जस्ट चील (टीम - व्हॉट्स इन अ नेम)

Easy solution of problems. Day to Day life. Ira championship trophy.

जस्ट चील 

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील नावे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
**************************
"मिस प्रिया! हा सगळा काय प्रकार आहे? किती महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे हे माहीत आहे ना?" प्रिया चा बॉस जयराम आज तिच्या वर खूपच चिडला होता. 

"हो... हो.. सर! मला दोन मिनिटं द्या!" प्रिया थोडी दबकत म्हणाली. 

जयराम कडे दुसरा काहीही पर्याय नसल्यामुळे त्याने एकदा रागात तिच्याकडे बघितलं आणि शांत बसून राहिला. प्रिया! एका मोठ्या कॉर्पोरेट फर्म मध्ये मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये काम करणारी एक हुशार आणि चुणचुणीत मुलगी! तिच्या बोलण्याच्या पद्धतीने आणि प्रेझेंटेशन मुळे बराच नफा फर्म ला मिळत होता! कितीही हुशार आणि कामात नेटकी असली तरी जरा वेंधळा स्वभाव होता तिचा! तोच आज तिच्या अंगलट आला होता. आजचं प्रेझेंटेशन कंपनीला लाखोंचा नफा देणार होतं! दोन आठवडे तिने त्यावर काम केलं होतं आता अर्ध्या तासात क्लाएंट येणार आणि त्याआधी बॉस ला प्रेझेंटेशन दाखवताना तिच्या लक्षात आलं फाईल करप्ट झाल्यात! ती चांगलीच टेंशन मधे आली होती. बॉस कडून दोन मिनिटं तर घेतली मागून.... आता? हा प्रश्न तिला पडला होता. एवढ्यात कॉन्फरन्स रूम च्या दारावर टकटक झाली! जयराम आणि प्रिया ने वळून बघितलं तर सानवी आली होती. 

"येस कम इन मिस सानवी!" जयराम डोक्याला हात धरुनच म्हणाला. 

"प्रिया! अगं तू प्रेझेंटेशन चा पेन ड्राईव्ह तुझ्या डेस्क वरच विसरून आलीस! हे घे..." सानवी तिला पेन ड्राईव्ह देत म्हणाली. 

प्रिया ने तो पेन ड्राईव्ह घेतला आणि गोंधळून थँक्यू म्हणाली. बॉस ला पण आता थोडा धीर आला होता. पंधरा मिनिटात क्लाएंट येणार होते त्याआधी त्याला स्वतःच्या नजरेखालून सगळं घालायचं होतं! तो प्रेझेंटेशन बघण्यात मग्न झाला. क्लाएंट आले... मीटिंग पण झाली! हे डील कंपनीला मिळालं. प्रिया आज खूप खुश होती. मीटिंग झाल्यावर ती आधी सानवी जवळ गेली. या वेळेला ती कॅफेट एरिया मध्ये असणार हे तिला माहीत होतं. 

"सानु ssss.... थँक्यू......" ती जवळ जवळ ओरडली आणि तिला कडकडून मिठी मारली आणि गोल फिरवली. 

"हो.. हो... जरा हळू..." ती तिला जागेवर उभं करत म्हणाली. 

"अरे काय कमाल आहेस यार तू! आज खूप मोठ्या पेचात अडकले होते... तू होतीस म्हणून वाचले.... थँक्यू....." प्रिया म्हणाली आणि तिला पुन्हा मिठी मारली. 

"हो... हो... आता बास.... जस्ट चील! आता सांग कसं झालं प्रेझेंटेशन?" सानवी ने विचारलं. 

"ते तर खूप छान झालं! आपल्या कंपनीला डील मिळालं आहे. ते जाऊदे... मला सांग मी कोणत्याच पेन ड्राईव्ह मध्ये प्रेझेंटेशन नव्हतं ठेवलं तुझ्याकडे कुठून आला तो पेन ड्राईव्ह?" प्रिया ने विचारलं.

"ते मीच बॅकअप घेतलं होतं. परवा तू प्रेझेंटेशन पूर्ण केलं आणि घरी जायच्या नादात तुझा लॅपटॉप तसाच चालू होता. म्हणून मग मी ते मला मेल करून घेतलं, पेन ड्राईव्ह मध्ये टाकलं आणि मॅडम जरा तुमचा मेल चेक करा तुला पण मेल केलं होतं!" सानवी तिच्या डोक्याला टपली मारून म्हणाली. 

"काय ग्रेट आहेस यार.... आज तू होतीस म्हणून वाचले मी...." प्रियाची पुन्हा कॅसेट सुरू झाली. 

"बास आता! तुला एक गंमत दाखवते चल..." सानवी म्हणाली आणि तिला घेऊन गेली. 

प्रिया जरा गोंधळातच होती! आपण तर ऑफिस मध्येच आहोत इथे आता काय गंमत? ती काही बोलणार एवढ्यात सानवीने तिला गप्प राहायला खूण केली. 

"मी जे बोलेन त्याला फक्त हो हो कर... एक्स्प्रेशन बदलू नकोस आणि जरा दुःखी कर चेहरा..." सानवी तिच्या कानात पुटपुटली. 

प्रिया ने तसंच केलं. सानू काहीतरी सांगतेय म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे हे तिला समजलं होतं म्हणून तिने काहीही न विचारता उदास चेहरा घेऊन डेस्क वर जाऊन बसली. 

"प्रिया! तुला किती वेळा सांगितलं ग महत्वाच्या गोष्टींचं बॅकअप घेत जा... गेलं ना आजचं डील! आता काही उपयोग आहे का तोंड पाडून?" सानवी तिला ओरडली. 

"अगं पण फाईल मध्येच उडेल हे मला कसं ग समजणार? परवा तर पूर्ण केलं ना मी प्रेझेंटेशन! तेव्हा तर नीट होतं सगळं.... अँटीव्हायरस पण टाकून घेतला आहे... म्हणून केलं जरा दुर्लक्ष! हेच चुकलं माझं! आता माझं हे मार्केटिंग हेड पद गेल्यातच जमा आहे..." प्रिया रडवेल्या सुरात म्हणाली. 

प्रियाच्या समोरच्या डेस्क वर बसलेला सूरज सगळं ऐकून गालातल्या गालात हसत होता. हे सानवीने बरोबर बघितलं होतं आणि तिचा संशय खरा ठरला. तिने प्रिया ला तिथेच बसण्यासाठी सांगितलं आणि ती सूरज जवळ आली. 

"सूरज! मला ना तुझी एक हेल्प हवी होती... प्लीज करशील?" ती म्हणाली. 

"हो.. बोला ना..." त्याने काहीही ऐकलं नाही या आविर्भावात तो म्हणाला. 

"माझा लॅपटॉप अचानक बंद पडला आहे... जरा तुझा लॅपटॉप देतोस का? मला अर्जंट एक मेल करायचा आहे..." ती म्हणाली. 

सूरज ने तिला लॅपटॉप दिला. मेल करण्याच्या नावाखाली तिने त्याचा लॅपटॉप चेक केला तर प्रिया ने केलेलं प्रेझेंटेशन तो स्वतःसाठी थोडे बदल करून वापरत होता! हे तिने पाहिलं आणि मॅनेजमेंट ला पुरव्यासकट याची कल्पना दिली. 

"खरंच ग! तू खूप ग्रेट आहेस... जस्ट चील म्हणतेस ते खरं पण करतेस... आज तुझ्यामुळे मी मस्त चील पिल आहे..." प्रिया म्हणाली. 

तो दिवस पुन्हा कामात गेला. सानवी आणि प्रिया यांची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत चालली होती. सानवी सतत तिच्या "जस्ट चील" फंड्याचा वापर करून क्लिष्ट कामं पण सोपी करत करत सगळ्यांना मदत करत होती. प्रिया आणि सानवी च्या रिक्वेस्ट मुळेच मॅनेजमेंट ने सूरज ला तंबी देऊन कामावर ठेवलेलं होतं. उगाच त्याची नोकरी जाऊन पुढे त्याला अडचण नको, आता त्याला उपरती झाली असेल असं दोघींना वाटलं होतं! सानवी मुळे बरेच घोटाळे पण बाहेर पडत होते आणि म्हणून आता तिच्यावर सगळ्यांनी डुक धरला होता. कोणतंही महत्वाचं काम किंवा पार्टी असेल तर आता सानवी कडे त्याची जबाबदारी असायची. प्रियाने केलेल्या प्रेझेंटेशन मुळे झालेल्या नफ्यातून ऑफिस तर्फे पार्टी आयोजित केली होती. 

"यावेळी आता त्या सानवीला बघून घेऊ... बघूया कशी वाचते.... बॉसच्या नजरेतून उतरली की गेलीच ही बाहेर...." सूरज त्याच्या साथीदारांनी बोलत होता. 

कॅफेट एरिया मधेच तो बोलत होता त्यामुळे हे बोलणं प्रियाच्या कानी पडलं! हे सगळं ऐकून तर तिला धक्का बसला.... ज्याचा आपण एवढा विचार केला, त्याला करीयर मध्ये काही अडचण नको म्हणून सानू ने त्याची शिक्षा कमी केली, त्याला चूक समजली असं आम्हाला वाटलं तर हा पुन्हा असाच वागतोय? तिला काय करावं कळत नव्हतं! 

"शी! नेमकी आज सानू ऑफिस ला आली नाही..." ती मनात म्हणाली. 

सानवी ला फोन करावा असा विचार करून तिने मोबाईल काढला! ती फोन लावणार एवढ्यात; "नाही.. नको... ती कितीही जस्ट चील म्हणाली तरी हे ऐकुन तिला त्रास होईल.... आता मलाच तिच्या पावलावर पाऊल ठेवून चील राहून काहीतरी केलं पाहिजे..." ती स्वतःशीच म्हणाली. 

मोबाईल स्क्रीन पुन्हा लॉक करून तिकडेच आडोशाला उभी राहून सूरज अजून काही बोलतोय का हे ऐकत होती. त्याच्या बोलण्यातून तिला त्यांचा नेमका बेसिक प्लॅन काय आहे हे समजलं. संध्याकाळी ७ वाजता पार्टी सुरू होणार त्या आधी मला तिथे जाऊन सानू ला या सगळ्यातून सोडवलं पाहिजे.... असा विचार करून तिने तडक अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली आणि पार्टीच्या ठिकाणी गेली. 

"हाय.... काय मॅडम? आपण इथे कश्या?" सानवी प्रिया ला अचानक तिथे पाहून म्हणाली. 

"काही नाही... तुला मदत करायला आले..." प्रिया म्हणाली. 

"बरं...." ती हसून म्हणाली आणि पुन्हा कामात गढून गेली. 

प्रिया तिथे असणाऱ्या प्रत्येकावर बारीक लक्ष ठेवून होती. पार्टीसाठी मांडण्यात आलेल्या खुर्च्या, टेबल, जेवणाची तयारी सगळ्यात ती बारकाईने लक्ष देत होती. 

"पियु! काही विशेष कारण आहे का? तू एवढी गंभीरपणे कधी कुठे बसत नाहीस... काही काळजी असेल तर सांग मला..." सानवी ने तिला चिंतेत पाहून विचारलं. 

"जस्ट चील सानू! काही नाही झालं आणि काही होणार पण नाही.... जरा तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे ग! बाकी काही नाही..." ती हसत हसत म्हणाली. 

"वा... मेरी बिल्ली मुझिको म्याव? नेहमी गडबड करणारी, सतत वाऱ्याच्या वेगात असणारी मुलगी मला जस्ट चील सांगतेय? वा! चालू दे... चालू दे... असं असेल तर खरंच छान आहे... पण, जर काही टेंशन असेल तर बोल..." सानवी ने तिला पुन्हा समजावलं. 

"अरे काही नाही ग खरंच! बघ आता सहा वाजलेत! सगळे येत असतील... आपल्या स्पेशल गेस्ट साठी बुके आणला का?" प्रिया ने विचारलं. 

"अरे हो! बघ, त्या फुलवाल्या दादांना फोन केला पाहिजे परत...." सानवी म्हणाली आणि फोन करायला गेली. 

थोड्याच वेळात तिथे ऑफिस स्टाफ येऊ लागला... सगळ्यात आधी सूरज आणि त्याचे कलिग आले! जसे ते आले तशी प्रिया त्यांच्या हालचालींवर नजर ठेवून होती. 

"पियू! ऐक ना... त्या दादांना आत्ता येता येणार नाहीये बुके घेऊन... ते येत होते तेव्हा त्यांना म्हणे एका बाईक ची धडक लागली आहे... तर पाय सुजला आहे... मी पटकन येते जाऊन.... तू थांब इथेच!" सानवी म्हणाली. 

"सॉरी मी तुमच्या मध्ये बोलतोय.... मी येतो पटकन बुके घेऊन... बाईक वरून जाईन तर वेळ पण वाचेल..." सूरज म्हणाला. 

"ग्रेट! थँक्यू सूरज!" सानवी म्हणाली आणि ती स्वागताची तयारी बघायला गेली. 

ती गेल्यावर सूरज आणि त्याच्या बाकी कलीग मध्ये झालेल्या खाणाखुणा प्रिया ने पाहिल्या होत्या! नक्की आता हा काहीतरी घोळ घालणार हे तिला समजलं होतं! तो गेला तशी प्रिया अजून सतर्क झाली. 

"याने जर बुके आणला नाही तर?" असा विचार तिच्या मनात डोकावून गेला. 

त्यासाठी आता आपल्याला बॅकअप काहीतरी ठरवावं लागेल... अश्या विचाराने तिने पटकन दुसरीकडून अर्जंट बुके कुठे मिळेल हे शोधू लागली! अचानक तिला काहीतरी क्लिक झालं आणि सगळ्या गर्दीतून बाजूला जाऊन तिने एक फोन लावला. 

"हॅलो! सुधा मावशी... मला ना खूप अर्जंट मध्ये एक बुके हवा आहे.... तुमच्याकडे तयार असेल छानसा एखादा तर पाठवता का रिया बरोबर? मी पत्ता पाठवते..." प्रिया म्हणाली. 

समोरून सकारात्मक उत्तर आलं! तसा तिने पटकन पार्टी हॉल चा पत्ता रिया ला पाठवला. अवघ्या १० मिनिटात तिच्या हातात छान आर्टिफिशियल फुलांचा बुके हजर होता. डुप्लेक्स कागदाने बनवलेली ती फुलं अगदी खरी भासत होती. तिने पटकन जाऊन तो बुके सूरज आणि त्याच्या साथीदारांना दिसणार नाही असा ठेवला. साधारण पंधरा मिनिटांनी सूरज बुके घेऊन आला! 

"मॅडम, बुके आणला आहे..." तो सानवी ला बुके दाखवत म्हणाला. 

"थँक्यू... दे मी ठेवते..." सानवी म्हणाली. 

"नको... मी ठेवतो ना... कुठे ठेवू सांगा..." तो म्हणाला. 

सानवी ने त्याला समोर असणाऱ्या टेबल वर तो ठेवायला सांगितला. प्रिया ला जरा हे संशयास्पद वाटलं! म्हणून तिथे असणाऱ्या पडद्याआड उभी राहून सूरज काय करतोय हे ती बघत होती. त्यात काहीतरी तो ठेवतोय हे तिला दिसलं. इतक्यात त्यांचे बॉस जयराम आणि स्पेशल गेस्ट आले. सगळी तयारी एकदम उत्तम झाली होती सगळे खुश दिसत होते.... पाहुण्यांच्या स्वागतासाठी सानवी बॉसच्या हातात बुके देणार एवढ्यात प्रिया ने तिने घेतलेला बुके त्यांना दिला! 

"वाव! खूप छान आहे हा बुके! आधी मला ही खरीच फुलं वाटली होती... रियली नाइस आयडिया!" गेस्ट म्हणाले. 

सगळ्यांनी एक स्मित केलं. 

"हा बुके कुठून आला?" सानवी ने प्रिया ला हळूच विचारलं. 

"सांगते! एक गम्मत मी आज तुला दाखवते..." प्रिया सूरज चा पडलेला चेहरा बघून तिला हळूच म्हणाली. 

कोणाचं लक्ष नाही हे बघून दोघी सूरज जवळ त्याने आणलेला बुके घेऊन गेल्या! 

"सूरज! हा बुके तुझ्यासाठीच होता... हे घे... तू सुद्धा कंपनीसाठी किती मेहनत करतोस... म्हणून तुझा आमच्या तर्फे हा सत्कार!" प्रिया त्याला बुके देत म्हणाली. 

हे प्रकरण आता त्याच्याच अंगलट येत होतं! त्याने त्यात जे ठेवलं आहे त्यामुळे तो तोंडघशी पडणार हे त्याला माहीत होतं.

"नाही... नको! माझा कसला सत्कार? मी किती चुका केल्यात... त्यापेक्षा आपण सानवी मॅडम चा सत्कार करू..." तो हात मागे घेऊन मागे मागे सरकत म्हणाला. अजूनही त्याची खोड काही मोडली नव्हती! 

प्रियाने जबरदस्ती च त्याच्या हातात बुके दिला आणि त्याच्या हातात बुके पडताच त्याच्या तोंडावर एक पाण्याची पिचकारी उडाली! दोघी हसत होत्या एकमेकींना टाळ्या देऊन त्या  तिकडून निघून गेल्या! सूरज मात्र त्याच्या इतर सहकार्यांसमोर तोंडावर पडला होता. 

समाप्त.
*******************************
सूरज सारख्या लोकांची कितीही मदत केली तरीही त्यांना त्याची जाणीव कधीच नसते! प्रिया आणि सानवी ने त्याचा एवढा विचार करून पण त्याने त्या बुके मध्ये एक पाण्याची पिचकारी मारणारं फुल ठेवलं! पण, प्रिया ने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सानवीचा होणारा अपमान वाचला! आयुष्यात बऱ्याचदा थंड राहून खूप क्लिष्ट कामं सोपी होतात. सूरज सारखी अनेक माणसं आपल्या आजू बाजूला असतात! ज्यांना त्यांची चूक समजली तरी ती कधी सुधारली जात नाही. अश्यावेळी थंड डोक्याने विचार करून काहीतरी पावलं उचलावी लागतात. कितीही कठीण प्रसंग समोर आला तरी ज्याला "जस्ट चील.... होईल सगळं नीट" असं आत्मविश्वासाने सांगता येतं आणि करता येतं तोच या सगळ्यात टिकतो! आपण छोट्या छोट्या गोष्टींचं खूप टेंशन घेतो आणि मार्ग समोर असेल तरीही मग आपल्याला दिसत नाही म्हणून हा छोटासा प्रयत्न! 

हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर करायला विसरू नका.