Oct 24, 2021
कथामालिका

फक्त तुझ्यासाठी!!- भाग ४

Read Later
फक्त तुझ्यासाठी!!- भाग ४

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

'तुझ्या आयुष्यात लवकरच पाश्चातापाचे क्षण येतील.. सूर्याच्या सच्च्या प्रेमाला ठोकर मारून तु भंपकपणाला जवळ केलं आहेस ना?? त्याचा फोलपणा लवकरच तुझ्या समोर येईल.. आणि त्या दिवशी तु इतकी रडशील ना की बास रे बास!! लाख जण जरी तुझे अश्रू फुसायला उभे राहिले तरी ते फुसले जाणार नाहीत.. आज जितकं दुःख सुर्या भोगतोय ना त्याच्यापेक्षा जास्त वेदना तुझ्या आयुष्यात येतील.. लक्षात ठेव..'- संध्या तावातावाने बोलून तिकडून निघून गेली होती.. 

'त्यावेळेस वाटलं नव्हतं की तिचं बोलणं इतकं खरे ठरेल'- रुचिच्या रडण्याचा आवेग वाढून ती शांत झाली होती..

                          -----------------

'पुढे??'- शरयूने विचारलं..तिचा निर्विकारपणा आशिषला अस्वस्थ करणारा होता..

'जसजसे दिवस सरू लागले, सुर्या माझ्या विचारातून धूसर होऊ लागला होता.. आरवसोबत मला धम्माल येत होती.. तो मला डेली गिफ्ट्स द्यायचा, आम्ही अधूनमधून त्याच्या आलिशान गाड्यातून लॉंग ड्राइव्हला जायचो, तो माझे खूप लाड करायचा.. मला तर माझी सारी स्वप्नं क्षणात पुर्ण झाल्यासारखी वाटली होती.. त्या वर्षीच कॉलेज संपायला आलं होतं आणि असंच एक संध्याकाळी आम्ही लॉंग ड्राइव्हला गेलो होतो तर...'- रुचिराने त्या नकोश्या आठवणींनी आपले अंग चोरून घेतले होते..

'गाडी चालवताना मध्येच त्याने आडरस्त्याला गाडी थांबवून; माझ्या नकळत ड्रिंक घेतलं होतं.. मी त्याच्यावर चिडली होती पण त्याने त्याला काही फरक पडला नव्हता.. त्या संपुर्ण प्रवासात त्याने एक-दोनदा माझ्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न केला होता.. बट मी त्याला धुडकावून लावल्याने त्याचा इगो हर्ट झाला होता.. त्या दिवशीची आमची लॉंग ड्राइव्ह भांडणाने संपली होती.. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजमध्ये आरवला शोधत कॅन्टीनमध्ये पोहचली होती.. मला त्याला त्याच्या कालच्या आगाऊपणाबद्दल खडसावायचे होते.. मी आरवच्या ग्रुप जवळ पोहचलीच होती की मला त्यांच्या ग्रुपचं संभाषण कानावर पडलं होतं.. ते सारेजण माझ्याबद्दलच बोलत होते..

'काय आरव? काल फायनली चान्स दिला की नाही रुचिराने?? किस दिला की अजून जास्त??'- त्याच्या मित्राने कालच्या ड्राइव्हचा विषय काढला होता..

'अरे भाय, ये क्या पुछने की बात हैं?? तिची फिगर बघूनच तर भाईने पटवलीय तिला.. चान्स मारल्याशिवाय थोडीच सोडेल तो.. बट भाई तुझं झाल्यावर आम्हाला पण चान्स भेटेल का रे??'- त्याच्या मित्राने लाळ टपकत असल्याची ऍक्शन केली आणि सारा ग्रुप हसू लागला होता.. सगळ्यांत जास्त हसणारा आरव होता.. त्याक्षणी मला त्याचा भयंकर राग आला होता पण मला त्याच खरं रूप बघायचं होतं..

'आरव, बट ती तुला चान्स देईल ना रे?? '- कोण्या एकाने सहजच शंका व्यक्त केली..

'देणार म्हणजे?? ब्रो; आय एम आरव.. तिच्यावर इतका खर्च उगीच थोडी करतोय?? अँड अशी पण तिच्यासाठी प्रेम वगैरे असं काही नाही आहे.. तिला लाईफमध्ये लक्जरी, मौजमज्जा करायची आहे.. आणि आपण तिला ते देतोय ना?? त्याबदल्यात थोडी मज्जा मी घेतली तर कुठे बिघडलं??'- आरवने डोळे मिचकावत म्हटलं आणि इकडे माझ्या डोळ्यांत अश्रूंचा पूर लोटला होता..

'आणि जर ती तुझ्याबद्दल सिरीयस असेल तर?? आय मिन तिच्या फिलिंग्ज??'- अजून एक प्रश्न आला..

'हाड.. अशा मुली कधी कोणाबरोबर सिरीयस नसतात रे.. काल ती सुर्यासोबत होती, आज माझ्यासोबत आहे, उद्या तु माझ्यापेक्षा जास्त पैसा दाखव; ती तुझ्याबरोबर येईल.. त्यानंतर त्याच्याकडे, परवा ह्याच्याकडे.. अशा पोरीचं काही कॅरॅक्टर नसतं.. या युज अँड थ्रो टाईप वाल्या पोरी!! अँड तु म्हणतोस तशा तिला फिलिंग्ज असत्या ना तर तिच्यासाठी रात्री रात्री गॅरेजमध्ये काम करून पैसे कमावणाऱ्या सूर्याचं प्रेम तिने सोडलं नसतं..तुम्हांला सांगतो मी; माझी गाडी एकदा मध्यरात्री येताना बंद पडली होती आणि मी योगायोगाने सुर्या काम करत असलेल्या गॅरेजवर पोहचलो आणि मला यांची स्टोरी कळली.. सुर्या भोळा होता; म्हणून त्याला हिची चाल कळली नाही बट अपुन तो शाना कौवा हैं ना भिडू!! मला ती काय चीज आहे लगेच कळलं; म्हटलं चला असाही विधासोबत बोअर झालंच होतं; आता हिला टेस्ट करून बघू.. अशीही ती माझ्या हिटलिस्टमध्ये होतीच.. अँड तिला थोडे पैसे दिसले तशा झाल्या ना मॅडम फिदा!! आता काय थोडे दिवस नाटकं करेल, सभ्य असल्याचा बनाव करेल आणि मग काय मज्जाच मज्जा!!!'- आरव बोलून जोरात हसू लागला आणि त्याचे मित्रही त्यात सामील झाले होते..

त्यांची बोलणी ऐकून माझी तर बोलतीच बंद झाली होती.. त्याचे शब्द माझा अंतरात्मा जाळत पुढे जात होते.. मी आतून पुर्ण कोसळली होती.. आज पहिल्यांदा सूर्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला होता.. त्याने माझ्या विश्वासघाताबद्दल एका शब्दाने विचारलं नव्हतं.. तो निमूटपणे माझ्या आयुष्यातून निघून गेला होता.. बट त्यादिवशी माझं मन मला राहून राहून जाब विचारत होतं आणि माझ्याकडे त्याच काहीच उत्तर नव्हतं.. कॅन्टीनच्या भिंतीच्या आड मी एकटीच कितीतरी वेळ रडत होती.. स्वतःला कोसत होती.. मी पूर्णपणे तुटली होती..

कसंबसं स्वतःला सावरून मी आरव आणि त्याच्या ग्रुप समोर जाऊन उभी राहिली.. मला अचानक पाहताच त्या लोकांचे चेहरे पडले होते.. माझ्या डोळ्यातले अश्रू पाहूनच ; त्यांना मी सर्वकाही ऐकल्याचा अंदाज आला होता..

'थँक्स आरव.. थँक्स मला माझ्या नीचपणाची जाणीव करून दिल्याबद्दल.. माझ्याशी जशास तसे वागून; माझे डोळे उघडल्याबद्दल.. मी.. मी.. उद्याच तुला तुझे सारे गिफ्ट्स परत करेन.. अगदी नवे कोरे.. थँक्स वन्स अगेन!!'- मी तिथून रडतच निघाली होती.. 

'त्यानंतर कित्येक दिवस मी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं.. मी माझ्याच नजरेत पडली होती.. सुर्या सोबतचे मोमेंट्स आठवून माझी हालत अधिकच बिकट बनत चालली होती.. त्याच प्रेम आठवून; मी पश्चातापाच्या आगीत होरपळत होती.. आय मिन आजही होरपळते आहे.. शेवटी कसंबसं स्वतःला सावरून मी त्या वर्षाची परीक्षा दिली होती.. सुर्या समोर जाण्याची हिंमत होतच नव्हती.. शेवटचा पेपर संपला आणि मी धीर एकवटून मी सूर्याच्या शोधात गेली तर तो आधीच कॉलेज सोडून गेल्याचं कळलं.. तेव्हापासून मी तुला शोधतेय सुर्या.. प्लीज मला माफ कर.. मी तुझ्याशी धोका करून खूप मोठी चूक केली होती.. माझ्या पापाला माफ कर सुर्या...'- रुचिरा सूर्याच्या पायाशी जात कळवळून विनंती करत होती..

भरल्या डोळ्यांनी तिने त्याच्याकडे पाहिलं तर त्याचा चेहरा अजूनही भावनाशून्य होता.. त्याच अस दुर्लक्ष करणे तिला अधिकच वेदना देत होतं..

'ऐकलं सारं तुझं.. आता मी सांगते ते ऐक.. तुझ्या गिफ्ट्सचा, महागड्या जेवणाचा खर्च सुर्या कसा निभावत होता हे तर तुला आरवकडून कळलंच आहे... पण यांत अजून एक गोष्ट तुलाच काय कोणालाच माहीत नाही.. '- शरयूने बोलता बोलता पॉज घेत सूर्याकडे डोळे रोखले तशी त्याच्या हृदयाची धडधड वाढली..

'गॅरेजमध्ये काम करूनही सूर्याला तुझ्या मागण्या पुर्ण करता येत नव्हत्या.. पण तुझ्यावर तो अगदी आंधळेपणाने प्रेम करत होता.. अगदीच जमेनासे झालं तसं त्याने हॉस्टेल सोडून अक्षरशः रस्त्यावर राहायला सुरू केलं.. रवी हॉस्टेलसाठी देत असलेले पैसे तो तुझ्यावर खर्च करू लागला होता.. पण तु तर त्याच्यापासून पळ काढण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत होतीस.. शेवटी त्या पैशातही तुझं भागेना म्हंटल्यावर एका क्षणात रवीची शिकवणूक मातीमोल झाली होती..'- शरयू आता सूर्याच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिली होती.. 

'आत्या..'- सूर्याला आता दरदरून घाम फुटला होता.. त्याची तशी अवस्था पाहून सगळेच हैराण झाले होते...

'तुझ्या खोट्या प्रेमाच्या आहारी जाऊन, राजे सगळी नीतिमूल्ये विसरले होते.. कमी कष्टात, कमी वेळात जास्त पैसे मिळवण्याच्या नादात याने ड्रग सप्लायरांशी हात मिळवणी केली होती.. अधिकच्या पैशांसाठी हा त्यांच्या ग्राहकांना ड्रग्ज पोहचवण्याचे काम करत होता.. तुझा बर्थडे साजरा करण्यासाठीचे पैसे याने असेच तर जमवले होते.. बरोबर ना??'- शरयूने सूर्याकडे पुनः डोळे रोखत विचारलं..

'सॉरी आत्या..'- सुर्या मान खाली घालून पुटपुटला..

पुढच्या क्षणाला सूर्याच्या गालावर एक जोरदार फटका पडला होता... अनपेक्षित फटक्याने सुर्या तर हललाच होता पण उपस्थित साऱ्यांच्या शरीरातून भीतीची एक लहर पास झाली होती.. शरयूचे डोळे भयंकर लाल झाले होते.. तिच्या हाताच्या मुठी अजूनही घट्ट वळलेल्या होत्या..

'रागिणी...'- शरयू पटकन रागिणी मॅडमकडे वळली तशा काही क्षणांसाठी त्याही गडबडल्या..

'तिवारीच्या केस मधून हा सहीसलामत बाहेर पडेल हे मी माझ्या भावाला दिलेलं वचन आहे आणि ते पुर्ण होईलच.. बट ड्रग्ज केसमधून जर हा बाहेर पडला तर तुझी माझ्याशी गाठ आहे एवढं लक्षात ठेव!!'- शरयू रागाने फुत्कारली तशी रागिणी मॅडमनी आपली मान डोलवत होकार कळवला..

'काय बाई आहे ही साहेब.. मॅडमचाही यांच्यासमोर आवाज फुटत नाहीये.. आपण उगाच सूर्याला थर्ड डिग्री देत बसलो.. या आधी आल्या असत्या तर आपला मनस्ताप वाचला असता..'- हवालदार माने इंस्पेक्टर सावंतांच्या कानात खुसपुसत होते..

'सुर्या..'- शरयू रागाने पुन्हा एकदा सुर्याजवळ गेलीच होती की आशिषने तिचा हात धरला होता.. आपले दोन्ही हात तिच्या गालावरून फिरवत त्याने तिला शांत केलं होतं..

'सुर्या.. प्रेम करणं चुकीचं नाही.. तुझ्या प्रेम करण्याला कोणाचाच आक्षेप नव्हता रे! प्रेम करण्यासाठीची तुझी निवड चुकली ही तुझी नियती होती.. तुझ्या आयुष्यातील वाईट स्वप्नं समजू आपण.. पण तिच्या मागण्या ऐकून वेळीच तुझे डोळे उघडायला हवे होते ना रे?? बरं डोळे नाही उघडले तरी तु त्या मागण्या चांगल्या मार्गाने निभवायला हव्या होत्या.. वाईट मार्ग निवडण्याआधी कदाचित एकदा तरी रुचिराशी संवाद साधला असता तर सत्य तुला खूप अधिच कळलं असतं.. तुला स्वतःला वेळीच सावरता आलं असतं.. प्रेमात धोका मिळाला म्हणून तुझं भरकटण तु न्याय्य समजू शकतोस... पण तुझ्या अशा भरकटण्याने आसप्रति असलेल्या तुझ्या कर्तव्याशी तु केलेल्या गद्दारीचे तु समर्थन करशील?? रवीने तुझी हुशारी पाहून तुझ्या वकिलीच्या शिक्षणाचा खर्च उचलला.. संस्थेच्या खर्चात काटकसर करून; तुझ्यावर पैसे खर्च केले गेले.. स्वतःच्या मुलापेक्षा त्याने तुझ्याकडून अपेक्षा ठेवल्या होत्या.. काय चुकलं रे त्याच?? तु तुझं शिक्षण पुर्ण केलं असतं तर कावेरी पांडे केसमध्ये संध्याऐवजी आज तुझं नाव झालं असतं.. रुचिरावर डोळे झाकून प्रेम करताना जरा डोळसपणे आपली कर्तव्य आठवली असतीस तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती...' - आशिषने सूर्याची सौम्य शब्दांत कानउघडणी केली होती..

'सॉरी अंकल, सॉरी आंटी.. हे सगळं माझ्यामुळे झालं.. आय एम सॉरी..'- रुचिराने बोलताना हात जोडले होते.. रडून रडून तिची अवस्था अगदीच बिकट झाली होती..

'इट्स ओके रुचिरा.. माझी तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाही.. '- सूर्याने तोंड उघडलं अन एकवार शरयुकडे पाहत पुन्हा मान खाली घातली होती..

'तु.. तु मला माफ केलंस सुर्या?? रियली??'- रुचिला काहीसं हायसं वाटलं होतं..

'माहित नाही.. पण तुला माझ्या चुकांबद्दल गिल्टी फिल करायची गरज नाही.. चुका मी केल्या आहेत.. त्यांचं प्रायश्चितही मिच करेन..'- सूर्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं होतं..

'आत्या, काका.. मी जे केलं ते माफीच्या लायकीचे बिल्कुल नाही हे मलाही माहित आहे.. पण आता मी मेलो तरी बेहत्तर बट रवीबाबाला अभिमान वाटण्यासारखं एकतरी काम मी नक्कीच करेन... मला रवी बाबाला भेटायचं आहे आत्या.. मला बाबाला भेटायचं आहे..'- सूर्याच्या रडण्याचा आवेग वाढला होता..

'नक्कीच.. मी तुझी रवीशी भेट नक्कीच घालून देईन.. जे तु प्रदिप तिवारीसोबत केलंस त्याबद्दल मला तुझा अभिमान आहे सुर्या..'- शरयूने त्याच्या केसांतून हात फिरवत म्हटलं.. 

'सो माय डार्लिंग! तुझ्या काळ्या कोटाला इस्त्री करून ठेव.. ही केस तुलाच लढवायची आहे.. आणि जर तुझी ईच्छा नसेल तर सांग.. म्हणजे मला तुझ्या गरोदर लेकीला कोर्टात उभं करायला..'- शरयूने आशिषकडे पाहत म्हटलं तसा तो हसला आणि त्याने डोळ्यांनीच तिला होकार कळवला..

'काकी? रुचिरा?? आय मीन काका बोलले होते की ती केस लढवणार म्हणून??'- निशांतने गोंधळून विचारलं..

'आता जे मी बोलली तेच होईल.. ही केस एकतर आशिष साटम लढेल नाहीतर संध्या कंबळे लढेल.. रुचिरा बिल्कुल नाही!!'- शरयूने शांतपणे म्हटलं.. 

'आंटी?? असं अचानक चेंज का? तुमचापण माझ्यावर भरोसा नाही का??'- रुचिरा पुन्हा रडवलेली झाली होती...

'हो.. धोका देणं तुझ्या रक्तात आहे.. त्याची झलक तु आधीही दाखवली आहेस.. आणि आता स्वतःच्या चुलत भावाच्या विरोधात तुझी इमानदारी किती टिकेल याची मलातरी ग्यारंटी नाही..'- शरयूने रुचिकडे निर्विकार पाहत म्हटले तसे सारे शॉक झाले होते..

'शरयू?? म्हणजे??'- रागिणीमॅडमनी विचारलं..

' मिस. रुचिरा तिवारी ही आरोपी प्रदिप तिवारीची सख्खी चुलत बहिण आहे..'- शरयूने केलेला गौप्यस्फोट ऐकूनच सारे चकीत झाले होते..

'तुम्हीं येऊ शकता मिस. रुचिरा.. तुमच्या सहकार्याबद्दल तुमचे आभार.. वेळ आलीच तर आम्ही तुमची मदत घेऊ.. बट सध्या..'- शरयूने रुचिराला निरोपपर म्हटलं..

'मी समजू शकते मॅडम.. मी जे केलंय ते खूप मोठं पाप आहे.. माझ्यामुळे कोणाचंतरी अक्खा आयुष्य उद्धवस्त झालं.. कितीतरी अपेक्षांचा चुराडा झाला.. बट मॅम.. मॅम.. आता ती वाली रुचिरा माझ्यात शिल्लक राहिली नाहीये.. ती त्याच दिवशी मेली; ज्या दिवशी आरवच्या नजरेत मला माझी जागा कळली.. माझे अश्रू, माझा पश्चात्ताप खरा आहे मॅम.. मी.. मी तुम्हांला कोणालाच फोर्स करणार नाही.. कोणालाच फोर्स करणार नाही बट आय लव्ह सुर्या हे फॅक्ट आहे.. वेळ आली की मी ते प्रूव्ह करेलच.. तुम्हीं सूर्याला एकहाती वाचवाल यात शंकाच नाही बट जेंव्हा कधी तुम्हांला माझी गरज लागेल तेव्हा नक्की आवाज द्या मॅम.. मी.. मी जिथे पण असेन; तिथून सूर्यासाठी हजर होईन..'- रुचिरा डोळे फुसत तिकडून बाहेर पडली होती..

'सुर्या, तुझ्या माफीची मी कायमच वाट पाहत राहीन.. मे बी त्याशिवाय मला मुक्तीही मिळणार नाही!!'- रुचिरा निघता निघता थांबून बोलून गेली तसं शरयुला ते विचित्र वाटलं...

क्रमशः

© मयुरेश तांबे

कथेचे सारे अधिकार लेखकाच्या अधीन असून; कथा नावासाहित प्रसिद्ध करण्यास काही हरकत नाही.. 

सादर कथा ही काल्पनिक असून;   एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती..

धन्यवाद..

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Mayuresh G. Tambe

Service

नमस्कार मंडळी.. इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि नोकरी.. त्यामुळे नट आणि बोल्ट भोवती फिरणाऱ्या आयुष्यात विरंगुळा म्हणून जस जमतं तसं लिहितो.. आवडलं तर दाद द्या आणि नाही आवडलं तर नक्कीच हटका..