Login

जो बुंदसे गयी.... ! 

एक हृदयस्पर्शी कथा !

"काळजी नका करू येते दोन दिवसात. आजी घालेल ना दोन दिवस अंघोळ .. काय आजी ? येते मी. " असं म्हणत लक्ष्मी बाईंनी दार ओढलं आणि दाराबाहेर सटकल्या. 

मालतीबाई मधुराला म्हणाल्या " आग काळजी नको करुस. घालीन मी अंघोळ, दोन दिवसाचा तर प्रश्न आहे."

***

"मी दोन दिवस नाही येणार , पंढरपूरला जायचंय वारीसाठी," लक्ष्मीबाईंनी मालिश करताना जाहीर केलं. 

"मावशी काय हो अचानक ?"

"अचानक नाही. हे बघ माळ घातलीये. दरवर्षी न चुकता वारी करते. पायी नाही जमत. पण आम्ही बसने जातो. दर्शन घेऊन परत. "

"मावशी कुठे जाता पाऊस पाण्याचं, बर एव्हढी गर्दी, उगाच आजारी वगैरे पडाल. इकडूनच करा नमस्कार पोहचतो विठ्ठलाला, तो सगळीकडे असतो." मधुराने रेंटल. 

तिच्या पोटात गोळाच आला आता मावशी नाहीत तर माझ्या इवलुशा बाळाला अंघोळ कशी घालायची ? मालिश करायला कस जमेल? आईचे पण गुडघे  कुरकुर्तात. 

" नाही, माझा नेमच आहे. आजी घालेल ना अंघोळ. दोन दिवसाचा तर प्रश्न आहे?"

"बरं .. " नाक मुरडत मधुरा म्हणाली. 

"बरं, मावशी हे पैसे घ्या आणि आमच्यातर्फे प्रसाद चढवा," मालतीबाईंनी पैसे पुढे केले. 

नेहेमीप्रमाणे बाळाची बाळन्तिणीची अंघोळ-मालिश झालं. मावशी गेल्या आणि बाळाची न्हाऊ झोप सुरु झाल्यावर मधुराही जरा कलंडली. 

***

दुपारी चारनंतर जरा पाय मोकळे करायला म्हणून मधुरा तयार व्हायला लागली. सहज हात गळ्याकडे गेला तर गळा  रिकामा. मंगळसूत्र गायब. 

"आई, अग माझं मंगळसूत्र कुठे ?" नेहेमीप्रमाणे काही गडबड झाली कि आईला पुकारा करायचा हे मधुराच नेहेमीचंच होत. 

"मला काय विचारतेस? हातासरशी कुठे तरी वस्तू ठेवतेस आणि अक्ख घर डोक्यावर घेतेस. आता स्वतः आई झाली तरी काही बदल नाहीये. बघ जरा  नीट," मालतीबाई कारदावल्या. 

मधुराला आठवत होत तिने काही मंगळसूत्र काढलं नव्हतं पण आई एवढं  म्हणत्ये तर तिने कपाट, ड्रावर , बेड शेजारील टेबल परत परत तपासून बघितलं..

"नाही दिसते कुठेच .." आता  मधुरा थोडी रडकुंडीला आली.

तिचं लाडकं, नाजूक, पोवळ्याच पेंडंट असणार, गळ्यासरशी बसणारं ते मंगळसूत्र तिने खास बनवून घेतलं होत. 

"दिसत नाहीये म्हणजे काय ? नीट शोध ना जरा .. ," बोलता बोलता मालती बाई पण शोधायला  लागल्या. 

अर्धा एक तास दोघीनी मिळून अख्ख घर ढुंढाळलं पण मंगळसूत्र काही गावल नाही. 

आता मधुरा पूर्ण रडकुंडीला आलेली आणि मालतीबाई तापलेल्या. 

"घरातून वस्तू कुठे जाणार? शेवटचं कधी आणि कुठे बघितलेलस ? गळ्यातून काढून ठेवलेलस का? आठव नीट ... " मालतीबाईंनी दरडावल. 

"रात्री तरी गळ्यातच होत, थोडं टोचल्यासारखं वाटलं पण मी काही काढलं नाही गळ्यातून मला पक्क आठवतंय . "

".. आणि आत्ता नाहीये. मधलं काही आठवत नाहीये. "

दोघी दोन मिनिट विचार करत बसल्या आणि एकदमच दोघीना  काही क्लिक झाल. त्यांनी एकमेकींकडे बघितलं, " मावशी...???"  दोघी एकदमच बोलल्या. 

"त्या असं करतील ? मला  नाही वाटत .. " मधुरा पुटपुटली. 

"वाटत तर मला पण नव्हतं .. बहुतेक तिथेच आपलं चुकतं ." 

"आता  तर त्या दोन दिवस येणार पण नाहीत .. दोन दिवसांनी तरी येतील का ...? पंढरपूरला तरी गेल्यात का? " मधुराचे तर्क वितर्क सुरु झाले. 

"बहुतेक सगळ्या सांगायच्या गोष्टी .. माळकरी काय ? वारकरी काय ? पंढरपूरला जातायत ... वाट बघा ... ? भल्याची दुनिया काही राहिली नाही .. " मालतीबाईंच्या तोंडाचा पट्टा चालू झाला. 

अजून बराच वेळ ते धुमशान चालू राहील असतं  पण तेवढ्यात बाळाने "ट्याहाँ .." केल्याने मधुरा बाळाकडे धावली. आणि मालतीबाई संध्याकाळच्या  स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. 

रात्रीची जेवणं पण आज शांततेतच झाली. 

लक्ष्मीबाई साधारण पन्नाशीच्या, साडेपाच फूट उंच, निमगोरा रंग, धारधार नाक, छान चपून चोपून नेसलेली स्वच्छ नऊवारी साडी, कपाळावर मोठं कुंकू, मानेवर केसांचा आंबाडा, गळ्यात काळी पोत.  दोन महिन्यांपूर्वी बाळ बाळंतिणीच्या मालिश-अंघोळीच्या कामाचे म्हणून बोलायला  आल्या  तेव्हाच मधुरा आणि मालतीबाई दोघीनाही पसंत पडल्या . त्यामुळेच थोडे पैसे जास्त सांगितले तरी दोघींनी लगेच मान्य केलं. आणि पहिल्या आठवड्यातच आपला निर्णय बरोबर असल्याची दोघींची खात्री पटली. 

आपण एवढ्या विश्वासाने ह्यांना आपलं बाळ सोपवतो. त्यांच्या मालिशने बाळानेही किती छान बाळसं धरलय. आणि अचानक हे असं ?? आपण एवढा विश्वास टाकला म्हणून अंमळ जास्तच जिवाला लागतंय बहुतेक आपल्या, विचारांच्या शृंखलेतच मधुराला झोप लागली. 

बाळंतपणाला माहेरी आलेल्या लेकीचं मंगळसूत्र चोरीला जावं .. मालतीबाईंच्या अंगाचा तिळपापड होत होता. इतक्या वर्षात आपण माणसांना ओळखायला कधी चुकलो नाही मग आताच असं कसं  झालं ? पुन्हा काय त्या तोंड दाखवत नसतात, वारी नुसती नावाला. बहुतेक दुसरी बाई पण शोधायला लागणार....वस्तू गेल्याचं दुःख तर असतंच पण फसवणूक?.. चोरी?...   हे आणि ते .. कधीतरी रात्री खूप उशिरा मालतीबाईंच्या डोळ्याला डोळा लागला.   

***

सकाळी जरा उशिरच झाला दोघीनाही उठायला. मालतीबाई पटापट स्वयंपाकघरातील कामे उरकायला लागल्या. इकडे मधुराने बाळाच्या अंघोळीची तयारी करायला घेतली. बाळाचे कपडे, बांधायची साडी, पावडर, तेल सगळं नीट काढून ठेवलं आणि मालती बाईंना  हाक दिली. 

"आई, झालीये ग सगळी तयारी, तू येतेस ना ?"

"हो, हो.. येतेच, तू ती सतरंजीही घाल खाली म्हणजे तेलाचे डाग नको पडायला .. मला  काय नेहेमीची सवय नाहीये .. , "  मालतीबाईंनी स्वयंपाकघरातून ओरडुनच सांगितले.

"आई , आई .... पटकन  ये .. " मधुराच्या  किंचाळण्याने त्या धावतच बाहेर आल्या. 

 "हे बघ काय ?, " मधुराला हर्षवायूच झालेला. त्या सतरंजीच्या घडीत तिचं मंगळसूत्र अडकलेलं. पट्कन तिने ते उचललं आणि गळ्यात घातलं.

 घालताना तिच्या लक्षात आलं, "अग हा हुक बघ खूपच सैल झालाय, काल बहुतेक मालिश करताना पडलं वाटत. आणि माझ्या डोक्यात त्यांच्या सुट्टीतच चालू होत, त्यामुळे सतरंजीची घडी घालताना अडकलेलं मंगळसूत्र लक्षातच नाही आलं " मधुरा चित्कारली. मालतीबाईंचेही डोळे लकाकले. त्यांनी दीर्घ श्वास सोडला आणि तिथेच हात जोडले. 

***

"काय आमच्या बाळराजांना मिळाली कि नाही छान आंघोळ ? जमलं कि नाही आजींना ? " लक्ष्मीबाईंनी घरात शिरता शिरताच सरबत्ती केली. 

"प्रसाद चढवला बर का. हा घ्या तुमचा प्रसाद... आणि बाळाला हा धागा पण आणलाय. अंघोळीनंतर तोही बांधूया. मला  माहित्ये तुम्हा नवीन लोकांचा विश्वास नसतो .. हवा तर पायाला बांध .. पण असू देत. पहिले दृष्ट आईची लागते लक्षात ठेव . "

"आजी, आणि दृष्ट काढलीत का नाही ? मी ते सांगायलाच विसरले. म्हणा तुम्ही ते केलच असेल. " इकडे लक्ष्मीबाईंची प्रेमळ दटावणी, तक्रार चालू होती आणि तिकडे मधुराचे डोळे पाणावले, इतकी प्रेमळ बाई आणि आपण नको नको ते विचार करत होतो. 

"मावशी, मावशी, अहो जरा दमाने. आधी चहा बिस्कीट घ्या बघू. काम काय होत राहतील ... " मालती बाईंनी मावशींसाठी बनवलेल्या स्पेशल चहाचे आधण उतरवताना त्यांना आवाज दिला, आपल्या वाजतील कंप लपवत . 

"अरे वा ! आज आजींचा मूड लई ब्येस्ट दिसतोय, मस्त आलं बिलं घालून चहा बनवलाय ते ...," मावशींच्या स्वरात ख़ुशी लपकत होती. 

तर मधुरा स्वतःशीच पुटपुटली , "स्पेशल चहाच काय ? मावशी, तुमच्यासाठी बारशाला माझ्याकडून जरीची साडी नक्की .. !"

0