झुले उंच माझा झोका

.


स्पर्धा : राज्यस्तरीय लघुकथा करंडक
विषय : आणि ती हसली
कथा : झुले उंच माझा झोका
टीम : छत्रपती संभाजीनगर


आज देवकीच्या घरी पत्रकारांनी गर्दी केली होती. देवकीची मुलगी पूर्वा सर्वाना मुलाखती देत होती. देवकी सातव्या आसमंतात होती. का नसणार ?लेकीने नाव काढले होते. पूर्वा यूपीएससी परीक्षेत पूर्ण भारतात पहिली आली होती. देवकीचा हर्ष तो काय वर्णावा ? नेत्रांतून आनंदाश्रू वाहत होते.

" मॅडम , तुम्ही आईचे नाव लावतात यामागे काही कारण ?" एका पत्रकाराने प्रश्न विचारला.

हा प्रश्न ऐकताच देवकीचे डोळे पाणावले. कुणीतरी मनावर असलेली जुनी खपली उपटून काढली होती. आसवांच्या रूपात मनाचे रक्तच वाहू लागले होते. देवकी भूतकाळात गेली.

***

संध्याकाळचा प्रहर होता. देवकीला तिच्या नवऱ्याने आणि सासूने सामानासहित घराबाहेर फेकले. देवकी एकटी नव्हती. जन्म घेऊन एक वर्षही न झालेली पूर्वा तिच्या हातात होती.

" विवेक , अरे ऐक तरी. या सर्वात आपल्या बाळाचा तरी काय दोष ?" देवकीने रडत विचारले.

" आपल्या ? ही मुलगी माझी नाही. माझे नावही नको लावू या कार्टीला. उद्या हिलाही कोड फुटेल. शेवटी तुझ्याच पोटी जन्मली ना ती. मला माझ्या घरी नकोत असली माणसे. आयुष्यात तुझे थोबाडही नको दाखवू. लग्नाआधीच माहीत असते की तुला कोड फुटणारे तर कधी जवळही फिरकलो नसतो. " विवेक रागात म्हणाला.

" हो ना. मी तर तेव्हाच म्हणले तुला की अनाथ मुलीशी लग्न नको करू. आता घटस्फोट देऊन कायमचा संबंध तोड या अवदसेशी. " विवेकची आई म्हणाली.

देवकीने हातपाय जोडले. पण विवेकने घराची दारे बंद केली ती कायमची. देवकीने खूप दार आपटले. पण त्याने दार उघडले नाही. देवकी जवळच्या बागेत गेली. तिथे लोकांची गर्दी होती. लहान मुले आपल्या पालकांसोबत आली होती. देवकी एका खुर्चीवर बसली होती. तिचे लक्ष एका रिकाम्या झोक्याकडे गेले. मनात विचारांचे काहूर माजले. एक काळ होता जेव्हा विवेक आपल्याला अश्याच झोक्यावर बसवून किती उंच झोके द्यायचा. अनाथ असूनही विवेक किती प्रेम करायचा आपल्यावर. आपल्याशी लग्न व्हावे म्हणून घरी भांडला. एकक्षण वाटले की आपल्या जीवनाची सर्व दुःखे संपली , एकटेपणा संपला. विवेकच्या मिठीत स्वर्ग लाभला. प्रेमवेलीवर वर्षभरातच फुल खुलले. पूर्वाने देवकीचे कुटुंब पूर्ण केले. सर्वकाही सुरळीत चालू असताना क्षणार्धात प्रेम द्वेषात बदलले. आपल्याला कोड फुटले आहे हे जेव्हा विवेकला कळले तेव्हा त्याने किती घाणेरडे आरोप लावले. त्याला वाटले आपणच जाणूनबुजून ही गोष्ट लपवली. विवेक खरच आपल्यावर प्रेम करायचा की आपल्या रूपावर ? देवकी या विचारात मग्न असताना पूर्वा रडू लागली. देवकी भानावर आली. वॉचमनने शिट्टी वाजवली.

" ओह मॅडम , चला. गार्डन बंद करायची वेळ झाली." तो ओरडला.

देवकी निघाली. कुठे जाणार होती तिलाही ठाऊक नव्हते. पण आईला आपल्या काळजाच्या गोळ्याला भूक लागली आहे हे कळत होते. एकेठिकाणी बसून ती पूर्वाला दूध पाजवू लागली. तेवढ्यात दोन गुंड तिथे आले. त्यांच्या अंगातून दारूचा प्रचंड वास येत होता. हातात सिगरेट जळत होती. त्यांचे लक्ष देवकीच्या स्तनांकडे गेले. त्यांनी जिभेने ओठ ओले केले.

" थोडं आम्हाला बी चाटू दे ना. " एकजण म्हणाला.

दुसरा हसला. दोघेही देवकीजवळ असुरी हास्य करत येऊ लागले. देवकी उठली. सावरली. ती पळणार इतक्यात दोघांनी तिला घेरले.

" तुझ्या नवऱ्याने तुला टाकले आहे वाटते. काळजी करू नको. आम्ही दोघे ती उणीव पूर्ण करू. " त्यापैकी एकजण म्हणाला.

मग दुसऱ्याने तिचे वस्त्र फाडले. ती किंचाळली. मदतीची याचना करू लागली. गयावया करू लागली. पण त्या रस्त्यावर कुणीच नव्हते. तेवढ्यात तिथे एक तृतीयपंथी टाळी वाजवत आला.

" अकेली औरत देखी तो मर्दानी चढती है. आजा मैं प्यार करती हू. लहानपणी तुम्हीही आईचे दूध पिले असेल तेव्हाही असाच विचार केला होता का ?" तो तृतीयपंथी म्हणाला.

" ए तू जा. तुला काय करायचे ?" एकजण घाबरत म्हणाला.

त्या तृतीयपंथीने त्याच्या पिशवीतून कोयता काढला.

" निकल. पेहली फुरसत में निकल. " तो तृतीयपंथी कोयता दाखवत म्हणाला.

ते दोन्ही गुंड पळून गेले. देवकी आपल्या बाळासहित त्या तृतीयपंथीच्या झोपडीत आली.

" घाबरू नको. छक्का आहे मी. काही करणार नाही तुला. हे बघ. ही दुनिया खूप वाईट आहे. ती आपल्याला त्रास देणार. पण आपण घाबरायचे नाही. एकदा घाबरले की लोक अजून घाबरवतात. बिर्याणी खायेगी ?" त्या तृतीयपंथीने विचारले.

" मला विष द्या. मला जगण्याची इच्छा नाही. " देवकी रडत म्हणाली.

" का इच्छा नाही ? तू एक आई आहेस हे विसरू नको. जगात आईहून सामर्थ्यवान कुणी नसते. नारायणालाही अवतार घेण्यासाठी देवकी-कौशल्या यांची गरज पडली. सीता क्षणात भूमीत सामावू शकली असती पण लवकुशसाठी जगली. महाराणी अहिल्याबाई जेव्हा रयतेची आई बनली तेव्हा तिला " पुण्यश्लोक " पदवी भेटली. ही पदवी पुराणातील आहे. कलियुगात खूप कमी जणांना भेटली आहे. जिजाऊ जेव्हा शिवबा घडवते तेव्हा सह्याद्रीत मराठ्यांचे सार्वभौम तख्त उभे राहते. राणी लक्ष्मीबाई जेव्हा पाठीवर बाळाला बांधून रणचंडी बनून लढते तेव्हा इंग्रजांनाही पळता भुई थोडी करते. तुला लढावेच लागेल. तुला संघर्ष करावाच लागेल. आई जगदंबा तुझ्या पाठीशी आहे. " तो तृतीयपंथी म्हणाला.

देवकीला हुरूप आला.

***

देवकी पदवीधर असल्यामुळे तिने लगेचच नोकरी शोधायला सुरुवात केली. पण एक अडसर होता तो पूर्वाचा. पण पूर्वाला दुसरीकडे सोडता येणेही शक्य नव्हते आणि परवडणारेही नव्हते. अश्यावेळी देवकीला तिचे अनाथाश्रम आठवले. तिने तिथे संपर्क केला. अनाथाश्रमचे प्रमुख गोविंदराव कुलकर्णी हे देवकीची कथा ऐकून हळहळले. त्यांनी आनंदाने देवकीला आश्रय दिला. देवकीला एकेठिकाणी नोकरीही लागली. दिवसभर पूर्वाला अनाथाश्रमात ठेवून देवकी नोकरी करायची. तिचा जीव फार तुटत असे. पण पर्याय नव्हता. अनाथाश्रमातील लोक मात्र पूर्वाची खूप काळजी घ्यायचे. हळूहळू देवकी स्थिरस्थावर झाली. तिने दुसरे घर भाड्याने घेतले. पूर्वाही मोठी होऊ लागली. शाळेत देवकीने पूर्वासोबत स्वतःचे नाव लावले. खूप काबाडकष्ट करून देवकीने पूर्वाला मोठे केले. आयएएस अधिकारी बनून पूर्वाने देवकीच्या कष्टाचे चीज केले होते.

***

" माझी आई सिंगल मदर आहे. मला तिचा खूप अभिमान आहे. ती नसती तर मी नसते. तिच्यापायी मी घडले. नाव का लावले विचारण्यापेक्षा नाव का लावायचे नाही याचे एक कारण द्या. " पूर्वा म्हणाली.

सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

***

संध्याकाळी पूर्वा देवकीला घेऊन एका बागेत आली.

" पूर्वा , अधिकारी झाली म्हणून डोक्यात हवा शिरू देऊ नको. भ्रष्टाचार नको करू. जनतेची सेवा कर. तृतीयपंथीसाठी जेवढे करता येईल तेवढे कर. जेव्हा पुरुषांनी तुझ्या आईला त्रास दिला तेव्हा एक तृतीयपंथीच मदतीसाठी आला होता हे लक्षात ठेव. " देवकी म्हणाली.

" हो ग. आई , तुला आठवते का लहानपणी तू मला असच बागेत घेऊन यायची. मी तुला सतत विचारायचे की माझे बाबा कुठे आहेत पण तू उत्तर देत नव्हती. माझ्या मैत्रीणी मला खूप चिडवायच्या. कारण माझ्या आईला कोड फुटले होते ना. मी रडत घरी यायचे. पण खरं सांगू लोकांसाठी तू कशीही असली तरी माझ्यासाठी तू जगातील सर्वात सुंदर स्त्री आहेस. तू मला झोक्यावर बसवून उंच झोका द्यायचीस. त्यानेच मला आकाश कवेत घेण्याची प्रेरणा भेटायची. पण आज मी तुला झोका देणार. तू डोळे मिटवून फक्त मनसोक्तपणे झोका घे. आता ठरवले आहे की तुझ्या डोळ्यातून एकही अश्रू गळू देणार नाही. " पूर्वा म्हणाली.

देवकी झोक्यावर बसली. कदाचित गेल्या पंचवीस वर्षात पहिल्यांदाच. पूर्वाने झोका दिला. देवकीने गच्च डोळे मिटले. तिला दिसला कोड फुटल्यावर हाकलून देणारा पती विवेक , टोमणे मारणारी सासू , अब्रू लुटायचा प्रयत्न करणारे गुंड , मदत करणारा तृतीयपंथी. वारा तिच्या देहाला स्पर्शून जात होता. जणू जखमांवर फुंकर मारत होता. देवकी हसली. मनसोक्तपणे समाधानाने हसली. जीवनात लढल्याचे आणि स्वाभिमान राखल्याचे समाधान.

झिजे पायरी होऊन जन्म चंदनासारखा
येई कवेत आकाश झुले उंच माझा झोका !

©® पार्थ धवन