Oct 24, 2021
कथामालिका

फक्त तुझ्यासाठी!!- भाग ७

Read Later
फक्त तुझ्यासाठी!!- भाग ७

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

'शरयू?? हे सगळं तु करवून आणलंस ना??'- वॉर्डच्या बाहेर उभ्या असलेल्या रागिणी मॅडमनी शरयुला फोन करत विचारलं होतं..

'ते कसं आहे ना; शांत समुद्रच जास्त धोकादायक असतो! सिंहाच्या कळपाला छेडण्याची कोणी हिम्मत करु नये ते यासाठीच..'- शरयू पलीकडे जोरजोरात हसत होती..

                          ------------------
'मिस्टर शर्मा, कसं वाटतंय आता??'- रागिणी मॅडमनी डिसीपी शर्माकडे पाहत विचारलं..

'मज्जा बघायला आलात ना?? '- शर्माने खिन्न हसत उत्तर दिले..

'नाही.. तो माझा स्वभाव नाही.. आणि मुळात पैशासाठी स्वतःच इमान विकलेल्या माणसावर काय हसावं?? ज्यांच्यासाठी ही पापाची कमाई जमा करत होतात; तेही तुम्हाला लाथाडून गेलेच की..'- रागिणी मॅडम ठसक्यात बोलून गेल्या..

'किसीने सच कहा हैं, इस जन्मके सारे पापोंका हिसाब इसी जन्म मै होता हैं.. शायद उपरवाला अभी मेरी कुंडली निकालके बैठा हुवा हैं..'- शर्मा हताशपणे बोलत होता..

'हो सकता हैं शर्माजी.. कदाचित म्हणूनच तुम्हाला सस्पेंड केलं गेलं आहे.. मला तुम्हांला अटक करण्याचे आदेश दिले गेले आहेत.. तुम्हीं व्यवस्थित झालात की तुमची रवानगी कोठडीत होणं पक्का आहे...'- रागिणी मॅडमनी नजर रोखत म्हटलं..

'ओह.. अच्छा हुवा..'- शर्मा हसला..

                                      --#--

इकडे आमदार तिवारीच्या घरी तांडव सुरू झालं होतं.. तिवारी घरातल्या वस्तू रागाने इकडेतिकडे फेकत होता.. त्याचा लालबुंद चेहरा पाहूनच कोणीही त्याच्या जवळ जाण्याची हिंमत करत नव्हतं.. 

'अरे कोण आहे मी?? विसरले का ही लोक?? मी आमदार आहे पण त्याच्याआधी मी एक जाहील जानवर आहे..डॉन आहे आपण.. सोडणार नाही मी कोणाला...'- तिवारीने दात-ओठ खात आपल्या अंगावरचा सदरा दोन्ही हातांनी जोर लावत फाडून टाकला..

'एवढं वाटतं तर पोराला स्वतः सारखं बनू द्यायचं नव्हतं ना??'- कोणी एक स्त्री दबक्या आवाजात बोलली..

'कौन बोला?? ये म्हातारे, तु बोललीस?? तुझी एवढी हिंमत?? मुकाट्याने आपल्या खोलीत चालती हो.. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल..'- तिवारी त्या स्त्रीच्या अंगावर जवळपास धावून गेलाच होता पण ती स्त्री मात्र आपल्या जागी स्थिर होती..

'शर्म महसुस कर रही हुं मै..आधी माहिती असतं तर जन्माला येण्याआधीच मारलं असतं तुला.'- त्या स्त्रीच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या..

'तोंड आवर थेरडे!! माझी मां नसतीस तर तुझी जबान काटून टाकली असती मी.. ये; हिला आत घेऊन जा रे कोणीतरी.. '- तिवारीच्या रागाने आता परिसीमा  गाठली होती..

शेवटी त्याच्या संतापाला घाबरून त्याची बायको पुढे सरसावली होती अन तिने तिच्या सासूला जबरदस्ती घरात नेले होते..

'पाटिल, आपले सारे पंटर जागे कर.. आता हा मॅटर आपण आपल्या स्टाईलने निपटवूया..'- तिवारी खुनशीपणे बोलला..

तिवारी संतापाने घराबाहेर पडलाच होताच की त्याचा फोन वाजला होता...

'क्या???? पा..पागल हैं क्या तु?? क्या..क्या अनाप-शनाप बोल रहा हैं?? तु.. तुझे पता हैं, तु मुझे क्या खबर दे रहा हैं??'- तिवारी धक्क्याने मटकन खाली जमिनीवर बसला होता..

'साब?? क्या हुवा?'- तिवारीच्या पी.ए. ने त्याच्याकडे धाव घेतली होती..

'मुन्ना गया मेरा... जंग हार गया.. मर गया बच्चा मेरा!'- तिवारीचे डोळे भरून आले होते...

तिवारीचे शब्द घरात पसरले तसे आतल्या खोलीतून कोण्या स्त्रीच्या आर्त टाहोने खुद्द तिवारीही अंतर्बाह्य हलला होता.. पण तो आक्रोश जितक्या तीव्रतेने सुरू झाला होता तितक्याच लवकर शांतही झाला होता..

चकीत तिवारी आपल्या बायकोकडे जाणार तोच डिसीपी रागिणीला दारात पाहून जागीच थबकला होता..

'एम सॉरी सर.. आत्ताच तुमच्या मुलाच्या निधनाची बातमी कळली. देव त्याच्या आत्म्यास शांती देवो.. बट सर..'- इन्स्पेक्टर सावंत बोलता बोलता थांबले..

'बट काय?? आणि तुम लोगोंकी इतनी हिंमत की एक मंत्री के घर बिना पूछे आ गये?? '- तिवारीच्या दुःखाची जागा पुन्हा एकदा रागाने घेतली होती..

'जबान संभालके तिवारीजी!'- रागिणी मॅडम कडाडल्या..

'क्या?? माझ्यावर आवाज चढवलास तु??'- तिवारीच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या..

'येस.. सध्यातरी आमच्यासाठी तुम्हीं केवळ एक आरोपी आहात.. आणि आमच्याकडे तुमच्या अटकेचे वॉरन्ट आहे.. तुम्हांला आमच्यासोबत पोलिस स्टेशनला यावं लागेल.. स्वतःहून आलात तर सन्मानाने नेऊ नाहीतर..'- रागिणी मॅडमचा चेहरा करारी झाला होता..

'नही तो??'- तिवारी इरेला पेटला होता..

'तो मुझे मजबूर होके आपको घसीटके ले जाना पडेगा..'- रागिणी मॅडमनी आवाज चढवला होता..

'तेरी इतनी जुररत???' साली ^*&&#&.. जा निकल यहासे.. दिमाग खराब मत कर..'- तिवारीने आक्षेपार्ह हावभाव करत शिवीगाळ सुरू केली होती..

आता रागिणी मॅडमच्या संतापाचा कडेलोट झाला होता.. त्याच तिरमिरीत त्या तिवारीच्या दिशेने चालत गेल्या होत्या.. 

'चल कसा येत नाहीस तेच बघते..'- रागिणी मॅडमनी थेट तिवारीच्या कॉलरला धरत त्याला ओढले होते..

प्रतिकार म्हणून तिवारीचे साथीदार मॅडमवर धावून येताच इन्स्पेक्टर सावंतांनी बाहेर उभ्या हवालदार मानेनां इशारा केला होताच.. इशाऱ्याचीं देवाणघेवाण होताच पत्रकारांची फौज तिवारीच्या घरात घुसली होती.. पत्रकारांचे कॅमेरे पाहताच पोलिस कर्मचाऱ्यांवर धावून गेलेली तिवारीची माणसं लगोलग मागे फिरली होती..

तिवारी शेपटावर पाय पडलेल्या नागासारखा फुत्कारत होता परंतु रागिणी मॅडम जाणूनबुजून त्याच्याकडे लक्ष देत नव्हत्या.. एवढया पत्रकारांसमोरही त्यांनी तिवारीची कॉलर सोडली नव्हती..   तिवारीची धिंड सगळीकडे ब्रेकिंग   न्युज म्हणून झळकली होती.. रागिणी मॅडम तिवारीला घेऊन गाडीजवळ पोहचल्याच होत्या की त्यांचा फोन वाजला होता..

'बोला कमिशनर साहेब'- रागिणी मॅडमनी फोन कानाला लावताच तिवारी जोरजोरात हसू लागला होता..

'हाऊ डेअर यु रागिणी?? तुम्हीं कोणाच्या सांगण्यावरून एवढी मोठी स्टेप घेतलीत?? तुम्हीं तुमच्या अधिकाराचा गैरफायदा घेताय आणि तुम्हाला ते भारी पडू शकेल..'- पलिकडून कमिशनर तावातावाने बोलत होते..

'यु आर राईट सर! आज मी माझ्या पॉवरचा मिस-युज करतेय.. या अख्या मिडियासमोर  सांगते की तिवारीवरची आजची कार्यवाही ही निव्वळ माझ्या वैयक्तीक सुडापोटी आहे.. आज डिसीपी रागिणी नाही तर आस्थाची आई रागिणी राणे आहे.. आणि ती आज त्या तमाम स्रियांच प्रतिनिधित्व करतेय की ज्यांच्या मुलींची अब्रु त्या नराधम प्रदिप तिवारीने लुटली आहे आणि या आमदाराने आपल्या सत्तेचा गैरवापर करत त्याच्या प्रत्येक गुन्ह्याला पाठीशी घातलं आहे.. आज मला कोणीच अडवू शकत नाही.. तुम्हींही नाही मिस्टर कमिशनर..'- रागिणी मॅडमनी रागात फोन बंद केला तसा तिवारी चारचौघांत तोंडात मारल्यासारखा शांत झाला होता..

'आमदार तिवारीच्या मुलावर एकूण सहा मुलींवर बलात्कार करण्याचे आरोप आहेत.. आणि त्या प्रत्येक गुन्ह्यांचा आमच्याकडे पुरावा आहे आणि वेळ येताच आम्ही तो कोर्टात सादर करुच.. आमदार तिवारींनी आपल्या आमदारकीचा गैरवापर करत आपल्या मुलाचे सारे अपराध पाठीशी घालत त्याला शिक्षा होण्यापासून वाचवलं आहे आणि त्याचमुळे त्याची मजल इतकी वाढली होती.. तसेच आताही त्यांच्यावर ख्यातनाम वकील आशिष साटम यांच्या परिवाराला  डिसीपी शर्माकरवी धमकी दिल्याचाही आरोप आहे.. आणि याच सर्व गोष्टींसाठी यांना आम्हीं अटक केली आहे..'- रागिणी मॅडमनीं प्रसारमाध्यमांना माहिती देत तिवारीला गाडीत जवळपास ढकललं होत..

                                  --#--

'बाबा, तु किती दिवस इकडे राहणार आहेस रे??'- संध्याने आपल्या गर्भार पोटाला सावरत आशिषला विचारलं..

'कदाचित जास्त वेळ.. काही काम आहेत.. ती पुर्ण केल्याशिवाय जाणं नाहीच!'- आशिष कसल्याशा निश्चयाने बोलला..

'आशु?? कोणतं काम अरे?? '- शरयूने मागून येत त्याच्या खांद्यावर हात ठेवला..

'आहे एक काम बाकी.. मला ते कधी कळले नाही.. किंबहुना मी त्याबाबत जाणून घेण्याचे प्रयत्न केले नाहीत.. बट यावेळेस पुन्हा चूक नाही.. अरे पण ते माझं पर्सनल काम आहे; तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही..'- आशिष खांदे उडवत म्हणाला..

'बरं.. झोपा आता सर्वांनी.. उद्या किंवा परवा तिवारीच्या केसची सुनावणी असू शकते.. '- शरयूने सर्वांना आराम करण्यासाठी पाठवलं..

अश्विनी आणि छोटी मीरा झोपली होती.. त्या दोघींच्या चेहऱ्यावरून   हात फिरवून शरयू आपल्या खोलीत आली तर आशिष खोलीत अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता..

'काय रे झोपला नाहीस??'- शरयूने आशिषसमोर उभं राहत विचारलं..

'अंम नाही.. विचार करतोय..'- आशिष..

'तिवारी केसचा??'- शरयू..

'नाही..'- आशिष.

'मी काही मदत करू शकते का??'- शरयुला आता काळजी वाटू लागली होती..

'हो तशी तूच मला मदत करू शकतेस.. '- आशिषने शरयूकडे पाहत म्हटलं तशी ती त्याच्याकडे सरसावली..

शरयूने अधिक जवळ जात त्याच्या खांद्यावर आपले हात गुंफले आणि ती त्याला पुढे काही विचारणार तोच आशिषने तिच्या कमरेला पकडत तिला आपल्याकडे ओढून घेतले होते..

चकीत शरयू काही बोलणार तोच तिच्या ओठांवर आशिषचे ओठ स्थिरावले होते.. कितीतरी वेळ दोघेजण एकमेकांमध्ये गुंतले होते... काहीवेळानंतर शरयूने आशिषच्या मिठीतुन आपली सुटका करून घेतली होती..

'आशु?? माझ्याकडून काय हवंय तुला??'- शरयूने आशिषला विचारलं..

'तु माझ्यासाठी एका स्पर्धेत भाग घेशील??'- आशिषने तिला पुन्हा एकदा आपल्याजवळ ओढत विचारलं..

'तुझ्या मनात नेमकं काय चालू आहे आशु??'- शरयुला खरंतर त्याच्या मनातलं कळलं होतं पण तरीही तिने प्रश्न केला होता..

'पुढच्या महिन्यात 'मम्माज किचन' म्हणून फूड शो येतोय.. यांत चाळिशीपार केलेल्या स्रियांनीच भाग घ्यायचा आहे.. वेगवेगळ्या डिशेस बनवत; जी स्त्री सर्वाधिक गुण मिळवेल ती स्त्री त्या स्पर्धेची विजेती असेल.. आणि मला तुला त्या स्पर्धेची विनर म्हणून पाहायचं आहे.. तु.. तु भाग घ्यायचा आहेस... माझ्यासाठी..'- आशिषच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते..

'आशु?? का रे असं अचानक?'- त्याला रडवलेला पाहून तिचेही डोळे भरून आले होते..

'तुला उडताना पाहायचं आहे.. अजून किती दिवस तु आशिष साटमची बायको म्हणून जगशील?? खूप दिवस माझं नाव वापरलंस.. आता मला तुझ्या नावाची ओळख मिळू दे.. लोकांनी म्हणावं, मला विचारावं- तुम्ही शरयू साटमचे मिस्टर ना?? मला.. मला तुला तुझं स्वप्न जगताना पाहायचं आहे.. शरू एवढी भीक माझ्या झोळीत घालशील का ग??'- आशिष तिच्यासमोर गुढघ्यावर बसला होता..

'आशु... आशु मी जिंकेन की नाही ते माहीत नाही.. बट तुझ्यासाठी अन फक्त तुझ्यासाठीच मी त्या स्पर्धेत भाग घेईन.. मी नाही जिंकली ना तरी आपण आपलं एक हॉटेल नक्कीच काढू.. मी शेफ असेन तिथे आणि तु काऊंटर सांभाळ..'- शरयुने आशिषला खांद्याला धरून वर उठवलं होतं..

'थँक्स सोना.. थँक्स.. खूप मोठी हो शरू.. खूप मोठी.. इतकी वर्षे स्वतःच मन मारत जगलीस.. तुझं स्वप्न मला कळूनही दिलं नाहीस..  माझ्यासाठी अजून कुर्बान्या नको आता.. आता मला तुझं जीवन जगू दे..'- आशिषने पुनः तिला मिठी मारली होती..

कितीतरी वेळ एकमेकांच्या मिठीत थांबून दोघे एकदूसऱ्याला दिलासा देत होते..

                                 --#--

साऱ्या व्यूहरचनेनुसार आमदार तिवारीला कोर्टाने जामीन सपशेल नाकारला होता.. त्याच्या अटकेनंतर शहरात दंगे करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिवारीच्या साथीदारांना पोलिसांनी थेट पोलिस कोठडीत डांबले होते.. 

उर्वरित कुटुंबियांनीं प्रदिप तिवारीचा मृतदेह स्वीकारण्यासाठी नकार दिला होता.. अखेरीस पोलिसांनी समजवल्यानंतर तिवारीच्या भावाने मृतदेह स्वीकारत अंतिम क्रिया पार पाडल्या होत्या..

                                     --#--

आमदार तिवारीच्या अटकेमुळे विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवली होती.. त्यामुळे नाईलाजाने का होईना; त्यांना तिवारीला पक्षातून बडतर्फ केल्याचे आदेश द्यावे लागले होते.. तसेच या केसचा निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी फास्ट-ट्रॅक कोर्ट चालवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता..

                                    --#--

डिसीपी शर्माच्या तावडीतून सुटलेल्या अनघाला तिच्या अटकेनंतर; सुर्वे कुटुंबियांकडून आई-वडिलांची झालेली अवहेलना कळली होती.. त्यात निशांतच्या बदललेल्या वर्तनाने तिला अतोनात दुःख झालं होतं.. सारी रात्र तिने रडून काढली होती.. 

दुसऱ्या दिवशी अनघा उठली होती तिच वेगळ्या निश्चयाने! रडून रडून सुजलेला तिचा चेहरा तिचं कोसळलेलेपण स्पष्ट करत होतं पण त्याचवेळी मुखचर्येवर दाटून आलेला निर्विकारपणा तिच्या घरच्यांना चिंतेत टाकणारा होता..

'अनु?? अग स्वतःची काय अवस्था करून घेतली आहेस पोरी??'- तिच्या वडिलांनी तिच्या हाताला धरत विचारले..

'बाबा, उध्वस्त घराने आपलं अस्तित्व हरवल्याचं दुःख करावं की आपल्या पडीक भिंतीवरच्या घाणीची काळजी करावी??'- तिने खिन्न हसत प्रश्न केला..

'बेटा, असं निराश नको होऊस.. किमान आमच्यासाठी तरी स्वतःला सावर.. काहीही झालं तरी आमच्या पोटाचा गोळा आहेस आणि आम्ही तुला असं खचलेलं पाहू शकत नाही..'- तिच्या आईने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तिची समजूत काढली..

'आई-बाबा, किती दुर्देवी आहात ना तुम्हीं?? एकतर मुलगी अन तीही आंधळी.. ते कमी होतं तर आता तिच्यावर बलात्कार झाला.. म्हणजे समाजच्या दृष्टीने मी अस्पृश्यच.. माझ्यामुळे तुम्हालाही अपमान सहन करावे लागत आहेत.. मी का जन्माला आली?? का??'- अनघाच्या डोळयातून पुन्हा अश्रुधारा सुरू झाला तस तिच्या आईलाही रडू कोसळलं.. दोघी मायलेकी एकमेकांना मिठी मारत रडू लागल्या होत्या..

'अनघा..'- दरवाज्यातून एक सौम्य आवाज आला तसे तिच्या आई-वडिलांनी त्या दिशेला पाहिलं.. अनघाही स्वतःला सावरून उभी राहिली..

'तुम्हीं?? काही बोलायचं राहिलं होतं का??'- अनघाची आई बोलली...

'हो.. माफी मागायची राहिली होती.. तुमच्या सर्वांची.. त्या दिवशी आम्ही जे काही अविचारी बोललो त्याने तुमच्या मनाला झालेल्या खोलवर जखमा तर मी भरून काढू शकत नाही.. पण.. पण तुमच्या पायाशी लोळण घेत; क्षमायाचना तर नक्कीच करू शकते.. माफ करा मला..'- एवढं बोलून सुर्वेबाईनी अक्षरशः समस्त जाधव कुटुंबासमोर लोटांगण घातले होते..

'अहो, काय करताय तुम्ही?? उठा उठा..'- जाधव काकींनी त्यांना वर उठवलं..

'काकी, माझी तुमच्याकडे काहीच तक्रार नाही.. तुम्हीचं काय सारा समाज आज मलाच दोषी मानतोय.. आजही बलात्कार झाला की सगळ्यांत आधी मुलीची पार्श्वभूमी तपासली जाते, तिच्या चारित्र्यावर प्रश्नःचिन्ह उपस्थित केलं जातं.. तिच्या आई-वडिलांना दोष दिला जातो.. बलात्कार करणारा विकृत मात्र उजळ माथ्याने फिरतो.. कोणी दोन वर्षांच्या बालिकेला कुस्करावे किंवा कोणी साठ-सत्तर वर्षीय वृद्धेला आपल्या वासनेची शिकार बनवावं.. समाजाला त्याचा काहीच फरक पडत नाहीच.. आमचं आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या नराधमानां मिळून मिळून शिक्षा मिळावी तीही दहा-बारा वर्षांची.. शिक्षा भोगून आल्यावर लोक एकवेळ त्याला मान देतील पण आमच्याबद्दल कायम मनात अढीच ठेवतील.. त्यांच्या नजरेत आमच्याबद्दल कधीच सन्मान नसेल... जाऊ दे काकू.. तुम्हीं जा.. आमची कोणाबद्दलही काहीही तक्रार नाही... मी ठरवलं आहे.. हि केस संपली की मी आई-बाबांना घेऊन इथून दूर जाईन.. साऱ्या काळ्या सावल्यांपासून खूप दूर!!'- अनघाचा चेहरा पुनः एकदा निर्विकार झाला..

'जशी तुझी इच्छा बेटा.. त्या दिवशी तुझ्यासाठी धावलेली ती स्त्री.. तिने वेळीच माझे डोळे उघडले.. तिने विचारलेला प्रश्न रात्रभर माझ्या डोक्यात घोळत राहिला.. सकाळी उठल्या उठल्या मी निशांतच्या वडिलांना तोच प्रश्न माझ्या तोंडून विचारला-  कधी माझ्यावर बलात्कार झाला तर तुम्ही मलाही असंच बोलाल का?? काय कराल तुम्हीं??.. त्यांची नजर फिरवण मला माझ्या   प्रश्नाचं उत्तर देऊन गेलं आणि मला तुझ्या वेदना कळल्या.. मला खरंच माफ करा..'- सुर्वेबाईनी परत एकदा हात जोडले होते..

'तुम्हांला तुमच्या वागण्याचा पश्चाताप झाला हिच मोठी गोष्ट आहे वहिनी.. सावरा स्वतःला.. मी  निशांतला बोलवू का तुम्हाला घरी नेण्यासाठी??'- जाधवकाकी काळजीने बोलल्या..

'तुम्हीं बोलावलं तरी तो येणार नाही.. वेळ लागेल त्याला..'- सुर्वे काकी अचानक हसत बोलल्या पण त्यांच्या डोळ्यातले अश्रू अधिक जोमात आले होते..

'म्हणजे?? कुठे आहे तो??'- अनघाने अस्वस्थ होत विचारलं..

'तुझ्याबद्दल आमच्या तोंडून वाईट ऐकल्यापासूनच अस्वस्थ होता तो.. त्यात त्याला स्वतःला तुझा सन्मान जपता आला नसल्याची सल त्याला सतावत होती.. त्यात मला माझी चूक कळल्यावर मीही त्याला झापलं होतं.. पण मला वाटलं नव्हतं की तो असं काही करेल म्हणून...'- बोलता बोलता सुर्वे मॅडमना हुंदका आवरला नाही तशा त्या आवेगाने रडू लागल्या..

'काकू?? असं कोड्यात ठेवू नका.. कुठे आहे निशांत?? काय केलं त्याने??- अनघा धडपडत सुर्वे काकूंच्या आवाजाच्या दिशेने धावली होती..

'स्वतःला माफ करु शकला नाही तो.. त्याच तिरमिरीत घरातलं फिनाइल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याने.. आम्ही वेळीच दवाखान्यात दाखल केले म्हणून वाचला तो.. आता त्याची तब्येत स्थिर आहे..'- सुर्वेबाईनी अनघाच्या जवळ जात तिला आश्वस्त केलं..

'पण असं का केलं त्याने?? मी अशीही दूर जाणारच होती त्याच्यापासून..'- अनघा मुसमुसत म्हणाली..

'जर तुला त्याची काळजी वाटत असेल तर अजिबातच असं करू नकोस अनघा..'- सुर्वेबाई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या..

'पण आम्ही इथे राहिलो तर लोकांचे टक्केटोणपे खात बसावं लागेल त्याच काय??'- अनघाच्या आईने मनातली खदखद बोलून दाखवली..

'ते तस होणार नाही.. आम्ही अनघाला आमची सून करून घेण्याचं ठरवलं आहे.. आमच्या तोंडून घडलेल्या पातकांचे हेच प्रायश्चित असेल...'- सुर्वेबाई असं बोलताच जाधव कुटुंब चकीत झाले..

'नाही काकू.. मी नको निशांतच्या आयुष्यात.. त्याच्यासाठी दुसरी कोणीतरी पहा तुम्ही..'- अनघा  तोंड दुसरीकडे फिरवत बोलली..

'अनघा, तुझ्यावर आघात झाला ठीक आहे.. ते तुझ्या हातात नव्हतं. पण उठून उभं राहणं तर तुझ्याच हातात आहेच ना?? अग तुझ्या भरारी घेण्याने; तुझ्यासारख्या कित्येक दुर्देवी मुलींना आत्मविश्वास मिळू शकतो माहीत आहे तुला?? स्वतःसाठी नाही पण त्या मुलींसाठी तुला स्वतःला सावरलं पाहिजे...आम्ही तर फक्त तुला साथ देणार आहोत.'- सुर्वेबाई आईच्या मायेने तिच्याशी बोलत होत्या...

'बरोबर आहे तुमचं.. मी नक्कीच पुन्हा एकदा उभी राहीन.. बट मी निशांतच्या आयुष्यात असेन की नाही ते मी सांगू शकत नाही..'- चेहऱ्यावरील अश्रू फुसत अनघा बोलली..

'जशी तुझी इच्छा मुली.. तुझं उभं राहणं हेच आमच्यासाठीही महत्वाचे..'- सुर्वेबाई बोलल्या..

                                    --#--

आज फास्ट ट्रॅक कोर्टात तिवारी केसची सुनावणी होती.. सारे जाधव कुटुंबिय, साटम परिवार उपस्थित होते..

आशिष आपला कोट सावरून बसला होताच की समोर संध्याला पाहून तो चक्रावला होता..

'तु हा कोट घालून का फिरते आहेस??'- आशिष आपल्या गर्भवती लेकीला पाहून बोलला..

'बाबा, माझी पहिली केस तु मला अशीच अचानक दिली होतीस ना?? आज मी तुझ्याकडून हि केस अशीच अचानक मागतेय.. हि केस मिच लढवणार बाबा..'- संध्याच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी विलक्षण उत्साह होता..

'तु वेडी झाली आहेस?? या अवस्थेत??'- आशिष जवळपास आता ओरडू लागला होता..

'डोन्ट वरी बाबा.. मी माझी काळजी घेईन.. पण मला साऱ्या समाजाला स्त्री- शक्ती दाखवून द्यायची आहे.. तिने मनात आणलं तर ती कोणत्याही अवस्थेत लढू शकते हे मला त्यांना माझ्या उदाहरणांवरून सांगायचं आहे.. माझ्या गर्भावर बंदूक रोखणाऱ्या या नराधमांना मला स्वतः शिक्षा मिळवून द्यायची आहे.. बाबा, ही केस मिच लढवणार.. तु आराम कर!'- संध्याचा निग्रह पक्का होता..

 आशिषने शरयुकडे पाहिलं तसं तिने डोळ्यांनीच त्याला आश्वस्त केलं होतं.

आधीच तिवारीच्या आमदारकीमुळे चर्चेत असलेली केस; आठ महिन्याची गर्भवती वकील म्हणून उभी राहिल्याने अधिकच चर्चेत आली होती.. हा हा म्हणता ही बातमी वाऱ्यासारखी बाहेर पसरली तशी कोर्टाच्या आवारात प्रसारमाध्यमांची गर्दी लोटली होती..


क्रमशः

भाग खूपच जास्त उशिरा आल्याने सर्वांची माफी मागतो.. नवीन ठिकाणी नोकरी सुरू केल्याने नव्या गोष्टी शिकण्यासाठी वेळ देणं भाग होतं परिणामी हा भाग लिहायला उशीर झाला.. पुढील भाग ही कदाचित उशिरानेच येईल.. तो भाग तीन-चार दिवसाने तरी पोस्ट करण्याचा मी प्रयत्न करेन...

© मयुरेश तांबे

कथेचे सारे अधिकार लेखकाच्या अधीन असून; कथा नावासाहित प्रसिद्ध करण्यास काही हरकत नाही.. 

सादर कथा ही काल्पनिक असून;   एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती..

धन्यवाद..

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Mayuresh G. Tambe

Service

नमस्कार मंडळी.. इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि नोकरी.. त्यामुळे नट आणि बोल्ट भोवती फिरणाऱ्या आयुष्यात विरंगुळा म्हणून जस जमतं तसं लिहितो.. आवडलं तर दाद द्या आणि नाही आवडलं तर नक्कीच हटका..