Oct 24, 2021
कथामालिका

फक्त तुझ्यासाठी!!- भाग ६

Read Later
फक्त तुझ्यासाठी!!- भाग ६

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

'माझा आशु माझ्याकडे काही मागेल आणि मी ते पुर्ण करणार नाही; असं कधी होईल का?? मी.. मी बनेन शेफ.. तुझ्यासाठी नक्की बनेन..'- शरयूने नवऱ्याच्या डोळ्यातले पाणी फुसत म्हटलं अन ती पुन्हा त्याच्या मिठीत शिरली..

'ताई, प्रेम यालाच म्हणतात का ग??'- संध्याच्या प्रश्नावर अश्विनीनेही नकळत मान डोलवली होती...

                           ------------------


घरातून सर्व काही आवरून संध्याकाळी शरयू आणि आशिष अनघाच्या घरी कारने निघाले होते..

'शरयू, हा तिवारी इतके दिवस शांत कसा ग?? मला त्याच्या शांततेचीच जास्त भीती वाटते आहे..'- आशिषने गाडी चालवता चालवता शंका व्यक्त केली..

'मी ही सकाळपासूनच त्याच विचारात आहे.. तो नक्कीच मोठं वादळ घेऊन येणार बघ!'- शरयूचा चेहरा गंभीर झाला होता..

                                     --#--

आशिष अन शरयू अनघाच्या घराबाहेर पोहचले तसा त्यांना निशांत घराबाहेर बैचेनपणे फेऱ्या मारताना दिसला.. त्या दोघांना पाहून; त्याने ते गाडीतून खाली उतरण्याआधीच त्यांच्याकडे धाव घेतली होती...

'काका, काकी.. खूप मोठा प्रॉब्लेम झाला ओ!! सगळं संपलं.. त्या लोकांनी आपल्याला चांगलंच कोंडीत पकडलं आहे.. सु...सुर्याचं वाचणं आता अशक्य आहे.. मी.. मी..'- निशांतला रडू कोसळलं होतं..

'शांत हो निशांत.. काय झालं ते सांगशील नेमकं??'- आशिषने गाडीबाहेर येत त्याला विचारलं..

'काका.. तो.. तो डीसीपी शर्मा आला होता घरी.. सुर्याची साथीदार म्हणून अनघाला अटक करून नेली आहे.. आणि.. आणि..'- निशांतने थोडक्यात घटनाक्रम सांगितला तसं आशिष अन शरयुला धक्का बसला होता..

'आणि??'- शरयुने विचारलं..

'आणि काय?? त्या पोरीच्या नादात आमच्या मुलाचं आयुष्य बरबाद होणार आहे.. तरी सांगत होतो की एवढं पण आंधळं प्रेम करू नकोस.. ते ही एका आंधळ्या मुलीवर.. आणि तीही आता कोणी दुसऱ्याने उष्टवलेली पोरगी..'- निशांतचे वडील बाहेर येत तावा तावाने बोलत होते..

'नाहीतर काय.. मेलीला जाळ्यात फसवायला पण माझाच मुलगा भेटला होता.. आता काय स्वतःच्या जीवनाची राख तर झालीच आहे; आता माझ्या पोराच्या वाईटावर उठली आहे..'- त्याची आईही आता शामिल झाली होती..

' पण अहो आमची मुलगी तुमच्या मुलाकडे मदत मागायला आली नव्हती! ती त्या वाईट दिवसांनंतर कितीतरी वेळा त्याला तिच्यापासून दूर हो म्हणत होती.. पण यानेच ऐकलं नाही.. आता तुम्ही माझ्या मुलीची बदनामी का करत आहात?? असं नका करू ताई.. तुम्ही इतक्या वर्षापासून आम्हांला ओळखता.. अनघालाही लहानपणापासून ओळखता.. किती साधी मुलगी आहे आमची.. देवाने केलेला अन्याय सहन करत कशी बशी ती उभी राहिलीच होती की त्या नराधमांनी तिच्या अब्रूचे लचके तोडले.. आता त्याला ती तरी काय करणार होती?? आम्ही स्वतः कित्येक वेळा निशांतला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला की आता अनघाला विसरून जा.. इतके दिवस तिच्या  अंधाऱ्या आयुष्यात प्रेमाचा प्रकाश दिलास तितका पुरे झाला.. पण आता.. आता समाजाच्या दृष्टीने आमची मुलगी आणि आम्ही अस्पृश्य झाले आहोत.. एकवेळ ते विकृत ताठ मानेने फिरतील पण माझी पोरगी नाही.. माझ्या मुलीची काहीच चूक नव्हती अहो.. काहीच चूक नव्हती.. निशांत; तु तरी सांग ना तुझ्या आई-बाबांना की अनघाची यांत काहीच चूक नाही.. सांग ना त्यांना की ती स्वतः तुला तिच्यापासून दूर जाण्यास सांगत होती..'- अनघाच्या आईने निशांत आणि त्याच्या आई-वडिलांसमोर आपला पदर पसरला होता..

आधिच दृष्टीहीन मुलीवर झालेल्या बलात्कारामुळे हादरलेल्या जाधव कुटुंबियांना समाजाचे टोमणे सोसणे दिवसेंदिवस कठिण होत होतं.. आता तर त्यांचे शेजारीही उघडणे त्यांच्यावर शितोंडे उडवू लागले होते.. ज्या सुर्वे कुटुंबीयांशी त्यांची सर्वात जास्त जवळीक होती; त्यांनीही आज गरळ ओकलीच होती.. विशेषतः एरव्ही अनघाच्या सुखासाठी वाट्टेल ते करणारा निशांतही आई-वडिलांसमोर गप्प होता.. समाजात एकटे पडलेले जाधव दांपत्य अगदीच कोसळले होते.. 

'पुढे काय झालं मि. निशांत??'- शरयूने निर्विकारपणे विचारलं तसा आशिषच्या काळजाचा ठोका चुकला होता..

'गेला निशांत आता कामातून.. आता ही महाचंडी काय सोडत नाही तुला, निशांत बेटा..'- आशिष मनाशीच बोलला..

'त्या शर्माने अनघाला अटक करून नेलं..'- निशांतने बोलणं चालू केलं..

'लेडी कॉन्स्टेबल होती तेव्हा?? किती वाजता झालं हे??'- आशिषने विचारलं..

'नाही.. लेडीज पोलिस नव्हते.. साडेसहाच्या दरम्यान नेलं तिला..'- निशांतने सांगितलं..

'आणि शर्मा जाताना मला धमकावून गेलाय..'- निशांतने घाबरत म्हटलं..

'काय धमकावलं त्यांनी??'- आशिषने प्रश्न केला..

'हेच की मी कोर्टात सुर्या आणि अनघाच्या विरोधात साक्ष द्यावी.. तिवारीच्या मुलावर त्या दोघांनी मिळून प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं होतं.. आणि हे सगळं त्या दोघांनी आमदार तिवारिंकडून पैसे उकळण्यासाठी केलं आहे.. मागेसुद्धा अनघाने केलेली तक्रार ही सूर्याची चाल असून; अनघा त्याला साथ देत होती..आणि जर मी अशी साक्ष दिली नाही तर..'- निशांतच्या चेहऱ्यावर भीती अधिकच गडद होऊ लागली होती..

'तर??'- आशिष..

'तर ते माझ्या आई- वडिलांना ठार मारतील.. आणि माझ्या ताईवरही अनघासारखीच वेळ येईल.. आणि मी.. मी एवढं सगळं.. कसं?? मला.. मला तर वाटतं की मला नाईलाजाने खोटी साक्ष द्यावी लागेल..आय एम सॉरी..'- निशांत पुन्हा एकदा घाबरून रडकुंडीला आला होता..

'बरं.. ठिक आहे.. तु आतापर्यंत अनघाला जितकी साथ दिलीस तितकी पुरे.. यापुढे ही लढाई आम्ही लढू..'- आशिषने निशांतच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले..

'मिस्टर अँड मिसेस जाधव; जे काही झालं ते जाऊ द्या.. माज असलेली लोक जिथे राहतात तोच समाज!! त्यांचं नका मनावर घेऊ.. मला सांगा; जर अनघा सहीसलामत सुटली तर??'- शरयूने जाधव उभयतांना प्रश्न केला..

'तर आमच्यासारखं सुखी दुसरं कोणीच नसेल.. आम्ही.. आम्ही आमच्या राणीला घेऊन इथून दूर निघून जाऊ.. इथल्या लोकांच्या कुत्सित नजरांपासून दूर नेऊ आमच्या अनघाला.. ती आजही आम्हांला ओझं नाही.. आम्ही तिला नक्कीच पुन्हा उभी करू..'- जाधव आपल्या पत्नीचे डोळे फुसत बोलत होते..

'तुम्ही कुठेही जा.. पण तुमच्या मुलीची काळी छाया; आमच्या मुलावर पडली नाही पाहिजे.. लक्षात ठेवा..'- निशांतचे वडील जोराने बोलले..

'ओह.. बरं सुर्वे मला एक सांगाल का?? उद्या तुमच्या बायकोवर बलात्कार झाला तर??'- शरयूने निशांतच्या वडिलांवर जळजळीत कटाक्ष टाकत विचारलं तसे सारेच हडबडले..

'ये बाई!! का..काय बोलतेस?? बाई असून काही लाज वाटते की नाही असं बोलायला??'- निशांतची आई उसळली होती..

'तुमच्या नवऱ्याला उत्तर देऊ द्यात मॅडम.. हा.. सुर्वे; तुम्ही उत्तर नाही दिलंत??? उद्या कोणी माथेफिरूने तुमच्या बायकोच्या अब्रूवर हात टाकला तर तुम्हीं तिलाही असंच दोषी ठरवाल??'- शरयू अधिकच आक्रमकपणे बोलू लागली होती..

'काकी, तुम्हीं तुमच्या मर्यादा ओलांडून बोलताय..'- निशांत भडकला होता..

'अरे व्वा!! आता तुला मर्यादा दिसल्या?? मघासपासून तुझे आई-वडील चारचौघांत त्या अनघाच्या चारित्र्याचा उद्धार करत होते; तेव्हा त्यांना तु मर्यादांची आठवण करून नाही दिलीस?? ज्या अनघावर जिवापाड प्रेम करण्याचा दावा केलास; त्याच अनघाच्या विश्वासाला ठार मारायला निघालास तु?? तेही एका धमकीला घाबरून?? मग उगीच लढण्याचा आव आणायचा तरी कशाला?? लढू द्यायचं होतंस तिला एकटीला.. तुझ्यापेक्षा तो सुर्या बघ कितीतरी पटीने जागला नात्याला.. त्या अनघाने फक्त तीन वेळा त्याला दादा म्हणून हाक मारली होती; फक्त एकदा घरातला मानून पुरणपोळी खाऊ घातली होती.. त्या साऱ्या गोष्टींची जाण ठेवली त्याने.. आणि तु?? लहानपणापासून अनघावर प्रेम करण्याचा दावा करतोस आणि आता?? लाज तुला वाटायला हवी निशांत.. लाज तुला वाटायला हवी..'- शरयूने कडक शब्दांत निशांतला फटकारले होते..

'तु कोणाचं ऐकत बसला आहेस.. त्या शर्माने सांगितलेलं लक्षात आहे ना?? या कुटुंबाच्या जवळ जरी कोणी गेलं तरी त्यांची खैर नाही..'- निशांतच्या वडिलांनी त्याला जवळपास खेचले होते..

'मिसेस सुर्वे, स्वतःला सांभाळा.. जर तुमच्या इज्जतीला जरा तरी धक्का लागला तर तुमच्या बाजूने उभं राहणार कोणी नसेल.. तुमच्या नवऱ्याने एका शब्दानेही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीये..'- शरयूने पाठ फिरवलेल्या सुर्वे कुटुंबियांतील निशांतच्या आईला उद्देशून म्हटलं होतं..

काही क्षण निशांतच्या आईची पाऊलं थबकली होती.. एका अनामिक भीतीने त्यांनी मागे वळून पाहिलं होतं आणि पुढच्या क्षणाला त्या मान खाली घालून पुढे मार्गी लागल्या होत्या..

'अनघा, आता आमची जबाबदारी आहे.. तुम्हीं चिंता करू नका.. अनघा लवकरच तुमच्या कुशीत असेल..'- शरयूने अनघाच्या आईच्या डोळ्यातील पाणी आपल्या हाताने फुसले होते..

जाधव पती-पत्नीला धीर देऊन आशिष अन शरयू घरी परतायला निघाले होते..

                                       --#--

'तुला काय वाटतं; शर्मा इतक्यावरच शांत बसेल??'- आशिषने शरयुला हसून विचारलं..

'नाही.. थोडी दशहत आपल्यालापण दाखवेलच..'- शरयूने गंभीर होत उत्तर दिलं..

त्यांची गाडी त्यांच्या बिल्डिंगच्या पार्कींगला आलीच तो त्यांना पोलिसांची गाडी दिसली होती..

आशिषने त्या गाडीचे काही लांबून तर काही जवळून फोटो घेतले होते..

आशिष अन शरयू घरी पोहचलेच तर त्यांना घरात काही पोलिस साध्या वेशात दिसले होते.. अश्विनी आणि संध्या हॉलमध्ये तणावग्रस्त बसलेल्या होत्या.. भीतीने त्यांचा चेहरा घामेजलेला होता.. अश्विनीने तर आपलं रडू जबरदस्तीने रोखलेलं दिसत होतं.. छोटी मीरा कुठेच दिसत नव्हती.. 

'मीरा कुठेय??'- आशिषने घाबरत अश्विनीला विचारलं तसा तिच्या अश्रूंचा बांध सुटला आणि ती आवेगाने रडू लागली होती..

'अलेले.. मम्माला सांग लडू नकोस नाहीतर हे पोलिस अंकल मला मारतील.. आजोबाला पण सांग गप्पगुमान या केसमधून चालू पडायचं नाहीतर पोलिस अंकल मला मारून टाकतील.. माझ्या मावशीच्या बाळालापण जन्मण्याच्या आधीच संपवून टाकतील.. हे पोलिस अंकल खूप बॅड आहेत.. सांगणार ना आजोबाला??'- शर्माने त्या इवलीश्या मीराचे तोंड तिच्या रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून दाबून ठेवले होते.. 

मीराचा निरागस जीव अगदी घाबराघुबरा झाला होता.. ती वारंवार अश्विनीकडे झेप घेण्याचा प्रयत्न करत होती पण प्रत्येक वेळी डीसीपी शर्मा तिला मागे दाबून ठेवत होता.. लेकीची अवस्था बघून अश्विनीच्या काळजाला असंख्य वेदना होत होत्या.. तिच्या ओढीने ती उठण्याचा प्रयत्न करताच; तेथिल पोलिस संध्याच्या गरोदर पोटाच्या दिशेने पिस्तुल रोखत आणि अश्विनी उद्धवस्तपणे जागीच बसून जात होती..

अश्विनी आणि संध्या आता चांगल्याच घाबरल्या होत्या..

'साहेब, असं नका करू अहो.. छोटासा जीव आहे तो.. मी.. मी सांगते माझ्या नवऱ्याला.. कोण अनघा?? कोण सुर्या?? आमचा तर असा पण काही संबंध नाही.. हे.. हे नाही लढवणार केस.. मी तुमच्या पाया पडते.. माझ्या नातीला सोडून द्या..'- शरयूने गरीब चेहरा करत शर्माच्या पायाशी लोटांगण घातलं होतं..

'हो; मी नाही लढवणार ही केस.. मी माघार घेतो पण माझ्या कुटुंबाला काही करू नकात.. प्लिज.. मी हात जोडतो तुम्हांला...'- आशिषही डीसीपी शर्मा समोर गयावया करू लागला होता..

'अब आया ना ऊंट पहाड के निचे!! शर्माशी पंगा घ्यायचा नाही म्हणजे नाही.. आता फक्त हिचं तोंड दाबलंय.. माझ्याशी काही चलाखी केलीत तर पुढच्या वेळी हिचा गळा दाबेन..'- शर्माने मीराच्या गळ्याला हात लावला तशी अश्विनी किंचाळून उठली होती.. कोलमडलेली ती हात जोडून शर्माला विनंती करू लागली तसा शर्मा क्रूरपणे हसला होता..

पुन्हा एकदा धमकी देऊन शर्मा आणि त्याची टिम घराबाहेर पडली होती..

अश्विनीने अक्षरशः धावत जाऊन मीराला आपल्याकडे घेतलं होतं.. आईकडे येताच मीराने जोरात भोकाड पसरलं होतं. अश्विनी पटापट लेकीचे मुके घेत होती.. तिच्या चेहऱ्यावर घाईने हात फिरवताना तिच्या स्वतः च्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती.. 

संध्या तर धक्क्याने जागची हलली नव्हती..

शरयू शांतपणे सोफ्यावर बसली होती.. तिने आपले डोळे मिटून घेत, आपले डोके हलके मागे केले होते.. तिला तस करताना पाहून अश्विनी आणि संध्या चकीत झाल्या होत्या.. त्या दोघींच्या मनातली दशहत ओसरली नसली तरी शरयूचे वागणे त्यांना बुचकळ्यात टाकत होते..

त्या दोघी आशिष अन शरयुला काही विचारणार तितक्यातच शरयूचा फोन वाजला होता..

'येस.. इट्स टाइम टू प्ले दि गेम.. लेट्स स्टार्ट दि गेम..'- शरयूने शांतपणे फोनवर म्हटलं होतं..

आशिषही बाहेर जाऊन एक-दोन फोन करून आला होता..

'डोन्ट वरी.. होतं असं कधी कधी.. कसं वाटलं भीतीला सामोरं जाऊन??'- शरयूने हसत दोन्ही लेकींना विचारलं तसे त्या दोघींना वेड लागायचं बाकी राहिल्यासारखं झालं होतं..

'आई?? वेडी झालीयेस का तु??'- अश्विनीने रडता रडता विचारलं..

'तु कधी आग आणि पाणी एक होऊन लढताना पाहिलं आहेस??'- शरयूने तिला विचारलं..

'आई??'- अश्विनी आता वैतागली होती..

'आग आणि पाणी..'- शरयूने आत परतलेल्या आशिषच्या खांद्यावर हात ठेवत पुन्हा म्हटलं होतं..

'मीरा, जो त्रास त्याने तुला दिला त्याच्या कितीतरी पट जास्त त्रास आम्ही दोघे मिळून त्याला देऊ.. वचन आहे बेटा तुझ्या आजी-आजोबांचं!! '- आशिषचा चेहरा गंभीर झाला होता.. आज पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावर सर्वांना राग स्पष्ट दिसत होता..

इतक्यातच टीव्हीवर बातमी झळकली होती- 'डीसीपी शर्मा आणि त्यांचे साथीदार रस्ता अपघातात गंभीर जखमी!!'

                               --#--


दुसरा दिवस उजाडला होता.. शर्मा आणि त्यांच्या साथीदारांना शुद्ध आली होती.. साऱ्या जणांना नॉर्मल वॉर्डमध्ये हलवलं होतं.. शर्माला डोकं जड झाल्यासारखं वाटत होतं..

'सावी, तु माझ्यासोबत असं कशी करू शकतेस?? तु माझी लेक माझ्यापासून दूर नेऊ शकत नाही.. म..मला माफ कर.. माफ कर.. मी चुकलो..'- शर्माच्या टिममधील एक हवालदार हातात एक पत्र घेऊन जवळपास रडू लागला होता.. त्याच्या हातात बायकोची सारी सौभाग्यलेणी होती.. 

'लांडगे, क्या हुवा??'- शर्माने क्षीण आवाजात त्या हवालदाराला विचारलं..

'सर, तुम्हांला साथ दिली म्हणून माझी बायको मला सोडून गेलीय.. जाताना माझी दोन वर्षांची मुलगीही सोबत घेऊन गेलीय.. माझ्यासारख्या बापाच्या काळ्या छायेखाली मुलगी सुरक्षित नाही म्हणून निघून गेली ओ सर ती!! असं कसं झालं अचानक??'- लांडगे अजूनही रडतच होता..

त्याचा रडण्याचा आवाज ऐकून डॉक्टर आणि नर्स मंडळी धावत आली होती..

लांडगेसोबत घडलेलं पाहून; बाकीच्यांनी आपल्या आजूबाजूला नजर फिरवली तशी सर्वांच्याच बाजूला त्यांच्या त्यांच्या पत्नीने  मंगळसूत्र, बांगड्या, जोडवे असा सारा सौभाग्याचा ऐवज सोडून दिला होता.. सोबत प्रत्येकाच्या बायकोची एक चिठ्ठी होतीच..

आता तिथे एकच कल्लोळ उठला होता.. कित्येक जण आपली छाती बडवत होती.. डॉक्टर आणि नर्सेसची त्यांना शांत करताना त्रेधातिरपीट उडत होती..

डीसीपी शर्माने घाबरत आपल्या आजूबाजूला पाहिलं तर त्याच्या आजूबाजूला तसलं काहीच नाही तस त्याला काहीसं हायस वाटून त्याने डोळे मिटले होते.. 

अशीच काही मिनिटे झाली असतील तितक्यातच कोणी त्याच्या अंगावर काही फेकल्याची त्याला जाणीव झाली होती.. घाबरून उठताच त्याला आपल्या छातीवर मंगळसूत्र पडल्याचे दिसले होते.. समोर रागाने लालबुंद झालेली त्याची बायको आपल्या बांगड्या उतरवत होती.. पुढच्या मिनिटाला तिने आपल्या बांगड्या  आणि पायातली जोडवी उतरवत नवऱ्याच्या अंगावर फेकली होती..

'लाज वाटतेय मला की तू माझा नवरा आहेस.. इतके दिवस जे दागिने मी अंगावर मिरवत होते; मला माहीत नव्हतं की ते तुझ्या काळ्या पैशाने घरात आले आहे.. शी... स्वतःला एक मुलगी असून  मुलीच्या इज्जतीशी खेळणाऱ्या विकृतांना पाठीशी घालताना तुला काहीच कसं वाटलं नाही.. घृणा वाटतेय मला तुझी.. आजपासून तुझा-माझा सबंध तुटला.. रस्त्यावर भीक मागून राहीन पण तुझा पापाचा एक पैसा नेणार नाही..'- त्याची बायको रागाने तणतणत बाहेर पडली होती..

बाकीच्यांचा काडीमोड कमीतकमी पत्रांतून तरी झाला होता.. पण शर्माच्या बायकोने त्याचा जाहीर अपमान करत त्याच्याशी असलेलं नाते तोडले होते..

'डीसीपी शर्मा.. कैसे हो?? कुछ शर्म महसुस कर रहे हो??'- एक नाजूक पण तितकाच त्वेषपुर्ण आवाज वॉर्डमध्ये अचानक घुमला होता..

'कमल? बेटी तुम??'- डिसीपी शर्मा आता हळूहळू तुटायला लागला होता..

'नही शर्माजी नही. प्लिज मुझे बेटी मत कहना.. आपका और मेरा जो भी सबंध था; वो कल शाम को खत्म हो चुका हैं.. अभी आप मेरे नजर मै एक शैतांन हो.. बस्स और कोई नही.. आपने मेरे लिये जितना किया उसके लिये मै आपको धन्यवाद देती हुं.. और मेरी आपसे अभी एकही गुजारीश हैं की आज के बाद आप मुझे और मेरे माँ को हमारे हाल पे छोड दे.. हम नही चाहते की किसी मासुम बच्ची की बददुवा हमारी जिंदगीमै शाप बनके मंडराती रहे... चलती हुं; हो सके तो अपने पापोका प्रायश्चित्त करे..'- शर्माची लेकही त्याला फटकारून निघून गेली होती..

वॉर्डबाहेर पडणाऱ्या लेकीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना शर्मा अगदीच सुन्न झाला होता.. आजवर केलेल्या पापांबद्दल नियतीने त्याचा सव्याज सूड घेतला होता..

'शरयू?? हे सगळं तु करवून आणलंस ना??'- वॉर्डच्या बाहेर उभ्या असलेल्या रागिणी मॅडमनी शरयुला फोन करत विचारलं होतं..

'ते कसं आहे ना; शांत समुद्रच जास्त धोकादायक असतो! सिंहाच्या कळपाला छेडण्याची कोणी हिम्मत करु नये ते यासाठीच!!'- शरयू पलीकडे जोरजोरात हसत होती..

क्रमशः

© मयुरेश तांबे

कथेचे सारे अधिकार लेखकाच्या अधीन असून; कथा नावासाहित प्रसिद्ध करण्यास काही हरकत नाही.. 

सादर कथा ही काल्पनिक असून;   एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती..

धन्यवाद..

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Mayuresh G. Tambe

Service

नमस्कार मंडळी.. इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि नोकरी.. त्यामुळे नट आणि बोल्ट भोवती फिरणाऱ्या आयुष्यात विरंगुळा म्हणून जस जमतं तसं लिहितो.. आवडलं तर दाद द्या आणि नाही आवडलं तर नक्कीच हटका..