ध्यास स्वप्नपूर्तीचा

Story of a woman who decided to complete her dream in late age.

सकाळपासूनच रुचिता खूप घाईघाईने आवराआवर करत असते, नाश्ता ही घाईघाईनेच खात असते, तिला अस बघून आईच्या मनात प्रश्न उभे राहिले. 

रुचिताची आई--- रुचिता एवढी कसली घाई आहे, जरा निवांत बसून नाश्ता कर. 

रुचिता--- अगं आई आज डॉ सोनलची मुलाखत घ्यायची आहे, त्या खूप व्यस्त असतात, खूप मुश्किलीने त्यांची वेळ भेटली आहे. 

रुचिताची आई--- कोण आहेत ह्या डॉ सोनल? याआधी नाव नाही ऐकलं. 

रुचिता--- वयाच्या 29 व्या वर्षी त्यांनी 11वी ला प्रवेश घेतला. वयाच्या 35 व्या वर्षी त्या डॉक्टर झाल्या आणि विशेष म्हणजे आठवड्यातून दोन दिवस आपल्या मूळ गावी जाऊन गरिब रुग्णांवर मोफत उपचार करतात. 

रुचिताची आई--- एवढया उशीरा शिक्षण का चालू केले? डॉक्टर च का झाल्या? गरिबांवर मोफत उपचार का? 

रुचिता--- अगं आई, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांची मुलाखत घ्यायची आहे. आता मी जाते, परत आल्यावर तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे असतील. 

रुचिता नाश्ता संपवून घराबाहेर पडते, ती थेट डॉ सोनलच्या घरी पोहोचते. डॉ सोनल रुचिताची वाटच पाहत होत्या. 

रुचिता--- नमस्कार डॉ सोनल अखेर तुमच्या भेटीचा योग आलाच. तुमच्या बद्दल ऐकल्या पासून तुम्हाला भेटण्याची खूप उत्सुकता लागलेली होती. 

डॉ सोनल--- माझ्या भेटीची उत्सुकता लागायला मी काही महान व्यक्ती नाहीये. माझी मुलाखत घेण्यामागे तुझा उद्देश काय आहे? 

रुचिता--- आपल्या आजूबाजूला अशा खूप स्त्रिया आहेत ज्या वय जास्त झाले म्हणून शिक्षण घेत नाहीत, इच्छा असूनही शिक्षण घ्यायला घाबरतात. तुमची कथा अशा स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरु शकते. 

डॉ सोनल--- बरं ठीक आहे, आपण वेळ न दवडता मुलाखतीला सुरुवात करु. 

रुचिता--- तुम्ही तुमच्या आयुष्याचा पूर्ण प्रवास सांगितला तर त्यात मला सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळतील. 

डॉ सोनल--- माझा जन्म एका छोट्याशा खेड्यात झाला. मला लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. मी १० वर्षांची असताना माझी आई खूप आजारी पडली होती. गावात दवाखाना नव्हता, पैशांअभावी तिला उपचारांसाठी शहरात नेता आले नाही. पैशांच्या व उपचारांअभावी माझ्या आईचा मृत्यू झाला. मी आईच्या मायेला पोरकी झाले. मी तेव्हाच ठरवले होते की मोठी होऊन डॉक्टर व्हायचे आणि गावात गरिबांसाठी मोफत उपचार करायचे. ज्या दु:खाला मला सामोरे जावे लागले ते दु:ख कोणाच्याही वाट्याला येऊ नये हीच प्रामाणिक इच्छा होती. गावात १०वी पर्यंतच शाळा होती, ११वी साठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागायचे. एकट्या मुलीला तालुक्याच्या ठिकाणी कसे पाठवावे या विचाराने माझ्या वडिलांनी माझे शिक्षण थांबविले. 

वयाच्या १७ व्या वर्षी अविनाश रावांशी लग्न झाले. अविनाश राव एका बॅंकेत नोकरीला होते. त्यांचे वडील आमच्या लग्नाआधीच वारले होते. लग्नानंतर अविनाश रावांना मी पुढे शिक्षण करण्याची इच्छा असल्याचे सांगितले, त्यांचा शिक्षणासाठी पूर्ण पाठिंबा होता,फक्त त्यांची एक अट होती की घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून शिक्षण घ्यायचे, सासूबाईंचा ही पूर्णपणे पाठिंबा होता. पण म्हणतात ना सगळचं आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. लग्नानंतर एका महिन्यातच सासूबाईंना अर्धांगवायूचा झटका आला, सासूबाई अंथरुणाला खिळल्या, घराची सर्व जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. सासूबाईंची तब्येत बिघडल्यामुळे माझ्या शिक्षणाला पुन्हा एकदा पूर्ण विराम लागला. पुढच्या दीड वर्षात आम्हाला एक कन्यारत्न प्राप्त झाले. मुलगी व सासूबाईंची तब्येत सांभाळताना दिवस असे भरभर जाऊ लागले. मुलगी ३ वर्षांची असताना पुत्ररत्न प्राप्त झाले. मुलांना वाढवण्यात व घर सांभाळताना पुढे शिक्षण घेण्याचा विषय मी डोक्यातून काढूनच टाकला होता. 

माझी मुलगी कांचन इयत्ता ४थीत असताना माझ्या सासूबाईंचा मृत्यू झाला. 

असेच दिवसा मागून दिवस जात होते, मुले मोठी होत होती. 

Life is unexpected. 

कांचन ५वीत होती तर माझा मुलगा शुभम २रीत होता. एक दिवस आम्ही घर आवरत होतो, सुट्टीचा दिवस असल्याने सगळेच घरात होते. जुन्या कागदपत्रात माझ्या गुणपत्रिका होत्या. माझी १०वीची गुणपत्रिका कांचनने बघितली. 

कांचन--- वाव आई, तुला १०वीत ८०% गुण होते. आई तुला इतके छान गुण होते तरी तु पुढे का शिकली नाहीस? 

तेव्हा मी तिला त्या वेळच्या परिस्थिती बद्दल, माझ्या असलेल्या स्वप्नांबद्दल कल्पना दिली. बोलता बोलता सहजच मी तिला विचारले

मी--- बेटा, मला घरच्या परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेता नाही आले, माझे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. आता तु करशील ना माझे स्वप्न पूर्ण, तु डॉक्टर होशील ना. 

कांचन--- आई मला डॉक्टर होण्यात काहीच रस नाहीये. तुझे स्वप्न तु सुद्धा पूर्ण करु शकतेस. 

मी--- कसं शक्य आहे? माझे वय बघ किती झाले आहे? या वयात पुन्हा शिक्षण सुरू करणे, कसं शक्य आहे. शिवाय तुमची जबाबदारी आहे माझ्यावर. घरातील कामे कोण करेल? 

कांचन--- आई तुच म्हणतेस ना, शिक्षणाला वयाची अट नसते. मी आणि शुभम एवढे मोठे झाले आहोत की आमची कामे आम्ही करु शकतो. बाबा तुमचं काय मत आहे या सगळ्यावर . 

कांचनचे बोलणं ऐकल्यावर असे वाटले, किती समजदार मुलगी आहे माझी. मुली किती पटकन मोठ्या होतात. इतक्या वेळ बघ्याची भूमिका घेतलेले अविनाशने बोलायला सुरुवात केली

अविनाश--- सोनल इच्छा तेथे मार्ग. मला मान्य आहे घरातील जबाबदाऱ्यांमुळे तुझे स्वप्न अपूर्ण राहिले. पण आता तुझे स्वप्न तु पूर्ण करुच शकतेस. घरातल्या कामांचा प्रश्न आहे तर त्या साठी एक कामवाली बाई ठेवूया, मुलांचा अभ्यास मी घेत जाईल आणि शिवाय आपली आर्थिक परिस्थितीही सुधारली आहे. इतक्या दिवस आपले घर तु सांभाळलेस, आता माझी वेळ आहे. 

मी--- पुन्हा मला अभ्यास करायला जमेल का? 

अविनाश--- मला खात्री आहे तुला पुन्हा अभ्यास करायला जमेल. तु खूप जिद्दी आणि कष्टाळू आहेस. प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे. 

त्या दिवसानंतर माझा पुढील शिक्षणाचा प्रवास पुन्हा सुरू झाला. घरापासून जवळच असलेल्या काॅलेज मध्ये ११वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. सुरवातीला काॅलेजला जायला खूप अवघडल्यासारखे वाटायचे, वर्गातील सर्व विद्यार्थी माझ्या पेक्षा खूप लहान होते, त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेणे खूप कठीण गेले. सुरवातीला काॅलेज मधील मुले माझी खूप थट्टा करायचे पण नंतर हळूहळू सर्वांशीच मैत्री होत गेली. अभ्यासाला पुन्हा एकदा सुरुवात करणे काही सोपे नव्हते पण स्वप्न पूर्ण करण्याचा मी ध्यासच घेतला होता. सातत्याने अभ्यास करत गेले आणि शेवटी यश मिळालेचं. १२वी ला चांगले गुण मिळाल्यामुळे BAMS ला सहजासहजी प्रवेश मिळाला. काॅलेज व घर एकाच शहरात असल्याने घराकडेही लक्ष देता आले. पुढील ५ वर्षांत माझ्या नावापुढे डॉ लागले होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर काय करायचे हा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला. पूर्ण वेळ गावाकडे दवाखाना ही चालवू शकत नव्हते कारण कांचनचे १२वीचे महत्त्वाचे असे वर्ष होते, मुलगा शुभम १० वीत जाणार होता, आता त्यांना माझी गरज होती. यातील मध्यस्थ शोधून काढला, शहरातील एका हाॅस्पिटलमध्ये काम करायला सुरुवात केली व आठवड्यातून दोन दिवस गावाकडे जाऊन गरीब रुग्णांवर मोफत उपचार करु लागले. तेव्हा कुठे जाऊन मनाला समाधान वाटले. स्वप्न पूर्तीचा आनंद काहीतरी वेगळाच असतो हे त्यावेळी जाणवले. 

रुचिता--- डॉ सोनल तुमच्या यशाचे श्रेय कोणाला देणार? 

डॉ सोनल--- अर्थातच माझे पती अविनाश रावांना आणि माझ्या दोन्ही मुलांना. जर त्यांचा पाठिंबा नसता तर हे सगळं शक्यच झाले नसते. 

रुचिता--- या पूर्ण प्रवासातील अशी एखादी घटना आठवते का? ज्या वेळी तुम्हाला घर की काॅलेज यातून एकच निवडावे लागणार होते, आणि निर्णय घेणे तुमच्या साठी खूप कठीण गेले. 

डॉ सोनल--- हो असा एक प्रसंग घडला होता, माझी १२वी ची परीक्षा होती, त्यावेळेस कांचनला टायफॉइड झाला होता, कांचनला खूप ताप होता, तिला हाॅस्पिटल मध्ये ॲडमिट केले होते. पण त्यावेळी तीने मला जवळ सुद्धा फिरकू दिले नाही, मी आजारी पडू नये हीच त्या मागची इच्छा होती. कांचनच्या बाबांनी १५ दिवस सुट्टी घेतली होती. त्यावेळी माझ्यातील आईला खूप वेदना झाल्या होत्या. 

रुचिता--- तुम्ही शिक्षण घेत असताना तुमच्या कडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन काय होता? 

डॉ सोनल--- माझ्या समोर तर कोणी काही बोलायचे नाही पण माझ्या मागे भरपूर नावं ठेवायची. कांचन आजारी होती तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील लोक बोलायचे, ह्या बाईला आईचे काळीज आहे की नाही, मुलगी तिकडे दवाखान्यात ॲडमिट आहे आणि आई इकडे परीक्षा देत आहे. समाजाचं काय घेऊन बसलात ते आपल्याला पायी चालू देत नाही आणि घोड्यावर ही बसू देत नाही. 

रुचिता--- तुम्हाला सगळयांना सल्ला द्यायचा असेल तर काय द्याल? 

डॉ सोनल--- श्री कृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे, "कर्म करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे" स्वप्न बघा, पूर्ण करण्यासाठी कष्ट घ्या. प्रामाणिक प्रयत्न केले तर ध्येय साध्य होतेच. स्वप्न पूर्ण करत असताना कुठलीही अडचण आली तरी धीराने सामोरे जा. 

Every dog has one day. 

©® Dr Supriya Dighe