Login

आज - राजमाता जिजाऊ यांची जयंती...

Jijau


राजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री....

त्यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ ला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे लखुजी जाधव यांच्या घरी झाला.

त्यांच्या पत्नी म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई ह्या जीजाऊंच्या माता. म्हाळसाबाई या निंबाळकर घराण्याच्या होत्या. लखुजी जाधवांना दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि महादुजी हे चार पुत्र आणि जिजाऊ ही एककन्या अशी पाच अपत्ये होती.

शिक्षण,तत्कालीन सुखवस्तू मराठा मुलीप्रमाणे जिजाऊंचे योग्य संगोपन करण्यात आले. त्या दांडपट्टा, अश्वारोहण वगैरे युद्ध कलांमध्ये देखील पारंगत होत्या.

जिजाऊंचा विवाह मालोजी राजे भोसले यांचे चिरंजीव शहाजी राजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे डिसेंबर १६०५ साली मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मालोजींना निजामशहाकडून पाचहजारी मनसब, शिवनेरी व चाकण हे किल्ले आणि पुणे व सुपे हे दोन परगणे जहांगीर म्हणून मिळाले. शहाजीराजांनी जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यात सुरक्षित ठेवले.

 येथेच १९ फेब्रुवारी १६३० साली जिजाऊंनी शिवबांना जन्म दिला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. जिजाऊंचे पती शहाजीराजे फार पराक्रमी सेनानी होते. त्यांनी पुण्याजवळील अहमदनगर व विजापूर प्रदेश काबीज करून आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले.

ई.स.१६३९ ते १६४७ या काळात शहाजी राजांनी पुण्यात झांबरे पाटलाकडून जागा विकत घेऊन लाल महाल नावाचा राजवाडा बांधला. जिजाऊ व शिवाजी यांचा मुक्काम लाल महालातच होता.

जिजाऊंच्या आज्ञेत शिवाजी महाराज सवंगड्यासोबत युद्ध कला शिकू लागले. तान्हाजी मालुसरे, सूर्याजी काकडे, येसाजी कंक, बाजी ही शेतकऱ्यांची मुले शिवाजींचे जिवलग मित्र झाले. शिवाजीसह सर्वजण जिजाऊंच्या आज्ञेनुसार वागत असत.

१६ मे १६४० साली जिजाऊंनी शिवाजीचा विवाह निंबाळकरांच्या सईबाईशी लावून दिला. यावेळी शहाजी विजापुरतर्फे बंगलोर येथे असल्यामुळे लग्नास येऊ शकले नव्हते. अशा रितीने जिजाऊंनी निंबाळकरांच्या मुलीच्या (सईबाई) सासू बनल्या.

तर वणजोगी निंबाळकरांची मुलगी दीपाबाई (मालोजीची पत्नी) या जिजाऊंच्या सासू होत्या. २५ जुलै १६४८ साली ‘जिजा’ येथे शहाजी यांना कपटाने कैद केले. हे काम वजीर मुस्तफा खान याचे होते.

१६ मे १६४९ रोजी जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीने शहाजींची सुटका केली. शिवाजी महाराजांनी १० नोव्हेंबर १६५९ साली अफझलखानाचा वध केला.

शिवरायांनी जिजाऊंच्या हाती राज्यकारभाराची सुत्रे सोपवली आणि ५ मार्च १६६६ साली राजगडवरून आग्राकडे प्रयाण केले. 

१७ जून १६७४ बुधवार रात्री जिजामातेने डोळे मिटले. महाराजांवरचे मायेचे छत्र हरवले. मराठा साम्राज्याचा प्रवर्तक पालनकर्ता आईविना पोरका झाला.

अश्या या जिजाऊंच्या कार्याला आणि त्यांच्या त्यागांना मानाचा मुजरा.. या राष्ट्र्मातेवर ज्या ठिकाणी संस्कार झाले ते ऐतिहासिक स्थळ म्हणजे सिंदखेडराजा. आज हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखल्या जाते.

दरवर्षी येथे जिजाऊंच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘जिजाऊ महोत्सव " साजरा केला जातो.

नमस्कार... सौ... सोनल गुरुनाथ शिंदे..... ( देवरुख - रत्नागिरी )

0