जीवनी आधार तू ( भाग २ )

भक्तीच्या आयुष्यात वादळ येते पण तिच्या पतीने तिला समजावून घेतले.
कॉलेजचे ते मोरपंखी दिवस होते. भक्तीने आर्टस् मध्ये प्रवेश घेऊन मराठी वाङमय हा विषय घेतला होता. बारावीच्या परीक्षेत तिला घवघवीत यश मिळाले होते. मराठी साहित्यात तिला भयंकर रुची. ती कवी श्री. मंगेश पाडगावकरांच्या कवितांची जबरदस्त फॅन. त्यांच्या प्रेमकविता वाचून तिने आपल्या प्रियकराविषयी एक डोळ्यांसमोर प्रतिमा बनवली होती.

कॉलेजमध्ये मराठी साहित्य मंडळ असल्याने तिथे विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात असत. भक्ती त्या उपक्रमात हिरीरीने सहभागी व्हायची. त्या दिवशी एक नामांकित लेखक श्री. सुयोग मराठे सर कॉलेजमधील साहित्य मंडळाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. सगळ्या साहित्य प्रेमींना ही पर्वणीच होती. मराठे सर आले आणि त्यांच्या विनोदी आणि दिलखुलास व्यक्तिमत्वाने विद्यार्थ्यांना अक्षरशः भारावून टाकले. मराठेसरांनी मुलं विरुद्ध मुली अशी वादविवाद स्पर्धा रंगवली ज्यात भक्ती आणि चैतन्यने बाजी मारली. चैतन्यचे मराठी उच्चार, त्याची बोलण्याची लकब, त्याचे विचार सिद्ध करण्यासाठी असलेला आत्मविश्वास, त्याचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व याने भक्तीला साहजिकच भुरळ पडली. चैतन्य देखील भक्तीच्या रूपावर, तिच्या आत्मविश्वासावर फिदा झाला.

" ए हाय ! मी चैतन्य शिंदे. मी सेकंड इअरला आहे. मला देखील मराठी साहित्यात रुची आहे. मी कविता करतो. लघुकथा आणि लेख लिहितो. आज मराठे सरांमुळे खूपच मज्जा आली. बाय द वे तू खूप छान बोलतेस. तुझं नाव काय आहे आणि कुठल्या इअरला आहेस ?

" ओह ! हाय चैतन्य, मी भक्ती जोशी. मी फर्स्ट इयरला आहे. मला देखील कविता करायला आणि वाचायला खूप आवडतात. कवी मंगेश पाडगावकर यांची मी जबरदस्त फॅन आहे. तू देखील खूप छान बोलतोस."

" अरे वाह ! मी पण पाडगावकर सरांचा पंखा आहे. अग म्हणजेच फॅन आहे." भक्ती आणि चैतन्य खळखळून हसले.

वरचेवर मराठी साहित्य मंडळातील उपक्रमाने किंवा अन्य काही कारणाने भक्ती आणि चैतन्य भेटू लागले. चैतन्य म्हणजेच नावाप्रमाणेच उत्साहाचा झरा होता. दोघांना कवितेची आवड असल्याने एकमेकांना आपल्या कविता ते ऐकवू लागले होते. साहजिकच दोघांमध्ये प्रेम फुलू लागले होते.

भक्तीच्या लांबसडक केसांचा चैतन्यला मोह पडे. " भक्ती ! तू वेणी नको घालूस ग. तू तुझे केस असेच मोकळे सोडत जा ना. तुझ्या केसांत माझं मन गुरफटून जातं. तुझे मऊ, मुलायम, रेशमी केस जेव्हा वाऱ्याने उडतात ना तेव्हा असं वाटतं की, तुला पाहतंच राहावं. तुझे केस जेव्हा पुढे खांद्यावर येतात आणि तू त्यांना मागे टाकायला एक हलकासा झटका देतेस ना तेव्हा किती गोड दिसतेस म्हणून सांगू." चैतन्य भक्तीची तारीफ करू लागला की, भक्ती लाजेने चुरर व्हायची.

भक्ती आणि चैतन्यमधील प्रेम दिवसागणिक जास्त घट्ट होत चालले होते. भक्तीच्या प्रेमाची कुणकुण तिच्या घरी लागली. भक्तीच्या आईवडिलांनी तिच्या प्रेमाला कडाडून विरोध केला कारण चैतन्यची जात आडवी येत होती. भक्तीने तिच्या आईवडिलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला तरीही आईवडील कुठलीच गोष्ट मानायला तयार नव्हते. त्यांनी भक्तीला चैतन्यला भेटण्याची देखील बंदी घातली. कॉलेज सुटल्यावर बरोबर वेळेत घरी येण्याची भक्तीला सक्ती केली गेली. जर चैतन्यला भक्ती भेटली तर भक्तीच्या आईवडिलांनी जीव देण्याची धमकी तिला दिली होती. पण भक्ती चैतन्यच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती त्यामुळे ती चोरून चोरून चैतन्यला भेटत होती.

" चैतन्य ! माहीत नाही पुढे जाऊन आपल्या प्रेमाचं काय होईल ? माझे आईवडील आपल्या लग्नाला होकार देणार नाहीत आणि मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे. मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाही. असं चोरून चोरून भेटण्याचा पण मला खूप त्रास होतो आहे. काय करायचं काही समजेनासे झाले आहे." भक्ती खूपच काकुळतीला येऊन बोलत होती.

" भक्ती ! मला एकचं मार्ग दिसतो आहे तो म्हणजे आपण कोर्टात जाऊन रजिस्टर लग्न करून ठेवूया. आपण दोघेही आता सज्ञान आहोत. मी थोडा सेटल झालो की दोघांच्या घरी आपण लग्न केल्याचे जाहीर करूया. माझ्या घरी काही प्रॉब्लेम आता देखील नाही. तुझ्या घरी आपण लग्न केल्याचे समजले की त्यांना नाईलाजास्तव आपले लग्न लावून द्यावेच लागेल. आणि कालांतराने तुझ्या घरातील लोकं आपल्या दोघांना माफ करून एकत्र सुद्धा येतील. भक्ती आपण दोघांनी प्रेम केले आहे कुठला गुन्हा केला नाही. मी देखील तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारचं करू शकत नाही. बघ तुला माझं म्हणणं पटतं आहे का ?" चैतन्यचे बोलणे भक्तीला पटले आणि एक महिनाआधी नोटीस देऊन त्या दोघांनी कोर्टात जाऊन रजिस्टर पध्दतीने लग्न देखील करून ठेवले. भक्तीची खास मैत्रीण शर्वरी आणि चैतन्यच्या खास मित्राने वेदांतने साक्षीदार म्हणून सह्या केल्या.

क्रमशः

वाचकहो, कथा कशी वाटते आहे कृपया अभिप्राय ध्या.

🎭 Series Post

View all