मागच्या काही वर्षांच्या शिरस्त्यानुसार गोसावी दांपत्य पंढरीच्या वारीला निघाले होते. त्यांची वृद्ध आई आणि किशोरवयीन मुलगी घरीच थांबले होते; एका अनामिक आशेने की त्यांचा हरवलेला लेक वारीत भेटला तर तिथे भेटावा किंवा तो घरी परतला तर घरी कोणीतरी असावं.
‘अहो, माझा विठोबा या खेपेला तरी भेटेल का ओ? कसा असेल माझा पोर? इतक्या वर्षात सावरला असेल का तो? कुठे आहेस रे विठा? चुकली रे तुझी आई, एकदा तरी भेट.’- साधनाच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रु वाहत होती. आधीच कृश झालेली तिची काया आपल्या लेकाच्या आठवणीत थरथरत होती.
‘साधना, अग पांडुरंगावर विश्वास ठेव. आपला विठोबा रुसला असला तरी हा जगाचा देव आपल्यावर जास्त दिवस रुसून रहायचा नाही बघ. एक ना एक दिवस तो आपली आणि आपल्या विठाची नक्कीच गाठभेट घालून देईल.’- आतून तुटलेले सुधाकर उसनं अवसान आणून बायकोला धीर देण्याचा प्रयत्न करत होते.
मागचे दहा वर्षे, दोघेही आपल्या हरवलेल्या मुलाच्या शोधार्थ पंढरीची वारी न चुकता करत होते. आजही मुखाने विठूनामाचा जयघोष करत ते मार्गक्रमण करत होतेच की एका ठिकाणी त्यांना गर्दी एकत्र जमा झालेली दिसली. कोणीतरी वारकऱ्यांसाठी मोफत चहाची सोय केली होती. अशी सेवा कित्येक जण करतात पण आज हि सेवा मांडणारे खास होते. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडणाऱ्या गतिमंद आणि दिव्यांग व्यक्तींनी आज वारकऱ्यांच्या सेवेचा वसा हाती घेतला होता.
गोसावी उभयतांनीही चहाचा आस्वाद घेतला आणि त्यांनी या सेवेनिमित्त काही पैसे समोरच्या मुलीला पुढे केले.
‘नको, नको पैसे नाही. देवबाप्पा रागवेल. आमची नाही मोडणार मी शिस्त. फ्री चहा आहे.’- पंचवीशीच्या आसपासची ती गतिमंद तरुणी निरागसतेने पैसे घेण्यासाठी नकार देत होती.
‘बाळ, पण हे आम्हीं तुमच्या कार्यात मदत म्हणून देत आहोत.’- साधना बोलली तरी समोरच्या मुलीला पाहूनच तिच्या डोळ्यांत पाणी आले होते.
‘ बोला.. दादूशी बोला.. विठा दादा, काकी पैसे देतात.’- त्या मुलीने त्या अखंड सेवेचे नियोजन करणाऱ्या तरुणाला आवाज दिला.
‘विठा!’- नाव ऐकूनच आशा जागी झालेल्या साधनाच्या तोंडून आपसूक आर्त हाक बाहेर पडली तसा समोरचा तरुण गर्रकन मागे वळला आणि एकत्रित सारेच स्तब्ध झाले.
‘ विठा, कुठे होतास रे इतकी वर्षे? एवढी मोठी शिक्षा दिलीस का रे माझ्या चुकीची?’- साधना भावनावेग आवरत भावुक नजरेने लेकाकडे पाहत बोलत होत्या.
‘मी नाही न काही कामाचा. मग..मग मी गेलो, तुला सगळे माझ्यामुळे ओरडायचे न. मी दगड होतो न. मग मी गेलो.’- विठोबा शब्द जुळवत बोलत असला तरी समोर त्याच्या लाडक्या आईला पाहून तोही हरखून गेला होता. काही वेळ स्टॉलच्या आसपासचे वातावरण काहीसे स्तंभित झाले होते.
‘विठा, अरे समाजाच्या टोमण्यांनी मी अन आई वैतागलो होतो. तुझ्या मनाची कधीच कदर केली नाही. तुझ्या निमित्ताने पांडुरंगाने टाकलेली खास जबाबदारी आम्हांला कळलीच नाही. तुझ्या आईला ती तेवढी कळली पण आम्ही तिलाच बोल लावायचो. तुम्हां दोघांना वेगळे करण्याचे कित्येक प्रयत्न केले पण असफल. तुझ्या आईला विश्वास होताच की तू एक ना एक दिवस आम्हांला चूक ठरवशील अन स्वतःच्या पायावर उभा राहशील. त्या दिवशी आधीच आजाराने बेजार असल्याच्या त्रागात ती तुला रागे भरली. तू मात्र तेवढंच डोक्यात ठेवून निघून गेलास. तू गेलास आणि आम्हांला तुझी पोकळी जाणवू लागली. तुझ्या आईने तर त्या दिवसापासून जगणंच टाकलंय रे. माफ कर आम्हांला.’- सुधाकर हात जोडून ढसाढसा रडत होते.
‘मी घरून गेला आणि गर्दीत हरवला. वारी चालली होती. आवडलं मला. मग मी त्यांच्याबरोबर गेला. देवबाप्पाला भेटला. सावळ्या काकांनी सांभाळलं. मी नंतर तुझ्यासाठी रडला, घर नाही सापडलं तर काकांनीच नेलं. शिकवलं मला. मी तुझ्यासाठी शिकला. तिथे माझ्यासारखे खूप होते. सावळ्या काकांनी सगळ्यांना शिकवलं. बघ आज आमचं हॉटेल आहे. पुण्यात. सावळ्या काकांनीच खोललं. मी.. मी मॅनेजर.. हि माझी भावंड. सावळ्या काका बाप्पाकडे गेले, आता मी यांना सांभाळणार. ‘- आपल्या लाडक्या विठू दादाला रडताना पाहून त्याच्या भोवती जमा झालेल्या मुलांच्या खांद्यावर हात टाकत विठोबा बोलत होता.
‘तू घरी नाही येणार, विठोबा?’- सुधाकरने रडवलेल्या स्वरात लेकाला विचारलं.
‘मी आलो तर यांना कोण सांभाळेल? तुम्हीं. तुम्हीं पुण्याला या. मी तुमची सेवा करेल. सावळ्या काकाला वचन दिलं आहे. यांना सांभाळणार.’- डोळ्यातले अश्रू उपड्या हाताने पुसत विठोबा बोलला तसे तिथल्या साऱ्यांनी घोळका करत त्याला एकत्रितपणे मिठी मारली.
सुधकराने हताशपणे बायकोकडे पाहिले तर ती भावविभोर होत लेकाकडे आणि त्याच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या त्याच्या नव्या भावंडांकडे पाहत होती.
आता तिथे निशब्द शांतता होती. अधूनमधून कुण्या जेष्ठ माऊलीच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या हरिनामाचा अस्पष्ट गजर ऐकू येत होता. सर्वांना साधनाच्या प्रतिक्रियेची उत्सुकता होती.
‘पांडुरंगा, आज माझी वारी सेवा संपुर्ण झाली रे. माझ्या स्वार्थासाठी सुरू केलेली सेवा तू मोठ्या मनाने रुजू करून घेतलीस. हे भगवंता, एका आईला याच्यापेक्षा अजून काय हवं रे? गतिमंद लेकरू पोटी दिलंस तेव्हा त्याच कसं होईल या काळजीत जीव तीळतीळ तुटायचा पण मी विसरले रे. त्याच नाव विठोबा ठेवलं तेव्हाच कळलं की तू तुझ्या नावाला जपणारच. आज त्याला इतरांसाठी स्वतःच सुख दूर करताना पाहून माझा ऊर भरून आलाय रे! एका आईला अजून काय हवं? मी भरून पावली रे देवा, भरून पावली. माझे दोन्हीं विठोबा मला आज अनुभवायला मिळाले.’- साधनाने लेकासमोरच लोटांगण घातलं तसं जमलेल्या गर्दीला एकच चैतन्य आलं आणि विठू नामाचा एकच जयघोष आसमंतात निनादला.
साऱ्या वारकऱ्यांची विठोबाचे दर्शन घेण्यासाठी झुंबड उडाली. कित्येक आयांचे, आजी आजोबांचे आशीर्वादपर हात लेकाच्या चेहऱ्यावर फिरताना पाहून गोसावी उभयतां भरून पावले होते. काही वयस्कर मंडळींनी त्या दोहोंचेही सांत्वन करत धीर दिला होता. एकमेकांचें पत्ते घेत माय-लेकरांनी एकमेकांचा निरोप घेतला होता.
‘आता माझ्या विठोबाला एखादी छान जोडीदार भेटू दे म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी’- नकळतपणे आईच लोभी हृदय देवाच आर्जव करत होत.
‘आई. थांब. बाबा..’- विठोबाने आवाज दिला.
‘हि रुक्मिणी. सावळ्या काकाने लग्न लावून दिलं. माझी. माझी रुक्मिणी!’- बायको शब्द उच्चरायला कचरत असलेल्या विठाच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली होती.
‘हे पण ऐकलस का रे? लगेच पुर्णही केलंस. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तुझी वारी करेल रे पांडुरंगा!’- पोलिओने एक पाय निकामी झाला असला तरी तेजपुंज चेहऱ्याच्या सुनेला पाहूनच साधनाच्या जीवाला समाधान लाभले होते.
‘आता लगेच बाळकृष्ण मागू नकोस हा.’- लेकाच्या तोंडून वाक्य ऐकता क्षणी साधना तिनताड उडालीच.तिने चमकून विठोबाकडे पाहिला तर तो अगदीच नटखटपणे कंबरेवर हात ठेवून हसत होता.
पुनः एकदा गर्दीत गजर उसळला होता-‘ हरी ओम विठ्ठलाss ‘
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा