जिंकणार कोण ... मीच!

टीव्हीवरील प्रश्नोत्तरीचा धम्माल कार्यक्रम!

                                     जिंकणार कोण... मीच!
         बिझी टिव्हीचा तो स्टुडिओ प्रेक्षकांनी खचाखच भरला होता. सर्वत्र चमकणाऱ्या रंगीबेरंगी लाईटमुळे वातावरणाचा खास असा माहौल तयार झाला होता. त्यादिवशी तिथे बिझी टिव्हीच्या अत्यंत, अत्यंत आणि अत्यंत लोकप्रिय  'कोट्याधीश मी होणार' या कार्यक्रमाचा एक भाग चित्रित होणार होता. प्रचंड लोकाधार लाभलेल्या त्या मालिकेचे तितकेच लोकप्रिय सूत्रधार सचित्र खोडकर यांचे कोणत्याही क्षणी आगमन होणार होते. प्रेक्षकांना जास्त वेळ ताटकळत न ठेवता अत्यंत देखण्या आणि तरण्याबांड सचित्र यांनी त्या झगमगत्या प्रकाशाच्या पायघड्यांवरून तिथे प्रवेश करताच उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.
"स्वागतम् ! सुस्वागतम् !.... मंडळी नमस्कार ! मी सचित्र खोडकर आपणा सर्वांचे मनापासून तुमच्या लाडक्या आणि आवडत्या कार्यक्रमात स्वागत करतो, ज्याचे नाव आहे... 'कोट्याधीश मी होणार!' मित्रांनो, नमनाला घडीभर तेल न घालता आपण कार्यक्रम सुरू करूया. आपणा समोरच्या खुर्च्यांवर दहा स्पर्धक बसलेले आहेत. 'काय तय्यार का?' ...." त्या स्पर्धकांकडे पाहत खोडकरांनी विचारताच कुणी मान हलवून, कुणी मंद स्मीत करून तर कुणी अंगठा दाखवून संमती दर्शवताच खोडकर पुढे म्हणाले,
"स्पर्धकांनो तुमच्यासाठी हा घ्या प्रश्न. जो या प्रश्नाचे वेगवान परंतु अचूक उत्तर देईल त्या स्पर्धकास प्रथम या हॉटसीटवर बसण्याचा मान मिळेल. हा बघा, तुमच्यासमोर हा प्रश्न..."
'चहा मध्ये ज्या क्रमाने साहित्य टाकले जाते त्याचा योग्य क्रम लावा. तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता.... पर्याय आहेत...
अ) पत्ती, साखर, दूध, पाणी
ब) साखर, पत्ती, दूध, पाणी
क) दूध, पाणी, साखर, पत्ती
ड) यापैकी नाही.
     अवघ्या काही सेकंदातच स्पर्धकांची उत्तरे चार पर्यायांमध्ये विभागून मिळताच सचित्र खोडकर प्रचंड उत्साहाने म्हणाले, “अ पर्याय स्विकारणारे दोन स्पर्धक आहेत, ब पर्याय स्विकारणारे चार स्पर्धक आहेत. क पर्यायास मान्यता देणारे एक स्पर्धक असून दोघे जण तटस्थ राहिले म्हणजे निर्धारित वेळेत उत्तर नोंदवू शकले नाहीत. मित्रांनो, योग्य पर्याय जाहीर करण्यापूर्वी आपण घेऊ या एक मोठ्ठी विश्रांती. आम्ही आत जावून नाश्ता, चहापाणी घेवून येतो. तोवर तुम्ही कुठेही जावू नका. बिझी टिव्हीसमोर बसून अगदी बिझी रहा. आवडत नसले तरी जाहिरातींचे मनसोक्त रवंथ करा."
जवळपास दहा मिनिटांनंतर सचित्र खोडकर रंगमंचावर पुन्हा अवतरून म्हणाले,
"तर मंडळी ब्रेकवर जाण्यापूर्वी विचारलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे.... 'क'! हा पर्याय एकाच स्पर्धकाने म्हणजे, सौभाग्यवती निर्मला यशवंत साडे यांनी स्वीकारला..." सचित्र यांचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच निर्मलाबाई जवळपास धावतच सचित्रकडे निघाल्या. त्यांच्या एकूण अविर्भावावरून त्या कडकडून मिठी मारणार की काय या शंकेने खोडकर हॉटसीटच्या समोरच्या बाजूस जात म्हणाले,
"या या निर्मलाजी या...."
"आज्जी? सचित्रभौजी, आज्जी काय म्हणता? वहिनी म्हणा ना! अहो, पंधरा दिवस रोज सकाळ-संध्याकाळ नेमाने वारी केलीय हो.... ब्युटीपार्लरची! हेची फळ का पार्लर वारीचे?"
खरेच निर्मला साडे यांनी पन्नाशी ओलांडली असली तरी त्या क्षणी त्या तिशीतल्या दिसत होत्या.
"या वहिनी, या.'' असे म्हणत सचित्र त्यांना हलकेच हॉटसीटपर्यंत घेवून आला. बसण्यापूर्वी निर्मलाताईंनी पर्समधून हळद-कुंकू, गुलाल, पेढे, हार असे साहित्य काढले. विधीवत हॉटसीट पूजा करून खुर्चीला हार घातला. पेढ्याचा नैवेद्य दाखवून आरती ही लावली....
'जयदेवी जयदेवी जय हॉटसीट देवी
प्रसन्न होवूनी दे मिळवूनी रूपये कोटी....'
त्यांची ती तयारी पाहून त्यांना थांबवत सचित्र म्हणाले,
"वहिनी वहिनी एक मिनट, ही आरती आपण कार्यक्रमानंतर म्हणू या का? कारण आपणास वेळेचे बंधन आहे. प्लीज..."
"असे म्हणता, ठीक आहे....." नाराज होत निर्मलाबाईंनी संगणकासह हॉटसीटला पाच प्रदक्षिणा घालताना अक्षरक्ष: साष्टांग नमस्कार घालून खुर्चीची हाताने चाचपणी सुरू केल्याचे पाहून खोडकरांनी विचारले,
"अहो वहिनी, हे काय करता?"
"तपासणी करतेय..."
"घाबरू नका बॉम्ब वगैरे नाही.''
"तो नसणारच हो. कुणाची ताकद आहे मी इथे असताना? सीट फार गरम तर नाही ना हे पाहतेय! तुम्ही सारखा हॉट... हॉट सीट असा जप करता ना..." निर्मला ताई चे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच सचित्रसह सर्वांनीच प्रचंड हास्यनिनाद करताना टाळ्यांचा कडकडाट केला.
"वा! वा! नाईस ज्योक ! वहिनी, कसे वाटतेय हॉट सीटवर ..."
"एकदम छान! चटका बसेल, पोळेल ही भीती दूर झाली. एक सांगू का सचित्रभौज्जी, मला की नाही हॉटसीटवर बसण्याची मनोमन इच्छा होती पण या नाही..."
"या नाही, मग कोणत्या?"
"ती हॉट सीट... तिच्या समोरच्या खुर्चीवर दशकानुदशके आम्हा स्त्रियांच्या ह्रदयावर राज्य केलेला अमिताभ असतो..., पण जाऊ द्या. अमिताभ ना सही सचित्रच सही. दुधाची तहान ताकावर! शिवाय तुम्ही इथे जे काही करता म्हणजे अॅक्शन, हातवारे, बोलण्याची ढब वगैरे ते सारे म्हणजे जणू अमिताभचीच नक्कल. त्यामुळे विशेष फरक जाणवत नाही. शिवाय हे वातावरण, हा सेट, ही रचना सारे सारे 'कौन बनेगा करोडपती' प्रमाणेच ... करोडो काय नि कोटी काय एकच."
"ग्रेट! खरेच अमिताभ आणि तुमच्यासारखे त्याचे चाहतेही भाग्यवान! वहिनी, तुमच्यासोबत कोण-कोण आलंय..."
"आले माझे धनी..."
"कोण ? धन्नो? ती शोलेतील बसंती धन्नो?"
"ओ भौजी, जरा धीरानं. ती बसंती आणि तिची ती घोडी इथे आली असती तर.." म्हणत प्रेक्षकांकडे बोट दाखवून ती म्हणाली,
"ही भुतावळ इथे अशी बसली असती? धनी... धनी म्हणजे नवरा...मालक... हजबंड, सासू-सासरे, दीर, नणंद, नंदवई, भाऊ, वहिनी, मुलगा, सून...''
"आबाबा! आख्खी खानदानच आलेली दिसतेय. बरे, आई नमस्कार... कसे वाटतेय?" निर्मलाच्या सासूकडे पाहत सचित्रने विचारले. त्या स्त्रीने फक्त हात जोडले.
"सध्या माझ्या सासूबाई म्हणजे कान असून ऐकता येत नाही, तोंड असून बोलता येत नाही. डोळे सताड उघडे ठेवून पाहण्याचे तेवढे काम करतात."
"ओ वेरी सॅड!"
"डोंबल्याचं आलंय सॅडवॉड! कान तिखट असताना नको ते सारे ऐकून तोंडाचा पट्टा असा सुरू असायचा ना की..."
"बरे ते जावू द्या. आपण खेळ सुरु करण्यापूर्वी एक सांगा, आज जी रक्कम जिंकाल त्याचे तुम्ही काय करणार?"
"काय करणार म्हणजे? मी माझ्या हुशारीवर तो पैसा जिंकणार आहे. त्यावर फक्त माझाच हक्क असणार आहे. साऱ्यांच सारे-सारे करण्यामध्ये जिंदगी निघून गेली. स्वत:ची हौस-मौज करण्यासाठी वेळच मिळाला नाही. आता हेच बघा ना, आमच्या या नणंदबाई, दरवर्षी वारी केल्याप्रमाणे न चुकता किमान पाच वेळा पंधरा-पंधरा दिवस ठाण मांडून बसतात. तीस वर्षे झाली असतील... जाऊ द्या. स्टोरी सांगत बसले ना तर एकाच वेळी पाच-दहा सिनेमा निघू शकतील. एका सिनेमामध्ये आमची कुटुंब कथा बसणारच नाही."
"बरे ठीक आहे. या खेळाचे काही नियम आहेत..."
"मला सारे नियम मुखपाठ आहेत. शाळेत असल्यापासून मी एकपाठी आहे. तुमचे सारे शो तसेच अमिताभचे करोडपतीचे सारे एपिसोड अगदी पुनः प्रक्षेपणासह पाहिले आहेत. मी तुम्हाला सांगते, प्रश्न विचारल्यावर तुमच्या वेळेत मी उत्तर देईन. वेळ वाढवून मागणार नाही. नो प्रॉब्लेम! पण तुम्ही मध्येच काहीबाही गडबड करून मला संभ्रमात टाकायचे नाही. बिल्कुल बोलायचे नाही. तुमच्या आणि त्या बिग बीच्या बोलण्याच्या जाळ्यात अडकून अनेकांना मध्येच डाव सोडावा लागला. समजा मी उत्तर देताना अडखळले, गोंधळले तर उत्तराचा क्रमांक बोटाच्या इशाऱ्याने मला खुणवायचा. ते उत्तर बरोबर असेल तर तुम्हास बक्षीस म्हणून शे-दोनशे रूपये देईन. असे समजा ना ही व्यवस्था म्हणजे कितीही वेळा वापरता येईल अशी लाईफलाईनच! तशी तुमच्या मदतीची गरज पडणारच नाही. परंतु कसे आहे, प्रसंगच तसा आला तर कुणासही काका म्हणावे लागते."
"बाप रे! धनी, आज आपला सामना वेगळ्याच व्यक्तिमत्त्वाशी..."
"हे धनी कोण? धनी म्हणजे..."
"अहो वहिनी थांबा, गैरसमज नको. अहो, धनी म्हणजे हे संगणक महाराज! वहिनी, तुमच्यासाठीचा हा पहिला प्रश्न..."
"होम मिनीस्टर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कोण आहेत?''
"थांबा. काहीही पर्याय देवू नका. बांदेकरांचा आदेश."
"वा! वहिनी, वा! तुम्ही फॅन..."
"डोंबल्याची फॅन! अहो, मी एकदा त्यांच्यासोबत खेळलीय... अहो, होममिनीस्टरचा खेळ हो. वासलेले डोळे मिटा आधी. पूर्ण न ऐकताच..."
"म्हणजे तुम्हास अशा कार्यक्रमांचा अनुभव आहे तर.."
"चांगलाच अनुभव आहे."
"त्या कार्यक्रमात जिंकलेली पैठणी ती हिच का ?"
"एवढी चांगली पैठणी तो भाऊजी देईल का? माझ्या धन्याने रिटायर झाल्यावर घेतलीय. जिंकलेली पैठणी मला आवडली नाही, म्हणून देऊन टाकली सुनेस...''
"मला वाटले, आदेश तुमचा आदर्श असेल तर त्याला फोन लावून तुमची आणि त्याची शब्द भेट घालू या."
"नको, नको इकडे यायच्या आधी घंटाभर बोललीय त्यांच्याशी. मला वाटले होते, आदेशच्या मदतीने हा आपला एपिसोड फिक्स करून कोट्यधीश व्हावे. पण भाऊजी महावस्ताद हो. ताकाला तूर लागू दिली नाही हो."
"बरे, आदेश बांदेकर यांना लॉक करू का?"
"लॉक? का? त्यांचा गुन्हा काय? जिंकणाऱ्या वहिनींना डुप्लीकेट पैठणी दिल्याचे उजेडात आलेय का ? "
"तसे काही नाही. लॉक करू का म्हणजे पर्यायावर..."
"म्हणजे? अजून तुमच्या धन्याला माझे उत्तर पाठवलेच नाही? खोडकर, एवढा आळशीपणा बरोबर नाही हो.''
"वहिनी, धनी म्हणताहेत, तुमचे उत्तर एकदम बरोबर आहे. तुम्ही एक हजार जिंकलेत..."
"फक्त हजार? अहो, आदेश म्हणजे केवढा मोठा माणूस आणि त्याच्या नावावर फक्त एकच हजार रूपये!''
"गुड! वहिनी, आता पुढचा प्रश्न... चालून आलेले पंतप्रधानपद नाकारणारी महिला कोण? पर्याय...
अ) सुषमा स्वराज
ब) शीला दीक्षित
क) राजकुमार,
ड) सोनिया गांधी.."
"काय हा प्रश्न भौजी? नावाप्रमाणेच खोडकर आहोत. मला सांगा, खोडकर हे आडनाव तुमच्या वंशाचे आहे की..."
"वहिनी, लहानपणी... म्हणजे तसा आत्ताही मी खूपच खोडकर आहे म्हणून मित्रांनी हे नाव चिकटवलय..."
"माझा संशय खरा ठरला तर... तुमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे अहो, आपल्याकडे त्यागमूर्ती एकच, सोनिया गांधी!"
"वा! वहिनी, वा! खूपच छान खेळता आहात तुम्ही."
"जावू द्या. बोलण्यात गुंतवू नका. या प्रश्नाची जिंकलेली रक्कम सांगायचे टाळू नका... हडप कराल..."
"वहिनी, तुम्ही दोन हजार रुपये जिंकले..."
"काय? फक्त तेवढेच? बडा घर पोकळ वासा! नावे कित्ती मोठ्ठाली होती. अहो, संसद भवनासमोर उभे राहून ही नावे जोरजोराने घेतली ना तर चुटकीसरशी दहा-वीस हजार रूपये मिळतील. कसे आहे, काँग्रेसवाले समोर दिसताच सोनियाच्या नावाचा जयजयकार केला ना तर ती मंडळी खिशात हात घालून बंडल काढून देतील आणि बीजेपीची माणसं दिसताक्षणी टोपी बदलून म्हणायचे... सुषमाजींना 'पंतप्रधान' करा असा कंठशोष करताना प्रत्येकाला एक एक कमळाचे फुल देताच लगे त्यांचेही हात खिशात जातील."
"खरे आहे तुमचे पण आपला धनी तेवढा श्रीमंत नाही हो."
"ते जावू देत. मला सांगा तुम्हाला या प्रत्येक एपीसोडचे किती मिळतात आणि तुम्ही त्यापोटी कर भरता का नाही?"
"वहिनी, तुम्हास माहिती आहेच, की स्त्री कधीच आपले खरे वय आणि पुरूष कधीच स्वत:चा पगार सांगत नाही"
"हे अर्धसत्य आहे. वयाच्या बाबतीत बरोबर आहे पण पगाराबाबत..... इथे आल्यात का मिसेस खोडकर?"
"वहिनी लाईव्ह सुरू आहे. तुम्हांस सांगितले आणि तो आकडा बायकोने ऐकला तर नसती आफत येईल हो.''
"तुम्ही भलतेच हुशार हो भाऊजी. पण तुम्ही मला नाही ओळखलेत? वहिनी आहे तुमची म्हटलं! एकाच वेळी दोन बायकांना खेळवत आहात तुम्ही..."
"बाप रे! हे-हे काय भलतंच?"
"घाबरू नका. पगाराचा खरा आकडा न सांगून बायकोला आणि कराच्या बाबतीत माझ्या प्रश्नास केराची टोपली दाखवून मला..."
"नाही. तसे नाही. मी नियमित करदाता आहे. अजून बीझी टिव्हीशी माझा आर्थिक करार झालेला नाही. म्हणजे व्हाईटमनी नियमानुसार ठरलाय. परंतु ब्लॅकमनीसाठी वाटाघाटी चालू आहेत. बरे, आता पुढचा प्रश्न. यानंतर तुम्हास एक आवाज ऐकवण्यात येईल. तुम्ही ओळखायचा. ऐका...." खोडकर म्हणाले आणि दुसऱ्याच क्षणी एक आवाज तिथे सर्वांच्या कानावर पडला...
"आता तर काय मज्जा आहे बाईसाहेबांची! कोट्यधीशसाठी बोलावणे आलेय म्हणे. काय दिवे लावणार देवच जाणो. हॉटसीट म्हणजे काय डायनिंगची खुर्ची वाटली? बसताक्षणी त्या म्हातारीच्या कथेतील बोरे खाणाऱ्या कोल्ह्यासारखे नाही भाजल्या तर नाव नाही सांगणार. गल्लीतल्या टवाळ बायकांना जमवून कुटाळकी करण्याएवढे सोपे आहे ते? अहो, तशी एका पैशाचीही शक्यता नाही. पण यदाकदाचित कोटी रूपये जिंकलेच तर त्या खोडेकरांना हजार-दोन हजार रूपये देवून तो धनादेश आपल्यापैकी कुणाच्या नावावर घ्या. मिळालेल्या पैशावर असा फणा काढून बसतील की, आपल्यावर हात चोळण्याची पाळी येईल..."
"वहिनी, आवाज ओळखीचा वाटतोय?"
"ओळखीचा? ह्या किरकिऱ्या आवाजाने मती कायम गुंग झालीय. डोक्यात घण घातल्यासारखे वाटतेय. पोट्ट्याचे लग्न झाल्यापासून माझ्या डोक्यावर मिरे वाटणाऱ्या सुनेचा हा आवाज आहे. बघा, कशात काय नि फाटक्यात पाय असताना, माझ्या कष्टाने मिळणारा पैसा असा हडप करायला टपलीय ही हडळ. खोडकर भौजी, खरे सांगा, असा काही दगाफटका तुम्ही हिच्या लागून... असे काही करणार ना तुम्ही?"
"वहिनी, शांत व्हा. जिंकलेली सारी रक्कम तुमच्याच नावे धनादेशाने मिळेल. मी आत्ता घेतोय एक विश्रांती...''
"थांबा, थांबा. विश्रांती, ब्रेक, रेस्ट ही नाटकं बंद करा. त्यामुळे आमची तंद्री भंग पावते. त्या वीस षटकांच्या सामन्यात नाही का सेट झालेला, ब्रेकपूर्वी खोऱ्याने धावा काढणारा फलंदाज ब्रेकनंतर पहिल्याच षटकात बाद होतो..."
"क्या बात है, वहिनी, बरे मला सांगा, वीस षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात कधीच न खेळलेला खेळाडू... अ) धोनी
ब) रैना
क) कोहली
ड) सुनील.. "
"सांगा. सांगा. तुमच्या धन्याला ड हा पर्याय सांगा."
"नक्की, अजूनही ..."
"खोडकरपणा चालू केलात की? मी अगोदरच सांगितले होते, मी सांगितलेला पर्याय मुकाटपणे पोहोचवयाचा... धन्याकडे केवळ पोस्टमनप्रमाणे! बरोबर असेल, चूक असेल ती जबाबदारी माझी"
"क्या बात है? धनी, जरा सुनीलला लॉक करा."
"खोडकरजी, हे बघा, उत्तर बरोबर का चूक ते त्वरीत सांगायचे टेंशन वाढवायचं नाही, अभिनय करायचा नाही. काय होते, या तुमच्या अशा सोंगामुळे हॉटसीटवरील प्रत्येक व्यक्ती माझ्यासारखी खमकी नसते. एखाद्या कमजोर दिलवाले व्यक्तिचा हार्टबीट चुकून अॅटॅक आला म्हणजे?"
"वहिनी, तुमचे बरोबर आहे. माझ्या हे लक्षात आलेच नाही. केवळ गंमत म्हणून...''
"ही बाब कुणाच्याही जिवावर उठू शकते. लक्ष देत रहा."
"तुमचे उत्तर बरोबर आहे. तुम्ही दहा हजार जिंकलेत अभिनंदन!"
"चिंचोके, गोळ्या, रूपये असे काही म्हणा ना."... असाच खेळ रंगात आलेला असताना खोडकरांनी विचारले,
"कसे वाटते आहे?"
"मला छानच वाटते. पण माझा प्रवास पंधराव्या प्रश्नाकडे यशस्वीपणे चालू असल्याचे पाहून तुमच्या आणि बीझी टिव्हीवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकतेय का? त्या माझ्या लाईफलाईन अजून शिल्लक आहेत म्हटलं. इतर स्पर्धकांना वारंवार आठवण करून देता. पण मला अजूनही आठवण..."
"वहिनी, तुम्हीच बोलायचं नाही असे म्हणालात ना? बरे, पुढचा प्रश्न...."
"आला का तुमच्या धन्याकडून प्रश्न?"
"म्हणजे.."
"भावोजी, तुमच्या हातात काय आहे? ही प्रश्नपत्रिका का तुमच्या हातात असते? या धन्याने प्रश्न दाखवला तरच तुम्ही आम्हास विचारणार. जोवर प्रश्न येत नाही तोवर तुमची बडबड चालते. मला सांगा, सारे पंधरा प्रश्न एपिसोडच्या आधी तुमच्या हातात दिले तर तुम्ही ती प्रश्नपत्रिका अगोदरच फोडून मालामाल झाले असते का नाही? अहो, मोठमोठ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटतात तिथे या कार्यक्रमाची प्रश्नपत्रिका फुटायला कितीसा वेळ आणि पैसा लागणार? पण तुमचे हे बीझी टीव्हीवाले महावस्ताद दिसतात हो. मांजराने उंदराला खेळवावे तसे आपल्याला खेळवतात."
"बाप रे! वहिनी, काय हे तुमचे विचार? बरे मला सांगा...?सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन कोण? पर्याय आहेत...
अ) आदेश बांदेकर,
ब) डॉ. निलेश साबळे,
क) सचिन खोडकर,
ड) पुष्कर श्रोती..."
"कसे आहे सचित्रजी, तुम्ही कात्रीत पकडून धर्मसंकटात टाकलेत हो. काय आहे, माझे कोट्यधीश होणे हे केवळ तुमच्या हातात आहे. इतर कुणाचे नाव सांगून काही कोटी रूपयांवर पाणी फेरण्यापेक्षा मी म्हणेन की या देशात, या जगात आणि त्रिभुवनातही सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक केवळ आणि केवळ सचित्र खोडकर!"
"वहिनी, मला म्हणालात. परंतु आत्ता तुम्हीच मला धर्म संकटात टाकले हो. तुमचे उत्तर चूक ठरवले तर मी सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक नाही हे मान्य करताना तुमचे कोटी रूपये बुडवणे आणि उत्तर बरोबर म्हणावे तर उर्वरित तिन्ही मित्रांचा रोष ओढवून घेणे आणि आत्मप्रौढी मिरवणे, परंतु धन्यवाद! अभिनंदन! तुमचे उत्तर बरोबर आहे."
"मी अजून कोणतीही जीवनदायिनी वापरलेली नाही."
"मुळीच नाही. तुम्ही आतापर्यंत सहा लाख रूपये जिंकलेत. पुढचा प्रश्न... स्त्री कोणत्या भूमिकेत अधिक रमते...
अ) सून
ब) सासू
क) आजी
ड) मुलगी'
"कसे आहे, मुलगी माहेरी असेपर्यंत तिथल्या लोकांवर अवलंबून असते. सून होते त्यावेळी नवरा, सासू, सासरे, नणंद, दीर अशा लोकांचा सहवास सहन करते. ती आजी होते त्यावेळी हत्ती गेला शेपूट राहिली अशी तिचीअवस्था असते. सासू हा एकच कालावधी तिच्या जीवनात असा असतो, की ती सर्वार्थाने स्वतंत्र असते, मालकिणीच्या भूमिकेत जगते म्हणून तिला सासूचीच भूमिका अधिक आवडते."
"वा! बरोबर आहे, वहिनी, आपण ब्रेक घ्यावा का?"
"घ्यायला हरकत नाही. पण पोटाची यथासांग पूजा असेल तरच. उगीच चारीमुरी खाणे नको."
"यथासांग पोटपूजा? बाप रे! अवघड आहे. कारण दररोजच्या पोटपूजेसाठी बायकांना साधारणपणे एक तास लागतो आणि यथासांग म्हणजे... असे करू या आपण 'विश्रांती' हा भागच रद्द करू या. तर हा तुमच्यासाठी पुढचा प्रश्न... क्रिकेटमध्ये तिसऱ्या पंचाच्या मदतीने बाद होणारा पहिला खेळाडू कोण?
अ) सुनील गावस्कर
ब) कपिल देव
क) सुरेश रैना
ड) सचिन तेंडुलकर..."
"हा तिसरा पंच कुठे असतो? एक पंच गोलंदाजाजवळ, दुसरा पंच विकेट किपरच्या आजूबाजूस असतो. बाकी तर सारे क्षेत्ररक्षकच असतात मग हा तिसरा पंच? बाद दिले? कसे शक्य आहे? भाऊजी, प्रश्नात काही तरी भेसळ आहे किंवा मला चुकीच्या प्रश्नावर बाद करण्याचा तुमचा डाव आहे. प्रश्न एकदा तुमच्या धन्याकडून तपासून घ्या."
"नाही. वहिनी नाही. प्रश्न आणि पर्याय दोन्ही बरोबर आहेत."
"तरीही मी साशंक आहे. मला तुमच्याकडून बाद न करण्याचे वचन हवंय..."
"नाही. तसे काहीही होणार नाही."
"मी प्रेक्षकांची मदत घेतेय. बा प्रेक्षका, मज पाव रे! माझे कोटी आता तुझ्याच हातात आहेत. प्रेक्षकांनो मला माहिती आहे, तिथे बसणे आणि इथे बसणे यामध्ये प्रचंड फरक आहे. पण कधी कधी बुडत्याला काडीचा आधार असतो, जसा याक्षणी मला तुमचा! अनेकांचा डोळा मला मिळणाऱ्या कोटी रूपयांवर असू शकतो. जलस हा मानवास लाभलेला शाप आहे. तेव्हा एक क्षण परमेश्वरास स्मरून खरेखुरे, प्रामाणिकपणे उत्तर द्या. त्या बदल्यात हा खेळ संपल्यानंतर प्रत्येकास एक एक चॉकलेट देईन किंवा प्रश्नाचे उत्तर सचिन असल्यास आणि या धन्याने ते बरोबर ठरवल्यास सचिनला आवडतो म्हणून प्रत्येकाला वडापाव खावू घालेन."
अवघ्या दहा-बारा सेकंदामध्ये प्रेक्षकांनी आपापल्या पसंतीचा कौल दिला. त्यानुसार अ पर्यायास ६० टक्के लोकानी, पर्याय ब वीस टक्के लोकांनी तर क हा पर्याय १८ टक्के प्रेक्षकानी स्वीकारला. ड हा सचिन तेंडुलकर पर्याय केवळ २ टक्के रसिकांनी नोदविला."
"वहिनी काय करणार?"
"तोच तर विचार करतेय. सुनीलने कधीही पंचाच्या निर्णयाची वाट पाहिली नाही. कपिल देव हा प्रामाणिक! सुरेश रैना हा आजच्या पिढीचा खेळाडू आहे. तिसऱ्या पंचाची निवडणूक...नेमणूक हो... त्याच्या काळात झाली असती तर मला माहिती असते. बरे, शेवटचा पर्याय.... हां हां सचिनच असणार. सचिनला बाद देणारे... आणि तेही खोटे बाद करणारे अनेक पंच आहेत. तेव्हा या अशा तिसऱ्या पंचानेच सचिनला मुद्दाम बाद दिले असणार. शिवाय येथे असलेले दोन टक्केच प्रेक्षक प्रामाणिक, विश्वासू आहेत. त्यांना मनापासून मी कोट्यधीश व्हावे असे वाटत असणार, बाकीच्यांनी मी खेळातून बाद व्हावे या आशेने ड पर्याय सुचविला नाही."
"म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के लोक बेईमान आहेत.''
"मला तसे म्हणायचे नाही. पण तसे असू शकतात. बरे 'ड' सचिनवर शिक्का मारा."
"ठीक आहे. धनी ड पर्यायावर शिक्का मारून आम्हाला सांगा की, वहिनी बरोबर आहेत की चूक आहेत?"
"चुकणारच नाही मी. माझे उत्तर एकदम करेक्ट असणार."
"वा! वहिनी, तुमचा आत्मविश्वास प्रचंड आहे. तुमचे उत्तर करेक्ट आहे." सचित्र सांगत निर्मलाताई जाग्यावर उभ्या राहून म्हणाल्या,
"ड पर्याय सुचविणाऱ्या दोन टक्के प्रेक्षकांचे मी आभार मानते. तुम्हास कबूल केलेला वडापावचा नवस मी फेडणार आहे. पण इथे खाणे शोभणार नाही तेव्हा माझा क्रमांक बीझी टिव्हीकडून घ्या आणि त्यावर आपापल्या बँकेचा खातेक्रमांक एसएमएस करा. या कार्यक्रमात जिंकलेली रक्कम मिळताच प्रत्येकाच्या खात्यावर मी दहा रुपये जमा करीन. इतर प्रेक्षकांनी वडापावसाठी या कार्यक्रमानंतर माझी वाट अडवू नये. माझा क्रमांकही या वाहिनीकडून मिळवायचा प्रयत्न करू नये. कारण ज्या दोन टक्के लोकांनी ड पर्याय सुचविलाय त्यांचे क्रमांक, नाव मी घेऊन जातेय आणि त्यांच्यावर खात्यावर प्रत्येकी दहा रूपये जमा करीन. धन्यवाद!"
"वा! वहिनी वा! मानले बुवा, काय धनी, आज कसा हुश्शार स्पर्धक मिळालाय. वहिनी तुमच्या धन्याला विचारतो, काय दादा, कसे वाटतेय?"
"छान! एका गोष्टीचा मला फार आनंद, अभिमान वाटतोय की लग्न झाल्यापासून माझी निम्मू मलाच गप्प बसवते. परंतु आज मात्र तिने तुम्हाला आणि या भरपूर प्रेक्षकांना चिडीचूप बसवून स्वत: कडकलक्ष्मी असल्याचे सिद्ध केले आहे."
"वा! वा! वहिनी हे निम्मू काय? कडकलक्ष्मी काय?"
"आजवर सारेच माझ्या पश्चात हे असे काहीबाही म्हणत ते मला समजत असे. आज मात्र संधी मिळताच सर्वांसमोर असे बोलून यांनीही हात धुऊन घेतले. घरी तर चला तुम्ही आणि ती तुमची करंटी सून. माझ्या जिंकलेल्या पैशावर डोळा ठेवते काय?"
"असो. वहिनी, समजा तुम्ही एक कोटी रूपये जिंकले तर त्याचे श्रेय..."
"समजा काय? अहो मीच जिकणारच!  'जिंकून जिंकून जिंकणार कोण? माझ्याशिवाय कोट्यधीश होणार कोण?' शिवाय त्याचे श्रेय इतर कुणास देवून जिंकलेल्या रकमेत का म्हणून कुणास भागिदार करू? तसे मनातही आणू नका कुणी. फार तर इथे येण्या-जाण्याचा सारा खर्च मी देईन. अर्थात माझ्या लोकांचा बरे. नाही तर उगीच तुम्ही म्हणाल या फुकट्यांना का?"
"धनी, आता वहिनीस कोणता प्रश्न विचाराल?"
"का? संपले काय प्रश्न? तर मग मला 'कोट्यधीश' जाहीर करा.'
"ते तर होईलच हो. वहिनी एक सांगा, एक कोटी रूपये जिंकताच कोटी रूपये किंवा मुंबईत फ्लॅट असे दोन पर्याय दिले तर..."
"अहो, सचित्रजी वेगळे चित्र रंगवू नका. मी पैसे जिंकणार त्यामुळे मला पैसेच हवेत. ही लांडीलबाडी कामाची नाही. फ्लॅट-वॅट मोठ्या समारंभपूर्वक द्याल आणि ते दुसऱ्याच कुणाच्या नावावर असले तर? त्या घरावर भले मोठे कर्ज असले म्हणजे? असेही होईल, की एखाद्या चाळीतील मोडकळीस आलेले घर माझ्या माथी माराल. ते काही चालणार नाही. दुसरे म्हणजे मला चेकबिक चालणार नाही. ओन्ली कॅश! कारण असे चेक वटतच नाहीत म्हणे! असे वठणीवर आणीन ना की कोर्टाच्या चकरा मारण्यातच बिझी राहते."
"बाप रे बाप! वहिनी, कमाल आहे तुमची. तुम्हास सारे नियम माहिती आहेत तरीही सांगतो, ह्या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिल्यास पन्नास लाख जिंकाल. परंतु उत्तर चुकल्यास तुम्हाला बारा लाख रुपये मिळणार किंवा या प्रश्नाचा योग्य उत्तर देण्यापूर्वी खेळ सोडल्यास जिंकलेले पंचवीस लाख मिळणार..."
"काय? हा सरासर धोका आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकलेल्या पैशात कपात होवू नये. ठीक आत्ता पन्नास लाखापर्यंत आले ना, बस आता दोन प्रश्न दूर आहे कोट्यधीश होण्यापासून. सचित्रजी, अजून जीवनदायिनी बाकी आहेत बरे."
"हो, हो नक्कीच. आता प्रश्न बघा. पंतप्रधान होण्यापूर्वी मनमोहनसिंह कोणत्या खात्याचे मंत्री होते? पर्याय...
अ) अर्थमंत्री
ब) गुरुद्वारा विकास समिती
क) आरोग्यमंत्री
ड) विज्ञानमंत्री..."
"हं. अश्शी चाल खेळलात काय? ठीक आहे. मला एक सांगा, मी एखादी जीवनदायिनी शिल्लक ठेवून कोट्यधीश झाले तर त्याचा आर्थिक फायदा होईल."
"वहिनी, नाही हो ती लाईफ लाईन लॅब्स होईल.''
"ठीक आहे, मग कशाला शिल्लक ठेवू? तळ्यात मळ्यात..."
"धनी, वहिनी आपली दुसरी जीवनदायिनी फिफ्टी फिफ्टी घेवू इच्छितात. कृपया दोन चूक उत्तरे नष्ट करावी..."
"तुमच्या धन्याला चुकीचेच पर्याय असे निक्षून सांगा हं. नाही तर या यंत्राचे काही खरे नसते. उगीचच एखादेवळी बरोबर असलेला पर्याय उडवून देईल अन् मग वांधे होतील. हा तुमचा धनी त्या बँकेतल्या संगणकाप्रमाणे 'डाऊन' तर होत नाही ना? बँकेचे सर्वर बंद पडते आणि सारीच बोंब होते."
"तसे काहीही होत नाही. हे बघा आरोग्यमंत्री आणि विज्ञानमंत्री हे दोन चुकीचे पर्याय नष्ट झाले आहेत. आता बोला.."
"गुरुद्वारा विकास समिती आणि अर्थमंत्री? ठीक आहे. यातील अर्थमंत्री हा पर्याय लॉक करा. आत्ता मात्र 'नक्की का? विचार करा. वेळेचे बंधन नाही. अजून एक जीवनदायिनी बाकी आहे.' असे शब्दजंजाळ निर्माण न करता मी पन्नास लाख जिंकले असे जाहीर करा आणि चेक लिहा. कसे आहे खोडकरजी तुम्ही आणि तुमचे धनी दोघेही मला घाबरलात. थांबा, सांगते कसे आहे, तीन चुकीचे पर्याय होते. मला गोंधळात टाकण्यासाठी अर्थमंत्री आणि आरोग्यमंत्री हे दोन पर्याय ठेवले असते तर मी क्षणाचाही विचार न करता आरोग्यमंत्री या पर्यायाची निवड केली असती. कारण मनमोहनसिंग डॉक्टर आहेत. परंतु तुम्हीच दोघे मी कोटी रुपये जिंकणार या विवंचनेत असल्यामुळे माझा रस्ता मोकळा झाला..."
"अगदी खरे आहे तुमचे वहिनी, तुम्हास मनापासून मानले."
"ते ठीक आहे हो, उगाच स्तुतीचे मनोरे बांधू नका."
"वहिनी, तुम्ही एवढ्या विचारपूर्वक खेळत आहात तेव्हा तुमचे उत्तर चुकेलच कसे? तुम्ही पन्नास लाख रुपये जिंकलेत. प्रेक्षकांनो मी धनादेश लिहितोय तोवर टाळ्या वाजवत ठेवा."
"अरे, जरा जीव लावून वाजवा की. आठ दिवसांपासून उपाशी असल्याप्रमाणे आणि माझ्यावर उपकार केल्याप्रमाणे का वाजवता?"
"घ्या. वहिनी, घ्या. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून प्रथमच पन्नास लाखांचा धनादेश लिहितोय. घ्या..." खोडकरांनी पुढे केलेला धनादेश निर्मलाताईंनी झडप मारून घेतल्याप्रमाणे ताब्यात घेतला. त्यावरील नाव, दिनांक, अक्षरी आणि अंकातील रक्कम तीन-तीन वेळा वाचली. मग तो धनादेश डोक्यावर, डोळ्यांवर, ओठांवर आणि हृदयावर भक्तीपूर्वक लावून चपळाईने ब्लाऊजच्या आत सरकवताच जिथे खोडकरांनी कपाळावर हात मारून घेतला तिथे प्रेक्षकांनी पुन्हा टाळ्यांचा कडकडाट केला.
"वहिनी, आता शेवटचा, ठेवणीतला प्रश्न. हा प्रश्न कुण्या स्पर्धकास पहिल्यांदाच विचारण्याचे भाग्य मला लाभले. त्यापूर्वी मी तुमच्या नणंदेस विचारतो. ताई, नमस्कार तुमच्या वहिनी कोट्यधीश होण्यापासून एक प्रश्न दूर आहेत कसे वाटते?"
"सचित्रभौजी, मस्त वाटतेय. आमचा परिवार करोडपती..."
"वन्स, चुकताय तुम्ही. परिवार नाही. मी-मी निर्मला... "
"ठीक आहे. वहिनी तू काय नि मी काय सारखेच. पण एक सांगू का भाऊजी, लग्नापूर्वीची आमची वहिनी आणि आजची वहिनी यात जमीन-आस्मानचा फरक आहे. लग्न होऊन आली तेव्हा हिच्या चेहऱ्यावरची माशी उठत नव्हती."
"त्याचाच तर फायदा घेतला ना तुम्ही."
"मला तसे म्हणायचे नव्हते. लग्नापूर्वीची भोळी, अडाणी निर्मला आमच्या संगतीने इतकी हुशार झालीय की तुमच्या अवघड पंधरा प्रश्नांची उत्तरे देवून कोट्यधीश होतेय. वहिनी मान अथवा न मान. पण याचे सारे क्रेडिट तुझा नवरा, सासू, सारे, भावे, दीर आणि माझ्यासारखी चतुरस्त्र नणंद यांनाच जाते हो. ह्या हुशारीचे संस्कार आम्हीच केलेत हो."
"हे बघा, वन्स, हा गळे काढूपणा आता बंद करा. फुटकी कवडीही मिळणार नाही..."
"त्या फुटक्या कवड्यांची माळ करून गळ्यात घाल. वा ग वा, ऐकून घेतलेय म्हणून काहीही बडबडू नकोस हं. तू करोडपती झालीस तरी आम्ही भिकारी नाही आहोत की तुझ्या घरी बारा महिने अठरा काळ पडून राहत नाहीत. माहेरवाशीण म्हणून येत असेल दोन-चार दिवसांसाठी तर त्यापायी एवढा घोर अपमान करण्याची गरज नाही. चला हो. तिचे कोटी तिलाच लखलाभ..." असे रागारागाने बोलत नणंद दणादण पावले आपटत निघाली. पाठोपाठ बिचारा नवरा.
"अरेरे! वहिनी हे तर भलतेच झाले. तुम्ही वाईट वाटून घेवू नका. टेन्शन..."
"काही नाही वाटणार. हे नेहमीचेच आहे. उद्या सकाळी पुन्हा सहकुटुंब येतील. पंधरा दिवस डेरा टाकतील. उलट तुम्हीच टेंशन घेऊ नका. अगोदरच मला एक कोटी रूपये द्यावे लागणार. हा ताण शिवाय वरती वन्सचे हे टेंशन कशाला? चला सुरू करा. मी खूप तयारी केलीय. मी त्या क्षणासाठी आतूर झालेय आणि म्हणून भाऊजी, धनादेश देताना कोणतीही खोडी करायची नाही. सरळ-सरळ एक कोटी रूपये लिहायचे. करबीर काहीच काटायाचे नाही. मी डायरेक्ट कोर्टात जाईन हं. कसे आहे, मागे तेंडूलकरांच्या सचिनला ऑडी का फेरारी की सवारी अशी कोणती तरी कार बक्षीस मिळाली होती. तेव्हा त्यावरचा कर म्हणे सरकारने माफ केला होता तर मला का नाही? हा दुजाभाव का? सर्वांत महत्त्वाचं म्हणजे वेळ पडलीच तर माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही स्वतः किती कर भरता, शिवाय हा तुमचा बीझी टिव्ही किती कर भरतो याची माहिती मिळवीन. साऱ्या सेलीब्रिटींकडे प्रचंड कर थकलेला असतो. त्या सर्वांचा कर नील झाल्यावरच मी स्वत: होऊन टॅक्स भरीन. बरे, माझी शेवटची लाईफलाईन बाकी आहे हे केव्हा सांगणार?"
"वहिनी, तुमची परवानगी असेल तर तुम्हास कोट्यधीश बनविण्याची आतुरतेने वाट पाहणारा प्रश्न विचारू?"
"हो. हो. विचारा. मी ही त्या प्रश्नाची तेवढ्याच आतुरतेने वाट पाहतेय. विचारा.... " म्हणत निर्मलाताईंनी पुन्हा एकवार समोरच्या संगणकाची हळद, कुंकू, गुलाल वाहून मनोभावे पूजा केली. गुडघे टेकवून नमस्कार केला आणि त्या सज्ज झाल्या... कोट्यधीश मी होणार या कार्यक्रमातील शेवटच्या प्रश्नासाठी. मात्र त्या अचानक म्हणाल्या,
"पण सचित्रजी, शेवटच्या प्रश्नापूर्वी मी तुम्हास काही देऊ इच्छिते."
"काय?"
"तसे घाबरू नका. लाच वगैरे काही नाही. मी तुमच्यासाठी काही तरी आणलंय'
"माझ्यासाठी? मग आधी का नाही दिले?''
"हे सारे बघे म्हणाले असते ना, की खोडकरांना शंकरपाळे खाऊ घालून मी कोट्यधीश झाले."
"अरे वा! शंकरपाळे! माझी फेवरेट डिश आहे. तुम्हास कसे समजले?"
"माहितीच्या अधिकारातून ही तुमची आवडती डिश मिळाली."
"आणा वहिनी, आणा ...'' म्हणत सचित्रने त्यांच्या हातातील डब्यातून एक शंकरपाळे घेतले आणि मोठ्या आनंदाने ती दाताने तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु ती शंकरपाळी तुटली नाही. तेव्हा सचित्र म्हणाले,
"वहिनी, चव खूपच छान आहे. सारे घरी नेतो रात्रभर भिजवून सकाळी न्याहारी साठी घेतो. बरे, वहिनी, हा तुम्हास कोट्यधीश बनवू पाहणारा प्रश्न..."
"एक मिनिट, तुम्हीसुध्दा शांत राहायचे आणि प्रेक्षकांनी चिडीचूप व्हायचे. गोंधळ केलेला मला चालणार नाही.''
"धनी टाका, कोटीचा प्रश्न. आपला भारत देश..."
"आपला? मी तर अगदी पहिल्या वर्गापासून भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा..."
"वहिनी हाऊ ज्योकिंग! खरेच कमाल आहे हं. एक कोटी जिंकण्याची संधी दार ठोठावतेय तरी तुम्ही विनाटेंशन ज्योक करता..."
"कसे आहे, दारी आलेल्या संधीचे सोने कसे करायचे ते मला चांगलेच माहिती आहे. शिवाय वक्त से पहले और तकदीरसे ज्यादा नहीं मिलता। शायद मेरी तकदीर खुलने का वक्त आया है।"
"वा! वहिनी, भारताचे पहिले पंतप्रधान कोण ?
अ) पंडित नेहरू
ब) सरदार पटेल
क) महात्मा गांधी
ड) डॉ. राजेंद्र प्रसाद..."
"थांबा, एकदम सायलेंट हं. बिल्कुल गडबड नको. मला पूर्ण विचार करू द्या. तुमच्या बडबडीमुळे माझे लक्ष विचलित होईल. तुमचे काहीही नुकसान होणार नाही. महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण ते सत्तेत आले नाहीत तर किंगमेकर झाले! डॉ. राजेंद्रप्रसाद हे राष्ट्रपती होते म्हणजे तेही नाही. नेहरू आणि पटेल. दोघेही एकाच मंत्रीमंडळात असावेत. पण पंतप्रधान कोण? एक लाईफलाईन बाकी आहे. सचित्रजी मी शेवटची फोनाफोनी ही जीवनदायिनी वापरेन..."
"धनी, वहिनी त्यांच्या शेवटच्या जीवनदायिनीची मदत घेवू इच्छितात. कोणास फोन लावायचा?"
"शंकर साडे या माझ्या दिरास...."
"कुठे असतात शंकरजी?"
"ते पुण्याला एका मोठ्या कंपनीत इंजिनिअर आहेत. लाख रुपये महिना पगार उचलतात परंतु आम्हाला तर सोडा पण कायम आमच्याकडे असणाऱ्या त्यांच्या आईवडिलास कधी एक रूपयाही पाठवत नाहीत."
"तरीही तुम्ही त्यांना विचारणार?"
"काय करणार? प्रसंगच तसा बाका आहे. दिरालाच काका...."
"हॅलो, शंकरजी नमस्कार! मी सचित्र खोडकर बोलतोय."
"अरे बाप रे! सचित्रजी तुम्ही, बोला... बोला..."
"तुमच्या वहिनी मी कोट्याधीश होणार या कार्यक्रमात आहेत. एक कोटी रुपये जिंकण्यासाठी एक प्रश्न दूर आहेत. त्यांना त्यासाठी तुमची मदत हवी आहे."
"वहिनी, एवढे प्रचंड यश मिळवलेस आणि मला एका शब्दाने सांगितले नाही...."
"शंकर, वेळ कमी आहे. सांग... भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू की सरदार पटेल ?"
"काय हे वहिनी? चौदा प्रश्नांची उत्तरे कशी दिली हो. छे! कोटी रूपयांची आशा बाळगणाऱ्यास एवढे सोप्पे उत्तर येवू नये? बरे, सांगतो. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू होते."
"थँक्स शंकर! खोडकरजी, जवाहर नेहरू.... करा लॉक! आता काहीही बोलू नका."
"वहिनी, खरे सांगू का तुमचे उत्तर एकदम बरोबर... पण एक घोळ...."
"घोळ? तो कोणता? मला शंका होतीच की तुम्ही काहीतरी आडवा पाय मारणार आणि माझे कोट्यधीश होण्याचे स्वप्न आणि मेहनत उधळून लावणार. काय झाले ते सांगा.."
"वहिनी, धनी म्हणताहेत की तुम्हास चुकून पंधरा ऐवजी सोळा प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे तांत्रिक अडचण अशी आहे. की तुम्हाला हे बक्षीस देता येणार..."
"का नाही? प्रश्न पंधरा असोत की सोळा.... शेवटचा प्रश्न हा एक कोटी रूपयांचा असतो. सचित्रजी, तुम्हाला सांगते, मी तुमच्यावर या वाहिनीवर दोन कोटी रूपयांचा दावा ठोकणार.."
"दोन कोटी? तो का?"
"हे बघा. तुमची बक्षिसाची रक्कम चढत्या क्रमाने होती की नाही? एक हजार-दोन हजार - पाच-दहा - वीस...साडेबारा लाख रूपये - पंचवीस लाख रूपये आणि पन्नास लाखानंतर म्हणजे पंधराव्या प्रश्नासाठी एक कोटी रूपये! तुम्ही सोळावा प्रश्न विचारलाच असेल तर तुमच्याच क्रमाने एक कोटीच्या दुप्पट दोन कोटी! चला लिहा... दोन कोटी ! आणि तोही लगेच वटला पाहिजे. त्याशिवाय मी हे शहर सोडणार नाही."
"अरे बाप रे! निर्मलावहिनी, मी टाकलेल्या गुगलीवर काय सणसणीत षटकार ठोकलात हो. या या हा घ्या एक कोटी रूपयांचा धनादेश...." सचित्र खोडकरांकडून टाळ्यांच्या गजरात तो चेक घेवून कारमध्ये बसलेल्या निर्मलाबाईनी तो एक कोटींचा धनादेश पुन्हा बाहेर काढला आणि त्यांना कशाची तरी आठवण झाली. त्यांनी ब्लाऊजमध्ये लपवलेला पन्नास लाखांचा धनादेश काढला.
ते दोन्ही धनादेश त्यांनी कपाळावर, डोळ्यावर आणि हृदयाशी भक्तीपूर्वक लावले आणि पुन्हा ब्लाऊजमध्ये खोलवर सरकावले, जणू लॉकरमध्ये ठेवल्याप्रमाणे!...
                                                                   ०००                                           
                               
                                                          नागेश सू. शेवाळकर
                                                         ११०, वर्धमान वाटिका, फेज ०१,
                                                         क्रांतिवीरनगर, लेन०२,
                                                         हॉटेल जय मल्हारच्या जवळ,
                                                         थेरगाव, पुणे ४११०३३
                                                         संपर्क:- ९४२३१३९०७१