ज्युलिया राघव शास्त्री ४

तिची त्याची पहिली भेट... प्रवास तिचा...
ज्युलिया राघव शास्त्री

भाग ४

"या.. प्लीज कम." म्हणत तिने दारावर उभ्या असलेल्या व्यक्तीचे स्वागत केले.

"मला थोडे महत्वाचे बोलायचे आहे."

"हो बोला ना.."

"इथे नाही, थोडे इकडे बाहेर.." तिथे लागलेले सीसीटीव्ही कॅमेरे बघून ती व्यक्ती म्हणाली.

ज्युलिया हसत त्या व्यक्तीच्या मागे बाहेर गेली.

थोड्या वेळाने ज्युलिया परत खोलीत आली. अजूनही बाहेर ' बँड बाजा बारात ' वाला जल्लोष सुरू होता. ती खिडकीत जात परत बाहेरचे दृश्य बघत होती. तिचा राजकुमार बघत होती. आता हळूहळू त्याचा चेहरा अंधुक दिसायला लागला होता. आतापर्यंत तिच्या डोळ्यात असणारा आनंद, डोळ्यातील सुखांचे रूपांतर अश्रूमध्ये व्हायला लागले होते. ती त्याला बघत वारंवार आपले डोळे पुसत होती. पण अश्रू मात्र थांबायचे नाव घेत नव्हते. पोट दुखायला लागले, पाय लटपटू लागले, मन खूप भरून आले, गळा दाटून आला, डोकं बधीर व्हायला लागले आणि डोळे अविरत वाहू लागले. वारंवार ती तिच्या डोक्यावर असलेली ती ओढणी सांभाळत घट्ट घट्ट छातीशी धरत होती आणि तिला ते दिवस आठवू लागले, जे आजच्या दिवसाला ती मागे सोडू बघत होती. पण त्यामुळेच कदाचित आज हे घडत होते. सगळं चित्र जसेच्या तसे तिच्या डोळ्यांपुढे येऊ लागले.

"हे यू, कम बॅक.. लूक बॅक.." ती जोराने ओरडली.

सात वर्षांपूर्वी…. परदेशात ..

एक बर्फाळ प्रदेश..

"हे यू, कम बॅक.. लूक.." ती ओरडत होती. पण पुढे असलेल्या व्यक्तीला बहुतेक तिचे शब्द ऐकू जात नव्हते की त्याला ऐकायचे नव्हते, माहिती नाही. पण तो अगदी आपल्याच तालात चालत होता.

"हे यू.. लिसन.." ओरडत त्याच्याकडे पळत जात त्याच्यावर तिने झडप घातली. त्याला घेऊन ती बाजूला असलेल्या बर्फाच्या ढिगाऱ्यात जाऊन पडली. तोच एक मोठा ट्रॅक भरधाव वेगाने त्यांच्याजवळून गेला. त्याच्या आवाजाने तो शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडले तर तो बर्फात फसला आहे आणि कोणीतरी त्याला घट्ट पकडून धरले आहे, हे त्याला जाणवले. त्या ट्रकचा वेग इतका जास्त होता की त्यामुळे आता या क्षणाला काय घडले असते, या विचारानेच ती थरथरू लागली आणि तिची त्या वक्तीच्या कॉलरवरची पकड आणखीच घट्ट झाली. ती बर्फाच्या ढिगाऱ्यात आणि तिच्यावर तो.. तिच्या हृदयाची वाढलेली धडधड आणि तिच्या शरीराचे होणारे कंपन, त्याला जाणवत होते. पण तिचा चेहरा त्याला दिसत नव्हता. तिच्या चेहऱ्यावर असलेला बर्फ तो हळूहळू दूर करू लागला. आता त्याला तिचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. लाल गुलाबी गोरा नितळ रंग, थोडा लांबोळका पण गोलच चेहरा, छोटीशी निमुळती जीवनी, सरळ छोटंसं नाक, त्याखाली अगदी कोरलेले दिसावे असे गुलाबी ओठ, डोक्यावर असलेल्या वुलन कॅप मधून बाहेर डोकावणारे काळे भोर केस आणि गच्च बंद केलेले डोळे.. चेहऱ्यावरून तरी सतरा अठरा वर्षाची वाटत होती. तो तिच्याकडे एकटक बघत होता.

तिने हळूहळू डोळे उघडले. निळेशार अगदी मार्बल सारखे दिसणारे पाणीदार डोळे..आता मात्र तिचा चेहरा न्याहाळताना त्याचा डोळ्यांच्या हालचालीची गती वाढली होती. तो वारंवार तिचा चेहरा निरखून बघू लागला.

काहीच हालचाल न करता ती त्याच्याकडे बघत होती. नंतर डोळ्यांच्या कोनांतून आजूबाजूला बघत होती. सगळं ठीक असल्याची जाणीव झाली तसे तिने सुटकेचा श्वास सोडला. त्याने मात्र एकदम स्वतःच्या नाकावर हात ठेवला.

"ड्रंक.." त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडला.

"जस्ट थिंक ट्वाइस बिफोर थिंकिंग अबाऊट सुसाईड.. यू केअरलेस मॅन! थिंक अबाऊट युअर फॅमिली, युअर मॉम, डॅड, ब्रदर्स सिस्टर्स बिफोर टेकिंग सच डेमोन डिसिजन्स.. यू कोल्ड हार्टेड सिली मॅन.." त्याच पडलेल्या अवस्थेत सुद्धा तिचा राग उफाळून येत होता. पण तो मात्र भराभर तिच्या चेहऱ्यावर डोळे फिरवत होता.

"मुव्ह.." त्याला तसेच बघून ती चिडून ओरडली. पण तरीही तो तिलाच बघत होता.

"आय सेड मुव्ह.." म्हणत तिने आपली सर्व शक्ती एकवटून त्याला आपल्या अंगावरून दूर ढकलले आणि जागीच उठून उभे राहण्याचा प्रयत्न करत होती पण तिचा तोल जात होता. तरी स्वतःला कसेबसे सांभाळत ती उभी राहिली. डोक्यावरील टोपी नीट करत अंगावर असलेल्या जाड्याभोर जॅकेटवर जमा झालेला बर्फ झटकू लागली. अन् तो मात्र तिलाच बघत होता. तिचीच हालचाल टिपत होता.

"यू फुल, वेदर इज सो हाई अँड ऑन अलर्ट. गो टू एनी सेफ प्लेस." त्याला स्वतःकडे असे घुम्यासारखे पाहताना बघून ती चिडत म्हणाली आणि आपला तोल सांभाळत चालत चालत जात पुढे एका बाजूला उभ्या असलेल्या गाडीत जाऊन बसली. तिने गाडी सुरू केली आणि रस्त्याने पुढे जात दिसेनाशी झाली. तो मात्र तिच्याचकडे बघत उभा होता.

जसे ती दिसेनाशी झाली तसे पळत येत तो आपल्या गाडीत बसला आणि भरधाव वेगाने गाडी त्याने आपल्या अपार्टमेंटकडे घेतली. गाडी चालवताना सुद्धा पूर्णपणे तीच त्याच्या डोक्यात होती. तिचे डोळे वारंवार त्याच्या डोळ्यांपुढे येत होते. गाडी पार्किंग एरियामध्ये सोडून भरभर चालत तो त्याच्या अपार्टमेंटमध्ये आला. चावी शोधतोय तर त्याच्या लक्षात आले चावी गाडीलाच राहिली. गाडी सुद्धा त्याने लॉक केली नव्हती, त्याच्या लक्षात आले. परत तो धावत गाडीजवळ आला. गाडी लॉक करत सगळ्या चाव्या सोबत घेतल्या. घराचे दार उघडून आत शिरला आणि सर्वात आधी त्याचा लॅपटॉप सुरू केला. लॅपटॉप सुरू होईपर्यंत त्याने अंगातले जॅकेट काढून फेकले. पायातले बूट आणि मोजे उडवत बाजूला टाकले. टेबलवर बसत लॅपटॉपच्या कीबोर्डवर भराभर बोटं चालवू लागला आणि शेवटी त्याच्या डोळ्यांना जे बघायचे होते, ते त्याला सापडले.

"एस.. ज्युलिया.. शी वॉज ज्युलिया.."
लॅपटॉपमध्ये तिला बघत असताना त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. डोळ्यात राग संचारत होता. त्याच्या हाताची मूठ आपोआप आवळल्या गेली आणि त्याने जोरदार एक पंच टेबलवर मारला.

धीर गळून तो खुर्चीत बसला. त्याला परत खूप अस्वस्थ वाटू लागले. काही महिन्यांपूर्वीच घरातील तो आक्रोश त्याच्या डोळ्यांपुढे येऊ लागला होता. त्याला असह्य वाटू लागले. डोकं जड होऊ लागले. डोळ्यात पाणी दाटू लागले. मोठमोठ्याने श्वास घेऊन स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. पण तरीही त्याचे मन शांत होत नव्हते. त्याने फ्रीज मधून बियरच्या बॉटल काढल्या.. एक एक करत घशात रिचवु लागला. घरच्या आठवणीत बेडवर पडल्या पडल्या कधीतरी त्याचा डोळा लागला.

*****

स्थळ: कॉर्पोरेट ऑफिस

"व्हेअर इज ही?" बॉस चिडत होता.

"ही इज कमिंग सर.." केतनने सांभाळून नेण्याचा प्रयत्न केला.

"मोर हाफ एन अवर.." एवढे बोलून बॉस आपल्या केबिनमध्ये निघून गेला.

अर्धा तास उलटून गेला..

"व्हेअर इज ही?" बॉस परत विचारू लागला.
आता मात्र केतन जवळ सांगायला काही नव्हते.

"ही इज देअर.." ऑफिस मधली एक मुलगी म्हणाली.

बॉसने थोडे चिडक्या नजरेने त्याच्याकडे बघितले आणि आपल्या केबिनमध्ये निघून गेला.

"प्रेझेंटेशन की तयारी?" केतनने त्याच्याजवळ जात त्याला विचारले. त्याने नकारार्थी मान हलवली.

"दोन दिन कहा गायब था?" केतन.

"सिक.."

"ये प्रोजेक्ट बहोत इंपॉर्टन्ट है, तुम्हे पता है.." केतन.

"येह.. "

"भाई, टकलू भडका हुवा है." केतन.

"विल सी.."

"या आय नो, तू हॅण्डल कर ही लेगा. तेरी इंटेलिजन्ससेहीतो तुझे हमसे डब्बल पॅकेज मिल रहा." केतन त्याचे कौतुक करत म्हणाला.

त्यावर तो फक्त किंचितसा हसला. " इस बार क्या होगा, पता नहीं."

"व्हॉट हॅपेंड? यू आर लूकिंग सो डाऊन? तबीयत ज्यादा खराब थी क्या?" केतन.

"पता नहीं, क्या हो रहा, कूछ समझ ना आ रहा."

"हम्म. तू दोन दिन नही था, यह फुल पंखुडीसी लडकिया देख मुरझासी गई हैं. बिचारीयों को आय टॉनिक कम होगया." केतन त्याचा मूड ठीक करण्यासाठी म्हणाला.

त्यावर तो आजूबाजूला बघत हसला.

"आधा घंटा हैं अभी, इतने मे तो तू कायनात बदल देगा, यह प्रेझेंटेशन क्या चीज है." म्हणत हसत केतन त्याच्या जागेवर गेला.

थोड्या वेळातच एका प्रोजेक्टवर मीटिंग होती. बाहेरून आलेली एक टीम आणि ऑफीसची टीम कॉन्फरन्स रूममध्ये जमले. रूममध्ये अंधार झाला आणि एक प्रोजेक्टर सुरू झाले. पुढे एक चोविशितला तरुण उभा होता. त्याने सर्वांना ग्रीट केले आणि त्याचे प्रेझेंटेशन सुरू केले. तो सगळं खूप उस्फूर्तपणे सांगत होता. असा एकही क्षण नाही गेला की कोणाची त्याच्यावरून नजर हटली असेल.

"वाव! ही इज सो ब्रिलियंट अँड शार्प!" एक गोरी कलिग म्हणाली.

"येह, ही इज.. ही इज द स्टार ऑफ अवर डिपार्टमेंट." बाजूला बसलेल्या मुलीने माहिती पुरवली.

"व्हु इज ही?"

"राघव शास्त्री."

"वेरी ब्रेनी अँड हँडसम टू!" ती गोरी म्हणाली.
बाजूला बसलेल्या मुलगी तिरप्या डोळ्यांनी तिला बघत होती.

राघवने ती मीटिंग खूप छान पद्धतीने कंडक्ट केली. बाहेरून आलेली टीम आणि बाकी सर्वांनी त्याचे कौतुक केले. सगळ्यांना त्याच्या कामाची पद्धत आवडली. त्याच्या हुशारीचे खूप कुतूहल सुद्धा वाटले. आतापर्यंत चिडलेला त्याचा बॉस त्याचे प्रेझेंटेशन बघून शांत झाला होता.

सगळेजण राघवचे अभिनंदन करत बाहेर पडले.

"यू नेल्ड इट ब्रो.." केतन राघव जवळ येत त्याचे अभिनंदन करत म्हणाला.

"थँक्स!" राघवने कसेबसे उत्तर दिले.

"व्हॉट हॅपेंड? स्टील नॉट फिलिंग वेल? टकलू खुश दिसत आहे. सुट्टी मागून घे. आराम कर." केतन.

"हम्म, बघतो." म्हणत तो बॉसच्या केबिनमध्ये गेला.
बॉसने त्याचे चांगले काम बघता त्याला जाऊ दिले.

त्याने पटापट आपली बॅग पॅक केली, अंगावर जॅकेट चढवले, भरभर बाहेर येत लॅपटॉपची बॅग मागच्या सीट वर टाकत ड्रायव्हर सीटला जाऊन बसला. घड्याळात बघत तो कार चालवू लागला आणि त्याच्या निर्धारित जागेवर पोहचला. हो ती हीच जागा जिथे त्याला ती मुलगी दिसली होती. जिथे तिने त्याचे प्राण वाचवले होते, तीच जागा. गेल्या दोन दिवसापासून तो इथेच येत होता आणि तिच्या येण्याची वाट बघत बसायचा. रात्र उशिराने घरी परत जात होता. आताही तेच करायला तो तिथे आला होता.

चहूकडे थंडगार बर्फाळ वातावरण होते. रोड तसा मोठा होता. ती जागा म्हणजे रस्त्याचा शेवटच होती. विरळ वस्ती होती. अगदी हातावर मोजण्या इतकी घरं दिसत होती. अधूनमधून काही दुकानं होती. बाहेर फारसं कुणी दिसत नव्हते. रस्ता तसा क्लिअर होता. पण रस्त्याच्या दुतर्फा बर्फाचे डोंगर जमलेले होते. झाडांची पानझडी झाली होती. त्याच्या प्रत्येक फांदीवर बर्फच बर्फ साचला होता. सगळीकडे पांढर शुभ्र नजरा होता.

त्याने त्याची कार रोड वरून थोडी खाली उतरवत, एका बाजूला घेतली होती. कार मधून बाहेर येत तो उभा राहिला. सगळीकडे नजर फिरवत होता. दोन दिवसापासून हेच करत होता. तिला शोधत होता.

"त्यादिवशी एवढया बिघडलेल्या वातावरणात काय करत असावी? आज तरी येईलच? शिकत असावी? पलीकडे युनिव्हर्सिटी आहे, तिथेच शिकत असावी?पण एवढया बर्फात बाहेर काय करत होती?" तिथे रस्त्यावर आपली नजर गाडून तो उभा होता. रात्र झाली पण ती काही दिसली नाही. तो परत आपल्या घराकडे फिरला.

******

आज जवळपास तीन आठवडे होत आले होते. दुपारी तीन नंतर तो रोज इथेच येऊन तिची वाट बघत उभा राहत असते. कुठलं असं भूत डोक्यात घुसले आहे, त्याला कळत नव्हते. पण तो रोज हेच करत होता.

"यस, ती.. तीच आहे.." दूर एका घरातून त्याला एक मुलगी बाहेर पडताना दिसली. ती आपला तोल सांभाळत चालत चालत पलीकडे ठेवलेल्या कारकडे जात होती. त्याला खात्री झाली की ती तीच आहे. त्याने इकडेतिकडे बघितले, कोणीच नव्हते. क्षणाचाही विलंब न करता त्याने तिच्यावर झडप घालत तिचे तोंड दाबून धरले.

*******

क्रमशः


**********

कथेत मुद्दाम परदेशातील ठिकाणाचे नाव लिहिले नाही आहे. आपले वाचक लगेच गूगल करून बघतात? धन्यवाद!

*****

🎭 Series Post

View all