जीवनी आधार तू ( भाग १ )

भक्तीच्या जीवनात वादळ येते पण तिचा पती तिला समजावून घेतो.


" भक्ती, ए भक्ती. घरी येताना माझ्या बीपीच्या गोळ्या घेऊन ये ग. संपत आल्या आहेत." भक्तीच्या सासूबाईंनी रंजिताताईंनी फर्मान सोडले.

" भक्ती, अग मी काल माझा चष्मा रिपेअरला टाकला आहे तो पण आण येताना." भक्तीच्या सासरेबुवांनी संतोषरावांनी हुकूम सोडला.

" हो आई,बाबा मला माहित आहे तुमच्या दोघांच्या वस्तू आणायच्या आहेत. मी आणणारच होते."

" खूपच गुणाची पोर आहे हो. भक्ती ! आम्हाला मुलगी नाही याची जरा देखील आम्हाला खंत नाही हो. किती मायेने करतेस आमचं सारं काही. ह्या जमान्यात इतकी चांगली मुलगी सून मिळणं फारचं कठीण." रंजिताताई बोलत होत्या.

" ए आई, तोंडावर स्तुती करू नकोस सुनेची. नाहीतर डोक्यावर चढून बसेल ती." शुभंकर म्हणजेच भक्तीचा नवरा चेष्टेच्या सुरात म्हणाला.

" नाही चढणार हो ती डोक्यावर. खात्री आहे आमच्या सुनेबद्दल आम्हाला." सासूबाईंनी आपली बाजू घेतली म्हणून भक्तीने शुभंकरला चिडवून दाखवले.

" बरं आता आपण निघायचं का ? की अजून थांबायचं आहे घरात सासू - सासऱ्यांची स्तुतीसुमने ऐकत ? बरं आहे बुवा, लेकापेक्षा सून जास्त आवडीची झाली माझ्या आईवडिलांना. काय जादू केली दोघांवर काय माहीत ?"

" शुभंकर, जळू नकोस बरं. चल निघुया. आई, बाबा आम्ही जाऊन येतो लगेच. कस्तुरी झोपली आहे तोवर आम्ही पटापट आमची कामे उरकून येतो. कस्तुरी झोपली ते बरंच झालं एकाअर्थी. मॉलमध्ये शिरली की तिची पावले घराकडे लौकर निघत नाहीत आणि आई कस्तुरी जर उठलीच तर तिला फक्त दूध द्या बदाम पावडर घालून." भक्तीने सगळ्या सूचना देऊन घराचे दार ओढून घेतले आणि पटकन गाडीत जाऊन बसली. शुभंकरने गाडी स्टार्ट केली.

आज रविवार असल्याने शुभंकरला सुट्टी होती. भक्ती आणि शुभंकरच्या लाडक्या परीचा तिसरा वाढदिवस चार दिवसांवर येऊन ठेपला होता. त्यासाठी भरपूर खरेदी करायची असल्याने भक्ती आणि शुभंकर दुपारचे जेवण करून मॉलमध्ये निघाले होते. कस्तुरीला परीसारखा घेरदार पांढरा शुभ्र ड्रेस देखील हवा होता. भक्तीने पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि निळ्या रंगाची लेगिन्स घातली होती. तिच्या गोऱ्या रंगावर कपड्यांचे रंग खुलून दिसत होते. गळ्यात नाजूकस मंगळसूत्र, कपाळावर छोटीशी टिकली आणि भांगेत सिंदूराची छोटीशी रेष याने भक्तीचे रूप जास्त खुलले होते. तिच्या लांबसडक केसांची तिने वेणी घातली होती. वेणी पुढे घेऊन ती वेणीशी चाळा करत बसली होती. गाडीच्या आरशातून शुभंकर तिला सारखे बघत होता.

" इतकं मला काय बघतो आहेस शुभंकर ? पहिल्यांदा बघितल्यासारखं."

" अरे यार भक्ती तू इतकी गोड आहेस की तुला सारखं बघत राहवेसे वाटते. मी खूप लकी आहे मला तुझ्यासारखी सुंदर आणि गुणी बायको मिळाली. माझ्या आईवडिलांचं देखील किती मनापासून करतेस. आणि मला कस्तुरीच्या रूपाने किती सुंदर गिफ्ट दिलं आहेस. खरंच तू माझ्या जीवनात आलीस आणि माझ्या जीवनात फक्त नी फक्त आनंद घेऊन आलीस."

" शुभंकर आता तू चालू होऊ नकोस. मी सामानाची लिस्ट केली आहे त्याप्रमाणे पटापट वस्तू घेऊया म्हणजे सोपं पडेल. कस्तुरीच्या वाढदिवसासाठी खूप छान प्लॅन केले आहेत मी. सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी मॉलमध्ये मिळतील."

" ओके ! राणीसरकार. आपका हुकूम सर आँखोपर. हे बघ आलं तुझं मॉल. आता खिसा तर माझा पूर्ण रिकामा होणार आहे कारण मॅडम तुम्ही सगळ्यांसाठी काही ना काही घेणारंच. मी गाडी पार्क करून येतो तू इथेच थांब. आपण एकत्र जाऊया आतमध्ये."

" हो ठीक आहे. मी थांबते इथेच."

शुभंकर गाडी पार्क करायला गेला. भक्ती त्याची वाट पाहत थांबली. तितक्यात तिला समोरून मॉलच्या बाहेर चैतन्य त्याच्या पत्नीबरोबर येताना दिसला. चैतन्य दिसल्यावर तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिच्या हृदयाची धडधड वाढली. घशाला कोरड पडली. तिचा भूतकाळ तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला.

क्रमशः

🎭 Series Post

View all