Oct 18, 2021
कथामालिका

फक्त तुझ्यासाठी!!- भाग ११

Read Later
फक्त तुझ्यासाठी!!- भाग ११
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

'सावंत, तिवारीला कव्हर करा!! त्याचा जीव धोक्यात आहे..'- इन्स्पेक्टर रागिणी जवळपास ओरडल्याच होत्या.

इन्स्पेक्टर सावंत गडबडीने तिवारीला कव्हर करायला धावलेच होते की एक गोळी बेसावध तिवारीच्या छातीतून आरपार गेली होती.. त्यातून तो सावरणार तोच दुसऱ्या गोळीने त्याच्या मस्तकाचा वेध घेतला होता.. कोणाला काही कळण्याच्या आतच तिवारीने जागीच प्राण सोडले होते..

                                 ----------------

कोर्टात एकच हलकल्लोळ सुरू झाला. लोकं भीतीने इकडेतिकडे सैरावरा पळू लागले. जज जोशी तर बसल्या जागी थरथरू लागला.

खुद्द आशिष अन संध्या ही हैराण झाले. दोघांच्याही चेहऱ्यांनीं आश्चर्याची परिसीमा गाठली होती. मध्येच आशिषच्या लक्षात आलं आणि त्याने विटनेस बॉक्सकडे नजर फिरवली.

तिवारीचा इतका भीषण मृत्यू होऊनही त्याच्या घरच्या दोन्हीं स्रिया जागच्या हलल्या नव्हत्या. तिवारीच्या आई अन बायकोचे डोळे काटोकाट भरले तरी पाण्याने डोळ्यांचा काठ तेवढा ओलांडला नव्हता. 

रागिणी मॅडमना तर नेमकं काय करायचं तेच सुचत नव्हतं. त्या कधी तिवारीच्या मृत शरीराकडे तर कधी शरयुकडे बघू लागल्या. 

त्या शरयुला जाब विचारायला पुढे सरसवणार तेवढ्यात त्यांना मोबाईलवर एक फोन आला..  सध्या पोलिसांच्या अटकेत असलेला निलंबित डीसीपी शर्मा आपलं जुनं वजन वापरून पोलिस स्टेशन मधून फरार झाला होता..

फोनवर आलेली बातमी ऐकताच रागिणी मॅडमना संशय आला तशी त्यांनी सभोवताली नजर फिरवली. अचानक एका कोपऱ्यात त्यांची नजर एका व्यक्तीवर स्थिरावली अन त्यांचा कयास अचूक ठरला.

'सावंत, शर्माना पकडा.. ताबडतोब..'- रागिणी मॅडम जवळजवळ किंचळल्याच.

त्यांचा आवाज ऐकून शरयूने मागे वळून पाहिलं तशी तिची अन शर्माची नजरानजर झाली. शर्माने जागीच शरयुला सॅल्युट ठोकला अन प्रत्युत्तर म्हणून शरयूच्या चेहऱ्यावर हसू पसरलं होतं. पुढे होत शर्मा स्वतःहून पोलिसांना शरण गेला आणि त्याने हल्ल्यात वापरलेलं पिस्तुल पोलिसांना सोपवलं.


क्षणात रागिणी मॅडमना क्लिक झालं आणि त्यांनी लागलीच शरयुला भर कोर्टात नमस्कार केला..

या साऱ्या घडामोडी पाहत असलेल्या आशिष अन संध्यालाही नेमका खेळ कळला होता. 

सुर्या, जाधव कुटुंब या विचित्र घटनाक्रमाने चक्रावले होते.. कोणालाच काही सुचत नव्हतं. अनघाला तर दिसत नसल्याने तिची सगळ्यांत जास्त चुळबूळ होती.

सगळ्यांना खेळाची सूत्रधार कळली तरी प्रत्येकाच्या मनात विविध प्रश्नांनी थैमान घातलं होतं. शरयुला ते जाणवलं आणि सभोवताली सगळ्यांकडे एकदा नजर फिरवत ती उठली..

सगळ्यांत जास्त अस्वस्थ असलेल्या अनघाकडे मोर्चा वळवत तिने तिच्या डोक्यावर हात ठेवत तिला आश्वस्त केलं. अनघाच्या मनाने शरयूचा स्पर्श ओळखला अन ती काहीशी शांत झाली.

'शरयू काकू! मला काहीच कळलं नाही काय झालं ते. तिवारी काकांना कोणी मारलं?'- अनघाने न राहवुन मनातलं विचारलं.

प्रत्युत्तर म्हणून शरयूचा हात पुन्हा एकदा तिच्या डोक्यावरून फिरला तस तिला कळून चुकलं की तिला उत्तर भेटेल परंतु त्याला काहीसा अवकाश लागणार होता.

शरयू सरळ पुढे जात विटनेस बॉक्समध्ये उभ्या असलेल्या दोन्ही स्रियांकडे पोहचली. तिने दोन्ही स्रियांसमोर आपले हात पुढे केले तश्या दोन्ही स्रिया तिचा एक एक हात पकडून ओक्सबोक्शी रडू लागल्या. इतका वेळ रोखून धरलेला बांध आता पुरता तुटून दोघींच्या डोळयातून अश्रूंचा महापूर वाहू लागला होता. शरयू दोघींशी हळू आवाजात काहीतरी बोलत त्यांचं सांत्वन करत होती.. तिच्या बोलण्याचा परिणाम म्हणून त्या स्रिया हळूहळू शांत होऊ लागल्या. 

त्या अगदीच सावरल्या तशी शरयू तिथून पुढे निघाली. आशिषच्या चेहऱ्यावरच प्रश्नचिन्ह वाचूनच तिला हसू आलं. पुढे होत; तिने त्याला कपाळावर किस करून त्याचा हात आपल्या हातात घेतला. ती पुढे काही बोलणार तितक्यातच कोर्टात एका लहानगीच्या रडण्याचा आवाज घुमला आणि सर्वांच्या नजरा त्या दिशेला वळल्या.

छोटी मीरा रडत होती अन अश्विनी तिला शांतपणे थोपटत आत येत होती. (अश्विनी हि शरयू अन आशिषची मोठी मुलगी)

तिला तसं येताना पाहताच आशिषच्या मुखचर्येवर गुंता सुटल्याच हसू फुललं. त्याने शरयुकडे पाहिलं तर तीही गोड हसत होती. 

बाकी साऱ्यांना काहीच कळेनासं झालं तसे ते एकमेकांचे तोंड पाहु लागले. खुद्द संध्यालाही काहीच लिंक लागत नव्हती.

'अरे यार मला कोणी सांगाल? काय चालू आहे हे?'- संध्याने नेमका सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारला.

'आशु.. आता मी मोकळी झाली रे! आता तुझं स्वप्न पुर्ण करायला मी खऱ्या अर्थाने तयार आहे. आता माझी जागा घेणारी तयार झाली आहे.'- शरयूने अश्विनीकडे पाहत नवऱ्याच्या हाताला हळुवार थोपटलं.

'मी बोलली होती ना तुला? अश्विनी म्हणजेच शरयू.. बघ तिने सिद्ध करून दाखवलं. कोणालाही कळलं नाही की खरी सूत्रधार ती आहे म्हणून..'- शरयूने कौतुकाने लेकीकडे पाहत होती.

बाकी सगळेच आता वेडावले होते.. संध्या तर सारं काही असह्य होऊन बाजूच्याच खुर्चीवर बसली. तिला तसं बसलेलं पाहून  अश्विनी तिच्याकडे पोहचली. मिराने मावशीला पाहून लगेच तिच्याकडे झेप घेतली.

'दिदी?? मला एका शब्दाने बोलली नाहीस तु?'- संध्या काहीशी नाराज झाली.

'अश्या खेळांचा पहिला रुल हाच आहे की आपली चाल आपल्या माणसांनाही कळू नये.'- अश्विनीने बहिणीच्या चेहऱ्यावरचा घाम आपल्या रुमालाने पुसला.

'आशाजी , शर्मिलाजी आप दोनोंकां बहोत शुक्रिया. स्वतःच्या घरच्या माणसाच्या विरोधात जाऊनही न्यायाची बाजू सोडली नाहीत, तिवारींनी केलेल्या कुकर्माना आपण सर्वांसमोर उघड केलंत. आपण दाखवलेली हिम्मत कित्येक कुटुंबांना वाचवणारी ठरली आहे. आता तुम्हींही तुमच्या मानसिक अटकेतून सुटला आहात. अप्रत्यक्षपणे त्यांच्या अपराधात सहभागी असल्याचं तुमच्या मनावरचं दडपण आता नाहीस होईल.'- अश्विनी त्या दोघींशी बोलताना स्वतःही काहीशी भावुक झाली.

'बेबी त्याने जे केलं ते चुकीचं होतं. माझ्या नातवाने कित्येक मुलींचीं आयुष्य बरबाद केली. त्यांची स्वप्न कुस्करून टाकली. त्याला सुधारवण्याऐवजी याने कायम त्याला पाठीशी घातलं. मुलाला चांगलं आयुष्य देण्याऐवजी त्याला काळ्या धंद्याच्या दलदलीत ढकलून दिलं. रुचिराने आम्हांला हिम्मत दिली; तु आम्हांला मार्ग दाखवलास म्हणून तर आम्ही इथवर बोलू शकलो.'- आशाजी आता बऱ्या पैकी सावरल्या असल्या तरी शर्मिलाजी अजूनही स्फुंदत होत्या.

'आपलं दुःख मी समजू शकते. स्वतःच्या नवऱ्याच्या विरोधात उभे राहणे. स्वतःच्या डोळ्यादेखत त्याला दम तोडताना पाहणं; सार काही वेदनादायी आहेच. पण तुमच्या एका साक्षीने किती तरी जीव वाचवले आहेत. किती तरी संसार उध्वस्त होण्यापासून वाचले आहेत. तुमचं बलिदान कधीच वाया जाणार नाही. तुमचं कुंकू पुसलं गेलं तरी पुढे कितीतरी बायकांचे सौभाग्य वाचवल्याचं पुण्य तुमच्या पदरात असेल. किड मुळासकट उपटून काढल्याशिवाय ती मरत नाही म्हणून त्यांना मरावं लागलं. अटकेत गेले असते तर कसेही करून ते बाहेर आलेच असते अन पुन्हा एकदा मृत्यूचे तांडव सुरू झालं असत. नाईलाज होता आमचा.. मला माफ करा!'- अश्विनीने तिवारीच्या बायकोसमोर हात जोडले.

'इतना लज्जित मत करो बेटा.. वो कैसे थे; मुझे मालूम था. वो जिंदा रहते तो क्या करते; इसका अंदाजा मुझे भी था. असंही  त्यांनी जितके गुन्हे केली त्याची खरी सजा तर फाशीच होती. शेवटी त्यांना मृत्यूदंड तर मिळाला पण तो असा..'- त्यांना हुंदका आवरला नाही आणि त्यांच्या डोळयातून पुन्हा एकदा अश्रुधारा वाहू लागल्या.

'एम रिअली सॉरी. खरच माफ करा मला.. भारतीय स्त्री नवरा कसाही असला तरी भावनिक दृष्टीने त्याच्याशी बांधलेली असते आणि ही गोष्ट मी ध्यानात ठेवायला हवी होती. माफ करा.'- अश्विनीलाही स्वतःचा निर्णय मनाला लागला होता त्यामुळे तिचेही डोळे पाणावले.

तिने लागलीच शरयुकडे पाहिलं तर शरयूच्या नजरेतूनच तिला शिकवणी भेटली होती. अश्विनीला लख्ख आठवलं होतं; तिने जेव्हा तिवारीच्या विरोधात स्वतः लढायचं ठरवलं तेव्हाच शरयूने तिला तिच्यातल्या क्रूरपणाला आवर घालण्याचा सल्ला दिला होता. पण मिरासोबत झालेल्या प्रकाराने खवळलेल्या अश्विनीने तिवारीला निर्दयपणे मारण्याचा निश्चय कायम ठेवला होता. आता मात्र तिवारीच्या आई अन बायकोचे दुःख पाहून तिला स्वतःचा निर्णय चुकल्यासारखा वाटू लागला होता.

'जो हो गया सो हो गया बेटी. आगे से इस बात का खयाल रखना. दुष्मन का भी परिवार होता हैं. और अगर हम इतने खुंखार बनकर दुष्मनी निभायेंगे तो फिर उसमे और तुममे क्या फरक रह गया??'- आशाजीनीं अश्विनीची खाली घातलेली मान हनुवटीला धरून वर केली.

'खरं बोलताय तुम्हीं. मी याबाबत माझ्या आईचं ऐकायला हवं होतं. तिने मला याबाबत आधीच सावध केलं होतं.'- अश्विनीने अश्रूपूर्ण नजर शरयुच्या दिशेने वळवली आणि नजरेनेच आपल्या चुकीची कबुली दिली.

'तुझी निवृत्ती बहुदा लांबवावी लागेल.'- आशिषने लेकीकडे पाहत शरयुला म्हटलं.

'बहुतेक.'- शरयूलाही अश्विनीची ही चाल अजिबात रुचली नव्हती.

शेवटी शरयूने पुढाकार घेत अश्विनीच्या वतीने दोन्हीं स्रियांची पुन्हा एकदा माफी मागितली होती. तिच्या बोलण्यावरून तिने या आधीच्या संभाषणातूनही त्यांनी स्वतःच्या लेकीच्या आततायीपणाबद्दल स्वतः ला दोषी ठरवत त्यांच्याकडे क्षमायाचना केल्याच बाकीच्यांना कळलं होतं.

काही काळ एकमेकांशी बोलल्यानंतर तिथलं वातावरण काहीसे निवळले होते. 


तिवारीचा मृतदेह पोलिसांनी घटनास्थळावरून हलवला. तिवारीचे बंधू अन रुचिराचे वडील पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलिसांसोबत रवाना झाले.

सूर्याने सगळ्यांच्या संभाषणातुन रुचिराचा उल्लेख ऐकला होता मात्र ती त्याला आसपास कुठेच नजर आली नव्हती. त्याची नजर आजूबाजूला तिला शोधतच होती. जसजसे सगळे कोपरे संपत आले तशी त्याची अस्वस्थता वाढू लागली होती.

'रुचिराला शोधतोय?'- अचानकपणे शरयूने त्याच्या समोर येत त्याला सवाल केला तसा तो हडबडला.

'ना. नाही..'- सूर्याने सटकन मान खाली घातली.

'तिवारीशी लढणं कधीच सोप्प नव्हतं सुर्या! रुचिराने मदत केली नसती तर हे सगळं अशक्यच होतं. तिनेच स्वतःच्या काकी अन आजीला सत्याच्या बाजूला उभं राहण्यासाठी प्रवृत्त केलं. स्वतःच्या जीवाची बाजी लावत तिने कोणाला कानोकान खबर न लागू देता या दोघींना कोर्टात साक्ष देण्यासाठी कबुल केलं होतं. सुरुवातीला तुझी केस घेण्यासाठी कोणीच तयार होत नव्हतं तेव्हा तुझी केस घेणारी रुचिरा होती. तिची ओळख तुझ्यापासून लपवण्यासाठी तिने निशांतला आपलं खोटं आडनाव सांगितलं. तिला तेव्हाही तुझी मदतच करायची होती. पण तुझा तिरस्कार पाहून ती खूप खचली होती. तुला वाटतं संध्याने आम्हांला तुझ्या निरोपावरून बोलवलं?? नाही. फक्त तुझ्यासाठी तिने संध्याला फोन करून तुझी केस लढण्याची विनंती केली होती. गर्भारपणामुळे संध्याने तिला नकार दिला. महेशलाही काही कारणास्तव वेळ देणं शक्य नव्हतं त्यामुळे नाईलाजाने आम्हांला इथे यावं लागलं. रुचिराने धोका पत्करून आम्हांला सहाय्य केलं नसतं तर तुझं वाचणं अशक्य होतं सुर्या. खूप जळली ती पश्चात्तापाच्या आगीत! नाही सहन झालं ; तुझं असं तिचा तिरस्कार करणं. शेवटी अशीच गेली तुझ्या माफीची वाट पाहून.'- शरयूने सूर्याला रुचिराने दिलेली साथ सविस्तरपणे सांगितलं.

'गेली? म्हणजे कुठे गेली?'- सूर्याने रडवलेल्या चेहऱ्याने विचारलं.

'दूर.. खूप दूर. तुझ्यापासून दूर.'- शरयूने गंभीर स्वरात सांगितलं..

'नाही आत्या; असं नको म्हणूस. प्लिज. कुठे गेली ती अशी मला सोडून??'- सुर्या मटकन गुडघ्यावर बसून रडू लागला होता. 

त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अनघा त्याला सावरायला  पुढे सरसावली होतीच तोच शरयूच्या इशाऱ्यावरून जाधवांनी लेकीला हाताला धरून जागीच थांबवलं होतं.

'आत्या माझ्या मनात असं काही नव्हतं ग. माझं आजही तिच्यावर खूप प्रेम आहे. तिने माझ्याशी ब्रेकअप केला तेव्हा मला माझी लायकी कळली ग. पण तिला सुखात बघून मी खुश होतो. आरवचं सत्य समोर आल्यावर तिला झालेली चुकीची जाणीव माझ्या कानावर आली होती. ती मला शोधत असल्याचं मला कळलं होतं. पण मला पुन्हा तिच्या आयुष्यात जायचं नव्हतं कारण ती सुखात रहावी एवढीच माझी इच्छा होती. माझ्या प्रेमाचं बलिदान केलं ते फक्त तिच्यासाठी. फक्त तिच्यासाठीच!'- सुर्या आपला चेहरा ओंजळीत लपवून रडतच होता..

'पण मी जगतेय ती फक्त तुझ्यासाठी! तुझ्या माफीसाठी! तुझ्या प्रेमासाठी! मी कुठेही गेली नाहीये सुर्या. इथेच आहे; तुझ्या प्रेमाची वाट पाहत. तुझ्या मिठीची वाट पाहत!'- सूर्याने डोळे उघडून पाहिलं तर रुचिरा त्याच्या समोरच बसून होती.

तिचेही डोळे भरले होते. सूर्याच्या मनात आपल्याबद्दल आजही जागी असलेली प्रेमभावना कळल्यावर ती काहीशी सुखावली होती.

'रुचिरा..'- सूर्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले अन त्याने पटकन तिला आपल्या मिठीत घेतलं.

'मला माफ कर पिट्टू.. एम रियली सॉरी. मी तुला भयंकर वेदना दिल्यात. माझी चूक माफीच्या लायकीची नाहीच पण तरीही प्लिज विल यु फॉरगिव्ह मी?'- रुचिराने भावुकपणे विचारलं.

'तु अनघाला न्याय मिळवून देण्यासाठी आतेला मदत करून स्वतःच्या चुकांचे परिमार्जन केलं आहेस. सो तुझ्या मनावरचं ओझं आता उतरवून टाक.. सुखाने अन आनंदात जग.. जा.. मस्तपैकी जग. अगदी तुझ्या मनासारखं.'- सूर्याने अचानक स्वतःला रुचिरापासून वेगळं केलं तसे सगळे चकीत झाले.

'सुर्या?? का असं? म्हणजे तु मला अजुन माफ केलं नाहीस?'- रुचिराच्या चेहऱ्यावर पुनः दुःख दाटून आलं.

'तसं नाही ग. पण मी असा गुन्हेगार. त्यात बेरोजगार. प्रेम तर करेन पण तुला सांभाळू कसं? प्रेमाने सगळ्या गरजा भागत नाहीत ना? त्यापेक्षा तु एखादा छान मुलगा बघून सेटल हो. मला तुला सुखात बघायचं आहे..'- सुर्या बळेच हसून म्हणाला अन शांत झाला.

'सुर्या?? एकदा तुझ्या प्रेमाशी धोका केलाय पण आता नाही जमणार रे! किती तरी दिवस जिवंत असून मेल्यासारखी राहीली ती फक्त तुझ्यासाठी! तुझ्या माफीसाठी तडफली; मागच्या चार वर्षांत एकदाही गोडाचा एक कण तोंडात नाही टाकला; फक्त तुझ्यासाठी! आताही तुला मी तुझ्या आयुष्यात नको असेन तर तुझ्यापासून दूर निघून जाईन; फक्त तुझ्यासाठी सुर्या! फक्त तुझ्या सुखासाठी विरह वेदना सहन करेन मी!'- रुचिराने आपले डोळे पुसले अन ती उठून उभी राहीली. ती पुढे चालू लागलीच होती की सूर्याने बसूनच तिचा हात धरला आणि त्या हाताला धरून तो रडू लागला.

अखेर संध्याने दोघांमध्ये मध्यस्थी करत दोघांना एकमेकांसोबत नवं आयुष्य सुरू करण्यासाठी राजी केलं आणि दोघे पुन्हा एकदा एकमेकांच्या मिठीत विसावले.

'रागिणी, तु आता सूर्याला ड्रग्जच्या केस संदर्भात अटक करू शकतेस.'- शरयूच्या तोंडून करारी शब्द बाहेर पडले अन सगळे चाट पडले.

'शरयू, पण तशाने आम्हांला सखोल तपास करावा लागेल. या रॅकेटची पाळंमुळं कितीतरी खोलवर असतील. तिथे पोहचतात सूर्याच्या जीवाला धोका संभवू शकतो.'- रागिणी मॅडमनी वास्तववादी विचार मांडला.

'तो मेला तरी हरकत नाही. पण पुनः कोणी 'आस' चा मुलगा असा वाम मार्गाला लागता कामा नये. आणि मरता मरता त्याने हे रॅकेट उध्वस्त करण्यात सहाय्य केलं तर कित्येक तरुण-तरुणी ड्रग्जच्या विळख्यात जाण्यापासून वाचतील. तु त्याला अटक करणार आहेस की मला काही करावं लागेल?'- शरयूने निर्विकारपणे सवाल केला तशी तिकडे एकच गडबड सुरू झाली.

'आते बोलतेय ते बरोबर आहे मॅडम. मी गुन्हा केलाच आहे तर मला शिक्षा मिळायला हवी. मी तुम्हांला मला माहिती असलेली प्रत्येक माहिती देईन. भले माझ्या जीवाला धोका असला तरी.'- सूर्याने शरयुकडे पाहत म्हटलं.

'सुर्या..'- रुचिराला पुनः रडू कोसळलं.

'बघ, मी म्हटलं ना? माझं आयुष्य सहज सोप्प नाही. अजूनही विचार कर.'- सुर्याने तिचा हात हातात धरून म्हटलं.

'मी आयुष्यभर तुझी वाट पाहीन सुर्या. मरावं वाटलं तरी जेलमध्ये येऊन तुझ्या मांडीवर डोकं ठेवून प्राण सोडेल पण माझं प्रेम , माझा श्वास फक्त तुझ्यासाठीच असेल.'- रुचिराने स्वतःचे डोळे पुसत सूर्याच्या कपाळावर किस करत त्याला निरोप दिला.

रागिणी मॅडमच्या आदेशानुसार इन्स्पेक्टर सावंतांनी सूर्याला अटक केली होती.

अनघाला दिसत नसलं तरी सूर्याला झालेली अटक ऐकून तिलाही रडू कोसळलं होतं.

'अनघा.'- सुर्या जाता जाता तिच्यासमोर थांबला.

'दादा.. माझ्यासाठी एवढं केलंस अन आता तुला? शरयू काकू असं का केलं तुम्हीं?'- अनघा काहीशी रागात बोलली.

'आतेचा राग योग्य आहे ग. लहानपणापासून अनाथ होतो. आमच्या रवी बाबांनी मला वाढवलं. माझ्या शिक्षणासाठी खर्च केला अन मी काय केलं? वाट भरकटुन त्यांच्या संस्काराची, त्यांच्या स्वप्नाची धूळधाण केली. आमच्या रवी बाबाला त्रास दिलेला त्याच्या बहिणीला म्हणजे शरयू आतेला अजिबात चालत नाही. त्याला शिक्षा ही मिळतेच. तरी बरं ती स्वतः मला शिक्षा देत नाहीये.. सोड ते सगळं. तु माझं एक ऐकशील??'- सूर्याने अनघाच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं.

'बोल ना दादा.. काय करू तुझ्यासाठी?? तु जे बोलशील ते करेन.'- अनघा स्फुंदत बोलली.

'पुन्हा एकदा उभी राहशील? नव्याने जगशील?'- सूर्याने भावुक प्रश्न विचारला.

'मी जगेन दादा. पण समाज मला जगू देईल? आपल्या समाजात एकवेळ बलात्कार करणारा उजळ माथ्याने वावरू शकतो; पण जिच्यावर बलात्कार झाला ती कधीच नाही. तो आयुष्यात पुढे जाऊ शकतो पण ती अंधारातच राहते. लोक त्याला पुढेमागे हार घालतील पण तिला कायमच शिव्यांची लाखोली वाहतील. तो शिक्षा पूर्ण झाल्यावर स्वतःला धुतल्या तांदळासारखा स्वच्छ दाखवेल पण तिच्यावर लागलेला डाग कधीच पुसला जात नाही. किंबहुना कोणी तो पुसण्याचा प्रयत्न केला तरी लोक वारंवार तिकडेच बोट दाखवत राहतात. सांग दादा, कशी उभी राहू मी?? कसं सावरू स्वतःला?'- अनघा तिडकीने बोलत होती.

'आम्ही आहोत तुझ्यासोबत अनघा.. आम्ही तुला मदत करू. आणि कुठल्या समाजाची भीती मनात घेऊन जगतेय तु? स्रियांच्या इज्जतीशी खेळ करणाऱ्या, त्यांचा सन्मान चिरडून टाकणाऱ्या बलात्काऱ्यांना जिथे वाळीत टाकायला हवं तिथे जिच्या अब्रूवर घाला घातला गेला तिला अस्पृश्य ठरवणारा हा भ्याड समाज! तु यांचा विचार करतेस? अग तु फक्त उठण्याचा प्रयत्न कर, बघ किती जण तरी तुला पाडायला धावतील. तु पळण्याचा प्रयत्न कर, कित्येक जण तुझ्या पायात बेड्या बांधण्याचा प्रयत्न करतील. पण तु सगळ्यांना पुरून उर अनघा!. आजही स्त्रीला नाजूक समजलं जातं. आपल्याला सहानुभूती दाखवली जाती. मी म्हणते कशाला हवी सहानुभूती? एवढंच वाटतं तर जेव्हा कोणी स्त्री कुठल्याही आघातातून स्वतःला सावरून उभी राहत असेल तेव्हा तिला मदत करा ना! किमान तिला मानसिक आधार तर द्या. बघ मी आज ही केस तुझ्यासाठीच लढवली आहे. आठ  महिन्याची गर्भवती असूनही मी कोर्टात उभी राहिली ती फक्त तुझ्यासाठी! आपण मनात आणलं तर अशक्य काहीच नाही अनघा.. जग.. ताठ मानेने उभी रहा. तुझ्यासारख्या कितीतरी अनघा असतील; त्यांच्यासाठी आदर्श बन! लढ अनघा लढ.'- संध्या न थांबता बोलली. 

'थँक्स ताई. तुझ्या बोलण्यातून मला हुरूप आला बघ.. मी नक्कीच उभी राहीन. मी माझं नवं विश्व उभं करेन. माझ्यासारख्या स्त्रीयांसाठी काहीतरी नक्कीच करेन! मी लढणार ताई.. मी लढणार!'- अनघाने डोळ्यातले अश्रू पुसत निर्धार व्यक्त केला.

'आणि या लढ्यात मीही तुझ्या सोबत असेन अनघा.'- कोर्टात सुर्वे कुटुंब प्रवेश करत झालं.

'निशांत?? तु? तु हॉस्पिटलमध्ये होतास ना? इकडे का आलास? कसा आहेस तू? अरे आराम करायचा ना?'- निशांतचा आवाज ऐकून अनघा त्या दिशेने जाण्यासाठी धडपडू लागली.
चालता चालता एक दोन ठिकाणी ती अडखळली तसा निशांत पुढे सरसावला आणि त्याने तिला खांद्याला धरून थांबवलं.

'अग? केवढी धावपळ? आणि बोलताना थोडा दम तरी घे. किती ते प्रश्न? मी ठिक आहे ग.. मला माफ करशील का ग?'- निशांतने विचारलं.

'मुळीच नाही. तु. तु असा निर्णय कसा घेऊ शकतोस? तुझ्या मनात एकदाही माझा विचार नाही आला? मला किती वेदना होतील हे कसं तुझ्या लक्षात नाही आलं? काका-काकींनी तुझ्यामागे काय केलं असतं? मी कधीच तुला माफ करणार नाही निशांत.'- अनघा तोंड फिरवून रडू लागली.

'तुला दुखवलं ना ग मी. जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा मी तुझी साथ सोडली. जेव्हा तुझ्या चारित्र्यावर बाबांनी शिंतोडे उडवले तेव्हा मी गप्प राहीलो. तुला आधार देण्याऐवजी निर्ढावलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व केलं मी! स्वतःला कसं माफ करू सांग? पण आता मी तुझी साथ कधीच सोडणार नाही अनघा.. मी जगेन तो फक्त तुझ्यासाठी! तुझ्या स्वप्नासाठी! आपण मिळुन तुझं स्वप्न साकार करू. आणि हा तु माझ्याशी लग्न करायचं हा! नाही केलंस तर तुला पळवून नेऊन मी तुझ्याशी लग्न करेन. मस्करी केली अग. प्लिज माझ्याशी लग्न करशील ना ग?'- निशांतने तिचा हात हातात घेऊन विचारलं.

'अरे पण मी अशी आंधळी अन त्यात बलात्कारीत..'- अनघा आवंढा गिळत म्हणाली.

'त्यात तुझी काहीच चूक नव्हती पोरी. त्या घटनेचा निशांतला काहीही फरक पडणार नाही. त्या दिवशी खुलेआम तुला अन तुझ्या कुटुंबाला काही नाही ते बोललो. ते काही माफीयोग्य नाहीच. पण तरीही हात जोडतो अन क्षमा मागतो. तुझं स्वप्न आता केवळ तुझं नाहीच. आम्ही सारे तुझ्या मागे उभं राहू..'- निशांतच्या वडिलांनी जाधव कुटुंबियांसमोर हात जोडले.

'मग अनघा होशील ना ग माझी सून? माझी दुसरी लेक?'- निशांतच्या आईने पुढे येत अनघाचा हात हाती घेतला.

त्यांच्या प्रश्नावर अनघा काहीशी लाजली आणि ती त्यांच्या कुशीत जाण्यासाठी पुढे सरसावली पण अनवधानाने ती निशांतच्या कुशीत शिरली आणि त्याच वेगात बाहेरही आली..

इतका वेळ गंभीर असलेले सारे जण आता हसत होते. अनघाही हळूहळू खुलली होती.

साटम परिवाराचे आभार मानत सारे जण आपापल्या घरी निघाले होते. 

'शरू'- आशिषने बायकोला प्रेमळ हाक मारली.

'आहे माझ्या लक्षात. कुकिंग शो मध्ये भाग घ्यायचा म्हणजे प्रॅक्टीस तर करावी लागेल ना? आणि तु माझ्या सगळ्या डिश टेस्ट करणार आहेस.'- शरयूने नवऱ्याच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवत म्हटलं.

'चालेल. मलाही तुला तुझं स्वप्न पुर्ण करताना पाहायचं आहे शरू.'- आशिष भावुक झाला.

'नक्कीच आशु.'- आशिषच्या शर्टाला पकडत शरयू त्याला बिलगली.

-#-
शरयूने अजून एक खेळी करत सूर्याची शिक्षा कमी करवली होती. साऱ्या गैरव्यवहारात सूर्याला चार वर्षांची शिक्षा झाली होती. तो जेलमधून सुटून येईपर्यंत रुचिरा अविवाहितच राहिली होती. सूर्याने काही काळ मेहनत करून आपलं वकिलीचं राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं होतं. पुढे जाऊन तो रुचिराला घेऊन नागपुरात परतला होता.

-#-


अनघा जाधव नाव समाजात हळूहळू प्रसिद्ध होऊ लागलं होतं. एक समाजसेविका आणि यशस्वी उद्योजिका म्हणून लोक तिला ओळखू लागली होती.


अपंग व्यक्तींनी बनवलेल्या वस्तूंच्या विक्रीचा तिचा व्यवसाय पार साता समुद्रापार पोहचला होता. त्याच वेळी बलात्कारीत स्रियांना आधार देणाऱ्या; त्यांना मानसिक उभारणी देणाऱ्या तिच्या संस्थेची दखल परदेशी प्रसारमाध्यमांनीही घेतली होती.

तिची अन निशांतची लेक दुर्गा आता पाचव्या वर्षात पदार्पण करत होती.

'अनु, दुर्गासाठी यावर्षी काय करूया?'- निशांतने अनघाला विचारलं.

'तिला आपण सेल्फ डिफेन्स क्लासला टाकूयात..हिच काळाची गरज आहे..'- अनघा पटकन बोलून गेली.


समाप्त


© मयुरेश तांबे.

या कथेच्या प्रत्येक भागासाठी तुम्हांला खूप वाट पाहावी लागली त्याबद्दल क्षमस्व!

कथेचे सारे अधिकार लेखकाच्या अधीन असून; कथा नावासाहित प्रसिद्ध करण्यास काही हरकत नाही.. 

सादर कथा ही काल्पनिक असून;   एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती..

धन्यवाद..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Mayuresh G. Tambe

Service

नमस्कार मंडळी.. इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि नोकरी.. त्यामुळे नट आणि बोल्ट भोवती फिरणाऱ्या आयुष्यात विरंगुळा म्हणून जस जमतं तसं लिहितो.. आवडलं तर दाद द्या आणि नाही आवडलं तर नक्कीच हटका..