जुन्या पिढीची आधुनिकता - कौतुक की कटकट

This lieterature is about our Grandparents generations.

जुन्या पिढीची आधुनिकता - कौतुक की कटकट
-------------------------------------------------------------

"श्लोक, अरे तुझ्या मित्राने तो पाठवलेला जोक? त्या दिवशी तू मला वाचून दाखवलास? छान होता रे तो. कसं सुचतं त्याला?"

"आजोबा, तो फॉरवर्डेड होता."

"म्हणजे? त्याने लिहिला नव्हता?".

"नाही आजोबा. असं जोक कुणी लिहितं का? तो किती जुना जोक आहे. मागे बाबांनी पण सांगितलेला."

"अस्सं. मला वाटलं की त्याने लिहिलेला. पण कुणीतरी लिहिला असेलंच ना. बरं, तू मला फेसबुक, वॉट्सअप, इन्स्टा की काय असतं ते शिकवशील का रे?

" हा हा हा, आजोबा, त्यात काय शिकवायचं? हे सगळे काय विषय आहेत का शिकवायला? आणि तुम्ही तर शिक्षक होतात ना? मग तुम्हाला मी काय शिकवणार?". श्लोकला हसू आवरत नव्हतं. त्याचं हसणं ऐकून सारंग म्हणजे श्लोकचा बाबा बाहेर आला.

" काय झालं श्लोक? का हसतोय एवढा?"

" बाबा, आजोबा बोलतात फेसबुक, वॉट्सअप, इन्स्टा शिकव. हा हा हा"

"बाबा? तुम्हाला आता काय शिकायचंय त्यात?" सारंग बाबांना म्हणाला.

" अरे! तू पर्वा मला मोबाईल दिला ना घेऊन, त्यात आहे की हे सगळं. म्हणून या पठ्ठ्याला म्हंटलं शिकव तर हसतोय. खाली जमतो आम्ही तेव्हा पर्वा राम बोलत होता आता त्याला फेसबुकवर फोटो टाकायला जमतात म्हणून म्हंटलं आपणही शिकावं."

" बरं बरं आजोबा! शिकवतो मी तुम्हाला". असं म्हणत श्लोक गेला खाली खेळायला.

दुसर्‍या दिवसापासून आजोबांचा क्लास चालू झाला. पहिला विषय होता व्हॉट्सअॅप.

आजोबांचं विषयातलं कुतूहल काही संपत नव्हतं. रोज एक नवीन प्रश्न घेऊन आजोबा हजर असायचे. सुरूवातीला श्लोक ला सारंग ला खूप कौतुक वाटत होतं पण मग नंतर नंतर आजोबांच्या बोलण्यात रोज एकच विषय असे. हल्ली तर त्यांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या गृप मधे तर जणू चुरसच लागली होती कोणाला जास्त माहिती आहे याची. आज्जी पण आता वैतागू लागल्या होत्या.

"अहो? काय ते लहान मुलांसारखं दिवसभर तो मोबाईल घेऊन बसलेले असता."
" अगं घरबसल्या सर्वांच्या संपर्कात राहाण्याचा उत्तम मार्ग आहे हा!"
"कसला मेला उत्तम मार्ग? एकटेच हसता काय, चिडता काय ते काही बाही वाचून, रात्री आम्ही टी.व्ही. बघत असतो आणि मधेच तुम्ही ते विडिओ काय बघता मोठ्याने, कंटाळा आला बाई नुसता मला. एकतर माझ्या मोबाईल मधे पण ते काय ते वॉट्सअप टाकून ठेवलंय. मला मेलीला तर कळत पण नाही वापरायला. कोण कोण काय काय लिहून पाठवतात आणि मग विचारतात बाहेर भेटले की वाचला का मेसेज की काय म्हणतात ते. वैताग नुसता."
" मग तू पण शिक की. गरजेपुरता तरी थोडं फार यायला हवं मी शिकवू का तुला?"
" नको, राहू दे. तुम्ही दिवसभर असता मोबाईल मधे तेवढंच पुर अाहे. अजून मी पण मोबाईल मधेच राहिली तर घरची कामं कशी व्हायची."

आज्जी आजोबांचे हे संवाद आता जणू रोजचे झालेले श्लोकसाठी. त्याला तर आजोबांच्या या वागण्याने हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. आजोबांची प्रश्नावली काही कमी होत नव्हती आणि श्लोकला आता ही कटकट वाटू लागली होती.

एका विकेंडला श्लोक आई बाबांबरोबर लोणावळ्याला गेला. आज्जी लेकीकडे निघाल्या त्यांना भेटायला. आजोबांनी त्यांच्यासाठी त्या नको म्हणत असताना ऑनलाईन टॅक्सी बुक केली.

"आता मला टेन्शन नाही. आता तू डायरेक्ट शरेच्या घरी पोचशील. तुला टॅक्सीवाल्याला काही सांगावं नाही लागणार."

आज्जींना फारसं हे काही आवडलं नव्हतं. पण तरी टॅक्सीवाल्याला काही सांगावं लागणार नाही हे वाक्य थोडं दिलासादायक होतं म्हणून त्या काही बोलल्या नाहीत.

लेकीच्या बिल्डिंगचं नाव होतं अनमोल सोसायटी, सहयोग हॉस्पिटल शेजारी आणि आजोबांनी पत्ता निवडला अनमोल सहकारी निवास आणि उडाला सगळा गोंधळ. टॅक्सीवाला आपल्याला भलत्याच ठिकाणी नेतोय हे आज्जींना कळलं आणि त्या वैतागल्या. शेवटी टॅक्सीवाल्याला त्यांनी टॅक्सी थांबवायला सांगितली आणि त्या उतरल्या. मुलीला फोन केला, मुलाला फोन केला पण आपण कुठे आहोत ते त्यांना काही सांगता येईना. पुरता गोंधळ उडाला होता त्यांचा. शेवटी त्यांनी आजोबांना फोन केला आणि खूप खूप खूप रागावल्या. आजोबांना काही कळेना. शेवटी ते तिला शांतपणे म्हणाले,

" तू प्लीज आधी रडायचं आणि तुझा आतातायीपणा थांबव आणि मी काय सांगतो ते नीट ऐक. जिथून मला फोन केलास तिथून आधी फोनचा स्पीकर चालू कर."

"केला"

"आता तुझ्या मोबाईलमधे जे वॉट्सअप आहे ते चालू कर."

"केलं"

"आता त्यात माझं नाव शोध आणि खाली पेपरपीनचं चिन्ह आहे ते दाब"

"त्यात आता तुला लोकेशन लिहिलेलं दिसेल तिथून मला लाईव्ह लोकेशन पाठव मी येतो तुला घ्यायला."

आजोबांनी सांगितल्याप्रमाणे आज्जींनी सगळं केलं आणि मग आजोबा गेले घ्यायला आज्जींना. आपल्यालाही आता हे सगळं गरजेपुरता का होईना यायला पाहिजे हे आज्जींना मनोमन पटलं. श्लोक आणि इतर कुटुंबियांना आजोबांचं फार कौतुक वाटलं.

वाचकांनो हे एक उदाहरण झालं. अश्या कितीतरी गोष्टी आहेत ज्यात आपल्या घरातली मोठी मंडळी अपडेटेड राहू पाहात आहेत.ही अशी मोठी मंडळी आपल्याला घरोघरी आढळतात. कधी आपल्याला त्यांचं कौतुक वाटतं तर कधी त्यांच्या प्रश्नांचा त्रास होतो. पण काळाप्रमाणे बदल हे स्वीकारायला हवेत. आपणही मोठे होऊन उद्या त्यांच्या जागी असू त्यामुळे always be updated ????????.

                                                  - आरती शिरोडकर

             -----------------  समाप्त ---------------
वाचकहो, कथा काल्पनिक आहे. आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आपला अभिप्राय माझ्यासाठी महत्वाचा आहे.????????

PC - Google