Oct 18, 2021
कथामालिका

फक्त तुझ्यासाठी!!- भाग ८

Read Later
फक्त तुझ्यासाठी!!- भाग ८
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

आशिषने शरयुकडे पाहिलं तसं तिने डोळ्यांनीच त्याला आश्वस्त केलं होतं.

आधीच तिवारीच्या आमदारकीमुळे चर्चेत असलेली केस; आठ महिन्याची गर्भवती वकील म्हणून उभी राहिल्याने अधिकच चर्चेत आली होती.. हा हा म्हणता ही बातमी वाऱ्यासारखी बाहेर पसरली तशी कोर्टाच्या आवारात प्रसारमाध्यमांची गर्दी लोटली होती..

----------------

कोर्टात सुनावणी सुरू झाली होती.. जज म्हणून राम जोशी म्हणून असणार होते.. त्यांना पाहूनच संध्या आणि आशिषच्या कपाळावर आठयांचे जाळे पसरले होते.. 

कारण जजसाहेबांचे नाव जरी राम असले तरी तरी त्यांचे निवाडे हे कायम विवादित असतं. कोर्ट परिवारात सर्वाधिक भ्रष्टाचारी जज म्हणून ख्याती होती परंतु सगळ्या गुन्हेगारांच्या वरदहस्तामुळे अजूनपर्यंत ते कोणाच्या कचाट्यात सापडले नव्हते.. त्यांना पाहून आशिषने  शरयुला गुपचूप मेसेज केला होता   आणि तिने त्या अनुषंगाने अजून कोणाला तरी सूचना केल्या होत्या..

जाधव परिवारात सर्वांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता पसरली होती.. अनघावरचा बलात्कार हेच या केसच मुळ असल्याने प्रसारमाध्यमे नेहमीप्रमाणे सारं तारतम्य सोडून ब्रेकिंग न्युजमध्ये वारंवार अनघाच्या नावाचा उल्लेख करत होते.. त्यामुळे जाधवांच्या फोनवर त्यांच्या आप्तांचे मेसेज आणि फोन वाजतच होते.. या साऱ्या गोष्टींमुळे जाधव कुटुंबावर तणाव वाढला होता..

कोर्टात सूर्याला आणलं गेलं होतं.. त्याला तसं पाहताच जाधव  पती-पत्नीच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं होतं..त्यांनी अनघाला तसं सांगताच ती थेट उभी राहिली होती.. तिच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले होते.. तिला तसं पाहून सुर्याचेही डोळे पाणावले होते..

अनघा खाली बसली तसा सहा महिन्यापूर्वीचा भूतकाळ तिच्या नजरेसमोरून फिरू लागला होता..

रुचिराच्या वाढत्या मागण्या पुर्ण करण्यासाठी सूर्याने ड्रग्जची डिलिव्हरी करणं सुरूच केलं होतं.. त्यामुळे नकळतपणे तो वाईट संगतीत ओढला गेला होता.. त्याने स्वतःला ड्रग्जच्या व्यसनापासून मोठ्या प्रयासाने  रोखून धरलं असलं तरी नाक्यावर उभं राहून टवाळक्या करणाऱ्या मुलांमध्ये तो वारंवार राहू लागला होता.. नेमका त्याचा ग्रुप अनघाच्या येण्या जाण्याच्या वाटेवरच उभा राहून मवालीगीरी करत असायचा.. त्यांच्या व्रात्यपणाचा फटका अनघालाही बसलाच होता.. पुढे रुचिराचे खरे रूप समोर आल्यावर बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी सूर्याने स्वतःहून ड्रग्जचा सहारा घेतला होता.. हळूहळू व्यसनाने त्याच्या शरीराचा आणि मनाचा पूर्णपणे ताबा घेतलाच होता.. त्याच वर्तन दिवसेंदिवस बेतालपणाच्या साऱ्या हद्द पार करत चाललं होतं.. रुचिरावरचा राग आता परिसरातील मुलींवर निघत होता.. येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढणं, त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी करणं यांत त्याचा सहभाग वाढला होता.. 

आणि अशाच एका दिवशी त्याची गाठ अनघाशी पडली होती.. अनघा डोळ्यांनी अंध असली तरी तिची निरीक्षण बुद्धी आणि तिच्याकडे विशेष ठिकाण लक्षात ठेवण्याचं अनोखं कसब होतं.. त्यामुळे सुर्या आणि त्याच्या टवाळ ग्रुपचा अड्डा जवळ येताच अनघाच्या छातीत धडधड वाढू लागे.. त्या दिवशी ती भर दुपारी घरी परतत होती.. तिला दिसत नसलं तरी रस्त्यावरची शांतता तिला जाणवत होतीच.. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता पसरू लागली होतीच..

'हाय.. हाय.. क्या चीज हैं!! कुठे गेली होतीस ग इतक्या दुपारी?? आणि कोणाबरोबर?? तो तरी धडधाकट होता की असाच तुझ्यासारखा? डोळेफुटका?'- विवेक गमावलेल्या सूर्याने तिला छेडायला सुरू केलं होतं.. 

अनघाच्या घशाला कोरड पडली होती तशी ती जागीच थांबली होती.. इतक्यातच तिला कोणीतरी जिवाच्या आकांताने खोखत असल्याचा आवाज आला होता.. लागलीच तिने आपल्या बॅगेतली पाण्याची बॉटल काढून आवाजाच्या दिशेने पुढे केली होती..

'दादा.. दादा; हे.. हे पाणी देता का त्यांना?? कोणाला तरी ठसका लागलाय बघा ना. प्लिज त्यांना पाणी द्याल का?? प्लिज??'- अनघाने कळवळून विनंती केली होती..

समोर पाणी दिसताच सूर्याने; बॉटल जवळपास तिच्या हातून हिसकावून घेतली होती.. अधाश्यासारखं पाणी घटाघटा प्याल्यानंतर त्याला काहीसा दिलासा लाभला होता..

'घे तुझी बॉटल.. मलाच ठसका लागला होता..'- सुर्या अजूनही रुडली बोलत होता..

'तु जेवलास का दादा??'- अनघाने प्रश्न विचारताच सुर्याच्या विवेकबुद्धीला जोराचा झटका बसला होता..

'ना..नाही. तु... तुला काय करायचं आहे?? तु देणार आहेस मला जेवण??'- सूर्याने तिला चिडून प्रश्न केला.

'हो देईन ना; त्यात काय? पण त्यासाठी तुम्हांला माझ्यासोबत माझ्या घरी यावं लागेल.. आईने आज पुरण पोळी केली आहे.. आई खूप छान बनवते.. तुम्हांला नक्कीच आवडेल.. चला ना..'- अनघा त्याला आग्रह करत होती..

'तुला माझी भीती नाही वाटतं?? आत्ताच काही क्षणापूर्वी मी तुला छेडत होतो?'- सूर्याने चमकून विचारलं.

'आत्ताच दादा बोलली ना मी तुला?? मग बहिणीला कसली आलीये भावाची भीती??'- अनघा खेळकरपणे हसत म्हणाली..

तिच्या बोलण्याला नेमकं काय बोलावं हेच सूर्याला सुचत नव्हतं.. त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते..त्याच्या गंजलेल्या चांगुलपणाला अनघाने आपुलकीचे फडके फिरवत साफ  केले होते..

'नाही.. नको.. ज.. जा तु.. मला भूक नाही.. थँक्स..'- सुर्या खिन्नपणे मागे फिरला होता..

अनघा मात्र तशीच हसून पुढे निघाली होती.. तिने पुन्हा आग्रह न केल्याचा सूर्याला आश्चर्य वाटतं होतं. 

'नौटंकी साली.. मला घाबरून डाव खेळून गेली.. आंधळे; पुढच्या वेळी बघून घेईन तुला..'- सुर्याचा रुचिराबद्दलचा राग आता अनघावर निघत होता.

रुचिराच्या आठवणीने सूर्याचं शरीर थरथरू लागलं होतं.. तिच्यासोबतचे क्षण त्याच्या नजेरसमोर फिरू लागले तसे आपसूक त्याचे चक्षू पाझरू लागले होते.. 

'का?? का अशी वागलीस ?? माझ्या प्रेमाची एवढी मोठी शिक्षा का?? का??'- उद्विग्नपणे बोलत सूर्याने जवळच्याच एका डब्याला जोरात लाथ मारली तसा डब्बा हवेत उडाला..

'आई..ई.. '- एक अस्फुट किंकाळी सूर्याच्या कानात शिरली तसं त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि तो जागीच थबकला..

अनघा एका हातात डब्बा आणि काठी सांभाळत; दुसऱ्या हाताने आपलं कपाळ चोळत होती.. 

'तु?? परत आलीस??'- सुर्या झपाझप पावलं टाकत तिच्यासमोर जाऊन उभा राहिला..

'हो.. हे घे.. तुझ्यासाठी गरमागरम पुरणपोळ्या..'- अनघा आपलं कपाळ अजूनही चोळत होती..

'तु?? तु?? माझ्यासाठी??'- आता सूर्याच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते.. काही मिनिटांपूर्वीच्या आपल्या विचारांची त्याला लाज वाटत होती..

'अरे दादा, लवकर खाऊन घे. परत थंड झाल्यावर खाण्यात मज्जा येणार नाही.. सोबत एका छोट्या डब्यात तूपपण आणलं आहे..'- अनघाने आपल्या अंदाजाने डब्बा खोलत सुर्यासमोर धरला..

'क्या सुर्या भाई?  सेटिंग लग गया भिडू.. डायरेक्ट खाना?? और क्या क्या मिलेगा??'- सूर्याचे टवाळ मित्र अचानक तिकडे आली तशी अनघा बावरली आणि तिने आपले अंग चोरून घेतले..

'बहन हैं मेरी.. खाना लेकर आयी हैं.. तुम लोग खावोगे??'- सूर्याने भरल्या डोळ्यानेच मित्रांना विचारलं..

'हा.. घ्या ना.. तुम्हींपण घ्या.. मी वाटलं तर अजून आणेन.. घ्या.. घ्या..'- अनघाने आपल्या स्वभावाला जागत सूर्याच्या मित्रांना आर्जव केलं...

'सुर्या भाई?? क्या अकेले अकेले रिश्ता बनावोगे?? ये हमारीभी बहन हैं और उस हिसाब से इसपे हमाराभी हक हैं.. '- सारी मंडळी भर रस्त्यात बैठक मारून बसली होती..

'मी.. मी अजून आणू का?? एवढ्याने तुमचं पोट भरणार नाही..'- अनघा मागे फिरली होती..

'अरे बहन.. रुक.. अरे आजतक आम्हांला कोणी एवढं प्यार दिला नाही.. आमच्या माँ-बाप ने आम्हांला सोडून दिलं आणि पोटासाठी आम्ही काय बी केलं.. किती पाप केलं. मग आम्ही लोकांसाठी गुंडाच बनून राहीलो.. कोणी आपली अशी इन्कवायरी केलीच नाही.. आज तुच पहिली की जिने आपल्याला एवढं प्यारने विचारलं.. तुझ्या त्या प्यारनेच आमचं पोट भरलं.. भगवान तुला लंबी उमर दे.. '- त्यांचा म्होरक्या रफिक बोलत होता तसे बाकी सारे जण त्याला सहमती दर्शवत होते.. सूर्याला तर अगदीच भरून आलं होतं..

सारेजण आवडीने पुरण पोळ्या खात होते.. एक दोन जणांनी अनघालाही एक दोन घास आपल्या हाताने भरवले होते.. सगळेजण तिला बहन बहन म्हणून संबोधत होते..

 रस्त्यावरील रहदारीसाठी हा वेगळाच नजारा ठरला होता.. त्या मुलांना ओळखणारे सारे लोक चाट पडले होते.. नाना प्रकारचे लोक नाना प्रकारचे अर्थ काढत होते.. त्या लोकांनी डब्यातली पुरण पोळ्या फस्त करून ; बाजूच्याच हॉटेलमधून डब्बा धुवून आणून अनघाला दिला होता..

'दिल खुश केलंस बहन... खुश झालो आम्ही सगळे.. बोल काय हवं तुला??'- रफिकने अनघाला विचारलं.

'मी जे मागेल ते मिळेल??'- अनघाने मान खाली घालत विचारलं..

'अरे मागून तर बघ.. जान मागीतलीस तरी मिळेल..'- रफिक अश्वासकपणे बोलला..

'जान नको तुमची.. तुम्ही सगळे माझे भाऊ झालात. कोणती बहिण आपल्या भावाचा जीव मागेल?? मला काहीतरी खास हवंय..'- अनघा शांतपणे बोलत होती.

'अरे मांग के तो देख बहन'- आता सगळेच एकसुरात बोलले..

'तुम्हीं आता मुलींना छेडनं सोडून द्या..तुमच्या बहिणीला म्हणजे मला कोणी दुसऱ्याने छेडलं तर मला कसं वाटेल?? भाऊ म्हणून तुम्हांला कसं वाटेल?? मला तुमच्याकडून सगळ्या मुलींबद्दल सन्मान बघायचा आहे.. जमेल तुम्हांला?? द्याल मला वचन??'- अनघाने काहीसं बिचकत आपला हात पुढे केला..

'जबान हैं हमारा.. आज से किसी भी लडकी को छेडना बिल्कुल बंद.. '- रफिकने अनघाच्या हातावर हात ठेवत वचन दिलं तस बाकी सर्वांनी त्याच अनुकरण केलं..

सर्वांनी अनघाला वचन देताच; इतक्या वेळ बघ्याच्या भूमिकेत असलेल्या गर्दीने उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून अनघाला दाद दिली होती.. अचानकपणे इतक्या लोकांची जाणिव झाली तशी अनघा कावरी बावरी झाली होती.. तिच अवघडलेपण पाहून रफिक भाईने गर्दीला इशारा करताच; लोक तातडीने पांगली होती..

निघताना सूर्याने अनघाची सर्वांसोबत ओळख करून दिली होती.. अनघानेही सर्वांशी मनमोकळं बोलत त्यांना बोलकं केलं होतं.. आई-बाबा अन निशांत सोडला तर असंही अनघाच्या आयुष्यात दुसरं कोणीच नव्हतं.. अशातच तिला आज एवढा मोठा परिवार भेटला होता..

हळूहळू अनघाची त्या साऱ्यांशी चांगलीच गट्टी जमली होती.. स्वतःच्या वाईट प्रतिमेची सावली अनघाच्या चारित्र्यावर पडू नये म्हणून सारेजण विशेष काळजी घेत होते.. तिच्याशी भेटताना कोणीही कोणत्याही प्रकारची नशा करणं कटाक्षाने टाळत होते. अनघाच्या आपुलकीने त्यातली काहीजण चांगलीच सुधारली होती..तिच्याच सांगण्यावरून ज्यांचे परिवार होते त्यांना रफीकने स्वतःहून आपल्यापासून वेगळे करत , पुन्हा चांगल्या मार्गावर नेऊन सोडले होते.. जवळपास बऱ्याच जणांनी ड्रग्जचं व्यसन सोडण्यात यश मिळवलं होतं.

पण सुधारणेच्या या वाट्यावर आता काही खाच-खळगे तयार होऊ लागले होते.. शहरातला ड्रग्जचा व्यवसाय आमदार तिवारीच्या अनेक काळ्या धंद्यांपैकी एक होता. त्याचा एकुलता एक मुलगा प्रदिप तिवारी ड्रग्जचा धंदा सांभाळत होता.. 

प्रदीपकडे आजकल ड्रग्जच्या डिलिव्हरी बाबत रफिक गॅंग बद्दल बऱ्याच तक्रारी येऊ लागल्या होत्या..उशिराने मिळणाऱ्या डिलिव्हरीमुळे ग्राहकांची कुरकुर सुरू झाली होती.. शेवटी प्रदिपने आपल्या हस्तकांकरवी रफिक गँगची माहिती काढली तसा त्याला धक्का बसला होता.. 

'शिनू, अरे अशाने हा रफीक पोलिसांना आपली टीप द्यायलापण कमी करणार नाही.. याचा काहीतरी बंदोबस्त करायला हवाच..'- प्रदिपचे डोळे लाल झाले होते..

'काय करायचं मग त्याच? उचलून आणू का??'- शिनूने विचारलं..

'उचलून काय करायचं? त्याची जागा घेणारे खूप आहेत आपल्याकडे.. उद्या गाडी काढ.. माझ्या हाताने त्याला कापून काढतो.. तेही भर रस्त्यात.. मग परत कोणाच्या अंगात असा संत बनायचं शिरणार नाही..'- प्रदिप तिवारी हसत म्हणाला..

--#--

दुसऱ्या दिवशी सर्वजण अनघाला भेटून आपापल्या डिलिव्हरीला निघून गेले होते.. प्रदिपला रफिकची टिप पोहचली होती.. दुपारी रफिक अनघाला भेटायला नेहमीच्या जागी आला होता.. या वेळेस अनघा हातात डब्बा घेऊन त्याची वाट पाहतच होती..
तिला पाहून रफिकचा चेहरा खुलला होता.. तो तिच्या दिशेने चालू लागलाच होता की तिवारीच्या माणसाने त्याला घेरलं होतं.. आलेल्या संकटाची रफिकला लागलीच जाणीव झालीच होती तसा तो अनघाला जाण्यासाठी ओरडू लागला होता..

'भाग जा बहन... भाग जा.. तुझे मेरी कसम.. आ... या अल्ला..'- रफिक जिवाच्या आकांताने अनघाला ओरडून सावध करत होता.. तितक्यातच तिवारीच्या माणसांनी त्याच्यावर चहूबाजूने तलवारीने हल्ला केला होता.. तलवारीचे घाव पडूनसुद्धा केवळ अनघाच्या सुरक्षेसाठी रफिकने तोंडून साधा एक हुंकार बाहेर पडू दिला नव्हता.. रफिकवर झालेला जीवघेणा हल्ला पाहून रस्त्यावर एकच गोंधळ उडाला होता.. लोक घाबरून सैरावरा पळत होते.. अनघाला तर काहीच सुचत नव्हतं तशी ती एकाच जागी उभी राहिली होती..

रफिकने दम तोडताच प्रदिप तिवारी गाडीतून खाली उतरला होता..रफिकच्या रक्ताने भरलेल्या मृत शरीराला पाहून त्याने गडगडाटी हसू केलं होतं.. त्याने सभोवताली चौफेर नजर फिरवली तशी अनघा त्याच्या नजरेला पडली होती.. साऱ्या गर्दीने तिकडून पळ काढल्यानंतरही तिला तसंच उभं राहिलेलं पाहून तो काहीसा चकीत झाला होता..

'रफिक भाई?? रफिक भाई, कुठे आहात तुम्ही??'- अनघाच्या तोंडून शब्द बाहेर पडले तसा तिवारीला सारा प्रकार लक्षात आला..

'ये धरून आणा रे तिला.. हिच ना ती साली %@^@!?? , जिने आपल्या धंद्यांची वाट लावली.. आता हिची वाट लावायची वेळ आलीये.. जा आणा हिला..'- तिवारीने आपल्या माणसाला तिच्याकडे पिटाळले..

'को..कोण तुम्हीं दादा?? सोडा.. सोडा मला.. कुठे घेऊन जाताय मला??'- रफिकसाठी आणलेला डब्बा सावरत अनघाची त्या गुंडांसोबत झटपट सुरू झाली होती.. त्यांच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याच्या प्रयत्नात अनघाचा सलवार फाटला तसा तिच्या हातातला डब्बा खाली पडला होता.. अनघा आता चांगलीच घाबरली होती.. आपलं उघड अंग झाकण्याची तिची केविलवाणी धडपड चालू असतानाच तिवारीची नजर  तिच्या फाटलेल्या सलवारामुळे दिसत असलेल्या अंगावरून फिरली आणि त्याच्यातला सैतान जागा झाला होता.. त्याचे डोळे विकृतपणे चमकू लागले होते..

एखाद्या ससाण्याने बेसावध भक्ष्याला धरावे तसे प्रदिपने अनघाला मानेला पकडून; फरफटत आपल्या गाडीत नेलं होतं..

पुढे कितीतरी वेळ अनघाच्या किंकाळ्या चौकात ऐकू येत होत्या.

--#--

रफिकच्या हत्येची माहिती मिळताच सुर्या आणि त्याचे इतर मित्र तिकडे धावले होते..  रस्त्यावर बेवारसपणे पडलेल्या शवाला त्यांनी पोलिसांकडून रीतसर ताब्यात घेत; त्यावर अंतिम संस्कार केले होते.. रफिक सोबतच्या घटनेने सारेजण हादरले होतेच.. 

'सुर्या, अजून एक बुरी खबर आहे.. बहोत बुरी..'- समोरच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या पोऱ्याने सूर्याला म्हटलं..

'अजून काय??'- हताश सूर्याने विचारलं..

'त्या हरामखोर तिवारीने तुमच्या बहिणीची खुलेआम इज्जत लुटली.. इकडेच चौकात; त्याच्या गाडीत लुटली तिला..'- त्याने घाबरत खबर दिली तसे सगळेचजण हादरले..

'काय??'- सर्वजण एकाचवेळी दचकून ओरडले.. साऱ्यांच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या.. डोळे तप्त निखाऱ्यासारखे लाल झाले होते..

'सुर्या, कसम हैं हम सबको. जिसने हमारे बडे भाई को इतना बेरहमीसे मारा, हमारी बहन का रेप किया; त्याला आपण जिंदा नाही सोडायचं..'- जॉन रागाने थरथरत बोलला..

सुर्या अजूनही शॉकमध्येच होता. रुचिराने दिलेल्या दग्यानंतर जीव द्यायला निघालेल्या सूर्याला रफीकनेच रोखलं होतं.. कित्येक वेळी त्याने सूर्याला हा वाममार्ग सोडण्यासाठी सांगितलं होतं. त्यात आता अनघाची बातमी कळताच तो अंतर्बाह्य हलला होता.. तिचा निरागस चेहरा; तिची आपुलकी त्याच्या नजरेसमोरून हटत नव्हतं.. 

'सुर्या?? सुर्या?? किधर खोया तु?'- हरविंदर त्याला हाताला हलवून विचारत होता..

'काही नाही.. त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळेलच पण ती सजा असली पाहिजे की सारी दुनिया हलली पाहिजे.. त्याची हालत बघूनच किंवा ऐकूनच  कोणाची कुठल्या मुलीवर रेप करण्याची हिंमत झाली नाही पाहिजे..'- सुर्या त्वेषाने बोलत होता..

'अरे पर वो रहती किधर हैं?? उसे हमे संभालना पडेगा यार.. '- जॉन काळजीने बोलला तसे सगळेच चिंतेत पडले कारण तिच घर कोणालाच माहित नव्हतं.. तिने कित्येकदा विनंती करूनही या लोकांनी तिच्या घरी जाण्याचं टाळलं होतं..

'शोधून काढू आपण.. तो काय मोठा मॅटर नाही..'- हरविंदर बोलला तशी सर्वांनीच मान डोलावली..

--#--
पुढचे दोन दिवस सारेजण अनघाच्या घराचा शोध घेत होते. सुडाचा अग्नी सगळ्यांमध्येच धगधगत होता पण आता काही वेळ विचाराने राहणे गरजेचे असल्याने त्यांनी आपआपली डिलिव्हरीची काम कायम ठेवली होती.. रफीकच्या हत्येची भीती मनात भरल्यामुळेच सर्वजण वठणीवर आल्याचे त्यांना तिवारीला भासवायचे होते..

तिसऱ्या दिवशी त्यांना अनघाच्या घराचा पत्ता भेटला होता.. त्यांनी चौकशी केली तसं त्यांना अनघाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं कळलं होतं.. तसंच जाधव कुटुंबाने प्रदिप तिवारीची पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्याचेही त्यांना कळले होते..

'सुर्या अब?? तुझे लगता हैं कानून उस बडे बाप के बेटे को सजा देगा??'- त्याच्या मित्राने विचारलं..

'अगर कानून सजा नही देगा तो हम देंगे.. वैसे मुझे भी कानून पे ज्यादा भरोसा नही हैं.. बट ये केस डीसीपी रागिणी राणे के पास गया हैं तो कुछ आशा कर सकते हैं..'- हरविंदरने मागून येत माहिती दिली होती..

 

क्रमशः


© मयुरेश तांबे

कथेचे सारे अधिकार लेखकाच्या अधीन असून; कथा नावासाहित प्रसिद्ध करण्यास काही हरकत नाही.. 

सादर कथा ही काल्पनिक असून;   एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती..

धन्यवाद..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Mayuresh G. Tambe

Service

नमस्कार मंडळी.. इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि नोकरी.. त्यामुळे नट आणि बोल्ट भोवती फिरणाऱ्या आयुष्यात विरंगुळा म्हणून जस जमतं तसं लिहितो.. आवडलं तर दाद द्या आणि नाही आवडलं तर नक्कीच हटका..