लग्न झालं तरी विलासरावांच संसारात मन लागतं नव्हतं. विशालाक्षीने त्यांना भेटण्यासाठी छोट्या पोरांकडून खूपदा निरोप पाठवले, पण दरवेळेस काहीतरी कारण काढून विलासराव तिला भेटणं टाळायचे, ते विशालाक्षीच्या मुलीच्या बारश्याला सुद्धा गेले नाही. लग्न झाल्यापासून वैशालीसोबत बोलताना चुकून आपल्या तोंडून विशालाक्षीच नाव आलं तर! ही भीती सतत विलासरावांच्या मनात असायची. शेवटी त्यांनी विशालाक्षीला भेटून तिच्याशी असलेले संबंध संपवायचे ठरवले.
****
जवळपास चार वर्षांनी विलासराव विशालाक्षीला भेटायला आले होते. बाहेर एक छोटी मुलगी खेळण्यांसोबत खेळत होती. विलासरावांनी एक नजर त्या मुलीकडे पाहिले आणि घरात आले, तशी त्यांची नजर समोरच्या भिंतीवर लावलेल्या एका ब्लॅक अँड व्हाईट फोटोफ्रेमवर गेली. जो विशालाक्षी आणि बाहेर बसलेल्या छोट्या मुलीचा होता. त्यांनी विशालाक्षीकडे पाहिलं, जी गुणगुणत मडक्यात रवी घुसळून दह्याच लोणी काढत होती.
"विशू.." विलासरावांनी प्रेमाने तिला हाक मारली. आवाज ओळखीचा वाटल्याने विशालाक्षीने नजर वर करून समोर पाहिले
"तुमची हिंमत कशी झाली इथे यायची?" विशालाक्षी रागात म्हणत जागेवरून उठली, तसा विलासरावांनी दरवाजा आतून लावून घेतला.
"विशू, तू का असं का म्हणतेयस? आम्ही बोललो होतो ना, तुला भेटायला येऊ." विलासराव बाजेवर बसत म्हणाले
"तुम्ही बोललेल्या गोष्टीला चार वर्षे उलटून गेलीत साहेब." विशालाक्षी उपहासात्मकपणे म्हणाली
"हो, मला माहितीये. ते मी एका कामात व्यस्त होतो." विलासराव नजर खाली घेतं नरम आवाजात म्हणाले
"कामात की, लग्न करण्यात!" विशालाक्षी असं म्हणताच विलासरावांनी तिच्याकडे थक्क होऊन पाहिलं
"साहेब, इथे मी तुमच्याशी लग्न करून तुमच्यासोबत संसार थाटण्याची स्वप्न बघतेय आणि तुम्ही माझा जराही विचार न करता दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं." विशालाक्षी दुखऱ्या स्वरात म्हणाली
"माझं ऐकून घे विशू..," विलासराव पुढे बोलणार तेवढ्यात,
"खबरदार! मला विशू म्हणालात तर, तो हक्क तुम्ही त्यादिवशीच गमावलात ज्यादिवशी तुम्ही दुसऱ्या मुलीशी लग्न केलत. (रागाच्या नजरेने पाणावलेल्या डोळ्यांनी) काय कमी होतं हो माझ्यात? सांगाना, जे तुम्ही दुसऱ्या मुलीशी लग्न केलत. मी तुमच्यावर प्रेम केलं, तुम्हाला माझं सर्वस्व अर्पण केलं, तुमचा अंश माझ्या उदरी वाढवला आणि त्याबदल्यात तुम्ही मला काय दिलत? तर फसवणूक! बोला ना, का केलीत माझी फसवणूक? बोला.." विशालाक्षीने विलासरावांची कॉलर पकडत त्यांना जाब विचारला. आज एवढ्या वर्षांनी मनातली सगळी भडास ती बाहेर काढत होती.
"माझा नाईलाज होता." विलासराव स्वतःची कॉलर सोडवत चिडत म्हणाले
"नाईलाज.. कसला नाईलाज? तुमच्या आईने गळ्यावर कोयता ठेवून तुम्हाला लग्नासाठी उभ केलेलं का?" विशालाक्षीने चिडून विचारलं
"विशालाक्षी, (मोठ्या आवाजात) आईबद्दल बोलताना विचार करून बोलायचं." विलासरावांनी नजरेनेच तिला ताकीद दिली, तशी विशालाक्षी नरमली.
रत्ना बाईंच्या बाबतीत विलासराव हळवे होते. त्यांच्याबद्दल कोणीही वाईट बोललेल त्यांना सहन व्हायचं नाही.
"मगाशी तुम्ही म्हणालात, तुमचा नाईलाज होता म्हणजे तुम्ही ह्या लग्नाने खूष नाहीय ना. (स्वतःचे डोळे पुसत) चला, आपण आताच्या आता वाड्यावर जाऊ आणि वैशालीला व रत्ना काकूंना आपल्या प्रेमाबद्दल सगळं सांगू. त्या आपल्याला नक्की समजून घेतील." विशालाक्षी विलासरावांचा हात पकडून त्यांना नेणार तेवढ्यात, विलासरावांनी तिच्या हातातून हात सोडवून घेतला.
"ते आता शक्य नाही." विलासराव शांतपणे म्हणाले
"का शक्य नाही?" विशालाक्षीने विचारलं
"कारण माझं वैशालीसोबत लग्न झालंय आणि आम्ही तिच्यासोबत सुखी आहोत." विलासराव म्हणाले, तशी विशालाक्षी दोन पावलं मागे सरकली.
"व्वा.. विलासराव व्वा! शेवटी दाखवलेतच ना, स्वतःचे खरे रंग." विशालाक्षी म्हणाली, तसं विलासरावांनी तिच्याकडे चमकून पाहिलं. विशालाक्षीने पहिल्यांदा त्यांना नावाने हाक मारली होती.
"जेव्हा आपल्या प्रेमाबद्दल माझ्या आजीला कळलं, तेव्हा तिने मला समजावलं की, मोठ्या लोकांच्या नादी लागण्यात काहीचं अर्थ नाही. त्यांचं मन भरलं की, निघून जातात अन् आपण बसतो आयुष्यभर त्यांची वाट पाहत कधीतरी ते आपल्याला आपलंसं करतील ह्या आशेवर! पण मी तिला सांगायचे. माझे साहेब तसे नाहीयेत. माझे साहेब इतरांपेक्षा वेगळे आहेत, पण आज तुम्ही तो विश्वास खोटा ठरवलात. साहेब, बोला ना का वागलात असं? तुमचं कधीचं प्रेम नव्हतं का माझ्यावर?" विशालाक्षी विलासरावांना गदागदा हलवत विचारू लागली, तरीही विलासराव शांतच होते.
"ठिक आहे, तुम्हाला काहीचं बोलायचं नाहीय ना. मग मी स्वतः वाड्यावर जाऊन रत्ना काकूंना आपल्या प्रेमाबद्दल सगळं सांगते." विशालाक्षी म्हणाली आणि बाहेर जाऊ लागली, तसे विलासराव तिला अडवायला मध्ये येऊन ऊभे राहिले.
"विशालाक्षी, तू कुठे जाणार नाहीयेस." विलासराव तिला ताकीद देतं म्हणाले
"तुम्ही मला धमकी देताय. बघतेच, मला कोण अडवतंय." विशालाक्षी विलासरावांच्या डोळ्यांत आरपार बघत म्हणाली आणि दाराची कडी काढू लागली.
तसं विलासरावांनी तिला अडवायला तिचा हात पकडला आणि रागात तिला समोरच्या भिंतीवर आपटलं. तशी पुढच्याक्षणी विशालाक्षी जमिनीवर कोसळली. सगळं एवढं अचानक घडलं की, विलासरावांना काही सुचेनास झालं. ते विशालाक्षीला उठवू लागले. तसं तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं म्हणून त्यांनी एक नजर भिंतीवर पाहिलं. भिंतीवर टोकदार खिळा होता जो विशालाक्षीच्या डोक्यात घुसला होता. आपल्या हातून विशालाक्षीचा खून झाला, हे कळताच विलासराव सैरभैर झाले.
तेवढ्यात, विशालाक्षीने केसांत माळलेला गजरा जमिनीवर पडलेला त्यांना दिसला आणि त्यांना एक प्रसंग आठवला.
****
"साहेब, अहो अजून कितीवेळ डोळे झाकून ठेवणार आहात?" बंद डोळ्यांनी विशालाक्षीने विलासरावांना विचारलं
"हा, आता उघड डोळे." विशालाक्षीच्या डोळ्यांवर ठेवलेला हात काढत विलासराव म्हणाले, तसे विशालाक्षीने डोळे उघडताच तिला मोगऱ्याचा सुगंध आला, तसं तिचं लक्ष विलासरावांच्या हातातल्या गजऱ्याकडे गेलं.
"गजरा.." विशालाक्षी आनंदाने म्हणाली
"हो, मग! आज तू गजरा माळायला विसरलीस." विलासराव तिच्या केसांत गजरा माळत म्हणाले, तशी विशालाक्षीने स्वतःच्याच डोक्यात टपली मारली
"तू नेहमी केसांत गजरा माळत जा. ह्या गजऱ्यामुळे तुझ्या सौंदर्यात आणखी भर पडते. जेव्हा जेव्हा हा गजरा तू केसांत माळतेस, तेव्हा तेव्हा आपल प्रेम ह्या गजऱ्याच्या सुवासाप्रमाणे अधिक बहरतं." तिच्या केसातल्या गजऱ्याचा सुगंध स्वत:च्या श्वासात भरून घेत विलासराव म्हणाले, त्यावर विशालाक्षीने लाजून होकारार्थी मान हलवली.
****
तो प्रसंग आठवाताच विलासरावांचे डोळे पाणावले. ज्या प्रेमाने कधीकाळी तो गजरा विलासराव विशालाक्षीच्या केसांत माळायचे, आज त्यांच्याच कृत्यामुळे तो गजरा रक्तात माखलेला. त्यांनी विशालाक्षीला खाली ठेवलं आणि बाजेवर अंथरलेल्या चादरीने आपले रक्ताळलेले हात पुसले.
तेवढ्यात, त्यांना दाराच्या फटीतून कोणीतरी आत पाहत असल्याच जाणवलं. तशी त्यांना बाहेरची छोटी मुलगी आठवली. पटकन त्यांनी दार उघडलं, पण बाहेर कोणीच नव्हतं. त्यांनी दरवाजा बाहेरून लावून घेतला आणि ते आजूबाजूला बघू लागले, तशी एक मुलगी धावत नदीच्या दिशेने जाताना त्यांना दिसली.
****
विलासराव तिच्या मागोमाग नदीवर गेले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला, तशी ती मुलगी दचकली. तिच्या डोळ्यातलं पाणी बघून विलासरावांच्या हृदयात कळ उठली. त्यांनी तिला वाड्यात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, 'पण आई आणि वैशालीला काय सांगायचं? ह्या मुलीला कुठून आणि का घेऊन आलोय?' जे होईल ते बघून घेऊ. हा विचार करून ते तिला वाड्यावर घेऊन आले. तेव्हाच वैशाली आई होणार असल्याची बातमी त्यांना कळली. हा त्या मुलीचाच पायगुण समजून त्यांनी तिला वाड्यातच सहारा देऊन तिचं नाव चिंगी ठेवलं.
एकेदिवशी विलासरावांनी वैशाली ताईंसाठी मोगऱ्याचा गजरा आणलेला. तो पाहून चिंगी वॉयलंट झाली. वैशाली आणि रत्ना बाई प्रश्नार्थक नजरेने विलास रावांकडे पाहू लागल्या.
क्रमशः
✍️नम्रता जांभवडेकर
(रत्ना बाई आणि वैशालीच्या प्रश्नाला काय उत्तर देतील विलासराव? वाचूया पुढील भागात)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा