भावाला मारलं.. माझी अब्रू लुटली..'- अनघा आता आवेगाने आपले हात बिछान्यावर आपटू लागली होती..

'अनघा शांत हो.. तुझ्या हिंमतीला माझा सलाम.. एवढं दुःख ओढवूनही तु अन्यायाविरुद्ध उभी राहिलीस याबद्दल तुझं कौतुक.. यु आर ब्रेव्ह गर्ल.. शांत हो..'- रागिणी मॅडमनी अनघाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं...

'मला.. मला तुमचं कौतुक करायची संधी मिळेल??'- अनघाने त्याही अवस्थेत रागिणी मॅडमना सवाल केला होता तसे उपस्थित सारेच अवाक झाले होते..

'म्हणजे मला कळलं नाही??'- रागिणी मॅडमच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटला होता..

'तुम्ही त्याला शिक्षा द्याल?? आज त्याने मला लुटलं.. आता मोकाट सुटला तर अजून कितीतरी अनघांची इज्जत पणाला लागेल.. कितीतरी रफिक असेच भररस्त्यात दम तोडतील.. तुम्हांला त्याच्या बाबांच्या आमदारकीचा दबाव झुगारता येईल?? तुम्ही त्याला शिक्षा मिळवून द्याल?? मी कोर्टात साक्ष द्यायला तयार आहे पण तुम्ही मला मदत कराल?'- अनघाने रागिणी मॅडमना स्पष्ट विचारलं..

'म्हणजे?? अनघा स्पष्ट बोल.. तुला मला घाबरण्याची अजिबात गरज नाही..'- रागिणी मॅडमनी तिला धीर दिला..

'म्हणजे तुम्ही पण आमदार तिवारीच्या दबावात येऊन माझा विश्वास घात करणार नाहीत ना?? मी.. मी तुमच्यावर खूप आशा लावून आहे मॅडम.. प्लीज मला धोका देऊ नका.. कोणताही बलात्कारी वेळीच ठेचला पाहिजे नाहीतर आज मी आहे; देव न करो उद्या तुमची मुलगी असली म्हणजे? माफ करा मला तुम्हांला दुखावण्याचा कोणताच हेतू नाहीये पण मी तुम्हांला केवळ वस्तुस्थिती सांगतेय..'- अनघाचा स्वर दाटून आला होता..

'मी तुझ्या भावनांना समजू शकते.. तु माझ्यावर भरोसा ठेवू शकतेस.. मी प्रदिप तिवारीला मोठ्यातली मोठी शिक्षा मिळवून देईन..'- मॅडमनी अनघाच्या हातावर हात थोपटत म्हटले..

अनघाच्या जबानीवरून प्रदिप तिवारीला अटक करण्यात आली होती.. सुरुवातीला सबळ पुराव्यांच्या अभावी आणि आमदार बापाच्या प्रभावामुळे प्रदिपला लागलीच जामिन मिळाली होती.. त्यामुळे डीचवल्या गेलेल्या  रागिणी मॅडमनी इन्स्पेक्टर सावंत अन हवालदार मानेंच्या मदतीने पुढचे काही दिवस-रात्र एक करत  प्रदिप तिवारीच्या विरोधात बक्कळ पुरावे जमा केले होते.. 

आता फक्त प्रदिप तिवारीला कोर्टात उभे करण्याची खोटी होती की त्याला किमान जन्मठेप मिळणारच या विचारानेच रागिणी मॅडम खुश झाल्या होत्या.. 

अनघाला डिस्चार्ज मिळून ती घरी पोहचली होती. रागिणी मॅडमनी तिची घरी भेट घेऊन तिला प्रदीपच्या शिक्षेबद्दल आश्वस्त केलं होतं.

सुनावणीची तारीख दोन दिवसांवर आली होती..

'मॉम, आज मी माझ्या फ्रेंड्स सोबत पबला जाणार आहे ग.. श्रुती इज गेटिंग मॅरीड. तिची बॅचलर पार्टी आहे.. थोडा लेट होईल बट आय विल मॅनेज..'- रागिणी मॅडमची मुलगी आस्था घरातून निघता निघता त्यांना बोलली..

'ठिक आहे बेटा.. काळजी घे आणि वेळेत घरी येण्याचा प्रयत्न कर.'- मॅडमनी लेकीला मिठी मारत निरोप दिला..

स्वतःच सारं आवरून रागिणी मॅडम आपल्या कामाला निघून गेल्या होत्या.. पोलिस स्टेशनमध्ये पोहचताच त्यांनी अनघा रेप केस मधल्या साऱ्या पुराव्यांचा पुन्हा एकदा आढावा घेतला होता.. 

'यावेळेस हा प्रदिप चांगलाच फसला आहे.. मी सांगतो ना मॅडम, याला अशी शिक्षा मिळायला हवी की पुन्हा कधीच कुठल्या व्यक्तीला कोणा मुलीवर बलात्कार करण्याची दुर्बुद्धी सुचली नाही पाहिजे..'- हवालदार माने तावाने बोलत होते..

'माने, एक सज्जन माणूस म्हणून तुमचा त्रागा मी समजू शकते.. पण हि विकृती सहजपणे संपणारी नाहीच.. प्रदिप तिवारीला कितीही मोठी शिक्षा झाली तरी समाजातले बलात्कारी कधी संपायचे नाहीच!'- रागिणी मॅडम निर्विकारपणे बोलल्या.

'मग यात आपण समाज म्हणून काहीच करू शकत नाही का??'- इन्स्पेक्टर सावंतांनी उत्सुकतेने विचारलं.

'खूप काही करू शकतो सावंत.. आपण समाज म्हणून खूप काही करू शकतो.. आपल्या घरात मुलगी जन्माला आल्यावर तिला लहानपणापासूनच चांगला स्पर्श अन वाईट स्पर्श यांतला फरक समजवून सांगितला पाहिजे.. माणसातली विकृती ओळखणं तिला शिकवायला हवं.. आणि सगळ्यांत महत्वाचे तिला आत्मसंरक्षणासाठी सुसज्ज करायला हवं..लढणं तिच्या रक्तात भिनवायला हवं.. केवळ स्रियाच त्यांच्यावरील बलात्कार थोपवू शकतात..'- रागिणी मॅडम शांतपणे बोलत होत्या..

'आणि मुलांबद्दल काय?? ते स्वतःवर नियंत्रण का ठेवू शकत नाही??'- बाजूलाच बसलेल्या कॉन्टेबल मेधा काहीश्या चिडून बोलल्या..

'स्वतःला नियंत्रित ठेवणं सगळ्यांनाच जमते असं नाही ना.. बरेच बलात्कारी हे निर्ढावलेले असतात.. आपल्या हातून घडलेल्या गुन्ह्याबद्दल त्यांना पश्चात्ताप नसतो.. आपण कोणाचं तरी आयुष्य उध्वस्त करतोय हि जाणीवच त्यांना नसते.. अशा वेळी आपण एक करू शकतो.. ज्या ज्या आरोपीची मुलींच्या छेडछाडीची हिस्ट्री असेल त्यांच्या पालकांना किमान सहा महिने तुरुंगात डांबायला हवं.. कारण पालकांनी आपल्या स्वतःच्या मुलांना वेळीच आवरण गरजेचे आहे..'- रागिणी मॅडम मेधाकडे पाहत बोलल्या.

'मॅडम, मला तर कधी कधी भारतीय कायद्यांची किव येते.. एखाद्याच्या मर्जीशिवाय त्या व्यक्तीशी जबरदस्तीने प्रस्थापित केलेले शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार; ही आपली बलात्काराची व्याख्या. अरे पण त्या एका क्षणामुळे आयुष्यातुन उठणारी स्त्री कोणी का नाही बघत? आरोपीला शिक्षा झाली तरी आयुष्यभर स्त्रीच्या वाटेला येणारा मनस्ताप कोणीच का नाही पाहत? त्या घटनेनंतर समाजाची तिच्याकडे पाहण्याची बदललेली दृष्टी का विचारत घेतली जात नाही?? या सगळ्या रेपिस्टनां भर चौकात दगडाने ठेचलं पाहिजे.. ते सौदीत करतात ना? अगदी तसंच.'- मेधा मॅडम आवेगाने बोलत होत्या. त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता. कपाळावरच्या शिरा फुगल्या होत्या..

'खरंय तुझं.. याबाबत आपण दुर्देवीच म्हणायचं.. '- रागिणी मॅडमनीं मान डोलवत मेधाच्या बोलण्याला होकार दिला होता..

पोलिस स्टेशनमधली काम आटपून रागिणी मॅडम बाहेर पडतच होत्या की त्यांना इन्स्पेक्टर सावंत काहीसे चिंतेत दिसले होते..

'सावंत?? काय झालं? असा चेहरा पाडून का बसला आहात? काही प्रॉब्लेम?'- रागिणी मॅडमनी चौकशी केली..

'माहीत नाही मॅडम.. पण ही तिवारी केस काहीशी विचित्र वाटतेय.. आपण प्रदिप तिवारीला अटक केली, तो जामिनावर सुटला, दोन दिवसांनी त्याच्या केसची सुनावणी आहे.. बट या सगळ्यांत आमदार तिवारी शांत आहे.. हे थोडं अवघड वाटतंय.. काही झालं तरी तो पूर्वश्रमीचा गुंड! त्याच गप्प बसणं म्हणजे तुम्हांला वादळापूर्वीची शांतता वाटत नाही का??'- सावंत एका दमात बोलून गेले..

'मी ही तेच विचार करतेय, सावंत.. कदाचित त्याला त्याच्या पैशावर जास्तच भरोसा असेल किंवा तो आपल्या नकळत काहीतरी खेळी करण्याच्या प्रयत्नात असेल.. बघू काय होतं ते पुढे..'- सावंतांना धीर देत मॅडम घरी निघाल्या होत्या.

                            --#--

रागिणी मॅडमनी आपलं जेवण आटपून घेतलं होतं.

'आस्था अजून आली नाही?रात्रीचे बारा वाजायला आले आहेत..'- रागिणी मॅडमच्या पतींनी त्यांना विचारलं..

'थांबा, फोन करते तिला..'- रागिणी मॅडम..

पुढचे काही मिनिटं मॅडम आस्थाचा नंबर डायल करतच होत्या परंतु समोरून फोन उचलला जात नव्हता.. पाच-सहा रिंग नंतर मॅडमच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसु लागला होता..

'अग, ती फोन उचलत नाहीये.. कुठे राहिली ही??'- राणे आता अस्वस्थ झाले होते..

पुढचे काही मिनिटे घरात एक अस्पष्ट भीती दाटून राहिली होती.. पुढच्याच मिनिटाला रागिणी मॅडमच्या फोनवर एक नोटिफिकेशन आलं होतं.. त्यांनी त्यावर क्लीक करताच त्यांना दरदरून घाम फुटला होता..

व्हिडीओमध्ये आस्था बेशुद्धावस्थेत एका बेडवर झोपलेली होती.. प्रदिप तिवारी हसत तिच्या बाजूला बसलेला होता.. एक एक करत तो आस्थाचे कपडे उतरवू लागला होता.. इकडे रागिणी मॅडम मधली आई त्यांच्यातल्या धैर्यशील पोलिस अधिकाऱ्यावर भारी पडली होती..

'ओ, हे बघा ना?? हा नालायक माणूस आपल्या मुलीबरोबर काय करतोय??'- रागिणी मॅडमच्या तोंडून हुंदका फुटला होता..

'रागिणी, आवर स्वतःला.. तु सापाच्या शेपटावर पाय ठेवला आहेस..त्यावर तो ढसणे  स्वाभाविक आहे.. आवर स्वतःला.. तु डिसीपी आहेस..'- राणे स्वतःच्या बायकोला धीर देण्याचा प्रयत्न करत होते..

'अहो, कसली डिसीपी?? आई आहे मी तिची.. तुम्हीं पण दाखवत नसला तरी आतून तुटला असाल ना?? आस्था; बेटा सॉरी ग!'- रागिणी मॅडम आता जोरात रडू लागल्या होत्या..

'अग पण आता आपल्या हातात तरी काय आहे.. माझी लेक..'- आता राणेंचाही धीर सुटला आणि तेही रडू लागले होते..

व्हिडीओमध्ये प्रदिप आता थांबला होता.. आस्थाच्या ओठांचे चुंबन घेत तो तिथून बाजूला झाला होता.. बाजूलाच उभा राहून तो हसत होता.. रागिणी मॅडमला जणू तो आपल्यावरच हसतोय असं वाटून त्या अधिकच तुटत चालल्या होत्या..

राणे उभयतांनी तात्पुरता निःश्वास सोडला होता.

पुढे मॅडमना अजून एक नोटिफिकेशन आलं होतं.. गडबडीने मॅडमनी ते उघडलं तर अजून एक व्हिडिओ होता की ज्यात आस्था शुद्धीवर येऊन बेडवर रडत बसलेली दिसत होती.. आपले पाय पोटाशी मुडपून ती अश्रू ढळत बसली होती.. तिच्या चेहऱ्यावर भय, हतबलता स्पष्ट दिसू लागली होतं.. तिची तशी अवस्था पाहून राणे दांपत्यही अक्रोशात डुबलं होतं..

अशीच काही मिनिटे गेली होती रागिणी मॅडमच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून फोन आला होता..

'हॅलो?'- रागिणी मॅडम आपलं रडणं कसंबसं आवरत बोलू लागल्या..

'डॅशिंग डिसीपी मॅडम?? रडताय?? कसे काय??'- पलिकडून कोणीतरी हसत बोलत होतं..

'कोण?'- मॅडम

'बच्चू तिवारी.. आमदार तिवारी बोलतोय..'- पलिकडून गंभीर आवाज आला..

'तिवारी माझ्या मुलीला सोड.. मी तुझ्या पाया पडते.. पण जशी असेल तशी मला ती परत कर..'- रागिणी मॅडम फोनवर गयावया करू लागल्या होत्या..

'चल एक डिल करू.. तुझ्या मुलीसोबत आतापर्यंत जे झालं ते फक्त तुला धमकवण्यासाठी होतं.. अजून तिची इज्जत शाबूत आहे.. आणि पुढेही राहील.. पण त्याबदल्यात तुला माझ्या पोराच्या विरोधातले सगळे पुरावे माझ्याकडे जमा करावे लागतील.. जोपर्यंत माझा मुलगा निर्दोष सुटणार नाही तोपर्यंत तुझी मुलगी माझ्याकडेच राहील.. जर काही चलाखी केलीस तर माझे सारे पंटर तिच्यावर तुटून पडतील.. आणि त्याचा व्हिडीओ बनवून आम्ही तो सगळीकडे व्हायरल करू..कळलं?? '- तिवारीने धमकी देत फोन बंद केला होता..

सकाळपर्यंत राणे पती-पत्नी एकमेकांना धीर देत होते..

सकाळ होताच रागिणी मॅडमनी पोलिस स्टेशन गाठत सारे पुरावे आपल्या ताब्यात घेतले होते.. ते पुरावे काढताना त्यांनी इन्स्पेक्टर सावंतांना सगळी परिस्थिती सांगितली होती.. मॅडमना तसं हतबल पाहून सावंत ही हादरले होते..

रागिणी मॅडमनी सारे पुरावे स्वतः तिवारी कडे सुपूर्द केले होते.. त्यांनी विनंती करूनही तिवारीने आस्थाला त्यांच्या हवाली केलं नव्हतं.. प्रदिप निर्दोष सुटल्यावरच आस्था घरी येणार होती..

                              --#--

दुसऱ्या दिवशी कोर्टात तिवारी केसची सुनावणी सुरू झाली होती.. 

खबरदारी म्हणून तिवारीने सरकारी वकीलापासून जजपर्यंत सारेच जण पैशांच्या जाळ्यात ओढून ठेवले होते..

सरकारी वकिलाने खाल्ल्या पैशाला जागत अगदीच मूळमुळीत केस प्रस्तुत केली होती. सारे पुरावे रागिणी मॅडमनी  आधीच तिवारीला दिल्यामुळे कोर्टात सादर करण्यासाठी काहीच नव्हतं.. अनघा दृष्टीहीन असल्याने तिची साक्ष ग्राह्य धरली गेली नव्हती. उलट विपक्ष वकिलाने भरकोर्टात अनघाच्या चारित्र्यावर शितोंडे उडवले होते..

केवळ एका सुनावणीमध्ये केस संपली होती. प्रदिप तिवारी कार्यकर्त्यांच्या जल्लोषात कोर्टाबाहेर पडला होता..

अनघा कोर्टातच कोसळली होती.. तिचे आई-वडील तिला सावरण्यासाठी धावले होते.. निशांत ही तिला धीर देत सावरण्याचा प्रयत्न करत होता..

'मला माफ कर अनघा.. मी तुझं रक्षण करू शकलो नाही..'- निशांत तिला आपल्या छातीशी कवटाळून बोलत होता..

'निशांत, सोड रे.. जाऊ दे.. तु तरी काय करणार होतास? तु नव्हतासच तिथे.. जा तु.. तुझं आयुष्य जग.. मी असंही तुला लायक नव्हतीच.. आता तर माझ्याच चारित्र्यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.. असं वाटतंय की सगळ्या बाजूने माझी अब्रू सांडत चालली आहे.. तु कुठे कुठे ठिगळ लावत बसशील?? जा.. किमान तु तरी सुखात रहा..'- अनघा रडत रडत म्हणाली..

'नाही अनघा.. मी तुला सोडून कुठंही जाणार नाहीये.. माझं प्रेम आहे तुझ्यावर.. आपण.. आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागू.. आपण लढू अनघा.. आपण लढू.. मी आहे तुझ्या सोबत..'- निशांतच्या डोळयातून पाणी येत होतं तरीही तो अनघाला धीर देतच होता..

'सर्वोच्च न्यायालय?? तुला अजून न्यायालयावर भरोसा आहे?? आत्ताच बघितलं नाहीस?? तो तिवारी ताठ मानेने बाहेर गेला अन मी?? मी उभ्या आयुष्यात कधीच मान वर करू शकणार नाही एवढं मला बदनाम केलं गेलंय.. सगळी व्यवस्था भ्रष्टाचारी निघाली रे.. त्या रागिणी मॅडम, स्वतः एक स्त्री असून माझ्या वेदना समजू शकल्या नाहीत.. किती विश्वास ठेवला होता मी त्यांच्यावर.. शेवटी पैसाच जिंकला रे.. नको निशु..नको, आता अजून बेइज्जती सहन नाही होणार मला..'- अनघा आपले अश्रू फुसत म्हणाली..

जाधव कुटुंब अनघाला घेऊन घरी निघाले होते की जाता जाता त्यांची गाठ रागिणी मॅडमशी पडली होती..

'तुम्हीं असं नाही करायला हवं होतं मॅडम.. खुप वाईट केलंत तुम्ही..'- निशांतने रागिणी मॅडमकडे पाहत म्हटलं..

'निशांत, जाऊ दे रे त्यांना.. आपलंच चुकलं.. मी उगाच आशा ठेवून बसली होती.. भारतीय न्यायव्यवस्थेला विसरली होती.. इकडे न्यायासाठी पैसा लागतो आणि आपल्याकडे ते नव्हतं रे.. जाऊ दे त्यांना.. मॅडम, माफ करा आम्हांला.. आम्ही उगाच त्रास दिला तुम्हांला..'- अनघा कोरडेपणे बोलत पुढे चालू लागली..

तिच बोलणं काळजाला टोचलं तस रागिणी मॅडम धावतच आपल्या व्हॅनमध्ये जाऊन ओक्सबोक्शी रडू लागल्या होत्या.. काही वेळातच राणे सरांनी आस्था घरी आल्याची त्यांना खबर दिली होती तशा त्या तडक घरी पोहचल्या होत्या..

आपल्यासोबत घडलेली घटना आठवूनच आस्थाला जबर मानसिक धक्का बसला होता.. पुढील काही दिवस ती घरात एखाद्या निर्जीव पुतळ्यासारखी बसून असे.. तिला तसं पाहून राणे उभयतांचे ह्रदय आतल्या आत पिळवटून निघाले होते..

                                 --#--

सारा भूतकाळ आठवून अनघाच्या डोळयातून भळाभळ पाणी वाहू लागलं होतं.. भूतकाळाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ती देवाचा धावा करतच होती..

आमदार तिवारीने जज जोशींना हसून नमस्कार केला होता तसं त्यानेही त्यांना हसून प्रतिसाद दिला होता.. दोघांचे इशारे पाहूनच लोकांना केसच्या निकालाचा अंदाज आला होता.. कोर्टात चुळबुळ सुरू झाली होती..

साऱ्या कोर्टात केवळ तीनच व्यक्ती शांत होत्या- आशिष, शरयू आणि संध्या..

पुन्हा एकदा फोनवर नोटिफिकेशन आलं होतं.. पण यावेळेस ते जज जोशींच्या फोनवर आलं होतं.. त्यातला व्हिडीओ पाहून त्याला दरदरून घाम सुटला होता.. 


क्रमशः


© मयुरेश तांबे

कथेचे सारे अधिकार लेखकाच्या अधीन असून; कथा नावासाहित प्रसिद्ध करण्यास काही हरकत नाही.. 

सादर कथा ही काल्पनिक असून;   एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती..

धन्यवाद..

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Mayuresh G. Tambe

Service

नमस्कार मंडळी.. इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि नोकरी.. त्यामुळे नट आणि बोल्ट भोवती फिरणाऱ्या आयुष्यात विरंगुळा म्हणून जस जमतं तसं लिहितो.. आवडलं तर दाद द्या आणि नाही आवडलं तर नक्कीच हटका..