फक्त तुझ्यासाठी!- भाग दहा

This Part Is In Continuation With Earlier Series.

साऱ्या कोर्टात केवळ तीनच व्यक्ती शांत होत्या- आशिष, शरयू आणि संध्या..


पुन्हा एकदा फोनवर नोटिफिकेशन आलं होतं.. पण यावेळेस ते जज जोशींच्या फोनवर आलं होतं.. त्यातला व्हिडीओ पाहून त्याला दरदरून घाम सुटला होता..

---------------
जज जोशींनी रुमालाने कपाळावरचा घाम पुसत; समोरील पाण्याचा ग्लास तोंडाला लावला होता.. पाणी पिऊनही त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता कमी झाली नव्हती. त्याने एका नजरेने तिवारीकडे पाहिलं तसं तिवारीला त्यांचा पडलेला चेहरा खूप काही सांगून गेला होता..

"युअर ऑनर, काय झालं?? आर यु ओके??"- संध्याने स्वतःला सावरत उभं राहून प्रश्न केला..

"हा..अम्म्म.. म्हणजे?? मी ठिक आहे.. ते थोडं.."- जोशींच्या घश्याची कोरड आता वाढली होती..

"डोन्ट वरी जजसाहेब.. हि केस पहिल्या हाल्फमध्येच उरकून टाकायची आहे..मला दुपारी तीन ते चार झोपायची सवय आहे.."- संध्या आपल्या हाताची घडी घालून म्हणाली तशी कोर्टात एकच खळबळ उडाली..

जज जोशीला तर आलेल्या व्हिडीओ वरून आधीच अंदाज आला असला तरीही संध्याच्या बोलण्यावरून त्याच्या तोंडाचा आ वासला होता.. खुद्द तिवारी सारखा गुंड तिनताड उडाला होता..

"वकिलीत पोरगी अगदी बापावर गेलीय!"- गालातल्या गालात हसत शरयू मनातल्या मनात बोलली..

कोर्टात कुजबुज वाढून हळूहळू त्याच गोंधळात रूपांतर झालं तसं जोशी भानावर आले..

"ऑर्डर! ऑर्डर! कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी.."- त्यांच्या तोंडून कसाबसा आवाज बाहेर पडला..

"युअर ऑनर, आरोपी तिवारी यांच्यावर खूप गंभीर आरोप आहेत.. पहिला आरोप- यांनी आपल्या मुलाच्या प्रत्येक गुन्ह्याला पाठीशी घातलं आणि त्यामुळेच त्याने हत्या, बलात्कार, ड्रग्ज सप्लाय सारखे घृणास्पद प्रकार केले आहेत.. आरोप क्रमांक दोन- या साऱ्या काळ्या धंद्यांची तिवारींनां संपुर्ण माहिती असूनही त्यांनी आपल्या मुलाला आवरलं नाही. याचा अर्थ तेही त्यात भागीदार होतेच.."- संध्याने मध्येच पॉज घेतला आणि तिने विपक्ष वकिलाकडे पाहिलं..

"बस?? एवढेच आरोप?? मला तर वाटलं की तुम्हीं अजून काही गोष्टी रंगवून सांगाल.. मी त्याचीच वाट पाहत होतो."- बचाव पक्षाचे वकील गावडे हसू लागले होते..

"हो, अजून एक महत्वाचा आरोप बाकी आहे."- संध्याने पुन्हा म्हटलं..

"ओह! अजून एक स्टोरी आहे म्हणायची.."- गावडे अधिक जोरात हसू लागले..

"माझा पुढचा आरोप ऐकून कदाचित तुमचं हसणं पूर्णपणे बंद होईल वकील साहेब.."- संध्या निर्विकारपणे बोलून गेली.

"अच्छा? मग बोला ना.. बघू अजून किती फेकू शकता ते.."- गावडे संध्याला खिजवण्यासाठी अधिक जोरात हसू लागले होते..

"आरोपी तिवारीनेच स्वतःच्या मुलाचे हात-पाय कापून त्याला मृत्यच्या दाढेत ढकललं आहे.."- संध्याने कोर्टात आपला फासा टाकला होता..

"काय??"- तिवारी, गावडे एकत्रित ओरडले होते..

कोर्टात एखादा विस्फोट व्हावा तशी शांतता झाली होती.. प्रत्येकजण एकमेकांची तोंड पाहत आश्चर्य व्यक्त करत होत.. जज जोशी तर पार लटपटायला लागला होता.. खुद्द डीसीपी रागिणी मॅडम, इन्स्पेक्टर सावंतांना स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. रागिणी मॅडमनी चक्रावून शरयुकडे पाहिलं तर ती गालातल्या गालात हसत होती.. मॅडम काय समजायचे ते समजून गेल्या होत्या..

"सावंत, चला तिवारीला आता कोणी वाचवू शकत नाही.."- रागिणी मॅडम शरयुकडे हसून पाहत बोलल्या..

"म्हणजे?? मॅडम तुम्हांला वाटतं की या वकील मॅडमच्या फिल्मी स्टोरीज इकडे चालतील??"- सावंत काहीसे नाराज झाले होते.

"सावंत तुम्ही विसरताय.. जी तरुणी केस लढतेय ती स्वतः एक नावाजलेली वकील आहे.. तिचे आजोबा म्हणजे वकिल क्षेत्रातील ध्रुवतारा, अजुन पर्यंत एकही केस न हरलेला वकील म्हणजे आशिष साटम अशी ज्याची ओळख तो तिचा बाप आणि या सर्वांवर कडी म्हणजे शरयू सारख्या वाघिणीचं रक्त आहे संध्यामध्ये.. आपल्या भक्ष्यावर कधी अन कशी झडप घालावी हे वाघीण आपल्यापेक्षा चांगलं समजते.. आणि ज्या अर्थी संध्याने भर कोर्टात एवढा मोठा आरोप केला असेल तर त्यामागे नक्कीच मोठी तयारी असणार.. बाकी सर्वांच सोडून द्या.. तिवारीने शरयुला आणि तिच्या परिवाराला धमकावून खूप मोठी चूक केली आहे.. आणि तिच चूक त्याला किती महागात पडते ते बघायचं आहे.."- रागिणी मॅडम अजूनही शरयुकडे पाहत होत्या..

तिवारी जिवंतपणी प्रेतासारखा थंडगार पडला होता.. कारण ज्या अर्थी एक आठ महिन्याची गर्भवती बेधढक त्याच्या विरोधात उभी राहते, केस अर्ध्या दिवसात निकाली काढण्याची भाषा करते आणि वरून आपल्यावर असा ठपका ठेवते की ज्यात आपला सहभाग असण्याची दूर दूर शक्यता नाहीच.. पण ज्या प्रकारे संध्या आपल्या चाली चालत होती; तिवारीला कळून चुकलं होतं की त्याच्याभोवतीचे फासे अधिकच आवळले जात असून त्याच्या सुटकेचे सारे मार्ग एक एक करत हळूहळू बंद केले जातील..

"जजसाहेब, या.. या मॅडम काहीही बेछूट आरोप करत चालल्या आहेत.. यांना म्हणावं की या सगळ्याला पुरावा काय?? मग मयत प्रदिप वरील हल्ल्यासाठी सुर्या नामक युवकाला पोलिसांनी का अटक केली होती?? पुरावे द्या मॅडम.. पुरावे.."- गावडे आवाज वाढवून बोलत होते.

"ऑब्जेक्शन सस्टेन.. मॅडम, तुम्ही आरोपी तिवारीवर जे काही आरोप केले आहेत त्याचे पुरावे कोर्टासमोर सादर करा..."- जज जोशींनी गावडेंच्या बोलण्याला अनुमोदन दिलं होतं..

"ठिक आहे सर.. माझ्या पहिल्या साक्षीदाराला विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी देण्यात यावी.. श्रीमती आशा तिवारी.."- संध्याने तिवारीच्या डोळ्यांत डोळे टाकत नाव घेतलं..

"कोण??"- तिवारी नाव ऐकून चक्रावला होता..

"श्रीमती आशा तिवारी.. तुमच्या आई.."- संध्याने तिवारीकडे पाहत उत्तर दिलं..

"नाही.. मला अशा पापी माणसाची आई म्हणून हाक मारू नका.."- साधारण सत्तरीच्या एका स्त्रीने भरल्या डोळ्यांनी संध्यासमोर हात जोडले होते..

"सॉरी काकू.. आम्हांला आज नाईलाजाने काही कठीण प्रश्न विचारावे लागतील. पण तुम्हीं आज सत्य सांगितलं तर कितीतरी आयुष्य वाचतील."- संध्याने आशाबाईच्या हातावर हात ठेवत म्हटलं..

"विचारा.."- आशाबाईनी काहीश्या धास्तीने मुलाकडे पहिलं तर त्याचे डोळे आग ओकत होते..

"तुमच्या मुलाबद्दल काही सांगू शकाल??"- संध्याने विचारलं.

"एक आई म्हणून त्याच्याबद्दल सांगण्यासारखं माझ्याकडे काहिच नाही. याचा बाप लहानपणी गेला; म्हणून काहीसा लाडावला.. बास! मी तिथेच माती खाल्ली.. याचा हट्ट वाढत गेला, याची हाव याला राक्षस बनवत गेली आणि एकवेळ आली की याच्यातला क्रूरपणा माझ्या आवरण्यापलीकडे पोहचला इतका की आता माझ्या मनात त्याची दशहत आहे..नीचपणाची सारी सीमा ओलांडलेला हा माणूस नाही तर समाजाला लागलेली एक किड आहे.."- आशाबाईनीं बोलता बोलता डोळ्याला पदर लावला..

"थँक्स मॅडम.. तुमच्या लेकाच्या गैरधंद्यांबद्दल तुम्हांला काही माहीत आहे का??"- संध्याने प्रश्न विचारला तशी आशा मॅडमनी नकार दिला..

"मला माहीत आहे.."- कोर्टात एक स्त्री आवाज पसरला तश्या साऱ्या नजरा आवाजाच्या दिशेने वळल्या..

"मिसेस तिवारी? या सांगा ना.."- संध्याने हसून तिवारीकडे पाहिलं..

तिवारीला आता त्याच्याभोवती गुंडाळला जाणारा फास चांगलाच जाणवू लागला होता.. आपल्या काबूत असलेल्या स्रिया आज अचानकपणे आपल्या विरोधात कश्या काय उभ्या राहू शकतात? यांना एवढी हिम्मत दिलीच कोणी? अशा कित्येक प्रश्नांनी त्याच डोकं पोखरून निघालं होतं.

"जजसाहेब मला मिसेस तिवारीनां विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी देण्यात यावी.."- संध्याने जज जोशींकडे पाहिलं तर ते तिवारीकडेच पाहत होते.. जणू त्यांना आता सर्व काही आपल्या हाताबाहेर जातंय हेच कळवायचं होतं..

"जजसाहेब??"- संध्याने आवाज दिला..

"आ..अम्म्म. हो. बोलवा त्यांना.. परवानगी आहे." - जोशी स्वतःला सावरून बसले..

"बोला मिसेस तिवारी.. काय सांगायचं आहे तुम्हांला?"- संध्याने त्यांना प्रश्न विचारला.

"हेच की आमदार बनून पांढरा सदरा घालून फिरणारा माणूस आतुन किती काळा आहे! जजसाहेब या माणसाचे हर प्रकारचे अवैध धंदे आहेत.. दारूचे गुत्ते, गुटख्याची स्मगलिंग, वैश्या व्यवसाय, ड्रग्ज असे कितीतरी.. शहरात असा कोणताच अनैतिक धंदा नाही की त्यात यांचा हात नाही.."- तिवारीची पत्नी त्याच्या डोळयांत डोळे घालून बोलत होती..

आज तिने सारे बंधन तोडले होते.. आज ठरवून ती नवऱ्याच्या विरोधात उभी राहिली होती..

"बरं मग याबाबत प्रशासन का गप्प राहिलं??"- संध्याने बेरकी प्रश्न केला..

"अहो, तोंडात नोटा कोंबल्या की कोणाच्या तोंडून आवाज निघेल? तुम्ही इकडे एवढी मेहनत करताय पण काही फायदा नाहीच.. या जजच्या घरी दोन करोड पोहचलेत.. आता हा काय निवाडा करणार.."- मिसेस तिवारी रागाच्या भरात बोलून गेल्या होत्या आणि कोर्टात एकच खळबळ उडाली होती..

जज जोशी जागेवरच उडाला होता.. त्याचे श्वासोच्छ्वास तेजाने होऊ लागले होते.. ह्रदय जोरजोरात धडकू लागलं होतं.. कपाळावर जमलेले घामाचे बिंदू त्याची भीती ओरडून ओरडून जाहीर करत होते..

एकटा तिवारी शांत होता.. आपले दोन्ही हात विटनेस बॉक्सच्या फ्रेमवर ठेवत तो पुढच्या वादळाची प्रतीक्षा करत होता..

रागिणी मॅडम हैराण होत; वारंवार शरयुकडे पाहत होत्या.. शरयूने डोळ्यानेच हसत रागिणी मॅडमला घड्याळ दाखवलं होतं. त्यावर भर कोर्टातच रागिणी मॅडमना हसू फुटलं होतं.

"मॅडम??"- इन्स्पेक्टर सावंतांनी प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारलं.

"सावंत; आमच्या पुर्ण कॉलेजमध्ये शरयू देशपांडे म्हणजे लेडी चाणक्य म्हणून ओळखली जायची. तिच्या चाली मोडणं कोणालाच जमत नव्हतं. आणि बघा ना; आताही ते कोणाला जमत नाहीच आहे. कोणाचाही खेळ संपायला आला की ती घड्याळ दाखवायची.. तिने घड्याळ दाखवलं की मग आम्ही समजून जायचो की पुढच्या काही मिनिटांत समोरच्या व्यक्तीला खेळ खल्लास!! आणि आता तिने तेच केलंय."- रागिणी मॅडम कौतुकाने शरयुकडे पाहत होत्या..

"आणि तुमच्या मुलाची हत्या?? अनघा जाधववरचा बलात्कार??"- संध्याने अंतिम फास टाकला होता..

"होय.. अनघा जाधववर बलात्कार करणारा माझा मुलगाच होता.. प्रदिप.. त्यानेच रफिक म्हणून कोणी होता त्याची हत्या केली आणि त्याला सुधरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या अंध मुलीवर बलात्कार केला.. आणि त्याच कुकर्म त्याने घरी येऊन अभिमानाने स्वतःच्या बापाला सांगताना ऐकलं आहे मी. अनघा जाधववर बलात्कार झालाय आणि तो माझ्याच मुलाने केला आहे.. या माणसाने पैश्यांच्या आणि आपल्या गुंडगिरीच्या जोरावर ती केस दाबून टाकली होती.."- तिवारीची बायको भडाभडा बोलत होती..

कोर्टातली खळबळ आता हळूहळू वाढू लागली होती.. कोणीतरी कोर्टातल्या घडामोडी बाहेर पसरवल्या तशी कोर्टाच्या आवारात प्रचंड गदारोळ माजला होता.. लोकांनी तिवारीच्या आणि कोर्टाच्या निषेधात घोषणा देण्यास सुरू केली होती..

आता तिवारी मनात चरकला होता.. समोरच्याच्या ताकदीचा त्याला अंदाज आला होता.

"बरं मग तुमच्या मुलाची हत्या या सुर्याने केली??"- संध्याने तिवारीच्या पत्नीला प्रश्न केला..

"नाही.."- डोळे मिटून तिवारीच्या बायकोने उत्तर दिलं तसं तिवारीच्या काळजात धस्स झालं होतं. क्षणात त्याला पुढची चाल कळली होती आणि एक पराभवाचा हसू त्याच्या चेहऱ्यावर उमटलं.

"मग??"- संध्या.

"या नीच माणसानेच केली.. याला याची इज्जत प्यारी होती.. हे कबूल करणार नाहीत पण कोणीतरी यांना प्रदिपच्या विरोधातले पुरावे पोलिसांना देण्याची धमकी दिली होती. त्याने यांची नाचक्की पक्की होती.. आणि असंही बाप-लेकात सगळया काळ्या धंद्याच्या पैशांच्या वाटणीवरून बरेच दिवस वाद चालूच होता.. त्यात एक दोनदा त्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.."- तिवारीच्या पत्नीने डोळयातून आलेलं पाणी हाताने पुसत जबानी दिली..

"हे खोटं आहे जजसाहेब.. हे माझ्या आशिलाला फसवण्यासाठी रचलेलं कारस्थान आहे..मग सुर्या स्वतःहून पोलिसांत का शरण गेला होता??"- विपक्ष वकिलाने आक्षेप घेतला होता..

"कारण माझ्या पोराने त्याच्या वर दबाव आणला होता.. अनघा ही सूर्याची मानलेली बहिण आहे.. तिच्या वाईटाची धमकी देत ; माझ्या मुलाने त्याला स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन व्हायला भाग पाडलं.. पण माझ्या नातवाचा खुनी माझा मुलगाच आहे.."- अजूनही विटनेस बॉक्स मध्ये असलेली तिवारीची आई बोलली..

आशाबाईच्या जबानीनंतर कोर्टात एक प्रकारे सन्नाटा पसरला होता.. जो तो एकमेकांचे तोंड बघत आश्चर्य व्यक्त करत होता.. खुद्द रागिणी मॅडम, इन्स्पेक्टर सावंत चक्रावून गेले होते.. ते शरयुकडे एकटक पाहतच बसले होते तर शरयू आशिष कडे बघून गालातल्या गालात हसत होती..

"मॅडम.. मॅडम, तुम्ही खर..खरंच बोललात ओ.. या बाई खूपच भयंकर आहेत.."- सावंत आपल्या कपाळावरचा घाम पुसत म्हणाले..

"लेडी चाणक्य.."- रागिणी मॅडमही हलक्या हसल्या..

तिवारीला आता त्याचा अंत काहीसा दिसू लागला होता.. त्याने आपली मान खाली घातली तशी लोकांची कुजबुज वाढू लागली.. अशातच अचानकपणे कोर्टात भेसूर हास्याचा आवाज पसरला होता.. तिवारी वेड्यासारखा जोरजोरात हसू लागला होता.. विटनेस बॉक्सच्या फ्रेमवर हात आपटून तो संध्याकडे बोटांनी मोर दाखवत भारी भारी म्हणून बोलत होता..

"मि. तिवारी?? तुम्ही ठिक आहात?? तुम्हांला हवं असेल तर आपण पुढची तारीख.."- जज जोशी खाल्ल्या पैशाला जागणारच होता की त्याला काही मिनिटापूर्वी आलेला व्हिडीओ आठवला होता अन त्याने आपले शब्द ओठातच दाबून ठेवले होते..

गर्भारपणाचे नऊ महिने पुर्ण केलेल्या त्याच्या मुलीला काही लोकांनी किडनॅप केलं होतं.. घामाने डबडबलेली त्याची मुलगी या अनपेक्षित घटनेने चांगलीच भेदरली होती. व्हिडीओ मध्ये तिच कमी होत चाललेले ब्लडप्रेशर ही दाखवलं गेलं होतं..

जोशींच्या घशाला आता कोरड पडत चालली होती.. तिवारीच्या गळ्याभोवती आवळला जाणारा दोर त्यालाही दिसत होताच त्यामुळे त्याच एक चुकीचं पाऊल त्याच्या मुलीच्या अन तिच्या होणाऱ्या बाळाच्या जीवाला मरणाच्या दारात ढकलणार होतं..

"बचाव पक्षाला काही उलटतपासणी करायची आहे का??"- जज जोशीने गावडेना विचारलं..

"नाही.."- गावडेंनी हार मानली होती..

तिवारी अजूनही जोरजोरात हसतच होता.. आपले हात आपटत; तो अधून मधून उड्या मारत होता.. सारे लोक त्याच्याकडे पाहत चाट पडले होते..

"जोश्या, मला इकडून सोडव लवकर.. मुझे जल्द से जल्द सजा दे दो.. मै सारे गुनाह कबूल करता हुं.."- तिवारी बोलता बोलता हसण्याचा काही थांबला नव्हता..

तिवारीची अवस्था पाहून त्याच्या आईचे अन बायकोचे डोळे पाणावले होते.. पण कसल्याशा निर्धाराने दोघींनींही आपले अश्रू डोळयातून बाहेर वाहू दिले नव्हते..

"जोशी.. फैसला सुना.. सजा ए मौत दे दे मुझे..."- तिवारी स्वतःच्या अंगावरचे कपडे फाडून आक्रस्ताळेपणा करू लागला होता..

त्याला तस पाहून ; त्याच्या आईचा इतका वेळ रोखून धरलेला बांध सुटून एक हुंदका बाहेर गरजला होता.. तिला तसं रडताना पाहून तिवारी मनातून खुश झाला होता.. त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक आली होती..

"क्यू अब क्या हुवा?? तेरे मन में जो था, वो हुवा ना?? अब ये आंसू किस के लिये? क्यू झूठ बोला? ओ भी अपणे खुद के बेटे के खिलाफ??"- तिवारी आईला भावनेच्या जाळ्यात अडकवू पाहत होता..

"किसने झूठा बयान दिया हैं?? मेरे आसु तेरे लिये नही बलकी मेरे खुद के लिये हैं.. तेरे जैसा शैतान मेरा बेटा हैं इस बात पे खुद को कोस रही हुं.."- आशा बाईचे डोळे लाल झाले होते.. त्यांनी मुलाचा कावा चांगलाच ओळखला होता..

आईने आपली चलाखी ओळखल्याच कळताच तिवारीचा चेहरा चांगलाच पडला होता अन त्याने मान खाली घातली होती..

"जजसाहेब, आम्ही सारे पुरावे कोर्टात सादर केले आहेत तर लवकरात लवकर कोर्टाने आपला निर्णय जाहीर करावा.. म्हणजे आम्हांलाही हॉस्पिटलमध्ये लवकर पोहचता येईल.."- संध्याने बेरकीपणे हे वाक्य म्हटलं तसा जोशी चमकला होता..

"सादर पुराव्यावरून आरोपी तिवारीवरील सारे गुन्हे सिद्ध होत असून; कोर्ट त्याला आय. पी. सी सेक्शन #$%# नुसार जन्मठेपेची ना..नाही.. फाशीची शिक्षा सुनावत आहे.."- जज जोशींनी संध्याकडे पाहतच आपला निर्णय सूनवला होता.. तो आतून चांगलाच हवालदील झाला होता..

कोर्टाचा निकाल ऐकून सगळ्यांनी एकच जल्लोष सुरू केला होता.. अनघाने खुश होत बाजूलाच बसलेल्या आई-वडिलांचे हात घट्ट धरले होते.. तिच्या डोळयातून आनंदाश्रू वाहू लागले होते..

शरयूने रागिणी मॅडमना पुन्हा एकदा घड्याळ दाखवलं तश्या त्या शॉक झाल्या होत्या.. त्यांनी घाबरल्या चेहऱ्यानेच शरयुला तु तसं काही करणार नाहीस म्हणून बजावलं होतं.. प्रत्युत्तर म्हणून शरयू केवळ खुनशी हसत होती..

"सावंत, तिवारीला कव्हर करा!! त्याचा जीव धोक्यात आहे.."- इन्स्पेक्टर रागिणी जवळपास ओरडल्याच होत्या.

इन्स्पेक्टर सावंत गडबडीने तिवारीला कव्हर करायला धावलेच होते की एक गोळी बेसावध तिवारीच्या छातीतून आरपार गेली होती.. त्यातून तो सावरणार तोच दुसऱ्या गोळीने त्याच्या मस्तकाचा वेध घेतला होता..

कोणाला काही कळण्याच्या आतच तिवारीने जागीच प्राण सोडले होते..


क्रमशः

भागाला झालेल्या उशिराबद्दल दिलगिरी.. पुढील भाग दोन दिवसांनी येईल.. कदाचित पुढच्या भागात कथेचा शेवट होईल..

यावेळेस चांगला धडा मिळाला आहे; त्यामुळे पुढची कथा पुर्ण लिहूनच पोस्ट करायला सुरू करेन..

© मयुरेश तांबे

कथेचे सारे अधिकार लेखकाच्या अधीन असून; कथा नावासाहित प्रसिद्ध करण्यास काही हरकत नाही..

सादर कथा ही काल्पनिक असून; एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती..

धन्यवाद..

🎭 Series Post

View all