जिव्हारी लागलेली गोष्ट

Jivhari
अरुंधती दिवाळीची तयारी करत बसली होती. रेवा अरुंधतीची मुलगी आज फराळ करायला आली होती म्हणून अरुंधतीला आज निवांतपणा मिळाला होता. रेवा नुसताच फराळ करायला आली नव्हती तर बाबांनी खरेदी केलेला किराणा आपल्या घरी घाऊन जायला देखील आली होती. बाबा तिला नेहमी किराणा आणून देत तिच्या संसाराला हातभार म्हणून.
रेवाची परिस्थिती हालाखिची होती. नवरा तासांवर lecture घेत असे त्याला दिवसाला ५०० ते ६०० रुपये मिळत. पण उद्याची काही शाश्वती नसायची. Guest lecture महिन्यातून १० असत, बाकी मिळाले तर नशीब, असे करून घरकमाई जेमतेम होती.  त्यात रेवाही जॉब करत होती तिलाही दहा हजार मिळत. त्यात घरभाडे, मुलाची फी भरण्यात हे पैसे निघून जात. बाकी खाणे आणि किराणा बाबा भरून देत असत. तिला काही खर्चायला लागले तर परत बाबा आहेतच हक्काचे. म्हणून रेवा उठसुठ घरी येत असे, कधी तर डबाही माहेरी येऊन घेऊन जात असे.

रेवा तिच्या घरी जाऊन परत जेवणाचा डबा घ्यायला येणार होती, ती दार जोरात लावून निघून गेली. खरे तर अरुंधतीला रेवा डोळ्यासमोर नकोच होती. बाबांनी जरी तिची चूक पदरात घातली होती तरी आई तिला तिच्या चुकीबद्दल माफ करणे शक्य नव्हते. आज रेवाची जी परिस्थिती आहे ती सगळी त्या पंकज मुळेच उद्भवलेली आहे, ना त्याचे तोंड पहावेस वाटत ना लेकीचे. हा राग तेव्हा तेव्हा उफाळून येत जेव्हा जेव्हा रेवा त्यांच्या समोर येत. तिने तिच्या हाताने तिच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे आणि आज लंकेची पार्वती होऊन बसली आहे.

दिवाळीची धूळ झटकता झटकता ती त्या जुन्या जखमेवरून धूळ झटकत बसली होती. पश्चाताप तर नेहमी होतो पण दिवाळी जवळ आली की तो प्रकर्षाने जाणवत होता, ते ही दर दिवाळीला. त्या दिवळीपासून ते आज या दिवाळी पर्यंतही. अशा मागील ६ दिवाळ्या गेल्या जेव्हापासून ती श्रीमंत बापाची लेक दर महिन्याला बाबांकडून पैसे आणि किरणा घ्यायला येते असे. तिचा नवराही बिनधास आयते खात आहे, कधी तिच्या जीवावर तर कधी सासऱ्यांच्या पाठवलेल्या किरण्यावर.

एकही दिवाळी अशी नाही की तिला त्याने साडी घेऊन दिली असेल किंवा मुलाला कपडे घेऊन दिले असतील. करणारे करत आहे म्हणून तरी संसार चालू आहे हा विचार करून त्यांना त्या पंकजचा खूप राग येत असे. बिनकामी नवरा, एक बाप म्हणूनही बिनकामी होता.

पंकज हा अरुंधती यांच्याकडे tutions साठी येत असे. मोठ्या बापाचा मुलगा,पण काही दिवस चांगला वाटणारा हा पंकज त्यांच्याच मुलीवर प्रेम करू लागला आणि त्यांची मुलगी रेवा अल्लड वयात या मुलावर भाळली होती. प्रेम होते म्हणत म्हणत ती त्याच्या घरी कोणी नसतांना जाऊ लागली होती, तश्यात तिचे पाऊल वाकडे पडले, ती pregnent राहिली.

शेवटी ही बातमी तिच्या आई बाबांना नंतर कळली जेव्हा ती काकांकडे मुक्कामाला जात आहे हे सांगून त्याच्या घरी एक रात्री रहायला गेली होती. काकांना याबद्दल विचारले असता ते सर्व कुटुंबासोबत लोणावळ्याला आले आहेत, हे समजल्यावर आईला रेवाची शंका आली. तेव्हा खुलासा झाला की ती पंकजच्या घरी आली आहे. कारण ती दुसऱ्या दिवशी जाऊन बाळ पडणार होती ,तेव्हा तिला चौथा महिना लागला होता.

आईच्या पाया खालची जमीन सरकली. बाबांना तर बिपीमुळे चक्कर आली. त्याच्या घरच्यांना मुलीला सून करून घ्या म्हणायची आणि पाया पडण्याची वेळ पोरीने वडिलांवर आणली होती. त्याच्या घरचे बदनामी नको म्हणून त्यांनी मुलालाही बाहेर काढले होते.

कसेबसे बळेबळे दोघांचे मंदिरात लग्न केले होते. तरी काही दिवसांनी तो तर तिला सोडून गेला होता. पण घरच्यांनीही घरात न घेतल्याने तो पुन्हा रेवाकडे आला.
रेवाच्या आईला ती डोळ्यासमोर नकोच होती. म्हणून दिवाळीतील पाहुणे येण्याआधी तिला वेगळे घर भाड्याने दिले काही वर्षे त्यांनी भाडे भरून दिले. जेव्हाही दिवाळी येते तेव्हा रेवाने जे दिवे लावले त्याची कडू आठवण त्या आईला जाणवते, एकदम दिव्याचा चटका बसावा अशी. 

या दिवाळीत तरी काही चांगले घडावे म्हणजे ती जुनी जखम भरून येईल असे त्यांना प्रत्येक दिवाळीत वाटत होते. पण या दिवाळीत रेवाच्या नवऱ्याची काही तरी नवीन करण्याची धडपड दिसत होती. त्याने Mpsc ची जी परीक्षा दिली होती त्याचा result येणार आहे असे सांगून रेवा तिच्या घरी निघून गेली. घरच्यांनी काही लक्ष दिले नाही.

रेवा परत आली ती धावतच आणि आईच्या गळ्यात पडली. डोळ्यात आंनदाश्रू होते. आईच्या तोंडात आधी पेढा भरवला आणि म्हणाली ती दिवाळी आणि आजची दिवाळी यामध्ये खूप फरक आहे. तुला हवं होतं ना माझं चांगलं व्हावं बघ झाले माझे चांगले. पंकजने मनावर घेतले होते खूप आधीच की कोणाच्या मदत घेण्याची वेळ मी माझ्या बायकोवर येऊ देणार नाही. आईने धुळीच्या पदरातील मळभ झटकून डोळे पुसले आणि रेवाचेही डोळे पुसून तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
शेवटी आई ती आईच असते. कितीही मोठ्या चुका झाल्या तरी तीच मोठ्या मनाने पदरात घेत असते, कारण तिच्या रागातही मायाच असते.