जीवनाचे धडे.

भविष्यातील जीवनाचा पाया घालणारे धडे देणारी शाळा व शिक्षक यांचे स्मरण करणारा एक छोटासा लेख



ही आवडते मज मनापासूनी शाळा
लाविते लळा जसा माऊली बाळा.
वरील शब्द प्रत्यक्षात अनुभवायला मिळतात ते आईच बोट सोडून औपचारिक शिक्षण प्रवाहात प्रवेश केल्यानंतर.इयत्ता पहिलीच्या वर्गात पहिल्यांदा आपल्याला बाई आणि गुरुजी भेटतात.त्यातील काहींचे अमीट असे ठसे आपल्या मनावर,आयुष्यावर उमटत जातात.अशाच काही गडद,काही पुसट झालेल्या ठशांचा घेतलेला मागोवा.


आजही उत्तम इंग्लिश बोलता येत असल्याने मला अनेकदा सहकारी शिक्षक सुरुवातीला विचारायचे,"तुम्ही इंग्रजी माध्यमात शिकले का?शाळा कोणती तुमची?"


त्यांना मी अभिमानाने उत्तर देत असे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोविसावाडी.

ह्या उत्तरासोबत मन भूतकाळात आठवणीत हरवते. इंग्लिशचा हा आत्मविश्वास दिला तो कांबळे गुरुजींनी.प्रसंगी शिक्षा करून घेतलेला अभ्यास आज मला ताठ मानेने उभे रहायचा आत्मविश्वास देतो.ह्या शाळेत मोहिते गुरुजींनी दिलेली माया, आत्तार बाईंचे सुरेख अक्षर,भोसले बाईंचा उत्तम होणारा परिपाठ, खुडे बाईंचे अतिशय छान नृत्य बसविणे.मुख्याध्यापक सोनावणे गुरुजींचा करारी आणि शिस्तप्रिय स्वभाव.ह्या सगळ्यांचे प्रतिबिंब आज माझ्या व्यक्तीमत्वात दिसते.


त्यानंतर आठवीला माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला आणि मला एक असा शिक्षक लाभला ज्याचा ठसा माझ्या मनावर कायम गडद आहे.



तर आमच्या वाघेश्वर विद्यालय चऱ्होली बुद्रुक येथे त्यावेळी एक पद्धत होती.आठवीला बाहेरून म्हणजे आजूबाजूच्या जिल्हा परिषद शाळांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची एक वेगळी तुकडी केली जात असे.आठवी ई.


ह्यामागे काय कारण असेल माहित नाही.पण जुने विद्यार्थी वेगळ्या दृष्टीने पहायचे.अनेकदा शिक्षक सुद्धा,"आठवी ई ना?"असे बोलायचे.


त्यामुळे नकळत मने दुखावली जायची.कारण आमची चोविसावाडी शाळा खूप छान होती.तर अशातच साधारण एक महिन्याने आम्हाला वर्गशिक्षक म्हणून नवीन सर आले.श्री.सुधीर रोकडे सर.


शाळेतील सर्वाधिक कडक शिक्षक असा सरांचा लौकिक.गणित आणि विज्ञान शिकवणारे सर मनाने मात्र खूप प्रेमळ होते.



एक दिवस शाळेत नोटीस लागली.विद्यालयात वर्ग सजावट स्पर्धा आहे.प्रथम क्रमांकाचा वर्ग कोण ठरणार?आम्हाला कोणीही गणतीत धरले नव्हते.

सर वर्गात आले,"काय रे?आपण भाग घ्यायचा ना? बघा ही संधी आहे आपल्याला."


सर्व मुले एकसाथ ओरडली,"हो सर.आपण घ्यायचा भाग."


मग सुरू झाली धांदल.वर्गाला आतून रंग द्यायचा.आम्ही जिल्हा परिषद शाळेत ही सगळी कामे करत असू.त्याचा इथे उपयोग झाला.पण घोडे पहिल्याच टप्प्यावर अडले.रंग खलवणार कशात?आम्ही सगळी वाडी वस्तीवर राहणारी मुले.सर्वांची घरे लांब.

सर मात्र शांतपणे म्हणाले,"जा,माझ्या घरून भांडी घेऊन या."

बस तिथेच सरांनी आमची मने जिंकली.वर्गात वांड असणारी काही मुले झपाटून कामाला लागली.भराभर भिंती घासल्या.रंग चढू लागला.त्यानंतर सरांनी वर्गाचे नाव.सुस्वागतम असे आपल्या सुंदर अक्षरात लिहिले.मुलींनी सगळे बेंचेस पुसले.वर्गात पताका लावल्या.दिवसभर झपाटून काम केले.अख्ख्या वर्गात सरांनी निर्माण केलेली माझा वर्ग जिंकला पाहिजे.ही भावना आजही मनात रुंजी घालत असते.


त्यानंतर निकालाचा दिवस आला.नववी,दहावीचे वर्ग आणि इतर तुकड्या सगळे अधीर होते निकाल ऐकायला.तिसरा नंबर जाहीर झाला.दुसरा नंबर जाहीर झाला.


पहिला नंबर कोणाचा असेल?सगळे अगदी शांत.अचानक नंबर जाहीर झाला,आणि....वर्ग सजावट स्पर्धेचे विजेते आहेत.इयत्ता आठवी ई.


त्यानंतर आम्ही जो काही जल्लोष केला.आजही तो आवाज कानात घुमत असतो.


त्यानंतर सरांनी वर्गात अक्षरशः एका बुक्कित नारळ फोडला.ते खोबरे खाताना ती कष्टाची गोड चव आजही जिभेवर रेंगाळत असते.


माध्यमिक शाळेत आमच्यातील गुण हेरून प्रोत्साहन देणारे,आत्मविश्वास आणि कामाची शिकवण देणारे माझे प्रिय सर.आजही शिक्षक म्हणून काम करताना निराश व्हायला झाले की मी सरांना आठवत असतो.


शिक्षक जसे आपले गुरू असतात.त्याप्रमाणेच अनेकदा आम्हा शिक्षकांना विद्यार्थी सुद्धा अनेकदा खूप काही शिकवून जातात.


तर प्राथमिक शिक्षक म्हणून पहिली नेमणूक मिळाली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोरणे बुद्रुक.खेड तालुक्यातील छोट्याशा गावात असलेली शाळा.मुले मात्र खुप लाघवी. हळूहळू मुलांशी गट्टी जमली.


शाळेत अनेक सुविधांची वानवा होती.प्रजासत्ताक दिनाला कवायत बसवू.

तर मुले म्हणाली,"सर,आपल्याकडे ताशा नाही."

मी विचारले,"गावात असेल ना?"

मुले गप्प बसली.आता काय करायचे?मग मी ताशाची तात्पुरती व्यवस्था केली.माझ्याकडे सातवीचा वर्ग होता.


मुलांना विचारले,"तुम्ही आता दुसऱ्या शाळेत जाणार.मग आपण छोटीशी पार्टी करू."

मुले आनंदली.एक मुलगा हळूच म्हणाला,"सर,शाळेला भेट म्हणून ताशा द्यायचा आहे."

मी म्हंटले,"वा,छान."

मुलांनी पैसे गोळा करून दिले.दुकानात गेलो.तर चारशे रुपये कमी पडत होते.दोन हजार सहा साली.शिक्षणसेवक म्हणून मलासुद्धा तीन हजार पगार होता.पण मी ठरवले.मुलांना नाराज करायचे नाही.तो ताशा,आम्ही शाळेसाठी मिळवलेली पहिली वस्तू.


त्यानंतर तिथल्या गावकऱ्यांनी शाळेला काहीच कमी पडू दिले नाही.ती सातवीची मुले मला.मोठा धडा शिकवून गेली.प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.त्यामुळे आठ वर्षात.आमची शाळा सर्व सोयींनी सुसज्ज झाली.


असे हे काही धडे.जीवनात आनंद देणारे,शिकवणारे.ह्या सर्व गुरूंना प्रणाम.