Oct 24, 2021
कथामालिका

फक्त तुझ्यासाठी!!- भाग २

Read Later
फक्त तुझ्यासाठी!!- भाग २

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

'साल्या सगळ्या विश्वासघातकी बायका एकाच केसमध्ये एकत्र आल्यात निशांत...'- सूर्याचा आवाज वाढला तसा निशांत चकीत झाला होता..

'मी.. मी अजून दोन-तीन दिवस नक्कीच जिवंत राहीन.. बट मी तुला आजच सांगतो.. वकील बदल.. ही बाई एक नंबरची स्वार्थी आहे.. कधी पैशासाठी आपल्या पाठीत खंजीर खुपसेल; आपल्यालाही कळणार नाही.. ही.. ही नको...'- सूर्याने मान फिरवत सांगितलं तस रुचिराला अधिकच रडू कोसळलं.. 

आपल्या तोंडावर हात ठेवून ती मागच्या मागे धावत तिथून बाहेर पडली होती..

                             -----------
रुचिराला तसं रडत परतलेली पाहून निशांत गोंधळला होता. 

'तु ओळखतोस तिला??'- त्याने सूर्याला विचारलं..

'चांगलंच!'- सूर्याने दुखावलेल्या मनाने उत्तर दिलं.. त्याचा स्वर पाहूनच निशांतने पुढे काही विचारण्याचे टाळले होते..

'तु दुसरा वकील बघ.. बट ती नको..'- सुर्याने सुजलेल्या डोळ्यांनी निशांतकडे पाहत म्हटलं..

'तुला वाटतं का आमदार तिवारीच्या विरोधात जाऊन तुझी केस लढवायला कोणी तयार होईल ??'- रागिणी मॅडम अचानकपणे आत आल्या तशा सुर्या आणि निशांत दोघांच्याही कपाळावर आठ्या पसरल्या होत्या..

'अनघा आमच्याकडे आली तेव्हा तु होतास ना तिच्यासोबत?? मला आता थोडं थोडं आठवतंय..'- रागिणी मॅडमनी निशांतकडे पाहत विचारलं..

'हो.. मलाही आठवतंय की तुम्हीं एका वीरांगनेच्या थाटात आम्हांला न्याय मिळवून देण्याची घोषणा केली होतात.. आणि जेव्हा वेळ आली तेव्हा शेपूट घातला होतात..'- निशांतने कडव्या शब्दांत मॅडमची निर्भत्सना केली..

'मी.. मी समजू शकते.. तुमच्या जागी मी असती तर कदाचित मी ही तेच केलं असतं.. सुर्या सारखीच चिडली असती.. बट..बट माझा पण नाईलाज होता रे.. मी आयुष्यात पहिल्यांदाच कोणाच्या तरी दबावाला बळी पडून माझ्या कर्तव्याशी गद्दारी केली..'- रागिणी मॅडमच्या डोळयांत पुन्हा पाणी जमा होऊ लागलं होतं.. 

'माने, सोडा त्याला..'- मॅडमनी सांगताच हवालदार मानेनीं सूर्याला बांधलेल्या साऱ्या दोऱ्या मोकळ्या केल्या होत्या.. 

मारहाणीमुळे थकलेला सूर्याचा देह; दोऱ्यांचा आधार सुटताच गडबडला होता, जमिनीवर कोसळला होता.. निशांत आणि मानेंनीं त्याच्या काखेत हात घालून त्याला खुर्चीवर बसवलं होतं..

'सुर्या, तुझ्याच वयाची मुलगी आहे रे मला.. जेव्हा ती केस माझ्याकडे आली तेव्हा मी अनघाला न्याय मिळवून देण्याचा निश्चय केला होता.. आणि.. तु.. तु  इन्स्पेक्टर सावंतांना विचार हवं तर.. आम्ही सगळे पुरावे जमा करण्यासाठी दिवसरात्र एक केली होती.. सारी भट्टी जुळून आली होती.. कोर्टात फक्त ते पुरावे सादर करण्याची खोटी; प्रदिप तिवारीची शिक्षा पक्की होती... पण..'- बोलता बोलता रागिणी मॅडमना हुंदका आला आणि त्या बोलायच्या थांबल्या.. मान खुर्चीच्या हेडरेस्टवर टाकून त्या स्फुंदून रडू लागल्या.. 

'आमदार तिवारीला आम्ही जमा केलेल्या पुराव्याची खबर लागली आणि त्याने मॅडमच्या मुलीला किडनॅप केलं.. एक-दोन दिवस जंगजंग पछाडूनही आम्हांला आस्थाचा तपास लागत नव्हता.. आणि अचानक मॅडमच्या मोबाईलवर कोणीतरी एक व्हिडिओ पाठवला होता.. आणि सारी गणितं उलटी झाली...'- इन्स्पेक्टर सावंतही बोलता बोलता थांबले..

'असं काय होतं त्या व्हिडीओमध्ये??'- निशांतने विचारलं..

'अर्धनग्न अवस्थेतील अन बेशुद्ध आस्थासोबत प्रदिप तिवारी विकृत चाळे करतानाचा व्हिडीओ  होता तो..'- सूर्याने तोंड उघडताच सारेच चक्रावले होते..

'व्हाट?? तुला कसं माहीत हे??'- रागिणी मॅडम ताडकन उभ्या राहिल्या होत्या..

'मग तुम्हांला काय वाटतंय की मी उगाचच तुमच्या स्वाधीन झालोय?? मिस. आस्था राणेंच्या आई..'- सूर्या गूढ हसत होता..

'म्हणजे?? अँड तु आस्थाला कसा ओळखतोस?? आणि तु माझ्या स्वाधीन झालास म्हणजे समजलं नाही मला??'- रागिणी मॅडमनी प्रश्नांकित चेहऱ्याने इन्स्पेक्टर सावंताकडे पाहिलं तसे त्यांनीही खांदे वर करत त्यांनाही याबाबत काही माहित नसल्याचा इशारा केला होता..

'आस्था आणि माझं एकच कॉलेज.. माधव कॉलेज.. ती बि. एम. एस स्टुडंट तर मी लॉ चा!! कॉलेज कॅन्टीनमध्ये आमची भेट व्हायची.. आमच्यात छान मैत्री होती; आय मिन अजूनही आहे.. तिच्यासोबत जे घडलं त्याने ती अजूनही जबर मानसिक धक्क्यात आहे.. बरोबर ना??'- सूर्याने खुलासा केला तशी रागिणी मॅडमनी त्याच्या प्रश्नावर होकारार्थी मान डोलवली..

'बट तिने त्याच तणावात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता हे तुम्हाला माहीत नसेल??'- सूर्याने गंभीर होत विचारलं..

'काय??'- मॅडम जवळपास ओरडल्याच..

'हो.. तिला त्या व्हिडीओबद्दल कळलं होतं.. एकतर स्वतःची झालेली बेअब्रू आणि त्यात त्या व्हिडीओमुळे तुमच्या कारकिर्दीला लागलेला डाग तिला सहन होत नव्हता.. त्यात प्रदिप तिवारीने तिला ब्लॅकमेल करायला सुरू केलं होतं.. व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवून तो तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता.. सारा ताण तिला असह्य होत चालला होता.. तिने स्वतःला गळफास लावून घेतलाच होता की मी तिथे वेळेत पोहचलो होतो.. मी खरंतर तिकडे तुम्हाला जाब विचारण्यासाठी आलो होतो बट तिथे आल्यावर मला पुर्ण सत्य कळले.. मी आस्थाला धीर दिला आणि आम्ही तेव्हाच ठरवलं की प्रदिप तिवारीला आणि त्याच्या माध्यमातून समस्त  बलात्काऱ्यांना जन्माची अद्दल घडवायची..'- सूर्याने शांतपणे आपले म्हणणे मांडले..

'मग तुझं आमच्या स्वाधीन होण्याचे प्रयोजन काय??'- मॅडमनी विचारलं..

' तिवारीच्या बोलण्याप्रमाणे वागून तुम्ही तुमच्या मुलीची सुटका करून घेतलात असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे; हे तुम्हांला सांगायला आत आलोय मी.. आणि जितका सुरक्षित मी इथे आत आहे तितका तर मी बाहेरही नसेन..'- सूर्याने हसत म्हटलं..

'मला खरंच माहीत नव्हतं सावंत की तो तिवारी इतका खालच्या थराला जाईल म्हणून.. बट आता नाही.. आता नाही.. या आधी त्याचा सामना डी सी पी रागिणी राणे सोबत होता बट आता त्याचा सामना आस्थाच्या आईशी आहे.. आणि एका आईशी कोणीही पंगा घेऊच नये..'- रागिणी मॅडमनी मुठी आवळल्या होत्या..

'ओ अँग्री लेडी डॉन.. कंट्रोल.. कंट्रोल... तो तिवारी पूर्वाश्रमीचा गुंड आहे माहित आहे ना?? आता राजकारणात आलाय तो.. फक्त कपडे बदलले आहेत त्याने; डोकं नाही.. त्यामुळे जरा शांत डोक्याने.. मागे लेकीला किडनॅप केलं; पुढच्या वेळी नवऱ्याला उचललं तर मग काय करणार सत्यवानाची सावित्री?? '- सुर्या खोचकपणे बोलला तशा रागिणी मॅडम भानावर आल्या..

'येस.. यु आर राईट.. माझंच चुकलं.. ही केस खूप शांतपणे हँडल करायला हवी...'- मॅडमनी विचारपूर्वक म्हटलं..

'अनघा कशी आहे रे आता??' - सूर्याने निशांतला विचारलं..

'ती अजून कशी असेल रे?? आधीच ती अंध आणि त्यात आता बलात्कारीत.. तिने जगायचं ठरवलं तरी आपला समाज तिला जगू देईल का??'- निशांतचे डोळे भरून आले होते..

'ह्म्मम.. हिच आपल्या समाजाची तऱ्हा.. आपल्या समाजाला बलात्कार करण्याऱ्यापेक्षा बलात्कार झालेल्या स्त्रीची उणीधुणी काढण्यात जास्त रस असतो..'- सूर्याने म्हटलं तसा सर्वांनीच त्याला दुजोरा दिला होता..

'मग आता पुढे काय ठरवलं आहेस सुर्या??'- रागिणी मॅडमनी विचारलं..

'पाहिले तर तुम्ही मला होतो तसा परत बांधून ठेवा.. अधूनमधून मानेनीं आत येऊन मला मारहाण केल्याची ऍक्टिग करावी आणि मी ओरडण्याचा अभिनय करेन..  म्हणजे बाकीच्यांसाठी तुमचा तपास सुरू असल्याचा भास कायम राहील..'- सुर्याने उपाय सांगायला सुरू केला होता..

'पण असं का??'- इन्स्पेक्टर सावंत..

'साहेब, भिंतीलापण कान असतात की.. आपल्याला ते कान जोपर्यंत दिसत नाहीत तोपर्यंत आपल्याला काळजी घ्यायला हवी की नाही??'- सूर्याने हसत विचारलं तशी सावंतांनी मान हलवत होकार दिला..

'निशांत तु जा आता, आणि दुसरा वकील शोध.. बाकी उद्या आपण भेटू परत..'- सूर्याने निशांतला जाण्यासाठी सांगितलं तसा तो बाहेर पडला होता..

'अनघाला सावर रे.. '- निशांतला निघताना सूर्याने भावुकपणे आवाज दिला होता..

'मॅडम, तुम्ही आज रात्री आस्थाशी शांतपणे बोला.. तिच्या मनावरचा ताण हटवा.. आपल्याला तिची खूप मदत लागणार आहे.. त्यामुळे तिची मनस्थिती लवकरात लवकर नॉर्मल होणे गरजेचे आहे..'- सूर्याने रागिणी मॅडमनाही त्यांचा आजचा रोल सांगितला होता..

'सावंत साहेब, माने काका; आपल्या तिघांना मिळून तिवारीचे या पोलिस स्टेशनमधील कान शोधून ठेवायचे आहेत..'- सूर्याच्या बोलण्यावर दोघांनीही होकार दर्शवला होता..

                                    --#--

पोलिस स्टेशनवरून घरी पोहचताच रुचिराने बेडरुममध्ये शिरून; लागलीच तो बंद केला होता.. स्वतःला बेडवर झोकून देत; तिने इतका वेळ दाबून ठेवलेल्या आपल्या भावनांना अश्रूद्वारे वाट मोकळी करून दिली होती..

'रुचि..?? रुची??'- तिची आई तिच्यामागे धावणार तोच घरी आलेल्या तिच्या मैत्रिणीने तिला थांबवलं होतं..

काही वेळ असेच रडल्यानंतर; रुचिराने आपल्या कपाटातून सूर्याचा फोटो काढला होता.. फोटो पाहून तिला तिच्या भूतकाळातल्या स्वार्थीपणाची अधिकच लाज वाटू लागली होती..

'चुकली सुर्या! मी चुकली.. सफशेल चुकली.. तुझ्यासोबत केलेल्या विश्वासघातकीपणाची किंमत मी आजही चुकवतेय रे.. इतक्या वर्षांत असा एकही दिवस गेला नाही की मी स्वतःच्या नजरेला नजर मिळवू शकली आहे.. '- रुचिरा आजही सूर्याचा फोटो समोर ठेवून स्वतःच्या कानशिलात बडवून घेत होती..

'आशा, हिच काही कळत नाही बघ.. मध्येच ठिक असते तर कधी असा दरवाजा बंद करून आत तासंतास रडत बसते.. जेव्हापासून कॉलेज संपलं आहे; तेव्हापासून तिचं हेच चालू आहे.. तिच नेमकं काय बिनसलं आहे हेच कळत नाहीये.. बर विचारलं तर सांगतही नाही.. काय करावं हेच सुचेनासे झालेय ग..'- रुचिची आई तिच्या मैत्रिणीकडे आपली कैफियत मांडत होती..

'तु एकदा तिला विश्वासात घेऊन; तिच्याशी बोल.. एका आईपेक्षा एक मैत्रीण बनून बोल.. तिला या घुसमटीतून मोकळं करणे खूप गरजेचे आहे.. असं वाटतंय की ती तिच्या मनावर खूप मोठं ओझं ठेवून जगतेय..'- आशाने आपलं म्हणणं मांडलं..

'अग आम्ही हरप्रकारे प्रयत्न केले.. ती माझ्यापेक्षा तिच्या बाबाच्या जास्त क्लोज आहे.. तो ही प्रयत्न करून करून थकला.. पण ही काही सांगेल तर शप्पथ!'- रुचिची आई हताशपणे बोलली..

'माझी भाची मानोपसाचार तज्ञ आहे.. आपण रुचिला तिच्याकडे न्यावं का?? जर तुम्हांला ओके असेल तर मी तिची वेळ घेऊन ठेवेन.. तशी ती नागपुरात असते पण आता काही दिवस माहेरी; मुबंईला आली आहे.. कदाचित ती आपली मदत करू शकेल.. '- आशाजीनीं रुचिच्या आईला सल्ला दिला..

'मी रुचिच्या बाबांशी बोलून कळवते तुला.. मलाही तुझं म्हणणं पटतंय..'- आईने मैत्रिणीच्या बोलण्याला सहमती दर्शवली होती...

                                    --#--

'काकू, अनघा??'- निशांतने जाधवांच्या घरी येत विचारलं..

'तिने अजूनही कोपरा आणि काळोख सोडला नाही आहे रे..'- जाधवकाकींनीं पदराने आपले डोळे फुसले..

'ठिक आहे काकू.. मी बघतो प्रयत्न करून..'- निशांत आवंढा गिळत अनघाच्या खोलीत पोहचला..

'अनु.. अनु? मी निशांत! आत येऊ का ग??'- निशांतने दरवाज्यातून विचारणा केली..

'तु इथे सारखा सारखा का येतोस रे?? काय मिळणार आहे तुला माझ्याकडून?? सगळं सगळं संपलं.. आधीच डोळे फुटलेली मुलगी; आता एक बलात्कारीत मुलगी आहे.. अशी मुलगी की जिला स्वतःच्या बलात्काऱ्यांना साधी शिक्षाही मिळवून देता आली नाहीये.. मी न्यायासाठी उभी राहीली तर समाजाकडून मला काय भेटलं?? फक्त टोमणे आणि मानसिक अवहेलना... मी.. मी आधीच माझ्या घरच्यांवर ओझं बनून आहे आणि त्यात अजून तुझी भर कशाला?? जा.. जा.. तु..'- अनघाने एका दमात आपलं दुःख निशांतसमोर नव्याने मांडलं होतं..

'मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये अनघा.. माझं प्रेम आहे तुझ्यावर.. आणि तु न केलेल्या गुन्ह्यासाठी; मी माझ्या प्रेमाला असं अर्ध्या वाटेत सोडणार नाही..'- निशांतने निश्चयी भाषेत म्हटलं..

'निशु, असा हट्ट नको करूस रे.. ऐक माझं.. मी आंधळी होती तोपर्यंत ठिक होतं.. पण आता मी एक बेअब्रू झालेली मुलगी आहे.. समाजाच्या दृष्टीने अपवित्र.. माझ्या आयुष्याला उभारी देण्याच्या नादात; तुझं आयुष्य उध्वस्त झालेलं मला कधीही सहन होणार नाही..'- एवढं बोलून अनघा गुढघ्यात डोकं खुपसून रडू लागली होती..

'तु स्वतःला का अशी शिक्षा देते आहेस अनु?? अग गुन्हा त्या लोकांनी केला.. तुझ्या असहाय्यतेचा गैरफायदा त्यांनी घेतला तर त्यात तुझी चूक काय??'- निशांतने थरथरता हात अनघाच्या केसांतून फिरवला तशी ती किंचाळून मागे झाली..

'सॉरी निशु.. सॉरी.. आजकल आईचा जरी स्पर्श झाला तरी किळस वाटतो.. असं वाटतं की कोणी दुसरा लांडगा मला ओरबाडायला जवळ आला आहे.. निशु.. जा तु.. विसरून जा मला.. मी आता तुझ्या लायकीची राहिली नाही.. जा तु.. निघून जा..'- अनघा आता अधिकच आक्रमक झाली तसा निशांत निमूटपणे तिथून निघाला होता..

'अनु.. तुला आजही सांगतो; अनघा माझा श्वास होता, आहे आणि असेल.. आणि माझ्यात जीव असेपर्यंत माझं तुझ्यावरच प्रेम असंच असेल.. मग तुझी मर्जी असो वा नसो..'- निशांत आपले डोळे फुसून जाधवांच्या घराबाहेर पडला होता...

                                  --#--


पुढिल दोन दिवस निशांत वकिलाच्या शोधत वणवण भटकत होता.. परंतु आमदार तिवारीच्या दशहतीमुळे कोणीच अनघा जाधवची केस हाती घ्यायला तयार होत नव्हतं.. 

सारा प्रकार निशांतने सूर्याच्या कानावर घातला तसा नाईलाजाने सूर्याने रुचिराला केस देण्यासाठी होकार दिला होता.. पण तिला केस देण्याआधी त्याने तिच्याशी एकदा बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती.. 

सूर्याचा निरोप कळताच रुचिरा तातडीने पोलिस स्टेशनमध्ये येण्यासाठी धावली होती.. आज काही करून तिला सूर्याची दाहकता कमी करायची होती.. आपल्या चुकांची कबुली देत; सुर्याची माफी मागण्याचा चान्स तिला गमवायचा नव्हता.. सुर्या देईल ती शिक्षा पुर्ण करण्याचे तिने ठरवले होते..


क्रमशः

© मयुरेश तांबे

कथेचे सारे अधिकार लेखकाच्या अधीन असून; कथा नावासाहित प्रसिद्ध करण्यास काही हरकत नाही.. 

सादर कथा ही काल्पनिक असून;   एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती..

धन्यवाद..

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Mayuresh G. Tambe

Service

नमस्कार मंडळी.. इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि नोकरी.. त्यामुळे नट आणि बोल्ट भोवती फिरणाऱ्या आयुष्यात विरंगुळा म्हणून जस जमतं तसं लिहितो.. आवडलं तर दाद द्या आणि नाही आवडलं तर नक्कीच हटका..