जोरू का गुलाम

Marathi katha

"काय हो काका, तुम्ही काकूंना इतके घाबरता?"

"अरे नाही रे घाबरत मी.. फक्त तीच ऐकतो.."

"तेच म्हणजे त्यांना घाबरता.."

"फार काही नाही रे.. फक्त तिचं म्हणणं पटतं म्हणून.. मी तिचा सल्ला घेतो.. तिचं थोडं ऐकतो.. तिला दुखावत नाही.."

"याला आमच्यात जोरू का गुलाम म्हणतात.. बायकोचा ऐकणारा.."

"तसं असेल तर मग आहे मी जोरू का गुलाम.. त्यात काय एवढं विशेष??"

"काय काका, माझी चेष्टा करता का तुम्ही?? माझ्यापेक्षा एवढे मोठे आहात आणि माझी खेचताय काय??"

"अरे नाही रे, मी खरंच सांगतोय.. खरच मी जोरू का गुलामच आहे.."

"असं का बरं काका?? तुम्ही काकूंचे इतकं का ऐकता आणि त्यांना इतक का घाबरता.. त्या रागावतात का तुम्हाला.."

"घाबरत नाही रे तिच्यावर प्रेम करतो.."

"आम्ही पण करतो की प्रेम आमच्या बायकोवर पण तुमच्यासारख घाबरत नाही.. तुमचं जरा वेगळं असतं.."

"तसं नाही रे, त्या मुली आपल घर सोडून लग्न करून आपल्या बरोबर येतात.. त्यांचं सारं आयुष्य आपल्यासोबत जगण्यासाठी.. आधीच्या त्यांच्या सवयी असतात ते सगळं सोडून आपल्याकडच्या रीतीभाती, आपल्याकडची माणसं, आपल्याकडच्या जेवण हे सगळे शिकूव त्या आपल्यासाठी जगायला लागतात.. एवढंच काय तर आधीच नाव बदलून त्यांच्या नावापुढे आपलंच नाव लावतात..

आई-वडील, भाऊ-बहीण ही सगळी नाती बाजूला ठेवून सासू-सासरे दिर नणंद या नवीन नात्यांमध्ये त्या मिसळून जातात.. त्यांच्या सगळ्या आवडीनिवडी सोडून आपल्या आवडी-निवडी त्या जपत असतात.. आई वडीलांनी त्यांना फुलासारख जपलेल असत.. त्यांना सोडून फक्त आपल्या विश्वासावर त्या इथे आलेल्या असतात.. मग आपण त्यांचं थोडं तर का होईना ऐकायला नको का?? त्यांना मान द्यायला नको का??"

"अगदी बरोबर आहे काका तुमचं.. आपल्या बहिणीकडून, तिच्या सासरच्यांकडून, मुलीच्या सासरच्यांकडून आपण अपेक्षा करू शकतो तर मग आपण का आपल्या बायकोच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही.. सुरवात ही आपल्यापासूनच करायला हवी आता मी सुद्धा माझ्या बायकोला मदत करणार.. तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार.."