जिथे भाव तिथे देव

देव भावाचा भुकेला भाव पाहुन भुलला..
जिथे भाव तिथे देव

विज्ञानाचा तास संपवून वृंदा स्टाफरूममध्ये आली. सलग तीन तास शिकविल्यानंतर फ्री पिरेड मिळाला होता. शाळा नुकत्याच सुरु झाल्याने तसे जास्तीचे काम नव्हते त्यामुळे या मोकळ्या वेळात वृंदाचा मोर्चा मोबाईलकडे वळला. व्हॉट्सअप मेसेजेच वाचून झाल्यानंतर लोकांचे स्टेटस पाहण्याचा मोह आवरला गेला नाही. कानात इयरफोन घालून तिने स्टेटस पाहायला सुरवात केली आणि नजर एका स्टेटसवर खिळली. विठुमाऊलीच्या आषाढी वारीचा सुवर्णसोहळा अगदी मनोवेधकपणे त्या व्हिडिओत दाखविला होता. नानाविध फुलांनी सजलेली पालखी, त्या पालखीमागून चालणारा वैष्णवांचा मेळा, हाती दिंड्या पताका घेऊन नामस्मरणात तल्लीन झालेली विठुरायाची लेकरं अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत.गगनाला भिडलेला विठुरखुमाईचा नामघोष. सारं सारं नयनरम्य आणि लोभसवाणं.नानाविध भागांतून एकत्र आलेले सारे वारकरी भक्तीच्या एकाच रंगात न्हाहून गेले होते.अवघा रंग एक झाला, रंगि रंगला श्रीरंग. माणुसकीचा रंग लेवून सगळेच विठ्ठलभक्तीत दंगले होते. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला असलेलं 'जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ' या गाण्याने तर तिला आणखीनच मंत्रमुग्ध व्हायला झाले होते. व्हिडिओ पाहता पाहता वृंदाही त्या भक्तीरंगात न्हाहून निघाली. याची देही याची डोळा जणू प्रत्यक्षपणे आपण त्या वारीत सहभागी असल्याचा भास झाला तिला.विठ्ठलाच्या जाणीवेने मनाला भावनेची भरती आली. सावळ्या विठ्ठलाची प्रतिमा डोळ्यांसमोर रेखाटली गेली. नकळत हात जोडले गेले. मनावर दाटलेलं भक्तीचं आभाळ डोळ्यांतून रितं झालं. ओलेत्या नजरेतही विठुरखुमाईची मूर्ती तिला साजिरी सुंदर दिसत होती.भक्तीचं पाणी डोळ्यांतून आनंदाश्रू बनून वाहत होतं.
वारीत तल्लीन झालेल्या तिला आपण शाळेत असल्याचाही विसर पडला. तोच पाटील मॅडम स्टाफरूमध्ये आल्या. वृंदाच्या डोळ्यांत पाणी पाहून त्या घाबरल्या.

" वृंदा अगं काय झालं ? ठिक आहेस ना ?" त्या आपुलकीने म्हणाल्या.
पण कानात इयरफोन घातलेल्या आणि विठुरायाशी एकरूप झालेल्या तिच्या कानांपर्यंत त्यांची साद काही गेली नाही.

" अगं वृंदा काय झालं ? अशी का रडतेस ?" तिच्या कानातून इयरफोन काढत त्या म्हणाल्या.
त्यांच्या अश्या अचानक येण्याने वृंदा दचकली. डोळ्यांतील पाणी टिपत तिने स्वतःला सावरले.

"कोणी काही बोललं का तुला?" त्या मायेने विचारत्या झाल्या.

" नाही ओ मॅडम. मी ठिक आहे. वारीचा सोहळा पाहत होते त्यामुळे थोडी भावनिक झाले बाकी काही नाही.." स्टेटसमधून बाहेर पडत ती म्हणाली.

"कम ऑन वृंदा. तु आताच्या जनरेशनची आहेस आणि तरीही तुला यामध्ये एवढा इंटरेस्ट..?" त्या जरा तुच्छतेनेच म्हणाल्या.

" मॅडम, वारी हा इंटरेस्टचा नाही तर भावनेचा विषय आहे." ती ही परखडपणे आपलं मत मांडती झाली.

" मैलोचं अंतर चालत,पायपीट करत पंढरपुरला जाणाऱ्या वारकऱ्यांना वारीत का विठ्ठल भेटत असेल ?" त्याही मागे हटत नव्हत्या.

" इथे मैलोंच्या अंतरावर मोबाईलमध्ये नुसती व्हिडिओ पाहून माझी विठुमाऊली मला दर्शन देऊ शकते तर मग वारीतल्या वारकऱ्यांसोबत ती अप्रत्यक्षपणे वावरत असेलच ना. देहभान विसरून किर्तनात रंगून जाणाऱ्या वारकऱ्यांत त्या वेळेस प्रत्यक्ष विठुमाऊलीच वास करीत असेल, डोक्यावर तुळस घेऊन पायी चालत जाणाऱ्या प्रत्येक माऊलीची वाट विठुराया आईच्या मायेने पाहत असेल, चिमुकला वारकरी जेव्हा वारीत सहभागी होतो तेव्हा त्याची द्रिष्टही माझा पांडुरंगच काढत असेल..
मॅडम वारीच्या प्रत्येक रंगात माझा श्रीरंग आहे त्याशिवाय का डोळ्यांना भावनेची भरती येते?देव नेहमीच भेटतो हो फक्त अंतरीचा भाव शुद्ध असला पाहिजे." वृंदानेही समर्पक शब्दांत उत्तर दिले.

तिच्या उत्तराने पाटील मॅडमना मात्र काहीच फरक पडला नाही. तिला हात जोडून दाखवत त्या स्टाफरूम मधून बाहेर पडल्या. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत वृंदा गोड हसली.

" विठुराया, एकदा आमच्या मॅडमना पण भेट.." म्हणत तिने हात जोडले.

थोडक्यात काय तर देव भावाचा भुकेला, भाव पाहून भुललं. ठायी भाव असेल तर देव दिसतोच.मनातला भाव जपा देव कणाकणात भेटेल.
रामकृष्णहरी...

©® आर्या पाटील