जीवनाची एक नवी पहाट ..

"आई, का मला अशी एकटी सोडून गेलीस? का मला तुझ्यासोबत घेऊन नाही गेलीस? का आई?”मिताली आईचा फोटो हृदयाशी कवटाळून जोरजोरात रडत होती. इतक्यात मितालीची सावत्र आई धावत आली. तिच्या हातातला फोटो हिसकावून घेऊन फेकून दिला आणि तिच्या पाठीत एक धपाटा घातला मितालीच्या डोळ्यात पाणी आलं. "काय रडत बसली आहे ग तू? घरातली काम करायची आहे. चल उठ काम कर.. इथे बसून फक्त गिळायला मिळणार नाही. समजलं..”

जीवनाची एक नवी पहाट ... (लघुकथा स्पर्धा )

           \"प्रेरणा एक आधार \"या संस्थेचा आज पहिला वर्धापनदिन होता. छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परी सर्व व्यवस्था पाहत होती. तिच्याही मदतीला बरेच जण होते. मिताली आणि आई दोघीही आपल्या जागेवर बसल्या होत्या. मिताली मात्र आपल्या भूतकाळात गुंग झाली आणि तिच्या नजरेसमोर आतापर्यंतचा संघर्षमय जीवन प्रवास एखाद्या चित्रपटाप्रमाणे पुढे सरकू लागला .


"आई, का मला अशी एकटी सोडून गेलीस? का मला तुझ्यासोबत घेऊन नाही गेलीस? का आई?”



मिताली आईचा फोटो हृदयाशी कवटाळून जोरजोरात रडत होती. इतक्यात मितालीची सावत्र आई धावत आली. तिच्या हातातला फोटो हिसकावून घेऊन फेकून दिला आणि तिच्या पाठीत एक धपाटा घातला मितालीच्या डोळ्यात पाणी आलं. 


 "काय रडत बसली आहे ग तू? घरातली काम करायची आहे. चल उठ काम कर.. इथे बसून फक्त गिळायला मिळणार नाही. समजलं..”


आठ वर्षांची मिताली रडत रडत उठून कामाला लागली. घरातील काम करून एवढासा जीव थकून जायचा. खायलाही शिळी भाकरी पोळी मिळायची. तिखट मीठ टाकून ती खायची. मितालीची आई मितालीचे बाबा सुधीर संध्याकाळी घरी आल्यावर त्यांना काहीबाही सांगून मितालीविरुद्ध भडकवायची . बाबाही तिचं ऐकून न घेता तिला मारायचे.मितालीला क्षणोक्षणी आईची आठवण येत होती. आई गेल्यावर सर्वात आधी तिचा जन्मदाताच सावत्र झाला. घरात सावित्रीचा, मितालीच्या सावत्र आईचा हुकूम चालत होता. ती मितालीकडून सर्व काम करून घेत होती. तिला शिळं अन्न जेवायला देत असे. काही कारण नसताना तिचा राग राग करत असे. तिला मारहाण करत असे. तरीही मिताली निमूटपणे सारं सहन करत होती. 


मिताली अभ्यासात लहानपणापासूनच खूप हुशार होती. दिवसभराच्या कामात तिला अभ्यासाला वेळ मिळायचा नाही. तरीही ती रात्री जमेल तसा अभ्यास करायची. काही दिवसानंतर त्यांच्या घरात सोनालीच्या रूपाने आणखी एक पाहुणी आली. आता तर तिला सोनालीलाही सांभाळाव लागत होते आणि मितालीही प्रेमाने तिचं सर्व करत होती. मिताली आणि सोनाली या दोन मुलींमध्ये आता तर जास्तच भेदभाव केला जात होता. तरीही तिची कसलीही तक्रार नव्हती. एका प्रेमळ हाकेसाठी तिचा जीव जीव तळमळत होता. एका मायेच्या स्पर्शासाठी तिचा जीव आतुर झाला होता. तरीही मितालीने कधीही तिच्या सावत्र आईचा द्वेष केला नाही. तिने इतका त्रास दिला तरी ती तिच्या आईला जीव लावत होती. मायेने वागत होती.


मिताली जिवंतपणी नरकयातना सहन करत होती. एक दिवस तिला तिच्या आई बाबाचे प्रेम मिळेल या आशेवर जगत होती पण तिची इच्छा या जन्मात तरी पुर्ण होणार नव्हती. सावित्रीने रडून गोड बोलून मितालीच्या आईच्या नावावरचे घर स्वतःच्या नावावर करून घेतले आणि त्यात सुधीरचा, तिच्या वडिलांचा काहीही आक्षेप नव्हता. मिताली सतरा वर्षाची झाली. तिने तारुण्यात पदार्पण केलं होतं. एक दिवस मितालीच्या सावत्र आईने मितालीला शेजारच्या जोगळेकर काकूंच्या मुलासोबत बोलताना पाहिलं. घरी आल्यावर तिच्या आईने तिला बेदम मार दिला. तिच्या वडिलांना खोटे नाटे सांगून तिच्या बद्दल भडकवलं. 


“हिची लक्षणं काही बरी दिसत नाही. त्या जोगळेकरबाईच्या शार्दूल सोबत अफेयर चालू आहे. लवकरात लवकर हिच लग्नं लावून दिलं पाहिजे.”


असं म्हणत तिच्या आईने तिच्या बाबांच्या मागे मितालीच्या लग्नाचा तगादा लावला. स्थळ पाहणं सूरू झालं आणि एक दिवस मितालीचं लग्न जुळलं. तिला पुढे शिकायची इच्छा होती पण आईपुढे कोणाचेही चालत नव्हते. मिताली रडत रडत लग्नाला तयार झाली. योगेशसोबत तिचं लग्न झाले. योगेश गरीब होता खरा पण माणूस समजूतदार होता. मितालीला पाहिल्यांदा पाहिल्यावरच त्याने होकार कळवला. लग्नानंतर पुजा झाल्यावर मिताली दुधाचा ग्लास घेऊन योगेश च्या खोलीत आली. ती घाबरली होती. मनात धाकधूक होतीच. दुधाचा ग्लास त्याच्या समोर धरला. योगेश तर तिला पाहण्यातच हरवला होता. 


"अहो ऽऽ" तिच्या गोड आवाजाने तो भानावर आला आणि तिच्या हातातला ग्लास आपल्या हातात घेतला. त्याने तिला जवळ बसवलं. तिच्या ओठांवर दुधाचा ग्लास लावला आणि पी म्हणून सांगितले. त्याच्या प्रेमळ नजरेनेच तिच्या डोळ्यात हलकेच पाणी आले. तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून तो हाताने पुसू लागला तोवर तिच्या भावनांचा बांध गळून पडला. ती रडायला लागली त्याने जवळ कुशीत घेऊन तिच्या डोक्यावर प्रेमाने थोपटत राहिला.


"आज जितकं रडायचं आहे तितकं रडून घे. यापुढे तुझ्या डोळ्यांत मला कधीही अश्रू दिसायला नकोत."


असं म्हणून त्याने जबरदस्तीने तिला दूध प्यायला दिले. तरीही तिचं मुसमुसणं चालूच होते. थोड्या वेळाने त्याच्या खांदयावर डोकं ठेवून ती झोपी गेली. तिला झोपलेलं पाहिल्यावर त्याने मितालीला व्यवस्थित झोपवून तिच्या अंगावर पांघरून घातलं आणि तो तिच्याशेजारी पडला होता. झोपलेल्या मितालीकडे तो एक टक पाहत होता. तिच्या दुःखाचा विचार करत होता.


“झोपेत किती निरागस दिसतेय. खूप थकल्या सारखी दिसतेय. यानंतर मी मितालीला कुठलाच त्रास होऊ देणार नाही. कायम तिच्या आनंदाचा विचार करेन.”


त्याने त्यांच्या मनातच विचार पक्का केला.तिच्याकडे पाहता पाहताच त्याला कधी तरी झोप लागली.

सकाळी लवकर उठून स्नान पुजा करून सासुबाई च्या पाया पडली. सासुबाईने आर्शिवाद देऊन दोन्ही हात तिच्या डोक्यावरून फिरून त्यांच्या डोक्या जवळ नेऊन कडाकडा मोडली आणि तिचा मुका घेतला. 


“ इतक्या लवकर उठली तू? अगं ,अजून थोडा वेळ झोपली असतीस बाळा..”


 "आई, मला लवकर उठण्याची सवय आहे."

"योगेश उठला का?"


“मी जेव्हा बाहेर आले. तेव्हा ते झोपून होते. मी उठवते त्यांना.."


असं म्हणून मिताली योगेशला उठवायला गेली. 


 " अहोऽऽ , अहो ऽऽ ”


ती हाक मारत होती. नंतर हात ठेवून त्याला उठवू लागली तर त्याने कुस बदलली त्याने हात घट्ट पकडून ठेवल्यामुळे त्या हातासहीत त्याच्यावर आदळली. तिचे ओठ त्याच्या गालावर टेकले. तिला अंगावर गोड शहारा आला. ती स्तब्ध झाली. थोड्या वेळाने भानावर येत ती आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. तिची हात सोडायची धडपड चालू होती. तिची हात सोडायची धडपड पाहून तो गालात हसत होता. 


"मी तुझा हात सोडत नाहीय तर का उगीच प्रयत्न करत आहे सोडवण्याचा?”


तो डोळे मिटूनच बोलला तशी ती ची हालचाल बंद झाली.


 "म्हणजे तुम्ही जागे आहात."


ती म्हणाली त्याने डोळे उघडून अधिकच हात घट्ट पकडून घेतला.


"हो, केव्हाचाच जागा झालोय मी. पहात होतो कशी उठवते मला."


योगेश उठत हसून म्हणाला. आईने आवाज देत त्यांच्या खोलीत आली तसं त्याने पटकन तिचा हात सोडून दिला आणि उभा राहिला. आईने त्यांना लवकर आवरायला सांगितलं. त्याची ही फजिती पाहून मिताली खळखळून हसली आणि तो तिला भान हरपून न्याहळत होता. 


"मितू , काय गोड हसतेस गं ! अशीच हसत रहा.असं वाटत नुसत बघत राहावं.”


तशी तिने लाजून मान खाली घातली. आता तिच्या जवळ आईपेक्षा जास्त माया करणारी सासू होती आणि नवरा तर सखा, सोबती काळजी कळणारा, तिला जपणारा होता. त्यांच्या प्रेमामुळे तर ती मागचे सर्व दुःख विसरून गेली. लग्न झाल्यानंतर ती नावालाही माहेरी गेली नव्हती. मातृत्वाची चाहूल लागली आणि एका गोंडस परीने जन्म घेतला. परी वर्षांची झाली. एक दिवस घरी येतांना भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने योगेशला उडवलं. डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे तो तिथेच गतप्राण झाला. पुन्हा एकदा मितालीवर दुःखाचा डोंगर कोसळला. तिला हा धक्का सहन झाला नाही. ती तिथेच बेशुद्ध पडली. जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती वेड्यासारखी करत होती. स्वतः ला इजा करून घेत होती. योगेशसोबत स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न करत होती. तिचा तो वेडेपणा पाहून तिच्या सासूने तिच्या कानाखाली एक वाजवली. ती तिच्या सासूला बिलगून खूप रडली.


“तुला ह्या मुलीसाठी जगावच लागेल. तुला तिचं भविष्य घडायचं आहे. आज बाप गेला तिचा, उद्या तिची आई जर गेली तर काय करणार आहे ती पोर? 

एकतर वाईट मार्गाला लागेल. नाहीतर बसेल धंद्यावर.”


"आईऽऽ असं अभद्र बोलून नका ! .. मी माझ्या परीला... पुढचं तिच्याकडून बोललेच गेलं नाही.


“तिची आई अजून जिवंत आहे.”


असं म्हणत मितालीने आपले डोळे पुसले.


“यापुढे कधीही रडणार नाही. कमजोर पडणार नाही. माझ्या परीसाठी मला जगावंच लागेल. मला स्वतःला सावरावंच लागेल.”


मितालीने मनाशी पक्का निर्धार केला. तिने स्वतःचे दागिने विकले आणि घरातच कपड्यांचा व्यवसाय सुरु केला. विशेष करून साड्या ठेवल्या. सोबतच तिने जेवणाचे डबेही देणे सुरु केले. ती या लढाईत एकटी नव्हती. तिच्या पाठीशी तिच्या सासूचा विश्वास होता. पूर्ण पाठिंबा होता. मिताली परीला सांभाळून हे काम करित होती. हळूहळू परीही मोठी होत होती. तिची दमछाक होत होती पण परीला पाहून तीचा सर्व थकवा क्षणांत दूर व्हायचा. परीला परिस्थितीची जाणीव असल्याने तिच्यात लवकरच समजुतदारपणाही आला होता. मितालीचा व्यवसाय खूप छान चालत होता. ती न थकता अविरत मेहनत करत होती. खानावळमध्ये काम करण्यासाठी तिने तिच्यासारख्या विधवा आणि निराधार महिलांना प्राधान्य दिलं. ‘माफक दरात पोटभर जेवण’ असं त्या खानावळीच वैशिष्ट्य होतं. तिच्या मनात विचार आला.



“आपल्या सारख्या निराधार महिलांना मदत केली तर? त्यांनाही थोड़ी मदत होईल. माझ्यापाठी माझी सासूबाई, आई उभी होती. बाकीच्यांना कोणीच नसेल तर? त्यांनी कुठं जावं? काय करावं?”



मनात आलेल्या विचार मितालीने आपल्या सासूबाईंना आणि परीला बोलून दाखवला. त्यांनीही लगेच संमती दर्शवली आणि उदय झाला तो \"प्रेरणा एक आधार \" संस्थेचा. ज्यात तिच्यासारख्या एकटे जीवन जगणाऱ्या, विधवा महिलांचा समावेश होता. हळूहळू चित्र पालटत गेलं. दुःखाचे दिवस सरत होते. तिने घरातून सुरू केलेल्या छोट्याश्या उद्योगाचे आता मोठ्या साडीच्या शोरूममध्ये रूपांतर झाले होते. त्या सोबत छोटया खानावळीचे रूपांतर आता मोठ्या ‘अन्नपूर्णा हॉटेल’मध्ये झाले होते. सोबत परीचे शिक्षण झाले आणि तिनेही तिच्या आईला, मितालीला तिच्या उद्योगात मदत करण्याचा निर्णय घेतला.


खुर्चीत बसलेल्या मितालीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. संपूर्ण भूतकाळ तिच्या नजरेसमोर तरळला. ज्यांच्याकडून तिला प्रेरणा मिळाली त्या तिच्या सासूबाई म्हणजे आई यांच्या हातून दिपप्रज्वलन करण्यात आले. थोड्या वेळाने मितालीला दोन शब्द बोलण्याची विनंती करण्यात आली. सर्वांच्या विनंतीला मान देऊन मितालीने बोलायला सुरुवात केली. 


"नमस्कार.. मी मिताली आज इथे तुमच्यासमोर आहे ते फक्त आणि फक्त माझ्या सासूबाईं, माझ्या आईमुळे. आई, तुम्ही कायम माझ्यात यांना, परीच्या बाबांना पाहिलंत आणि मी तुमच्यात माझ्या जन्मदात्रीला, माझ्या आईला. अशी आई जी आपल्या सुनेच्या पाठिशी नाही तर तिच्या सोबत उभी राहिली. जन्मदात्याने कधी पाहिले नाही पण या माझ्या आईने मला एकटं सोडले नाही. एक आईच हे सगळं करू शकते. मी आत्मनिर्भर बनू शकले ते केवळ आईमुळे..” 


असं बोलून मिताली आपल्या सासूबाईंजवळ आली. आईंच्या पाया पडली तसं आईंनी तिला घट्ट मिठी मारली. हे पाहून सर्वत्र टाळ्यांचा गडगडाट झाला. अशी सासू सुनेची जोडी पाहून तिथे बसलेल्या सर्वांचे डोळे हलकेच पाणवले .

आयुष्यात कितीही दुःख आली तरी एका नव्या पहाटेचा उदय होतो .


समाप्त . 

     तुम्हाला कथा आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तुमचा एक लाईक लिखण्यास प्रोत्साहन देतो .

 धन्यवाद