Joshi kaka ani alien

When alien from other planet meets with Joshi family in pune, will he be able to handle them?

"अहो झालात का तयार? लोकं तिकडे सिनेमा बघायला येणार आहेत तुम्हाला बघायला नाही", जोशी काकूंनी वैतागून काकांना आवाज दिला. "एरवी माझ्या माहेरी जाताना दाढीची खुंट आणि नेहमीचा एकच शर्ट घालुन येतात. मागच्यावेळी मला बाबांनी विचारलं पण, काय गं जावईबापूंची तब्येत बरी नाही का? आणि आज अंधारात बसून सिनेमा बघायला एवढी तयारी! जा गं सई बाबांना घेऊन ये नाहीतर उद्या सकाळच्या शो ला जावं लागेल", जोशी काकूंनी जवळच फोनवर गुंतलेल्या सईला सांगितलं. आज खूप दिवसांनी जोशी कुटुंब नवीन हिंदी सिनेमा बघायला चालले होते. ह्रितिक रोशन चा 'कोई मिल गया'! दुपारी अवि टिकेट्स काढून आला आणि जोशी काका काकूंना समोर बसवून म्हणाला, "आई-बाबा आपण आज सिनेमाला चाललोय. मी तुम्हाला आत्ताच सिनेमाचा प्लॉट काय आहे ते सांगून ठेवतोय नाहीतर तिकडे आम्हाला प्रश्न विचारत बसाल. मागच्यावेळेला आपल्याला जवळजवळ हाकलून दिलं होता थिएटर मधून". "हो मग काय, आई तर मधेच पाय मोकळे करायचे म्हणून उभी राहिली, मागे बसलेलं कपल कसलं वैतागलं होतं.", सईने पण अविच्या तक्रारीमध्ये आपली तक्रार जोडली. "तर सिनेमामध्ये,  परग्रहावरून एक माणूस (एलियन) पृथ्वीवर येतो आणि चुकून इकडेच राहतो. त्याचं नाव 'जादू' असतं  कारण त्याच्याकडे खास पॉवर असते. पण त्याची पॉवर फक्त उन्हातच वापरता येते. यावर पूर्ण सिनेमा आहे. त्यात तुम्हाला अजून काही प्रश्न पडलेच तर ते तुम्ही सिनेमा संपल्यावर विचारा", अविने पाण्याचा ग्लास खाली ठेवत सांगितलं आणि काका काकूंनी मान डोलावली. शेवटी एकदाचे काका तयार होऊन बाहेर आले, छान ठेवणीतला शर्ट घालून आणि सेंट मारून. "काय कसा दिसतोय मी? लग्नाच्या आधीचे दिवस आठवले कि नाही?", काकूंकडे बघत काकांनी विचारलं. "हो अगदी आठवले, अर्धा सिनेमा झाला असताना घोरत होतात तुम्ही, असं कसं विसरेन मी. आणि केवढं ते परफ्युम मारलंय. तो एलियन का कोण आहे त्याच्या पॉवर्स जातील या वासाने", काकू तोंड मुरडत म्हणाल्या. 

सिनेमा संपवून जोशी कुटुंब परत घरी येत असताना काका म्हणाले, "काय रे अवि, हे एलियन वगैरे खरंच येतात आपल्याकडे? तुला आठवतंय का, परवा सामान आणायला चाललो होतो तेव्हा आपल्या टिळक नगर शाळेबाहेर पण असाच एक निळा मुलगा दिसला होता आपल्याला. मला तर वाटतं तो पण एलियनच होता"! "काहीपण काय बाबा, त्यांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती शाळेत. कृष्णाचा निळा रंग जरा जास्त झाला होता त्या मुलाला. एलियन मोरपीस कशाला लावेल डोक्यावर!", अवि हसत म्हणाला. घरी पोचल्यावर सगळे आपापल्या खोलीत झोपायला निघून गेले. तेवढ्यात माळ्यावरून जोशी काकूंच्या किंचाळण्याचा आवाज आला, 'ईईई ई ..उंदीर "! काका, सई, अवि सगळेच धावत माळ्यावर आले. "काय गं आई, एवढ्या रात्री माळ्यावर काय करतेयस? ही काय आवरायची वेळ आहे का?", सई ने झोपाळलेल्या आवाजात विचारलं. "काय बाई माझं नशीबच फुटकं, दोन-तीन दिवसापासून माळ्यावरून आवाज येत होता, मला वाटलं असेल एखादा एलियन इकडे पण. मस्त त्याच्याकडून धुणं भांडी घरकाम करून घेईन. पण कसलं काय, आमच्या नशिबात मेले उंदीरच आहेत.", काकू वैतागून म्हणाल्या. "म्हणजे? तुला धुणं भांडी करायला परग्रहावरून माणूस हवाय? अगं आपल्या गुलाबबाई काय वाईट आहेत? जवळच राहतात आणि त्यांना काय ते ऊन पण लागत नाही चार्जिंग साठी!", काका काकूंना चिडवायला म्हणाले. "आई-बाबा तो एलियन आहे हो. जगात लोकं त्यांचा अभ्यास करण्यासाठी दिवसरात्र काम करतात आणि तुम्ही त्याला घरगडी करून टाकलात. आम्ही चाललोय झोपायला", म्हणून अवि आणि सई निघून गेले.  

रात्री कसल्यातरी आवाजाने काकांना जाग आली. पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेले असताना त्यांना हॉलच्या खिडकीत एक आकार दिसला. जरा बिचकतच ते बघायला गेले. पडदा बाजूला केला तेव्हा भीतीने किंचाळणारच होते ते. समोर निळ्या रंगाचा विचित्र दिसणारा माणूस उभा होता, अगदी सिनेमा मध्ये होता, हुबेहूब तसा. थोडा धीर करून काकांनी विचारलं, "काय रे कोण तु? आणि इकडे काय करतोयस?". निळ्या रंगाचा माणूस काकांकडे बघत उभा राहिला आणि थोड्यावेळाने म्हणाला, "काका मी 'जादू', ओळखलं नाहीत का तुम्ही? मगाशी तुमच्या माळ्यावर लपलो होतो, काकूंचं लक्ष नसताना कसाबसा इकडे येऊन लपलो". "म्हणजे? तु खरंच तो एलियन आहेस?  पण बरं झालं हां आमच्या हिच्या हातात नाही लागलास नाहीतर 'जादू' चा 'झाडू' झाला असतास. आमच्या हिने तुला वॉशिंग मशीन, केर लादी सगळं करायला लावलं असतं !", काका आपल्याच जोकवर  खुश होत म्हणाले, "पण काय रे तू म्हणतोयस एलियन आहेस, मग काहीतरी वेगळं करून दाखव की". "मला ऊन लागतं काका, त्याशिवाय माझ्या पॉवर्स चालत नाहीत", एलियन म्हणाला. "अरे हो की, विसरलोच होतो मी.एकदम बरोबर सिजन मध्ये आला आहेस तु. मे मधलं पुण्यातलं ऊन म्हणजे एका दिवसात एवढा चार्ज होशील तु कि स्वतःच तबकडी बनून तुझ्या घरी परत जाशील. पण तोपर्यंत कोणाच्या हातात लागू नकोस इकडे, तुला काही हवं नको असेल तर मला येऊन सांग आणि जा वर माळ्यावर लप. काल उंदीर सापडल्यावर आता तिकडे कोणी फिरकणार नाही. मी जातो झोपायला", म्हणून काका झोपायला गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी कोणाचा लक्ष नसताना काका माळ्यावर चेक करायला गेले, तेव्हा रात्रीचा एलियन तिकडेच झोपला होता. त्याला हलवून उठवून काका म्हणाले, "ऊठ रे, उन्हं आली आहेत, गच्चीत जाऊन बस. आणि मला समोरच्या झाडावरचे नारळ काढून दे, बघू तरी तुझ्या पॉवर्स". दिवसभर जोशी काकांनी 'जादू' कडून कसली कसली कामं करून घेतली, झाडावरून नारळ काढ, हवेने उडून समोरच्या पत्र्यावर पडलेला बनियन आण, काकू सिरीयल बघत असताना ते चॅनेल बदलून क्रिकेटची मॅच लाव आणि अजून बरीच. दुपारी माळ्यावर जाऊन काका आपल्या विरळ होत चाललेल्या केसांवर हात फिरवत म्हणाले, "अरे ही सगळी कामं तर कोणीही करू शकतं, जर तू माझे हे विरळ होत चाललेले केस परत आणलेस तर मानलं तुला". एलियननं कंटाळून काकांकडे बघितलं आणि म्हणाला, "ओ काका, मी एलियन आहे, डॉ. बत्रा नाही तुमचे केस परत आणायला. जरा रिस्पेक्ट द्या कि राव!". काका एकदम आश्चर्यचकीत झाले, "अरे वा, एका दिवसात पुणेकरांसारखा बोलायला शिकलास. बरं घरी जायचा काय विचार केला आहेस? आमच्या अविचा एक मित्र सायंटिस्ट आहे. मी त्याला फोन करतो तो तुला मदत करेल!". "नको काका, मी माझ्या घरच्यांना सिग्नल पाठवला आहे ते येतीलच रात्रीपर्यंत, तोपर्यंत मला इथे राहू द्या", एलियन म्हणाला. तेवढ्यात मागून काकूंच्या किंचाळण्याचा आवाज आलं, "आई गं, हे काय आहे? तरी मला वाटलंच होतं आज सकाळपासून तुमची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत. अवि , सई वर या रे. हे बघा तुमच्या बाबांना काय मिळालंय", काकांचा आवाज ऐकून माळ्यावर आलेल्या काकू एलियन ला पाहून पुरत्या दचकल्या होत्या. अवि आणि सई पण धावत वरती आले. "अय्या किती क्युट आहे हा!", सई जवळजवळ किंचाळलीच. एवढ्या माणसांना बघून बिथरलेला एलियन बघून काकांनी सगळ्यांना शांत बसायला सांगितल, पण तोपर्यंत सईने आपल्या फेसबुक वर 'जादू' चा फोटो टाकला होता. 

पुढच्या तासाभरातच जोश्यांच्या घरासमोर लोकांची रांग लागली. "हि सरकारची प्रॉपर्टी आहे जोशी, तुम्ही त्याला असं घरात नाही ठेऊ शकत. तो बाकीच्या लोकांसाठी खतरा नाही याची खात्री तुम्ही देऊ शकता का?", कोणीतरी गर्दीतून म्हणालं.  "काका काका आम्हाला पण एलियन बघायचाय.", मुलांचा गोंधळ चालू होता. "आमचं नवीन पायपुसणं समोरच्या झाडावर अडकलंय, तेवढं काढून घेता का जरा त्याच्याकडून?", म्हात्रे काकू बाजूच्या झाडाकडे हात दाखवत ओरडल्या. ह्या सगळ्या लोकांना समजावणं शक्य नाही हे काकांना कळून चुकलं. त्यांनी आत जाऊन दरवाजा लावून घेतला. "इकडे जादू सुरक्षित नाही, मी त्याला घेऊन जातो, आणि तो गेला की परत येतो.", काका घरच्यांना म्हणाले आणि एलियनला घेऊन मागच्या दाराने बाहेर पडले.  

बिल्डिंग पासून थोड्या अंतरावर एका उंच झाडावर काका आणि एलियन बसले होते, 'जादू' च्या स्पेसशिपची वाट बघत.  साधारण तासाभरानं रात्रीच्या काळोखात काकांना काहीतरी त्यांच्या दिशेने येताना दिसलं, ते स्पेसशिपच होतं. निघताना एलियन  जोशी काकांना म्हणाला, "काका तुम्ही मला जी मदत केलीत त्याने मी एकदम खुश झालोय, आजपासून तुम्हालासुद्धा माझ्यासारख्याच पॉवर्स मिळतील, फक्त तुम्हाला त्या ऊन असतानाच वापरता येतील". जोशी काका एकदम खुश झाले. 'जादू' ला बाय करून ते घरी यायला निघाले आणि त्यांना आठवलं ते एका उंच झाडावर उभे आहे. "ह्या 'जादू' ने मला पॉवर्स एकदम वेळेत दिल्या आहेत, असा भरभर झाडावरून उतरून जातो आता", काका स्वतःशीच खुश होत म्हणाले. आणि तेवढ्यात त्यांना आठवलं, आता तर रात्रीचे बारा वाजले आहेत, ऊन कुठेय? काका आकाशाकडे बघून 'ऊन ऊन' ओरडायला लागले.

"अहोsss..झोपेत ऊन ऊन काय ओरडताय? इकडे उन्हानं पार करपायची वेळ आली आहे आणि तुम्हाला अजून ऊन कशाला हवय?", काकूंनी काकांना झोपेतून गदागदा हलवून उठवलं. काका झोपेतून जागे झाले, आपण कोणत्या झाडावर नाही तर आपल्या बेडवर झोपलोय हे बघून त्यांच्या जिवात जीव आला. ते पटकन उठून माळ्यावर जाऊन बघून आले, तिकडे कोणीच नव्हतं. खरंच स्वप्न होतं तर ते. काका स्वतःशीच हसत कालच पाहिलेल्या सिनेमातलं गाणं गुणगुणत त्यांच्या नेहमीच्या कामांना लागले.