जुन्या आठवणींचा अल्बम ( लघुकथा )

Tu mala visarlas tari mi janmdati aahe

जुन्या आठवणींचा अल्बम
लघुकथा


रमाने सुटकेस मधून एक जुनी फ्रेम केलेली फोटो काढली आणि अल्बम काढला. फोटो वरून प्रेमाने हात फिरवला.

अल्बम उघडला त्यातल्या एक एक फोटो बघू लागल्या.
त्याचवेळी खोलीत शांताबाई आल्या. रमाकडे बघून त्यांनी विचारलं.


“काय हो रमाबाई काय बघताय?”


“अल्बम बघत आहे हो.” रमा


“कुणाची फोटो आहे?” शांताबाईने उत्सुकतेने विचारलं.


“माझ्या मुलाची, अनिकेतची. पाच वर्षाचा होता त्यावेळी हा झबला घालून फोटो काढली होती. आठवण रहावी म्हणून फ्रेमही करून घेतली.”

“आणि हा अल्बम?” शांताबाईने पुन्हा उत्सुकतेने विचारलं.


“यातही माझ्या आठवणी दडल्या आहेत. हा माझा जुन्या आठवणींचा अल्बम आहे. आठवणी फक्त आठवणीच राहतात. कितीही नको नको म्हटलं तरी पाठ काही सोडत नाहीत.” बोलता बोलता रमाचे डोळे पाणावले.

“काळानुसार बदलतं
माणसाचही रूप
ओळखही हरवते
जतन केली जरी खूप”

रमा साठी पार केलेली एक वृद्ध स्त्री.


रमा लग्न करून सासरी आली तेव्हा खूप आनंदी होती, सगळं तिच्या मनासारखं झालं होतं. लग्न जरी घरच्यांनी ठरवलं असलं तरी रमाला विचारून केलं होतं.


सुरुवातीचे दिवस खूप छान गेले. मनोज ( रमाचा पती ) तिच्यावर खूप प्रेम करायचा.


बघता बघता वर्ष झालं आणि रमाच्या प्रेमाच्या वेलीवर एक फुल उगवलं.


रमाला पहिली मुलगी राशी झाली. राशीच्या संगोपनात दिवस फुरकन उडून जायचा. बघता बघता राशी सहा महिन्यांची झाली. आणि रमाला पुन्हा दिवस गेले. 


रमाला दुसरा मुलगा झाला. मुलाचा जोराशोरात बारसं झालं. आणि ह्या गोडुल्या बाळाचं नावं अनिकेत ठेवलं.


अनिकेत वर्ष भराचा होत नाही तर मनोजची बदली झाली. तो दुसऱ्या शहरात राहायला गेला.सगळा भार रमावर पडला. मुलांचं, घरच्यांचं करण्यातच पूर्ण दिवस जाई.


सगळं छान चाललं होतं, पण नियतीच्या मनात वेगळंच काही होत. मनोजचा रोड अक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला.


रमा कोसळली, पदरात दोन दोन मुले, एकटीने कसं काय करणार. सगळे प्रश्न भेळसवायला लागले.


सासू सासऱ्यांनी साथ सोडली. तू तुझं बघून घे असं बोलून तिला घराबाहेर काढलं.


माहेरी भाऊ वहिनी असल्यामुळे आई पण काही बोलली नाही. तिकडेही राहण्याची व्यवस्था होऊ शकली नाही.
रमा भाड्याच घर घेऊन राहू लागली.


मनोजची नोकरी तिला मिळाली म्हणून आर्थिकदृष्ट्या खमकी झाली. आर्थिक चणचण कधी भासली नाही.


पण मुलांना सांभाळून नोकरी करायची म्हणजे रमाची खूप दमछाक व्हायची.


हळूहळू मुले मोठी होऊ लागली.
राशीची स्कूलमध्ये  ऍडमिशन झाली. रमाच्या कामात अजून भर पडली. तिला शाळेतून ने- आण करणे , तिचा अभ्यास घेणे आणि बरेच छोटी छोटी कामे वाढली.  


वर्ष उलटली.


मुले मोठी होऊन चांगल्या पदावर नोकरीला लागले.

मुलीचं लग्न झालं. ती सासरी परदेशात गेली. मुलगाही इथे काहीच स्कोप नाही म्हणून तोही परदेशात निघून गेला.
रमा नोकरीतून मुक्त झाली.


आता मुलेही जवळ नाहीत. रमाला आता काहीच काम राहायचं नाही. दिवस कसा तरी निघायचा.


रमाने अनिकेतला फोन केला.


“हॅलो अनिकेत बाळा इकडे कधी येणार आहेस?”


“आई आता इतक्यात माझं येणं होणार नाही.” अनिकेत


“मला तरी घेऊन जा रे बाबा तुझ्यासोबत.” रमा


“आई अग माझी नवीन नोकरी आहे,मी कंपनीच्या फ्लॅट मध्ये राहतोय, मी तुला इकडे कुठे आणू? तू काही दिवस तिकडेच रहा. मग बघू समोर.”

अनिकेत नेहमी टाळाटाळ करायचा. दोन वर्षांनी अनिकेतने लग्नही केलं, आईला कळवलं सुद्धा नाही. 


जेव्हा तो घरी परतला तेव्हा तो एकटा नव्हता त्याच्या सोबत त्याची बायकोही होती.

दोघांना बघून रमाला खूप आनंद झाला. पण दुःखही तेवढंच झालं की अनिकेतने आपल्याला कळवलं सुद्धा नाही. तरीही हे सगळं मोठ्या मनाने स्वीकारून रमाने सुनेचा स्वीकार केला.

दोघेही काही दिवस रमाजवळ राहून पुन्हा परदेशी जायला निघाले म्हणजे जाण्याची तयारी केली. या वेळी रमाला जायची खूप इच्छा होती. रमा तसं अनिकेतजवळ बोलली.


“अनिकेत बेटा, आता तरी मला सोबत घेऊन जा तिकडे. एकटं नाही रहावत रे आता. कुठले काम होत नाही. गुडघे दुखायला लागतात. कधी कधी तब्येत बरी वाटत नाही. माझं कमी-जास्त झालं तर कोण आहे इथे बघायला? तिथे तुम्ही दोघे माझ्याजवळ असाल. अडीअडचणीला धावून याल. मला घेऊन जा रे या वेळी.” रमा काकूळतेने बोलली.


“आई आम्ही दोघेही आपापल्या कामात व्यस्त असतो. हिचा पण जॉब असतो मी पण दिवसभर बाहेर असतो. तुला कुठे नेणार? आणि तुला कोण बघणार आहे?

आम्हाला आमची कामे पुरत नाही, तुझ कोण करणार तिथे? माझ्या डोक्यात एक विचार आहे माझ्या मित्राकडे वृद्धाश्रमचा नंबर आहे. मी तो नंबर घेतो आणि तुला तिथे नेऊन देतो. तिथे तुझ्या वयाची खूप लोक असतील. तिथे तुझं मनही रमेल. आणि तुझे दिवस खूप छान जातील.” अनिकेत पटापट बोलून गेला.


पण त्याने आईच्या मनाचा विचार केला नाही. हे सगळं ऐकून आईला काय वाटेल याचा त्याने विचार केला नाही.


हे सगळ ऐकून रमाला खूप दुःख झालं. आपल्या मुलाला आपली गरज नाही. आता त्याला मी नकोशी झाले. ही भावना रमाला दुःख देऊन गेली.


इतके वर्ष काबाडकष्ट करून मुलांना मोठं केलं तो हा दिवस पाहण्यासाठी. हा दिवस पाहण्या अगोदर मी मेले असते तर बरं झालं असतं. हे देवा का ठेवलं रे बाबा हा दिवस पाहण्यासाठी?. मनातल्या मनात बोलून रमाने डोळे मिटले.


दुसऱ्या दिवशी अनिकेतने रमाला वृद्धाश्रमात सोडून दिलं. रमाला तिच्याच वयाची लोक भेटली. तिच्याच वयाच्या बाया मिळाल्या. तिचे दिवस छान जाऊ लागले पण जुन्या आठवणीत येतातच.

आज अनिकेतचा वाढदिवस होता म्हणून रमा त्याचे फोटो आणि त्याचा अल्बम काढून बसलेली होती. तिने फोटोकडे बघूनच त्याला आशीर्वाद दिला.


“ तू मला विसरलास तरी
मी जन्मदाती आहे
पोटच्या गोळ्याला नाही विसरणार,
गरज तुझी असताना मला
वृद्धाश्रमात आणून सोडलं
आता कितीही हाका मारल्यास
तरीही नाही परतणार”


समाप्त:


स्वतःच्या मुलाने वृद्धाश्रमात सोडणं यापेक्षा मोठं दुर्दैव त्या माऊलीसाठी दुसरं काय असणार.


किती निष्ठुर असतात ती मुले जी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवतात.


आई वडील आपल्याला लहानाच मोठं करतात. गरज पडल्यास एक वेळ उपाशी राहून मुलांची पोट भरतात.
पण मुलं मोठी झाली की सगळं विसरतात. आई वडिलांचे कष्ट, त्यांची तळमळ सगळं वाया जात. 


अशी निष्ठुर मुलं असण्यापेक्षा नसलेली बरी. मला मूल नाही यापेक्षा माझा मुलगा हा असा निघाला ही गोष्ट जास्त त्रासदायक आहे.


रमाला जे दुःख मिळालंय ते कुणालाही मिळू नये. 


धन्यवाद