Oct 18, 2021
कथामालिका

फक्त तुझ्यासाठी!!- भाग ५

Read Later
फक्त तुझ्यासाठी!!- भाग ५
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

'सुर्या, तुझ्या माफीची मी कायमच वाट पाहत राहीन.. मे बी त्याशिवाय मला मुक्तीही मिळणार नाही!!'- रुचिरा निघता निघता थांबून बोलून गेली तसं शरयुला ते विचित्र वाटलं...

                           ---------------

रुचिरा बाहेर जाताच शरयूने निशांतला त्याच्या आई-वडिलांना घेऊन संध्याकाळी सातच्या आसपास विभाच्या घराबाहेर थांबायला सांगितलं होतं..

'घराबाहेर??'- निशांतने गोंधळून विचारलं..

'होय.. घराबाहेर..'- शरयूने शांतपणे उत्तर दिलं..

काही वेळाने निशांतही सर्वांचा निरोप घेऊन बाहेर पडला तसे सर्वजण सूर्याला धीर देत लॉकअप बाहेर पडले होते..

रागिणीमॅडमनी शरयू अन आशिषला आपल्या केबिनमध्ये नेलं होतं.. सोबत इंस्पेक्टर सावंत होतेच.. हवालदार माने बाहेर थांबून संशयास्पद व्यक्तींच्या हालचाली टिपणार होते..

'रागिणी; सूर्याला इथे ठेवणं त्याच्या जीवासाठी धोक्याचं आहे.. आमदार इतका दिवस कसा शांत बसलाय याचाच मी विचार करतेय.. त्याचा मुलगा मरणाच्या दारात उभा आहे अन तो हातावर हात ठेवून बसेल हे जरा पटत नाही बघ.. सूर्याला जामीन मिळू शकतो का ग?? आशु, मिळेल का रे त्याला जामीन??'- शरयूने चिंतीत होत रागिणी आणि आशिषला विचारलं..

'मला तर तशी शक्यता कमीच दिसतेय.. जवळपास नाहीच..'- रागिणी मॅडमनी असमर्थता दर्शवली..

'मॅडम तुमच्याकडे सूर्याने तिवारीच्या मुलावर हल्ला केल्याचा कोणी प्रत्यक्षदर्शी  साक्षीदार आहे का??'- आशिषने प्रश्न विचारला तशी इन्स्पेक्टर सावंतांनी नकारार्थी मान हलवली..

'बट सूर्याने स्वतः तसा कबुलीजबाब दिला आहे..'- रागिणी मॅडमनी माहिती दिली..

'असे किती कबुलीजबाब कोर्टात बदलतात.. लोक वाईट कामांसाठी बदलतात; आपण चांगल्या कामासाठी बदलला मग काय प्रॉब्लेम आहे?? होऊन जाईल जामीन.. ती माझी जबाबदारी.. माझ्या शरूसाठी एवढं तर मी नक्कीच करू शकतो..'- आशिषने बोलता बोलता शरयुला डोळा मारला तशी तिच्या चेहऱ्यावर लाली पसरली आणि रागिणी मॅडमच्या केबिनमध्ये एकच हशा फुलला..

पुढच्याच क्षणी मॅडमच्या टेबलावरील लॅण्डलाईन फोन वाजला होता..

'रागिणी मॅडम, प्रदिप तिवारी केसची काय प्रोग्रेस आहे?? आरोपीने साथीदारांची नावे सांगितली की नाही??'- पलिकडून पोलिस कमिशनर केसचा आढावा घेत होते..

'नो सर.. अजून त्याने तोंड उघडलं नाहीये.. आमचे प्रयत्न सुरू आहेत..'- रागिणी मॅडमनी उठून उत्तर दिलं..

'ओह.. मग असं करा आता तुम्ही तिथून तुमचा गाशा गुंडाळा.. तुम्हीं आता ती केस बघायची गरज नाही.. तुम्हांला माहीत नाही; माझ्यावर किती प्रेशर आहे.. मी त्या केससाठी स्पेशल ऑफिसर अपॉइंट करतोय.. ते पुढच्या पंधरा मिनिटांत तेथे पोहचतीलच.. तुम्हीं त्यांना सगळ्या फाईल्स हँडओव्हर करा.. एम आय क्लिअर??'- कमिशनरांनी पलिकडून आदेश दिले..

'येस सर..'- फोन ठेवून मॅडम मटकन खाली बसल्या..

'मॅडम?? काय झालं??'- सावंतांनी काळजीने विचारलं..

'मॅडमकडून कमिशनरने तिवारी केस काढून घेतली.. बरोबर रागिणी??'- शरयू गालातल्या गालात हसत म्हणाली..

'राईट.. यापुढे कोणी स्पेशल ऑफिसर ही केस बघणार आहे..'- मॅडमनी हताश होतं म्हटलं..

'बट कोण असेल स्पेशल ऑफिसर??'- इन्स्पेक्टर सावंतांची चर्या गंभीर झाली होती...

'एसीपी शर्मा!!'- शरयूने हसत रागिणी मॅडमच्या टेबलावरील पेपरवेट गोल फिरवला तसे सारेजण चकीत होत तिच्याकडे पाहतच बसले..

'तु.. तु आजही बदलली नाहीस यार!! तुला चेकमेट करणारा कोणीतरी तुझ्यासमोर कधी आलाय का ग??'- रागिणी मॅडमनी हसत शरयुला म्हटलं..

'आहे ना! हि इज माय डार्लिंग.. माय जान! माझा आशिष..'- शरयूने गालातल्या गालात हसत म्हटलं..

'तु तेव्हा हरलीस कारण तुला मला जिंकवायचं होतं.. नाहीतर माझ्या शरयुला हरवणं कोणालाही शक्य नाही..'- आशिषने तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर केला तशी तीही लाडीकपणे हसली..

'बट शरयू, तुला शर्मा येणार म्हणून कसं माहिती??'- रागिणी मॅडमनी विचारलं..

'ते जास्त महत्वाचं नाही.. वेळ आली की सांगेन.. पण तो आताच्या सरकारचा वफादार कुत्रा आहे आणि ते आपल्यासाठी जास्त चिंतेचे आहे..'- शरयूच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.. तिने तसंच आशिष कडे पाहिलं तर त्याने डोळ्यानेच तिला आश्वस्त केलं..

' अग; तुझ्यासाठी काहीच कठीण नाही.. सूर्याची जामीन पक्की समज.. रागिणी मॅडम, मला सूर्याशी थोडं बोलयचं आहे..'- आशिषने शरयूच्या डोक्यावरून हात फिरवत रागिणी मॅडमची परवानगी घेतली..

'शरू, तु मॅडमना पुढे काय करायचं ते समजावून सांग.. मी सूर्याला भेटून येतो..'- आशिष पुन्हा एकदा लॉकअपमध्ये गेला होता..

                                       --#--

पोलिस स्टेशनमधून आशिष अन शरयू त्यांच्या घरी परतले होते.. शरयूचा मूड खूपच खराब होता त्यामुळेच आशिषने तिला जास्त डिस्टर्ब केलं नव्हतं..

'अरे घरात किती पसारा करून ठेवला आहे??'- घरात सगळीकडे पसरलेली खेळणी पाहून शरयू जाम वैतागली होती..

तिच ओरडणं ऐकून समोरच खेळत असलेली छोटी मीरा घाबरून तिच्या आईला; अश्विनीला बिलगली होती..

'अश्विनी, ती लहान आहे... तु तर मोठी आहेस ना?? तुला घरातला पसारा कळत नाही का?? कोणी अचानक घरी आलं तर काय म्हणेल??'- शरयूचा आवाज वाढला होताच की घाबरून मीराने भोकाड पसरलं होतं..

बाहेरचा गोंधळ ऐकून गर्भवती संध्या रूम बाहेर आली होती.. चालता चालता तिच डोकं दरवाज्याला धडकलं...

'ओ मॅडम, आता या अवस्थेत तरी डोळे उघडे ठेवून चाला.. इतके दिवस मजा मारलीत ना?? आता तरी जबाबदारीने वागायला शिका!'- शरयूच्या तोंडाचा पट्टा काही केल्या थांबत नव्हता..

'कोणत्या मूर्खांसमोर बोलतेय मी!'- कपाळावर हात मारून शरयू फ्रेश होण्यासाठी निघून गेली होती..

'बाबा, अरे काय करून आणलंस हिचं??'- अश्विनीने लेकीला शांत करता करता आशिषला विचारलं..

'काही नाही.. मॅडमसमोर नवीन चॅलेंज आलंय.. पुन्हा एकदा संध्या साटमला दिलेलं वचन पाळण्यासाठी तिने स्वतःला सज्ज केलंय.. त्या रवीला ना थेट नागपुरात जाऊन धुवावं वाटतं.. नालायकला हैराण करायला नेहमी माझीच प्रेयसी भेटते.. एक प्रॉब्लेम स्वतःला सोडवता येत नाही.. बरं प्रॉब्लेम पण असे निवडून आणेल की हिच्या डोक्याचा पार किस निघेल..'- आशिष काहीसा चिडून बोलला..

'बाबा, छान वाटतं रे तुला आईची काळजी करताना पाहून.. तुझं तिच्यावरचं प्रेम पाहून.. आता तिला तूच शांत करू शकतोस..'- संध्याने आपल्या गर्भार पोटावरुन हात फिरवत म्हटलं..

'आशु, ही बार्बी डॉल दे मला.. हिच तिच्या आजीला शांत करेल..'- आशिषने मीराला उचलून घेत आत नेलं..

'बघ, सांग आजूला.. कशाला एवढी चिडतेस.. घाबरली ना मी?? कट्टी.. कट्टी घे आजूशी.. बोल कट्टी..'- आशिष आत बेडवर बसलेल्या शरयुकडे मीराला मुद्दाम घेऊन आला होता..

शरयुला पाहून मीरा पुन्हा घाबरली तशी ती आशिषला अधिकच घट्ट बिलगली..

'सॉरी बच्चू.. आजी वाईट आहे ना?? आमच्या परीला ओरडली ना आजी.. सॉरी बेटा..'- शरयूने मीरासमोर येत कान पकडले होते..

मीरालाही काय वाटलं ते आशिषलाही कळलं नव्हतं पण मीराने लाडाने शरयुकडे झेप घेतली होती.. शरयू नातीला खेळवत खोलीबाहेर आली होती. दोघीजणी एकमेकांशी मनोसोक्त खेळत होत्या.. मीरा आपल्या निरागस भाषेत शरयुला काही सांगत होती अन शरयुही तिच बोलणं ऐकत तिला प्रतिसाद देत होती..

क्षणांत पलटलेलं चित्र पाहून अश्विनी आणि संध्याच्या तोंडाचा आ आश्चर्याने अगदीच मोठा झाला होता.. त्यांनी बाबांकडे पाहिलं तर तोही स्वतः चकीत होऊन हसत होता..

पुढच्याच मिनिटाला आशिष किचनमध्ये गेला होता.. काही भाज्या अन अजून काही पदार्थ काढत त्याने दोन्ही लेकींना हाक मारली होती..

'आशु, संध्या आत किचनमध्ये या!!'- आशिष

'बोल बाबा.. आज तु जेवण बनवतोस की काय??'- संध्याने हसत विचारलं...

'नाही.. तुम्हां दोघींना बनवायचं आहे.. बट हे सगळे इन्ग्रेडिंअंट वापरून! चॅलेंज तुम्हांला; बोला मंजूर?? जिंकल्यावर माझ्याकडून स्पेशल ट्रीट..'- आशिष मिश्कीलपणे बोलला..

'बाबा, काहीही काय?? तु तरी बघितलस का काय काय काढलं आहेस ते?? सगळे एकमेकांना विरुद्ध इन्ग्रेडिंअंट काढलेस..'- अश्विनीने बघूनच तोंड वाकडं केलं..

'नाचता येईना आणि म्हणे अंगण वाकडं.. कसल्या तुम्ही शरयू साटमच्या पोरी.. श्या!!'- आशिषने दोघी लेकींना अधिकच डीचवलं..

'आये, आत ये ग जरा.. इकडे किचनमध्ये... बाबा, तु आता इथेच थांब.. आई, तुला तुझ्याच भाषेत समजवेल..'- अश्विनीने एवढं बोलून संध्याला टाळी दिली..

'बोला, आज काय बाप लेकी मिळून स्वयंपाक करताय की??'- मीरा शरयूच्या कडेवर बसून खुश होती..

'नाही.. बाबाने चॅलेंज दिलंय की या सगळ्या घटकांचा वापर करून आजच जेवण बनवलं तर त्याच्याकडून स्पेशल ट्रीट..'- संध्याने किचनच्या ओट्यावर काढलेल्या पसारा शरयुला दाखवला..

'तुला काहीच कामधंदे नाहीत का रे??'- शरयू काहीशी वैतागली..

'बघ; खा आता प्रसाद!! बाबा; तुझं चॅलेंज कोणीच स्वीकारणार नाही..'- अश्विनी अन संध्या दोघीही हसू लागल्या होत्या..

'जर मी या सगळ्यांपासून काहीतरी बनवून दाखवलं तर??'- शरयूने अचानक म्हटलं तशा दोघी लेकी शॉक झाल्या..

'तु मागशील ते!!'- आशिषने हसत म्हटलं..

'बरं.. तुम्ही सगळे किचनबाहेर जा.. मी करते काहीतरी..'- शरयूने आव्हान स्वीकारत मीराला अश्विनीकडे सोपवलं होतं..

संध्या आणि अश्विनीसाठी हा जरी धक्का असला तरी आशिष मात्र गालातल्या गालात हसत होता.. काही वेळातच जेवण तयार झाले होते.. सर्वांनी एकत्रितपणे ते टेबलावर मांडले होते..

शरयूने बनवलेले सारे पदार्थ पाहून दोघी लेकीच काय आशिषही चकीत झाला होता. आशिषने दिलेल्या प्रत्येक घटकाचा शरयूने जेवणात बेमालूम समावेश केला होता.. जेवताना त्या त्या पदार्थाची चव कळत तर होती पण तो पदार्थ मात्र त्या डिशमध्ये ओळखून येत नव्हता.. साऱ्यांनीच शरयूच्या कल्पनाशक्तीला दाद दिली होती..

'बाबा, आता आईला काय देणार?? जिंकली ती तुझं चॅलेंज!'- दोघी लेकी भांड्यांची आवराआवर करता करता बाबाला विचारत होत्या..

'वेळ आली की मी मागेन त्याच्याकडे..आता नाही..'- शरयूने आशिषकडे हसत म्हटलं..

उरलेली भांडी घेऊन शरयुही किचनमध्ये रवाना झाली होती तसा आशिषही लगोलग सगळ्यांच्या मागून किचनमध्ये पोहचला होता..

'पण आता मी तुझ्याकडे काही मागितलं तर देशील मला??'- आशिषने आत येत शरयुला उद्देशून म्हटलं..

'मागून तर बघ!!-' शरयूने त्याचे गाल ओढत म्हटलं..

आशिष अचानक गुडघ्यावर बसला होता.. शरयूचा एक हात आपल्या हातात धरून त्याने त्या हाताचे चुंबन घेतलं होतं.. 

'आजवर माझ्यासाठी जगलीस.. माझ्या करिअरसाठी तुझी स्वप्नं पणाला लावलीस.. माझ्या स्वार्थीपणाची कधीच तक्रार केली नाहीस.. पण आता स्वतःसाठी जगशील का?? माझी इच्छा समजून तरी?? आज तुझी ओळख आशिष साटमची बायको म्हणून आहे.. मला शरयू साटमचा नवरा म्हणून ओळख मिळवून देशील?? आज या सगळ्या इन्ग्रेडिंअंट सोबत तु जे काही केलंस त्यावरून तुझ्यातलं कौशल्य स्पष्ट दिसतंय.. तु आजही शेफ बनू शकतेस शरू!! बनशील का ग?? माझ्यासाठी??'- आशिषच्या डोळ्यांत पाणी आलं होतं..

शरयू, अश्विनी अन संध्या; साऱ्याजणी चक्रावून गेल्या होत्या.. 

शरयूच्या डोळ्यांतुन अश्रू कधी वाहू लागले हे तिलाही समजलं नव्हतं.. मानेनेच हो बोलत ती आशिषच्या मिठीत शिरली होती..

'माझा आशु माझ्याकडे काही मागेल आणि मी ते पुर्ण करणार नाही; असं कधी होईल का?? मी.. मी बनेन शेफ.. तुझ्यासाठी नक्की बनेन..'- शरयूने नवऱ्याच्या डोळ्यातले पाणी फुसत म्हटलं अन ती पुन्हा त्याच्या मिठीत शिरली..

'ताई, प्रेम यालाच म्हणतात का ग??'- संध्याच्या प्रश्नावर अश्विनीनेही नकळत मान डोलवली होती...

 

क्रमशः

© मयुरेश तांबे

कथेचे सारे अधिकार लेखकाच्या अधीन असून; कथा नावासाहित प्रसिद्ध करण्यास काही हरकत नाही.. 

सादर कथा ही काल्पनिक असून;   एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती..

धन्यवाद..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Mayuresh G. Tambe

Service

नमस्कार मंडळी.. इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि नोकरी.. त्यामुळे नट आणि बोल्ट भोवती फिरणाऱ्या आयुष्यात विरंगुळा म्हणून जस जमतं तसं लिहितो.. आवडलं तर दाद द्या आणि नाही आवडलं तर नक्कीच हटका..